अमेरिका अध्यक्षीय निवडणूक: केवळ ट्रंप आणि बायडन व्यतिरिक्त शर्यतीत आहेत तब्बल 1214 उमेदवार

    • Author, रिबेका सिल्स
    • Role, बीबीसी न्यूज

अमेरिकेला तब्बल 230 वर्षांचा अध्यक्षीय इतिहास आहे. मात्र, या 230 वर्षात जेवढे राष्ट्राध्यक्ष होऊन गेले, त्यापैकी पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे एकमेव व्यक्ती होते जे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते.

अमेरिकेत बहुपक्षीय राजकारण असलं तर डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन हे दोन प्रमुख पक्ष आहेत. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मीडिया कव्हरेज आणि प्रचार मोहिमांसाठीच्या देणग्यांमध्ये या दोनच पक्षांचा दबदबा एवढा जास्त असतो की बाहेरची कुठली व्यक्ती राष्ट्राध्यक्षपदी निवडून येण्याची शक्यता जवळपास शून्य असते.

असं असलं तरी प्रत्येक निवडणुकीत अनेकजण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरत असतात.

यावर्षीच्या निवडणुकीतसुद्धा 9 ऑक्टोबरपर्यंत तब्बल 1216 जणांनी अमेरिकेच्या फेडरल इलेक्शन कमिशनकडे राष्ट्राध्यक्ष पदासाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

बीबीसीने यापैकी तीन उमेदवारांशी बातचीत केली आणि ते निवडणुकीला का उभे राहिले आणि मतदारांनी त्यांना का निवडून द्यावं, याबद्दल विचारलं. यापैकी एक पियानोवादक आणि मोटिव्हेशनल स्पीकर आहेत तर दुसरे मूळ अमेरिकन असलेले आयटी तंत्रज्ञ आणि तिसरे आहेत क्रिप्टो बिलिएनिअर.

'विद्यमान दोन पर्याय अमेरिकन मतदारांना पसंत पडणारे नाहीत'

जेड सायमन्स एक बहुआयामी व्यक्तीमत्व आहे. त्या ब्युटी क्वीन होत्या, व्यावसायिक पियानोवादक आहेत. मोठमोठ्या कॉन्सर्ट्समध्ये त्या पियानो वादन करतात. मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. रॅपर आहेत, आई आहेत आणि इतकंच नाही अधिकृतपणे नियुक्त करण्यात आलेल्या पादरी आहेत.

स्वतःबद्दल बोलताना जेड सायमन्स म्हणतात, "आतापर्यंत जसे उमेदवार होऊन गेले त्या पठडीतली मी नाही. मात्र, हा काळही सामान्य नाही."

त्या म्हणतात, "मी नागरी हक्कासाठी आयुष्य वेचणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याची मुलगी आहे आणि माझ्या वडिलांनी मला शिकवलंय की कुठे अन्याय दिसत असेल तर स्वतःला प्रश्न विचारा, इथे तुझी गरज आहे का?"

आर्थिक, शैक्षणिक आणि गुन्हेगारी कायदाा सुधारणेच्या माध्यमातून सर्वांना समान संधी देणारं वातावरण तयार करणं, हे आपलं ध्येय असल्याचं सायमन्स म्हणतात. आणि हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीच्या इतिहासातलं सर्वात कमी खर्चाची निवडणूक मोहीम राबवण्याचा त्यांचा विचार आहे.

साायमन्स म्हणतात, "वयाची 35 वर्ष पूर्ण झालेली, अमेरिकेत जन्मलेली आणि 14 वर्ष अमेरिकेत राहिलेली कुठलीही व्यक्ती अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढू शकते. मात्र, आज प्रचार मोहिमेसाठी 1 अब्ज डॉलर खिशात असणं, जास्त गरजेचं झालं आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे. खरंतर हे पैसे गरजूंना देता येतील."

