जो बायडन शपथविधी: डोनाल्ड ट्रंप यांच्या विषयीच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?

जो बायडन आणि कमला हॅरिस यांचा 20 जानेवारीला शपथविधी होईल पण वॉशिंग्टन डीसीमध्ये होणाऱ्या इनॉग्युरेशन सोहळ्याला डोनाल्ड ट्रंप हजर राहणार नाहीत.

या शपथविधीनंतर जो बायडन हे अधिकृतरीत्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील.

शपथ घेतल्यानंतर बायडन हे व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करतील. आपण या शपथविधीला हजर राहणार नसलो आणि निवडणुकीचा हा निकाल आपल्याला मान्य नसला, तरी सत्तेचं सुरळीत हस्तांतरण करणार असल्याचं डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं होतं.

डोनाल्ड ट्रंप त्यांच्या फ्लोरिडामधल्या निवासस्थानी जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.

नोव्हेंबर 2020मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जो बायडन यांनी बाजी मारली. पण डोनाल्ड ट्रंप यांनी हा निकाल स्वीकारायला वारंवार नकार दिला.

आपला या निवडणुकीत पराभव झाला, तर तो आपण सहजासहजी स्वीकारणार नसल्याचं त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यानही बोलून दाखवलं होतं.

ट्रंप यांच्या समर्थकांनी 6 जानेवारी 2021ला अमेरिकेची संसद असणाऱ्या कॅपिटल बिल्डिंगवर हल्ला चढवला. त्यावेळी संसदेमध्ये जो बायडन यांच्या राष्ट्राधयक्षपदावर शिक्कामोर्तब करण्याची प्रक्रिया सुरू होती.

या हल्ल्याला चिथावणी दिल्याचा आरोप ट्रंप यांच्यावर ठेवत महाभियोगही चालवण्यात आला.

डोनाल्ड ट्रंप 2016मध्ये राष्ट्राध्यक्ष होण्याआधी एक अतिशय यशस्वी उद्योजक होते, आणि त्यांच्या कंपनीने मुंबईतही एक टॉवर बांधलाय. डोनाल्ड ट्रंप यांचा व्हाईट हाऊसपर्यंतचा प्रवास तुम्हाला माहीत आहे का?

कोण आहेत डोनाल्ड ट्रंप?

डोनाल्ड ट्रंप यांचे वडील फ्रेड ट्रंप हे न्यूयॉर्कच्या रिअल इस्टेट क्षेत्रातलं मोठं नाव. त्यांचं चौथं अपत्य म्हणजे डोनाल्ड ट्रंप. शाळेमध्ये व्रात्यपणा करायला लागल्यावर 13व्या वर्षी डोनाल्डची रवानगी सैनिकी शाळेत करण्यात आली.

त्यानंतर त्यांनी पेन्सलव्हेनिया विद्यापीठातल्या व्हॉर्टन स्कूल (Wharton School) मधून शिक्षण घेतलं. डोनाल्ड यांचा मोठा भाऊ - फ्रेडने पायलट व्हायचं ठरवलं आणि वडिलांच्या बिझनेसचा उत्तराधिकारी होण्याची संधी डोनाल्ड यांच्याकडे आली.

खरंतर श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या डोनाल्ड यांनी वडिलांच्या कंपनीमध्ये अगदी खालच्या पातळीवरून काम करायला सुरुवात करावी, अशी कुटुंबाची अपेक्षा होती.

पण फ्रेड ट्रंप यांचं वयाच्या 43व्या वर्षी दारूच्या व्यसनामुळे निधन झालं. यामुळे आपण आयुष्यभर दारू आणि सिगरेटपासून दूर राहिल्याचं त्यांच्या भावाचं - डोनाल्ड यांचं म्हणणं आहे.

वडिलांच्या कंपनीत रुजू होण्यापूर्वी आपण वडिलांकडून 10 लाख डॉलर्सचं 'लहान' कर्जं घेऊन रिअल इस्टेट व्यवसायात प्रवेश केल्याचं डोनाल्ड ट्रंप सांगतात.

डोनाल्ड ट्रंप यांनी सुरुवातीला त्यांच्या वडिलांचं न्यूयॉर्कमधल्या गृह प्रकल्पांचं काम सांभाळलं.

