You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Chickenpox : लहान मुलांना कांजिण्या झाल्यावर काय करावं आणि काय करू नये?
- Author, शिरिषा पटिबंदला
- Role, बीबीसी मराठीसाठी
हिवाळा संपल्यावर झाडांना सुखद पालवी फुटायला लागते. या फेब्रुवारी-मार्च महिन्यांच्या काळाला आपण वसंत असं संबोधत असलो, तरी येऊ घातलेल्या परीक्षांमुळे आपण याच काळात धास्तावलेलेसुद्धा असतो.
याच दिवसांमध्ये विषाणूंचा संसर्गसुद्धा वाढतो. कांजिण्या हा असाच या कालावधीमध्ये उद्भवणारा विषाणूजन्य आजार आहे.
लहान मुलांचं नियमित लसीकरण सुरू झाल्यापासून मोठ्या शहरांमध्ये कांजिण्यांचा आजार फारसा उद्भवताना दिसत नाही, पण ग्रामीण भागांमध्ये अजूनही कांजिण्यांचा संसर्ग होतो.
प्रौढ वयातील लोकांमध्ये या विषाणूसंदर्भातील रोगप्रतिकारक क्षणता विकसित झालेली असते. पण लहान मुलांना, विशेषतः शाळेत जाणाऱ्या मुलांना कांजिण्या होण्याचा धोका जास्त असतो. शाळकरी मुलांच्या शरीरात अनेक विषाणू येतात आणि जातातसुद्धा. मग याच विशिष्ट संसर्गाची चर्चा का करायची? आपल्या देशात कांजिण्यांभोवती काही मिथकं रचली गेली असल्यामुळे अशी चर्चा गरजेची ठरते.
कांजिण्यांना इंग्रजीत 'चिकन पॉक्स' असं संबोधलं जातं. 'हर्पीस' या प्रवर्गातील हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे आणि त्याचं पारिभाषिक नाव 'Varicella Zoster Virus' (VZV) असं आहे.
सुशिक्षित मंडळींना याची साधारण जाणीव असते, त्यामुळे ते कांजिण्या झालेल्या मुलाच्या अंगावर हळदीचं पाणी लावणं आणि जेवण कमी करणं अशा प्रथांच्या मागे जात नाही. पण ग्रामीण भागांमध्ये परिस्थिती बिकट असते.
काही ठिकाणी कांजिण्या झाल्यानंतर ग्रामदेवतेसमोर कोंबडीचा बळी दिला जातो, उपास पाळला जातो, गावभर हळदीचं पाणी फवारलं जातं, रुग्णाला निंबाच्या पानांवर झोपवलं जातं, पोषक आहार टाळला जातो आणि केवळ बेचव अन्न दिलं जातं, आणि त्याहून वाईट म्हणजे काही वेळा संसर्ग झालेल्या बालकांची सेवाशुश्रुषा केली जात नाही. अशा निरर्थक धारणांमुळे रुग्ण धोकादायक परिस्थितीच्या दिशेने ढकलला जातो. कांजिण्या झालेल्या रुग्णाला आंघोळ न करण्याचंही बंधन काही ठिकाणी घातलं जातं.
कांजिण्या कशा होतात?
संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या नाकातून आणि तोंडातून सूक्ष्म थेंबांच्या द्वारे हा विषाणू पसरतो. त्यातून शरीरावर येणाऱ्या फोडांमुळे काही धोका नसतो. एकदा का हा विषाणू मानवी शरीरात गेला की दहा ते बारा दिवसांमध्ये पित्ताशय, प्लीहा आणि ज्ञानतंतुग्रंथींपर्यंत पोचतो आणि तिथे वाढतो. या प्राथमिक टप्प्यापासून हा विषाणू सर्व शरीर व्यापत जातो- त्यात श्वसननलिका व त्वचा यांचाही समावेश होतो. हा त्या पुढील टप्पा असतो.
पहिल्या टप्प्यात काहीच लक्षण दिसत नाहीत. यात विषाणू पसरलेला नसतो.
दुसरा टप्पा 24 ते 48 तास राहतो, त्यात ताप, डोकेदुखी, अंगदुखी व थकवा अशी लक्षणं दिसतात. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसानंतर ताप वाढतो, चेहऱ्यावर, छातीवर व मानेवर लाल फोड येतात. तिसऱ्या दिवसानंतर हे फोड इतर अवयवांवर पसरतात.