आम्ही त्यांना विचारलं, तुम्ही उदारमतवादी आहात की पुराणमतवादी? या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणतात, "तुम्हाला काय हवंय, त्यावर या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे. कारण बर्नी ब्रदर्सीपासून ते पुराणमतवादी ख्रिस्ती धर्मोपदेशांपर्यंत सर्वांनाच आमची धोरणं आवडत आहेत."

एक मंत्री आणि धर्माशी संबंधित व्यक्ती असल्याने मी पुराणमतवादी ठरत नाही.

त्या म्हणतात, "मला वाटतं येशू आपल्या इतिहासातली सर्वाधिक मूलगामी व्यक्ती आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्यावरून तुम्हाला ते पुरोगामीच वाटतील."

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर यावर्षी कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे मोठ-मोठ्या प्रचारसभा, ऑनलाईन परिषदा आणि प्रसारमाध्यमांमध्ये निवडणुकीच्याच बातम्यांचं वर्चस्व या सगळ्यांना यावर्षी धक्का बसला आहे.

मात्र, या निवडणुकीत त्यांचंही अस्तित्व आहे, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं, हेच आपल्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं त्यांना वाटतं.

"सध्या ब्लॅक लाईफ मॅटर्स, ब्लॅक व्हॉईस मॅटर यांची बरीच चर्चा आहे. मीडियापासून ते सरकारपर्यंत सर्वांनीच यात लक्ष घातलं. मात्र, जो मीडिया या बातम्या दाखवतो तोच मीडिया अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीती एक कृष्णवर्णीय स्त्रीदेखील आहे, हे दाखवत नाही."

"कॅने वेस्ट सारख्या अमेरिकी सेलिब्रिटी रॅपरने 4 जुलैला राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतरणार असल्याची घोषणा केली तेव्हा 30 मिनिटांत सर्व महत्त्वाच्या मीडिया नेटवर्कने ही बातमी दाखवली. त्यांनी तर आपला उमेदवारी अर्जही भरला नव्हता. आणि म्हणूनच पडद्यामागच्या घडामोडी बघितल्यावर लोकशाहीविषयी अमेरिकी मतदारांना जेवढं वाटतं तेवढं महत्त्व तिला दिलं जात नसल्याचं बघून आम्हाला थोडा धक्काच बसला."

अमेरिकेतल्या सर्व प्रांतातल्या बॅलेट पेपरवर डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची नावं असणार आहेत. मात्र, अपक्ष उमेदवारांसाठी अनेक अटी-शर्थी आहेत.

ओकलाहोम आणि लुईझियाना प्रांतातल्या बॅलेट पेपरवर जेड सायमन्स यांचं नाव असणार आहे. मात्र, अमेरिकेतल्या उर्वरित 31 राज्यांमध्ये त्या 'write-in candidate' असणार आहेत. म्हणजेच त्या प्रांतातल्या बॅलेट पेपरवर जेड सायमन्स यांचं नाव नसेल आणि मतदारांनी स्वतः बॅटेल पेपरवर त्यांचं नाव लिहिलं तरच त्यांचं मत गृहित धरलं जाईल.

अशा अनेक आव्हानांचा तोंड द्यायचं असलं तरी अध्यक्षपदाची निवडणूक आपण नक्कीच जिंकणार, असा विश्वास त्यांना आहे. मग कदाचित यावर्षी विजय मिळाला नाही तरी चालेल.

"अपक्ष उमेदवारांचा इतिहास बघता माझं बोलणं कदाचित धारिष्ट्याचे वाटेल. मात्र, अनेक अडचणी असल्या तरीही अमेरिकी मतदारांना हे नक्कीच उमगेल की त्यांच्या समोर जे दोन पर्याय आहेत ते योग्य नाहीत."

