You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तान: इम्रान खान आणि विरोधी पक्षांच्या भांडणात 'पोलीस दलाचं बंड'
पाकिस्तानमध्ये गेल्या आठवड्यात विचित्र घडामोडी पाहायला मिळाल्या. या घटनाक्रमांमुळे पाकिस्तानातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
यंदाच्या वेळी सत्तेशी संबंधित कुरघोडींमध्ये राजकीय पक्ष आणि लष्कर तर आहेच. पण सोबतच पोलीससुद्धा यावेळी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे.
पाकिस्तानात पहिल्यांदाच पोलिसांनी अशा प्रकारच्या घडामोडींमध्ये उडी घेतली आहे. पहिल्यांदाच एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचं अपहरण करण्यात आलं. त्या अधिकाऱ्याकडून एका नेत्याच्या अटक आदेशावर सही करून घेण्यात आली, असं सांगण्यात येत आहे.
या नेत्याचं नाव आहे लष्करातील निवृत्त कॅप्टन मोहम्मद सफदर. यांची विशेष ओळख म्हणजे मोहम्मद सफदर हे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे जावई आहेत.
पोलिसांनी हा विषय प्रतिष्ठेचा बनवला आहे. संबंधित अधिकारी आणि त्यांच्यासारख्या इतर अनेक अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांच्या सुटीसाठी अर्ज केला आहे.
या प्रकरणाची दखल आता लष्करानेही घेतली आहे. लष्करप्रमुखांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या सुटीचा अर्ज 10 दिवसांसाठी पुढे ढकलला आहे.
या प्रकरणी आता सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. पण असं होण्याची ही काय पहिलीच वेळ नाही. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींपैकी एक भाग म्हणून याकडे पाहिलं जाऊ शकतं.
पाकिस्तानात विरोधी पक्षाने महागाई, वीजटंचाई आणि इतर आर्थिक मुद्द्यांवरू इम्रान सरकारची कोंडी करण्यास सुरुवात केली होती. विरोधी पक्षांनी मिळून पाकिस्तान डेमोक्रटिक मूव्हमेंट (PDM) नामक एक आघाडी बनवलीय.
यामध्ये पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज), पाकिस्तान पीपल्स पार्टी, जमियत-उलेमा-ए-इस्लाम (फजलूर) आणि पख्तुनख्वाह अवाम पार्टी यांचा समावेश आहे.
PDM ने सरकारवर हल्लाबोल करताना या महिन्यात दोन सभा घेतल्या. 16 ऑक्टोबरला गुजरांवाला आणि 18 ऑक्टोबरला सिंधची राजधानी कराचीमध्ये या सभा झाल्या.
दुसऱ्या सभेनंतर पुढच्याच दिवशी हे प्रकरण सुरू झालं.
19 ऑक्टोबरला काय घडलं?
18 ऑक्टोबरला सभा पार पडल्यानंतर पुढच्याच दिवशी पहाटे मोहम्मद सफदर यांना पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्या थडग्याचा अनादर केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
त्यांना नंतर जामिनावर सोडण्यात आलं. संध्याकाळी ते लाहोरला परतले.
मोहम्मद सफदर सभेच्या दिवशी म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी कराचीमध्ये त्यांची पत्नी मरियम आणि पक्ष कार्यकर्त्यांसोबत जिन्ना यांच्या कबरीजवळ गेले होते. तिथं त्यांनी जमाव जमवून घोषणाबाजी केली होती. यामुळेच त्यांना अटक करण्यात आली होती.
नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज आणि विरोधी पक्ष या अटकेला राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई असल्याचं संबोधत आहेत. पोलिसांनी ही अटक केली असली तरी लष्कराचा त्या मागे हात होता, असा त्यांचा दावा आहे.
कराचीमध्ये ज्या हॉटेलात मरियम आणि त्यांचे पती वास्तव्यास होते, त्या खोलीचा दरवाजा तोडून पोलिसांनी आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते झोपलेले होते.
पत्रकार परिषदेत मरियम यांनी सांगितलं, "पहाटे आम्हाला जाग आली तेव्हा कुणीतरी मोठ-मोठ्याने दरवाजा वाजवत होतं. मी पतीला पाहायला सांगितलं. बाहेर पोलीस आले होते. मोहम्मद यांना अटक करण्यासाठी आम्ही आलो आहोत, असं त्यांनी सांगितलं. कपडे बदलून औषध घेऊन येतो, असं मोहम्मद यांनी सांगितलं. पण पोलीस ऐकले नाहीत. त्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला."
कराचीच्या पोलीस महानिरीक्षकांचं अपहरण करून त्यांच्याकडून जबरदस्तीने अटक आदेशावर सही घेण्यात आली, असा आरोप मरियम नवाज आणि लंडनमध्ये उपचार घेत असलेले त्यांचे वडील नवाज शरिफ यांनी केला आहे.