सुरुवातीला हे पुरळ बारीक आणि लाल असतात. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी ते पाण्याच्या बुडबुड्यासारखे होतात आणि मध्यभागी एक भोक दिसतं. त्या फोडांभोवतीची त्वचा लाल आणि जखम झाल्यासारखी दिसते. त्या जागी प्रचंड खाजही सुटते. डोळ्यांवर, ओठांवर, तोंडाच्या आत आणि गुप्तांगावरसुद्धा फोड उठतात. तोंडाची आग होते, आतड्यांमध्ये जळजळ होते आणि भूक कमी होते, चव जाते, इत्यादी.
दुसऱ्या दिवशी फोड आल्यापासून फोड जाऊन बरं वाटेपर्यंतच्या टप्प्याला दुसरा टप्पा मानलं जातं. या दहा दिवसांच्या कालावधीत इतरांना विषाणूची लागण होऊ शकते.
संसर्गाच्या काळात घ्यायची काळजी
1. शरीर, त्वचा, चादरी स्वच्छ ठेवाव्यात.
2. ताप आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पॅरासिटमॉल घेता येईल.
3. खाज उठत असेल तर कॅलमाइन मलम लावता येऊ शकतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हिस्टामाइनप्रतिबंधक औषधंसुद्धा वापरता येतील. काही मुलं अस्ताव्यस्तपणे खाजवतात, त्यांची नखं नीट कापावीत आणि त्यांच्या हाताभोवती पातळ कापड गुंडाळावं.
4. सहज पचेल असं अन्न द्यावं.
5. कुटुंबातील एका व्यक्तीला कांजिण्या झाल्या, तर संसर्ग होण्याची शक्यता असलेले आणि संसर्ग न झालेले यांना त्या व्यक्तीपासून दूर ठेवावं.
6. यातील धोकादायक लक्षणांबाबत किमान माहिती घ्यावी आणि तातडीने उपचार घ्यावेत.
ताप आणि साधे फोड यांची एवढी भीती कशाला?
सर्व विषाणूजन्य संसर्ग स्वतःहून कमी होत जातात. कांजिण्यांच्या संसर्गाचंही तसंच असतं. पण काही वेळा ताप आणि फोड यांहून अधिक धोकादायक परिस्थिती उद्भवू शकते. कधी न्यूमोनियापर्यंत आजार जाऊ शकतो, तर क्वचित काही प्रसंगी पित्ताशय बंद पडणं, मेंदूमध्ये सिऱ्हॉसिस होणं, अशा प्राणघातक आपत्तीसुद्धा ओढवू शकतात.
हा संसर्ग कोणासाठी अधिक धोकादायक असतो?
1. रोगप्रतिकारक्षमता कमी असलेले.
2. काही महिन्यांची बालकं.
3. गरोदर महिला (चौथ्या किंवा पाचव्या महिन्यात संसर्ग झाला तर गर्भावरही त्याचा विपरित परिणाम होतो).
4. कर्करोग किंवा प्रतिरोपण यांसाठी उपचार घेणारे.
5. एचआयव्ही रुग्ण.
6. अगदी क्वचित पूर्णतः सुदृढ व्यक्तीसुद्धा.
दहा दिवसांच्या संसर्गकाळात काय करावं आणि काय करू नये?
चुकीच्या धारणांसंदर्भात 'काय करू नये' हे आधी पाहू,
- पूजा, बळी, जागरणं, नजर काढणं, इत्यादी गोष्टी करू नयेत.
- रुग्णाला निंबाच्या पानांवर झोपवल्याने खाज वाढेल.
- रुग्णाला अनेक दिवस आंघोळ करू दिली नाही, तर फोडांमध्ये जीवाणूंचा संसर्ग होऊ शकतो आणि धोका वाढू शकतो. हळदीमुळे सेप्टिक टळतं, पण खाज थांबत नाही.
- तोंडातील आणि आतड्यांमधील जळजळीमुळे खाताना काळजी घ्यावी. पण बेचव अन्न खाण्याची गरज नाही.
- तेल, तिखट आणि मसाले कमी करणं इष्ट. पण दूध, दही, ताजी फळं आणि पाणी घ्यावं. पित्ताशयाचं कामकाज धड नसेल तेव्हा चरबी व प्रथिनं असणारे पदार्थ कमी खावेत.
