सिद्धू मुसेवाला : स्वतःची संजय दत्तशी तुलना, बंदुका मिरवणं ते 30 गोळ्या झाडल्याने मृत्यूपर्यंत...

गायक सिद्धू मूसेवालाच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होण्याच्या महिनाभर आधीच त्याचं गाणं रिलीज करण्यात आलंय. 'मेरा ना' हे सिद्धू मूसेवालाचं गाणं आज (7 एप्रिल) रिलीज करण्यात आलं.

पीटीआय वृत्तसेवा संस्थेच्या माहितीनुसार, सोशल मीडिया चॅनेलवरून गाणं रिलीज करण्यात आलं असून, आतापर्यंत 50 लाख लोकांनी हे गाणं पाहिलं, ऐकलं आहे.

नायजेरियाचा गायक बर्ना ब्वॉय यानं यातलं एक रॅप गायलं आहे. बर्ना ब्वॉय गेल्यावर्षी सिद्धू मूसेवालाच्या आई-वडिलांना भेटलाही होता.

या गाण्याच्या व्हीडिओमध्ये सिद्धू मूसेवालाचे चित्र असलेल्या भिंती, ट्रक, पेंटिंग्ज इत्यादी गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. व्हीडिओच्या शेवटी सिद्धू मूसेवालाच्या फोटोसोबत 'जस्टिस फॉर सिद्धू मूसेवाला' असंही लिहिलंय.

"साड्डा चलदा है धक्का, असी तां करदे... गभरू ते केस जेहड़ा संजय दत्त ते.. 'डॉलरां वांगू नी नाम साड्डा चलदां, असीं पुत्त डाकुआं दे…"

'डाकूचा मुलगा आहे' हे ठसवून सांगणारं पंजाबी गायक सिद्धू मुसेवालांचं गाणं. त्यांची अनेक गाणी गनकल्चरला प्रोत्साहन देणारी होती.

त्यांचा मे महिन्यात गोळीबारात मृत्यू झाला आहे.

पंजाबच्या मानसा भागात गायक सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात अन्य तिघेजण जखमी झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुसेवालांच्या वाहनावर बंदुकीच्या गोळ्यांचे तीस राऊंड फायर करण्यात आले. मुसेवाला सुरक्षा रक्षकांशिवाय घराबाहेर पडले होते. मुसेवाला यांना गोळीबारानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं.

सिद्धू मुसेवालांनी 2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी मानसा मतरदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती, पण आम आदमी पक्षाचे उमेदवार विजय सिंगला यांच्याकडून ते पराभूत झाले होते.

सिद्धू मुसेवाला पंजाबातले लोकप्रिय गायक होते. त्यांच्या गाण्यांना युट्यूबवर लाखो हिट्स होते.

लहानशा गावातून सुरुवात

साधारण चार वर्षांपूर्वी पंजाबी करमणूक दुनियेत शुभदीप सिंह सिद्धू अल्पावधीतच सिद्धू मुसेवाला या नावाने प्रसिद्ध झाले.

एकदा एका चॅनलचे अँकर कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांशी बोलत होते. तेव्हा शुभदीप सिंह सिद्धू मुसेवाला गर्दीतून समोर आले आणि गाण्याची संधी मागितली.

त्यांनी गाणं गायलं आणि सगळ्यांना आवडलं. एक काळ होता जेव्हा सिद्धूंना स्वतःची ओळख सांगावी लागायची आणि एक काळ असा आला जेव्हा ते सिद्धू मुसेवाला या नावाने संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाले. ते मानसा जिल्ह्यातल्या मूसा गावाचे राहाणारे होते.

सिद्धू मुसेवालांची लोकप्रियता 2018 साली एकदम वाढली जेव्हा त्यांनी गन कल्चरशी संबंधित अनेक गाणी म्हटली. त्यांच्या गाण्यात बंदुकांचा नेहमीच उल्लेख असायचा.

त्यांची आई चरणजीत कौर मूसा गावाच्या सरपंच आहेत. सरपंच निवडणुकीदरम्यान त्यांनी आपल्या आईसाठी जोमाने प्रचार केला होता.

सिद्ध मुसेवाला यांनी सरदार चेतन सिंह सर्वहितकारी विद्यामंदिर, मानसाहून बारावीपर्यंत शिक्षण घेतलं. यानंतर त्यांनी पदवी घेतली आणि नंतर कॅनडात एका वर्षाचा डिप्लोमाही केला.

मुसेवालांची गाणी आणि चित्रपट

सिद्धू मुसेवालांची अनेक गाणी आणि चित्रपट हिट झाले. युट्यूबवर त्यांच्या 'हाय', 'धक्का', 'ओल्ड स्कूल' आणि 'संजू' सारखी गाणी लाखो वेळा पाहिली गेली.

या गाण्यांच्या माध्यमांतून कथितरित्या बंदूक संस्कृती (गन कल्चर) ला प्रोत्साहन देण्यासाठी मुसेवाला यांच्यावर अनेकदा टीका झाली आणि त्यांच्यावर खटलाही भरला गेला.

गायक म्हणून यशस्वी झाल्यानंतर सिद्धू मुसेवालांनी चित्रपटातही अभिनय केला.

त्यांनी, 'आय अॅम स्टुडंट', 'तेरी मेरी जोडी', 'गुनाह', 'मूसा जट्ट', 'जट्टं दा मुंडा गौन लगा' अशा चित्रपटात काम केलं.

त्यांच्या गाण्यांना बॉलिवूडमध्येही प्रसिद्धी मिळत होती. फिल्मस्टार रणवीर सिंह आणि विकी कौशल यांनीही सिद्धू यांची गाणी सोशल मीडियावर शेअर केली होती.