पाकिस्तानमधील एका पत्रकाराने PML(N) चे ज्येष्ठ नेते मोहम्मद झुबैर यांचा एक ऑडिओ क्लिप ट्वीट केला होता. यामध्ये पोलीस महानिरीक्षक अटक करण्यास नकार देतात, तेव्हा त्यांना सेक्टर कमांडरच्या कार्यालयात नेण्यात आलं, तिथूनच आदेश जारी करण्यात आले, असं सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली हे सांगतात.
सिंध प्रांतात पाकिस्तान पीपल्स पार्टीचं म्हणजेच विरोधी पक्षाचं सरकार आहे. पण यात त्यांचा हात आहे, असं मरियम नवाज यांना वाटत नाही.
PPP चे प्रमुख बिलावल भुट्टो यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या बोलण्यात नाराजी दिसून आल्याचं मरियम यांनी सांगितलं.
पण सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली यांनी पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई केल्याचं सांगितलं.
20 ऑक्टोबर: सुटीवर जाण्याचा निर्णय
नवाज शरीफ यांच्या जावयाच्या अटक प्रकरणानंतर पुढच्याच दिवशी सिंध प्रांतातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी सुटीवर जाण्यासाठी अर्ज केले. यामध्ये अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक इमरान याकूब हेसुद्धा होते.
त्यांनी सुटीच्या मागणीसाठी लिहिलेलं पत्रसुद्धा माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं, "कॅप्टन सफदर यांच्याविरुद्ध कारवाईमुळे पोलिसांची बदनामी झाली आहे, यात निष्काळजीपणा करण्यात आला होता. त्यामुळे सिंधच्या पोलीस अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे."
सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत योग्य प्रकारे काम करणं अवघड आहे. त्यामुळे दोन महिन्यांची सुटी हवी आहे, असं त्यांनी अर्जात म्हटलंय.
सिंध पोलिसांच्या या निर्णयामुळे प्रचंड चर्चा झाली. सोशल मीडियावर याला सिंध पोलिसांचं सडेतोड उत्तर असल्याचं म्हटलं गेलं.
माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.
"मी सिंध पोलिसांना शाबासकी देतो. त्यांनी याचा विरोध करून स्वाभिमान आणि धाडस सिद्ध केला. त्यांचं हे पाऊल देशाला योग्य मार्ग दाखवेल."
पोलीस अधिकाऱ्यांच्या सुटीवर जाण्याबाबत माहिती समोर आल्यानंतर PPP प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी पत्रकार परिषद घेऊन लष्कर प्रमुख कमर बाजवा आणि ISI चे महासंचालक जनरल फैज हमीद यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितलं आहे.
सिंधच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचे आदेश दिले आहेत. हा विषय पोलिसांच्या प्रतिष्ठेचा असल्यामुळे लष्करप्रमुखांनीही याची चौकशी करावी, असं ते म्हणाले.
बिलावल यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर काही वेळाने लष्कराने एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं.
या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं.
त्यानंतर सिंधचे पोलीस अधिकारी बिलावल भुट्टो यांना जाऊन भेटले. त्यांनी सुटीचा अर्ज 10 दिवस पुढे ढकलला आहे.
इम्रान खान यांचं काय चाललंय?
इम्रान खान यांनी याप्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण त्यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीला सर्कस म्हणून संबोधलं आहे.
PDM च्या सभेच्या दुसऱ्या दिवशी इम्रान खान यांनी इस्लामाबादमध्ये एक सभा घेतली.
यामध्ये ते म्हणाले, "मी त्या दोन भाषण देणाऱ्या मुलांबाबत काहीही बोलणार नाही. कोणताही नेता संघर्ष केल्याशिवाय बनत नाही. त्या दोघांनीही आपल्या आयुष्यात एकसुद्धा चांगलं काम केलं नाही. आता भाषण देत असलेले लोक आपापल्या वडिलांच्या काळ्या कमाईने वाढले आहेत. त्यांच्याबद्दल चर्चा करणं वेळेचा अपव्यय आहे."
त्यानंतर पुढच्या दिवशी मरियम यांनी इम्रान खान यांच्यावर निशाणा साधून पलटवार केला. पाक लष्कर आणि ISI कडून नवाज शरीफ यांच्यावर कारवाई झाली. इम्रान सरकार हे त्यांच्याच हातातील बाहुलं असल्याचं त्या म्हणाल्या.
नवाज शरीफ यांच्यावर भ्रष्ट्चारप्रकरणी जुलै 2018 मध्ये कारवाई करण्यात आली होती. 2018 मध्ये त्यांना 10 वर्षांच्या अटकेची शिक्षा झाली. पुढच्या वर्षी त्यांनी उपचार घेण्याकरिता जामिनासाठी अर्ज केला. तेव्हापासून नवाज शरीफ लंडनमध्येच आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)