"सुरुवातीपासूनच आम्ही हे म्हणत आलो आहे की आपण आपल्या देशाची वीण कायम ठेवली पाहिजे. मग ती आध्यात्मिक वीण असो, सांस्कृतिक वीण असो की सामाजिक आणि वंशीय वीण. या दोन्ही राजकीय पक्षांनी प्रामुख्याने आणि जाणीवपूर्वक ही वीण कमकुवत केल्याचं आमचं म्हणणं आहे."

'आयुष्य सेवाकार्यासाठी खर्ची करण्याचा संकल्प'

ब्रॉक पिअर्स यांनीही राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी बाल कलाकार म्हणून काम केलं आहे. 'मायटी डक्स' आणि 1996 साली आलेल्या 'फर्स्ट किड' या विनोदी सिनेमात त्यांनी काम केलं आहे.

मात्र, पुढे त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि ते क्रिप्टो करंसी या डिजिटल करंसीमध्ये अब्जाधीश आहेत.

ते राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक का लढवत आहेत? अमेरिकीची सद्यस्थिती हे त्यामागचं एक कारण आहे.

ब्रॉक पिअर्स म्हणतात, "मला वाटतं आपल्याकडे भविष्यासाठीचा कुठलंच व्हिजन नाही. 2030 मध्ये आपण कोणत्या प्रकारच्या जगात जगू? आपल्याला कोणत्या मार्गाने पुढे जायचं आहे?, तुम्हाला काहीतरी ध्येय ठरवावं लागेल.

मला तर चहुबाजूंनी फक्त चिखलफेक होताना दिसतेय. कुणी गेम-चेंजिंग आयडिया देताना दिसत नाही. परिस्थिती भीतीदायक होत चाललीय. आणि माझ्याकडे भविष्यासाठीचं व्हिजन आहे."

गेल्या चार वर्षांपासून पिअर्स समाजकार्यात गुंतलेत. पोर्टो रिकोमधल्या आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पीपीई किटसाठी दहा लाख डॉलर्स उभे केले आहेत.

पुढच्या चार वर्षात अमेरिकेने कशाला प्राधान्य द्यायला हवं, या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणतात, "देशाने केवळ विकासासाठी विकासाच्या मागे धावू नये." याऐवजी लोकांना स्वतंत्र, सुखी आणि आनंदी आयुष्य कसं देता येईल, याचा विचार करायला हवा.

रोलिंग स्टोन या अमेरिकी मॅगझिनने पिअर्स यांचं वर्णन करताना 'द हिप्पी किंग ऑफ क्रिप्टो करंसी' म्हटलंय. गांजााला कायदेशीर मान्यता मिळावी, अशी त्यांची भूमिका आहे.

बर्निंग मॅन या अमेरिकेतल्या अतिशय महागड्या महोत्सवात त्यांनी यूनिकॉर्न थिम लग्न सोहळा आयोजित केला होता. आणि असं असलं तरी फोर्बच्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत त्यांच्या नावााचा समावेश त्यांना रुचला नाही. फोर्बच्या यादीत नाव आल्यानंतर त्यांनी आपले दहा लाख डॉलर्स दान करण्याचा निर्धार व्यक्त केला होता.

वैयक्तिक स्वातंत्र्याचे ते खंदे पुरस्कर्ते आहेत आणि रिपब्लिकन उमेदवारांना त्यांनी हजारो डॉलर्स देणगी म्हणून दिले आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या त्यांचा कल पुराणमतवादाकडे आहे की उदारमतवादाकडे, याचा अंदाज बांधणं अवघड आहे.

पिअर्स म्हणतात, "माझ्या स्वभावात जसा उदारमतवाद दिसतो तसाच रुढीवादही आढळतो. मला असं वाटतं की भविष्याच्या दृष्टीने धाडसी पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. कारण या सर्वच विचारसरणींमधून आपल्याला काहीतरी शिकवण मिळते."