गुन्हे, खटले आणि वाद

सिद्धू मुसेवाला यांचं नाव वादातही अनेकदा अडकलं. गोळीबार करतानाचे त्यांचे दोन व्हीडिओ व्हायरल झाले होते. यातल्या एका व्हीडिओत ते बर्नालाच्या बडबर फायरिंग रेंजमध्ये कथितरित्या रायफलने गोळीबार करताना दिसतात.

मे 2020 मध्ये संगरूर आणि बर्नालामध्ये सिद्धू आणि आणखी नऊ लोकांवर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.

दुसऱ्या व्हीडिओत सिद्धू मुसेवालाच्या संगरूरच्या लड्डा कोठी रेंजमध्ये पिस्तुलाने गोळ्या चालवताना दिसत आहे. दोन्ही व्हीडिओ लॉकडाऊनच्या काळातले आहेत.

पोलिसांनी आधी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाअंतर्गत सिद्धू मुसेवालांवर गुन्हे दाखल केले आणि नंतर हे दोन्ही गुन्ह्यांमध्ये आर्म अॅक्टची कलमं जोडली गेली.

याआधी फेब्रुवारी 2020 मध्ये मानसा पोलिसांनी हत्यारांच्या वापराला उत्तेजन दिल्याच्या आरोपखाली मूसेवाला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

यानंतर मुसेवाला आपलं गाण, 'गभरू ते केस जेडा संजय दत्त ते' या गाण्यामुळे वादात अडकले होते. या गाण्यामुळे पंजाब क्राईम ब्रँचने त्यांच्याविरोधात गन कल्चर आणि हिंसेला उत्तेजन दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता.

16 जुलै 2020 साली रिलीज झालेल्या 'संजू' गाण्यात सिद्धू मुसेवालांनी आपल्या विरोधात दाखल झालेल्या आर्म अॅक्ट केसची तुलना अभिनेते संजय दत्त यांच्याविरोधातल्या केसशी केली होती.

ऑलिम्पिक नेमबाद आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी अवनीत कौर सिद्धू यांनी आपल्या फेसबुक अकाउंटव्दारे सिद्धू मुसेवाला यांना सल्ला दिला होता.

अवनीत यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं की, " गेल्या काही दिवसांपूर्वी सिद्धू मुसेवालांनी जे गाण सादर केलंय त्यात ते स्वतःची तुलना संजय दत्त यांच्याशी करत आहेत. त्यांच्या विरोधात दाखल झालेले गुन्हे मिरवण्यासारखी गोष्ट आहे असं त्यांना वाटतं. सिद्धू गाण्यात म्हणतात की ज्यांच्यावर केस दाखल आहेत तोच यार आहे, बाकी असेच आहेत."

काँग्रेस पक्षात सहभागी झाल्यानंतर तत्कालीन पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांना मुसेवालांच्या गन कल्चरबद्दल प्रश्न विचारल्यानंतर याचा निर्णय पंजाबची जनताच घेईल असं उत्तर त्यांनी दिलं होतं.

त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या केसेसच्या बाबतीत नवज्योत सिंह सिद्धू यांनी म्हटलं होतं की, "केस दाखल झालीये म्हणजे तो व्यक्ती दोषी आहे असं नाहीये. माझ्याही विरोधात केस दाखल झाली होती. पण तरीही लोकांनी सहा निवडणुका जिंकवून दिल्या."

फेब्रुवारी 2020 साली त्यांच्या एका स्टेज शोमध्ये सिद्धू मुसेवालांनी म्हटलं होतं की, "माझ्या कोणत्याही गावात आजवर ड्रग्सचा उल्लेख आहे का? वेबसीरिजमध्ये दाखवलेली हिंसा पहा. तुम्हीही बंदुका देणं बंद करा, लायसन्स देणं बंद करा, दारूचे गुत्ते बंद करा.

कोरोना व्हायरसच्या काळातही मुसेवाला चर्चेत आले होते. त्यांनी शहीद भगत सिंह नगर जिलह्यातल्या पठलावा गावाचा उल्लेख त्यांच्या एका गाण्यात केला होता.

18 मार्च 2020 ला या गावातल्या 70 वर्षीय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कळलं की या व्यक्तीला कोरोना व्हायरसचं संक्रमण झालं होतं. यानंतर हे संपूर्ण गाव सील करून टाकलं होतं.

मुसेवालांनी या गावाला आपल्या गाण्यात पंजाबच्या कोरोना व्हायरस संक्रमणाचं केंद्र म्हणून सादर केलं होतं. यावर नाराज होऊन या गावकऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना पत्रही लिहिलं होतं.

पंजाब पोलिसांच्या अभियानाचा भाग

लॉकडाऊनच्या काळात सिद्धू मुसेवाला डॉक्टरांचा सन्मान करण्याच्या पोलिसांच्या मोहिमेचाही भाग होते. एप्रिल महिन्यात त्यांनी पोलिसांबरोबर मानसाच्या एका डॉक्टरांचा वाढदिवस साजरा केला.

सिद्धू मुसेवाला यांना अनेकदा विरोध झाला आणि बऱ्याचदा त्यांचं कौतुकही झालं. पण जेव्हा नवज्योत सिंग सिद्धू आणि सिद्धू मुसेवालांना राहुल गांधींना भेटून बाहेर आले तेव्हा त्यांनी म्हटलं की, "भाई, (राहुल गांधी) नी मुसेवालांचं खूप कौतुक केलं आहे. त्यांची गाणी प्रचंड हिट आहेत. ते एक रॉकस्टॉर आहेत. ते आता एक राजकीय नेते बनले आहेत."

याच मुसेवालांचा दिवसाढवळ्या खून झाला आहे. आता पोलिसांच्या तपासानंतर यामागचं संपूर्ण सत्य कळू शकेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)