त्यानंतर त्यांनी 1971मध्ये कंपनीची धुरा हातात घेतली आणि कंपनीचं नाव बदलून ट्रंप ऑर्गनायझेशन केलं.

1999मध्ये फ्रेड ट्रंप यांचं निधन झालं. "ते माझं प्रेरणास्थान होते," असं डोनाल्ड ट्रंप त्यावेळी म्हणाले होते.

'बिझनेसचा बादशहा'

ट्रंप कुटुंबाचा व्यवसाय सुरुवातीला होता न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन आणि क्वीन्स भागाध्ये निवासी संकुलं उभारण्याचा. डोनाल्ड ट्रंप यांनी या उद्योगाचा रोख मॅनहटनमधल्या ग्लॅमरस प्रोजेक्ट्सकडे वळवला. जुनाट कोमोडोर हॉटेलचं रुपांतर त्यांनी ग्रँड हयातमध्ये केलं. आणि सोबतच उभारलं त्यांचं आतापर्यंतच सगळ्यात प्रसिद्ध बांधकाम - फिफ्थ ॲव्हेन्यू (5th Avenue) वरचा 68 मजली ट्रंप टॉवर.

पुढे याच नावाची आणखी काही प्रसिद्ध बांधकामं उभी राहिली - ट्रंप प्लेस, ट्रंप वर्ल्ड टॉवर, ट्रंप इंटरनॅशनल हॉटेल अँड टॉवर आणि इतर काही.

याशिवाय मुंबई, इस्तंबूल आणि फिलीपिन्समध्येही ट्रंप टॉवर आहेत.

डोनाल्ड ट्रंप यांनी हॉटेल्स आणि कॅसिनोही सुरू केले. त्यांच्या उद्योगाच्या या शाखेने आतापर्यंत 4 वेळा दिवाळखोरी जाहीर केली आहे. (उद्योगांची दिवाळखोरी, वैयक्तिक दिवाळखोरी नाही.)

याशिवाय त्यांनी मनोरंजन क्षेत्रामध्येही साम्राज्यं उभं केलं. मिस युनिव्हर्स, मिस USA, मिस टीन USA या सौंदर्य स्पर्धांची मालकी 1996 पासून 2015पर्यंत त्यांच्याकडे होती.

अमेरिकेतल्या NBC वाहिनीवर त्यांचा द अप्रेंटिस ( The Apprentice) नावाचे एक रिऍलिटी शो होता. या शोचे स्पर्धक ट्रंप यांच्या कंपनीमध्ये मॅनेजमेंटच्या नोकरीसाठी एकमेकांसोबत स्पर्धा करत. डोनाल्ड ट्रंप यांनी 14 सीझन्स हा शो केला. हा शो सुरू होता त्या काळामध्ये आपल्याला NBC नेटवर्कने एकूण 213 दशलक्ष डॉलर्स दिल्याचं त्यांनी त्यांच्या अर्थविषयक कागदपत्रांमध्ये दाखवलं होतं.

यासोबतच डोनाल्ड ट्रंप यांनी अनेक पुस्तकं लिहीली आहेत, शिवाय त्यांच्या मालकीची उत्पादन कंपनी (मर्चंडाईझ) ही त्यांच्या ब्रँडच्या नावाच्या नेक-टायपासून ते बाटलीबंद पाण्यापर्यंत सर्व काही विकते.

पती आणि पित्याच्या भूमिकेत डोनाल्ड ट्रंप

डोनाल्ड ट्रंप यांनी आतापर्यंत तीन वेळा लग्न केलंय. त्यांची पहिली पत्नी इवाना झेलनिकोवा ही चेक ॲथलिट आणि मॉडेल होती. या लग्नातून ट्रंप यांना 3 मुलं झाली - डोनाल्ड ज्युनियर, इव्हांका आणि एरिक.

1990मध्ये या जोडप्याने घटस्फोट घेतला. या घटस्फोटाविषयीच्या अनेक बातम्या त्यावेळी टॅब्लॉईड्समध्ये झळकल्या होत्या. ट्रंप यांनी इवानाचा छळ केल्याचे आरोप या बातम्यांमधून करण्यात आले होते. पण नंतर इवानाने हे प्रकरण फार पुढे नेलं नाही.

1993मध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी अभिनेत्री मार्ला मेपल्सशी लग्न केलं. त्यांना टिफनी नावाची मुलगी झाली. 1999मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.