मात्र, 39 वर्षांचे पिअर्स यांचं आयुष्यही वादातीत नाही. पिअर्स 19 वर्षांचे असताना तीन पुरूष कलाकारांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या दोन बिझनेस पार्टनरवर लैंगिक छळाचे आरोप केले होते. मात्र, पिअर्स यांनी सर्व आरोपांचं खंडन केलं होतं. शिवाय, यासंदर्भात त्यांच्यावर कधी गुन्हाही दाखल झाला नाही.

ज्या तिघांनी पिअर्स यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते त्यांनी नंतर आपल्या तक्रारी मागे घेतल्या आणि त्यांना कधी नुकसान भरपाईदेखील देण्यात आली नाही. मात्र, या आरोपांमुळे त्यांची अध्यक्षपदाची निवडणूक सोपी राहिलेली नाही, एवढं मात्र नक्की.

ते म्हणतात, "अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये नाव आल्याने तुमचं मोठं नुकसान होत असतं. मात्र, यातली सकारात्मक बाजू म्हणजे मला यातून कुणाविषयीही दुराग्रह बाळगू नये, ही शिकवण मिळाली."

फेडरल इलेक्शन कमिशनच्या माहितीनुसार ब्रॉक पिअर्स यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारावर तब्बल 37 लाख डॉलर्स खर्च केले आहेत.

"नोव्हेंबर महिन्यात मी वयाची चाळीशी पूर्ण करेन. म्हणजे वयही माझ्या बाजूने आहे. त्यामुळे आम्ही भविष्यासाठी आतापासूनच काम करतोय. आणि हे काम मी फक्त माझ्यासाठीच नाही तर सर्वच अपक्ष उमेदवारांसाठी करतोय."

निवडणुकीत यश मिळालं नाही तरीही आपल्याकडे दुसरा पर्याय असल्याचं पिअर्स यांचं म्हणणं आहे.

ते सांगतात, "मी न्यू यॉर्कच्या गव्हर्नरपदााची, मिनिसोटाच्या गव्हर्नरपदाची निवडणूक लढवावी, यासाठी मला सारख्या ऑफर येतात. मी जिथे कुठे जातो ते मला म्हणतात, ब्रॉक पिअर्स तुम्हीच हे करू शकता. ते मला म्हणतात तुम्ही राष्ट्राध्यक्ष झाला नाहीत तर तुम्ही आमच्या प्रांताचे गव्हर्नल व्हाल का? ही जबाबदारी सांभाळाल का?"

"मात्र, 4 नोव्हेंबरपर्यंत याचा विचार करायला माझ्याकडे क्षणाचाही वेळ नाही आणि मी सर्वांनाच हेच सांगतो की मला 4 नोव्हेंबरला कॉल करा. मात्र, यापुढचं आयुष्य सेवाकार्यातच खर्ची घालायचं, असा संकल्प मी केला आहे आणि त्यासाठी जे काम माझ्या वाट्याला येईल ते मी पूर्ण निष्ठेने पार पाडेन."

'ज्या आधारावर या देशाची पायाभरणी करण्यात आली त्यात काही बदल करण्याची गरज'

या सर्व अपक्ष उमेदवारांमध्ये एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे पक्षातर्फे उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांना पक्षांतर्गत बहुमताची गरज नसते. त्याचा फायदा असा होतो की त्यांना स्वतःला जे मुद्दे महत्त्वाचे वाटतात त्यावर ते स्पष्टपणे बोलू शकतात.

याचं उत्तम उदाहरण म्हणजे मार्क कार्ल्स. ते कॉम्प्युटर प्रोग्रामर आहेत. पण, या बरोबरच ते सामाजिक न्यायाचे खंदे पुरस्कर्ते आणि प्रचारक आहेत. विशेषतः मूळ अमेरिकी नागरिकांना भेडसावणाऱ्या मुद्द्यांवर ते बरंच काम करतात.

विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किंवा जो बायडेन यांच्याशी ज्यांना जवळीक वाटत नाही, अशा मतदारांपुढे पर्याय उभा करणं, हे त्यांचं उद्दिष्ट आहे.

