You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रंप यांनी 2017 मध्ये भरला 750 डॉलर इतकाच इन्कम टॅक्स
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी 2016 साली केवळ 750 डॉलर्स एवढाच इन्कम टॅक्स भरला होता, असं वृत्त न्यूयॉर्क टाइम्सनं दिलं आहे. 2016 सालीच ट्रंप यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती.
राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे 2017 सालीही ट्रंप यांनी भरलेल्या इन्कम टॅक्सची रक्कम ही 750 डॉलर्सच होती.
आपण ट्रंप आणि त्यांच्या कंपनीचे गेल्या वीस वर्षांतील टॅक्स रेकॉर्ड मिळवले असल्याचा दावा न्यूयॉर्क टाइम्सनं केला आहे. या टॅक्स रेकॉर्डनुसार गेल्या पंधरा वर्षांमधील दहा वर्षे ट्रंप यांनी इन्कम टॅक्सच भरलेला नाहीये. या रेकॉर्डमधून ट्रंप यांना दीर्घकाळ सोसावं लागलेलं नुकसान आणि करचुकवेगिरी या दोन बाबी समोर आल्या आहेत.
ट्रंप यांनी हे वृत्त म्हणजे 'फेक न्यूज' असल्याचं म्हटलं आहे.
"मी कर भरला आहे. माझ्या टॅक्स रिर्टन्सचं ऑडिट सुरू आहे आणि ते खूप वर्षांपासून सुरूच आहे," असं ट्रंप यांनी रविवारी (27 सप्टेंबर) पत्रकारांशी बोलताना म्हटलं.
"IRS (इंटर्नल रिव्हेन्यू सर्व्हिसने) मला योग्य वागणूक दिली नाही किंबहुना त्यांनी मला अतिशय वाईट वागवलं," असंही ट्रंप यांनी म्हटलं.
आपला व्यवसाय आणि आर्थिक उलाढालींसंबंधीची कागदपत्रं देण्यास नकार दिल्यामुळे ट्रंप यांना कायदेशीर बाबींनाही सामोरं जावं लागलं होतं. 1970 पासून आतापर्यंतचा विचार करता, ते पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांनी आपल्या टॅक्स रिटर्न्सची माहिती सार्वजनिक करण्यास नकार दिला होता. कायद्याने त्याची जरूरी नाहीये.
न्यूयॉर्क टाइम्सची ही बातमी ट्रंप यांच्या प्रेसिडेन्शियल डिबेटच्या आधीच प्रसिद्ध झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यासोबत ट्रंप यांची प्रेसिडेन्शियल डिबेट असेल.
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तातले दावे काय आहेत?
राष्ट्राध्यक्ष ट्रंप आणि त्यांच्या मालकीच्या कंपन्यांच्या टॅक्स रिटर्न्सचे रेकॉर्ड तपासल्याचा दावा टाइम्सनं केला आहे.
त्यासाठी 1990 पर्यंतचे टॅक्स रेकॉर्ड तपासले गेले, शिवाय ट्रंप राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरचे 2016 आणि 2017 या कालावधीतले टॅक्स रेकॉर्डही तपासण्यात आले.
त्यातून असं दिसून आलं की, 2016 आणि 2017 या दोन्ही वर्षात ट्रंप यांनी केवळ 750 डॉलर्स इतका टॅक्स भरला. गेल्या पंधरा वर्षांपैकी दहा वर्षे तर त्यांनी टॅक्सच भरला नाही. आपल्याला व्यवसायात तोटा होत असल्याचं सांगून त्यांनी टॅक्स भरणं टाळल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलं.
राष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी ट्रंप हे सेलिब्रिटी बिझनेसमन म्हणून ओळखले जात होते. प्रॉपर्टी व्यवसायात त्यांच्या नावाचा दबदबा होता.
2018 साली आपल्या उत्पन्नाची माहिती देताना ट्रंप यांनी म्हटलं होतं की, त्यावर्षात त्यांनी 434.9 दशलक्ष डॉलर्स कमावले आहेत. पण त्यांच्या टॅक्सच्या प्रमाणपत्रात मात्र 47.4 दशलक्ष डॉलर्सचा तोटा दिसून येतोय. न्यूयॉर्क टाइम्सनं नेमक्या याच विसंगतीवर बोट ठेवलं आहे.
ट्रंप यांच्या कंपनीनेही हे आरोप फेटाळून लावले आहेत.
कंपनीचे मुख्य लीगल ऑफिसर अॅलन गार्टन यांनी म्हटलं की, या बातमीतले बरेचसे तपशील हे चुकीचे आहेत.
टाइम्सच्या बातमीतले अन्य दावे
ट्रंप यांचे बहुतांश उद्योग, जसं की गोल्फ कोर्स आणि हॉटेल्स वर्षानुवर्षे तोटाच सहन करत असल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलं आहे.
"हे समीकरण ट्रंप यांच्या आर्थिक किमयागारीचं एक महत्त्वाचं गमक आहे. जोखीम असणाऱ्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करायची आणि नंतर त्यातल्या तोट्याच्या आधारे कर चुकवण्याचा प्रयत्न करायचा," असं टाइम्सच्या बातमीत म्हटलं आहे.
स्वतः राष्ट्राध्यक्षांच्या डोक्यावर 300 दशलक्ष डॉलर्सचं कर्ज आहे, ज्याची मुदत येत्या चार वर्षात संपेल.
ट्रंप यांच्या काही व्यवसायांमध्ये लॉबिस्ट, परराष्ट्र अधिकारी आणि राष्ट्राध्यक्षांकडून कोणत्या ना कोणत्या मदतीची अपेक्षा असलेल्या काही लोकांची गुंतवणूक असल्याचा आरोपही टाइम्सनं केला आहे.
ट्रंप यांच्या परदेशातील कंपन्यांनी किती कमाई केली हे पाहण्यासाठीही टॅक्स रेकॉर्ड तपासल्याचं टाइम्सनं आपल्या बातमीत म्हटलंय. ट्रंप यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या दोन वर्षात त्यांना परदेशातील कंपन्यांकडून 73 दशलक्ष डॉलर्सचा महसूल मिळाल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलंय. त्यापैकी बराचसा महसूल हा आर्यलंड आणि स्कॉटलंडमधल्या गोल्फ कोर्सेसमधून मिळाला आहे.
एकाधिकारशाहीकडे झुकणारे किंवा जिथली भूराजकीय समीकरणं क्लिष्ट आहेत, अशा देशांशी केलेल्या लायसन्सिंग डीलमधूनही ट्रंप यांच्या उद्योगांना पैसे मिळाल्याचा आरोप टाइम्सनं केला आहे.
फिलिपिन्सकडून 3 दशलक्ष डॉलर्स, भारताकडून 2.3 दशलक्ष डॉलर्स आणि तुर्कस्तानकडून 1 दशलक्ष डॉलर ट्रंप ऑर्गनायझेशनला मिळाल्याचं न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीत म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)