यानंतर त्यांनी त्यांची आताची पत्नी मेलानिया ट्रंप यांच्याशी 2005मध्ये लग्न केलं. त्यावेळी त्या मॉडेल म्हणून काम करत. या जोडप्याला बॅरन विल्यम ट्रंप नावाचा मुलगा आहे.

ट्रंप यांच्या पहिल्या नात्यापासून त्यांना झालेली मुलं आता ट्रंप ऑर्गनायझेशन चालवतात.

अध्यक्षपदासाठीची पहिली शर्यत

अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद आपल्याला भूषवायचं असल्याचं डोनाल्ड ट्रंप यांनी खरंतर 1987मध्येच बोलून दाखवलं होतं. 2000 साली ते रिफॉर्म पक्षाचे उमेदवार म्हणून या स्पर्धेत उतरलेही होते.

बराक ओबामांचा जन्म अमेरिकेत झाला वा नाही याविषयी सवाल उपस्थित करणाऱ्या 'Birther' मोहीमेमध्ये बोलणाऱ्यांमध्ये 2008 साली डोनाल्ड ट्रंप आघाडीवर होते. नंतर या सगळ्या दाव्यांमधली सत्यता पडताळून पाहण्यात आली आणि बराक ओबामांचा जन्म हवाईमध्ये झाल्यावर शिक्कामोर्तब झालं. या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं नंतर ट्रंप यांनीही ते अध्यक्षपदाच्या शर्यतीत असताना मान्य केलं. पण असे दावे केल्याबद्दल त्यांनी कधीही माफी मागितली नाही.

आपण व्हाईट हाऊससाठीच्या शर्यतीत उतरणार असल्याचं जून 2015मध्ये ट्रंप यांनी जाहीर केलं.

"आपल्याला अशा व्यक्तीची गरज आहे जो अक्षरशः या देशाचा ताबा घेईल आणि पुन्हा एकदा देशाला महान बनवेल. मी असं करू शकतो," आपली उमेदवारी जाहीर करताना त्यांनी सांगितलं होतं.

एक उमेदवार म्हणून अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरत असताना इतरांप्रमाणे आपल्याला निधी उभारायला (Fundraise) लागणार नाही त्यामुळे कोणत्याही विशिष्ट गटात आपलं स्वारस्य असणार नाही म्हणून आपण एक योग्य 'Outsider' उमेदवार असल्याचं ट्रंप यांनी म्हटलं होतं.

'मेक अमेरिका ग्रेट अगेन' हे ट्रंप यांच्या कॅम्पेनचं ब्रीदवाक्य होतं. अमेरिकन अर्थव्यवस्था पुन्हा बळकट करण्याचं वचन ट्रंप यांनी त्यांच्या वादग्रस्त कॅम्पेनदरम्यान दिलं होतं. यासोबतच मेक्सिको आणि अमेरिकेमधल्या सीमेवर भिंत उभारणं आणि 'नेमकं काय सुरू आहे ते देशाच्या प्रतिनिधींना समजेपर्यंत' मुस्लिमांनी देशात येण्यावर तात्पुरती बंदी घालू असंही ट्रंप प्रचारादरम्यान म्हणाले होते.

त्यांच्या प्रचाराच्या वेळी अनेक ठिकाणी मोठी निदर्शनं झाली, रिपब्लिकन पक्षातल्याच नेत्यांनीही त्यांना विरोध केला. पण अखेरीस डोनाल्ड ट्रंप यांचीच रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली.

अध्यक्षीय निवडणुकीचे विजेते

डोनाल्ड ट्रंप यांची 2016मधली कॅम्पेन अनेक गोष्टींमुळे वादग्रस्त ठरली. 2005मध्ये त्यांनी महिलांबद्दल केलेली वक्तव्यंही या दरम्यान समोर आली त्यावरूनही वाद झाला. ते राष्ट्राध्यक्षपदासाठी योग्य नाहीत असं त्यांच्या पक्षाच्या सदस्यांसकट इतर अनेकांनाही वाटत होतं.

ओपिनियन पोल्स डोनाल्ड ट्रंप हे हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा पिछाडीवर असल्याचे दाखवत होते. पण यासगळ्यावर मात करून आपण जिंकू आणि आपलं अध्यक्षपदी निवडून येणं हा प्रस्थापितांसाठी सगळ्यात मोठा धक्का असेल, यामुळे 'वॉशिंग्टनमध्ये साचून राहिलेला गाळ' वाहून जाईल असं ट्रंप सातत्याने त्यांच्या पाठिराख्यांना सांगत होते.