चार्ल्स नॅवोजा वंशाचे आहेत. अमेरिकेविषयीच्या त्यांच्या विचारांचं मूळ त्यांच्या या ओळखीतच आढळतं.

ज्या जमिनीवर वॉशिंग्टन उभारण्यात आलं ती पिसाटावे लोकांची होती.

चार्ल्स म्हणतात, "कोलंबस समुद्रात वाट चुकला त्याही आधीपासून ही जमीन त्यांची आहे. मी या भूमीत राहतो यासाठी मी त्यांचा आभारी आहे."

2000 च्या सुरुवातीलाच चार्ल्स नावाजो रिझर्वेशनमधल्या एका घरात आपल्या कुटुंबीयांसोबत स्थायिक झाले. ते म्हणतात, "मला आयुष्य घालवण्यासाठी पारंपरिक मार्ग निवडायचा होता आणि म्हणून मी गेल्या 11 वर्षांपासून इथे राहतोय."

"मी याच दृष्टीकोनात राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या अनेक निवडणुका बघितल्या."

चार्ल्स म्हणतात, "आमच्या वस्तीपासून सर्वात जवळचा मुख्य मार्ग तब्बल 6 मैल लांब आहे. एका खोलीच्या पारंपरिक नवोजा घरात राहतात. घरात नळ नाही. वीज नाही. त्यांचे शेजारी सतरंजी विणतात, शेळ्या-मेंढ्या पाळतात."

ते म्हणतात, माझ्या कुटुंबीयांनीही या परिस्थितीशी जुळवून घेतलं. आमचा समाज एवढा उपेक्षित असावा, याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती.

चार्ल्स म्हणतात, "आमच्यासोबत फोटो काढण्यासाठी किंवा काही दान देण्यासाठी आलेले लोक आम्ही बघितले. पण, कुणीही आमच्याशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी कुणी आल्याचं आम्ही बघितलेलं नाही."

"यासोबतच आमच्या लोकांवर जो पिढ्यानपिढ्या अन्याय झाला, तेसुद्धा इथे आल्यावर प्रकर्षाने जाणवतंय. त्यामुळे मला असुरक्षिततेची भावना जाणवू लागली आणि याची चिडही आली."

या सगळ्या परिस्थितीतून गेल्यानंतर त्यांनी इतरांचा द्वेष करण्याऐवजी इतरांमध्ये जाऊन सामूहिक जाणीवा निर्माण करण्याचा निश्चय केला.

त्यांना एक असा अमेरिका निर्माण करायचा आहे जो सर्वसमावेशक आणि खऱ्या अर्थाने आधुनिक असेल आणि जिथे असमानतेला थारा नसेल.

ते म्हणतात, "आपल्या राज्यघटनेची सुरुवात 'आम्ही अमेरिकेचे लोक…' या ओळीने होते. मात्र, आमच्या राज्य़घटनेने कधीच स्त्रीला स्थान दिलं नाही, मूळनिवासींना स्थान दिलेलं नाही आणि तर आफ्रिकी वंशाच्या लोकांना तीन पंचमांश व्यक्ती मानलं आहे."

ते पुढे म्हणतात, "माझी प्रचार मोहीम याच विचारांभोवती आहे. जर आपल्याला खरंच असा देश उभारायचा असेल जिथे 'आम्ही अमेरिकेचे लोक…' यात अमेरिकेतल्या सर्वांचाच समावेश असेल तर त्यासाठी आपल्यालाही काही मूलभूत बदल करावे लागणार आहेत."

"फक्त बोलून किंवा इच्छा व्यक्त करून चालणार नाही. त्यासाठी आपल्यालाच उतरावं लागेल आणि ज्या आधारावर आपल्या राष्ट्राची पायाभरणी झाली त्यात काही महत्त्वाचे बदल करावे लागतील. उदाहरणार्थ वंशवाद, श्वेतवर्णियांचं वर्चस्व आणि स्त्री-पुरूष असमानता."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)