- लहान बालकांना आईच्या दुधापासून दूर ठेवू नये, त्यांच्या नाकांमध्ये व कानांमध्ये तेल घालू नये आणि हळदीचं पाणी लावू नये.मुलांना धाप लागत असेल तर तातडीने रुग्णालयात भरती करावं. बालकांना पोटावर लोखंडी सळीने डाग देणं खूपच धोकादायक ठरू शकतं.
- पानांचा रस देणं किंवा इतर भोंदू उपचार करणं पित्ताशयावर विपरित परिणाम करू शकतं.
गरोदर महिलांनी घ्यायची काळजी
- गरोदरपणाच्या आरंभीच्या महिन्यांमध्ये कांजिण्या झाल्या, तर अर्भकावर त्याचा विपरित परिणाम होतो, काही वेळा बाळ उपजत विकार घेऊन जन्माला येऊ शकतं.
- गरोदर असलेल्या किंवा गरोदर होण्याची शक्यता असलेल्या महिलांनी लशी घेऊ नयेत.
- पाचेक दिवसांनी प्रसूति होणार असलेल्या महिलेला कांजिण्या झाल्या, तर बाळामध्ये मातेकडून प्रतिद्रव्यं आलेली असतात, त्यामुळे बाळाला संसर्ग होण्याची शक्यता कमी असते.
- उपचारांबाबत लोकांमध्ये असणारे दोन गैरसमज- 1. कांजिण्यांच्या संसर्गावर विषाणूप्रतिबंधक औषधं दिल्याने रोगप्रतिकारक क्षमता विकसित होत नाही. गंभीर संसर्ग झालेल्या रुग्णांचा अपवाद वगळता विषाणूप्रतिबंधक औषधं (acyclovir) गरजेची नसतात. 2. लस घेण्यापेक्षा कांजिण्या होऊन गेल्यावर अधिक प्रतिकारक्षमता विकसित होते, असं मानणंही चुकीचं आहे. कांजिण्या झाल्या तर आयुष्यभरासाठी त्या आजारासंदर्भातील प्रतिकारक्षमता विकसित होते, हे खरं; पण, आजार सहन करण्यापेक्षा लस घेणं जास्त बरं नाही का? शिवाय, त्यात काही धोका नसतो.
लशीविषयी
विकसित देशांमध्ये 1990 च्या दशकात कांजिण्या प्रतिबंधक लस तयार झाली, पण भारतात मात्र गेल्या 10 वर्षांमध्येच ही लस लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोचली आहे. अजून सरकारच्या मोफत लसीकरण योजनेमध्ये तिचा समावेश नसला, तरी खुल्या बाजारात ती सहज उपलब्ध होते.
बारा ते पंधरा महिने वयाच्या बालकांना ही लस देता येते. त्यानंतर चार ते सहा वर्षं वयोगटातील मुलांना दुसरा डोस द्यावा. सहा ते तेरा वर्षं वयोगटातील मुलांना तीन महिन्यांच्या अंतराने दोन डोस द्यावेत. त्याहून मोठ्या मुलांना चार ते आठ आठवड्यांच्या अंतराने दोन डोस द्यावेत. कांजिण्या होऊन बरं झालेल्यांना लशीची गरज नाही.
सर्वसामान्य जनतेने बेफिकीरीने लस घेऊ नये. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच लसीकरण व्हायला हवं.
नागिणीविषयी
कांजिण्यांची लागण झाल्यावर रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेल्या लोकांच्या बाबतीत हा विषाणू चेतासंस्थेमध्ये सुप्त स्वरूपात राहू शकतो किंवा वय वाढल्यानंतर मज्जातंतूभोवती नागीण होऊ शकते किंवा पुरळ उठू शकतात. या जागी प्रचंड जळजळ होते आणि खाज सुटते. दोन ते तीन आठवडे हा संसर्ग राहतो.
या कालावधीत संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना कांजिण्या होऊ शकतात. यातील फोड कमी झाले, तरी वेदना आणि जळजळ काही महिने राहू शकते.
त्यामुळे सर्वच मुलांचं लसीकरण व्हायला हवं. दीर्घकालीन समस्या टाळणं चांगलं. तरीही कांजिण्यांनी हल्ला केला, तरी वर नोंदवल्याप्रमाणे गैरसमजुतींना बळी पडू नये. अर्धवट ज्ञानामुळे समस्या गंभीर होऊ शकते.
(सदर लेखातील मतं लेखिकेची वैयक्तिक आहेत. त्या स्वतः डॉक्टर आहेत).
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)