असं होण्याची शक्यता फार कमी जाणकारांना वाटत होती.

पण या सगळ्या जाणकारांना धक्का देत डोनाल्ड ट्रंप यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला आणि अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष म्हणून 20 जानेवारी 2017ला ओव्हल ऑफिसचा ताबा घेतला.

यापूर्वी कोणत्याही इतर पदावर निवडून न आलेले वा लष्कराशी संबंध नसणारे डोनाल्ड ट्रंप हे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत.

राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ

ट्रंप यांच्या प्रचार मोहीमेप्रमाणेच त्यांचा 2017पासूनचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळही वादग्रस्त राहिलेला आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाची परिस्थिती ट्रंप यांनी ज्याप्रकारे हाताळली त्यावर विरोधकांनी टीका केली. पहिल्या डिबेटदरम्यान जो बायडन यांनीही हा मुद्दा उचलत ट्रंप तर मास्क वापरण्याबद्दलही गंभीर नसल्याचं म्हटलं.

जागतिक साथीच्या काळात ट्रंप यांनी कोव्हिड 19वरचे उपाय सुचवताना केलेली 'जंतुनाशकं इंजेक्शनद्वारे द्यावीत' यासारखी विधानं, WHO सोबतचे संबंध तोडण्याचा निर्णय यागोष्टीही जगभर चर्चेचा विषय ठरल्या.

कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिक जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेमध्ये उसळलेल्या निदर्शनांची परिस्थिती ज्या प्रकारे हाताळली, त्या काळात ट्रंप यांनी निदर्शनं मोडून काढण्यासाठी जी पद्धत वापरण्याची धमकी दिली, त्यावरही टीका झाली.

राष्ट्राध्यक्ष पदावर आपली पुन्हा नेमणूक व्हावी यासाठी ट्रंप यांनी युक्रेनची मदत घेतल्याचा आरोपही झाला. जो बायडन आणि त्यांच्या मुलाची चौकशी सुरू करण्यासाठी ट्रंप यांनी युक्रेनवर दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला.

याबद्दल त्यांच्यावर महाभियोग (Impeachment) ही चालवण्यात आला. पण नंतर त्यांची या आरोपांमधून मुक्तता करण्यात आली.

इमिग्रंट्स म्हणजेच बाहेरच्या देशांतून अमेरिकेत येणाऱ्या शरणार्थींबाबत डोनाल्ड ट्रंप आणि त्यांच्या प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेवर विरोधकांनी सातत्याने आक्षेप घेतलाय.

2017 ते 2020 या ट्रंप यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या काळातच अमेरिका आणि चीनचे व्यापारी संबंध ताणले गेले आणि ट्रेड वॉरला सुरुवात झाली. चीनवर अवलंबून राहण्याचं प्रमाण आपल्याला कमी करायचं असल्याचं ट्रंप यांनी बोलून दाखवलेलं आहे.

असं करत असताना दुसरीकडे त्यांनी रशिया आणि उत्तर कोरियासोबतचे संबंध सुधारण्यावर भर दिला.

हवामान बदलाविषयीचं ट्रंप यांचं धोरणही वादात सापडलं. पर्यावरणाच्या रक्षणासाठी घालण्यात आलेले अनेक निर्बंध ट्रंप प्रशासनाने उठवले.

अध्यक्ष असतानाच्या काळात त्यांनी कर म्हणून फक्त 750 डॉलर्स भरल्याचा दावा न्यूयॉर्क टाईम्सने काही दिवसांपूर्वीच केला आहे. ट्रंप यांनी हे वृत्त म्हणजे 'फेक न्यूज' असल्याचं म्हटलं आहे.

ऑक्टोबर 2019मध्ये ह्युस्टनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या ट्रंप यांच्या 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाला अमेरिकेतल्या भारतीयांनी मोठा प्रतिसाद दिला होता.

फेब्रुवारी 2020मध्ये डोनाल्ड ट्रंप भारत भेटीवर आले होते. त्यांच्यासाठी भेटी निमित्ताने अहमदाबादमध्ये 'नमस्ते ट्रंप' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)