You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशिया-युक्रेनमध्ये 'व्लादिमीर' नाव इतकं लोकप्रिय का आहे? व्लादिमीर द ग्रेट कोण होते?
- Author, हर्षल आकुडे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
नावात काय आहे, असं लेखक शेक्सपिअर यांनी कधीकाळी म्हटलं होतं. पण जेव्हा-जेव्हा त्यांच्या तोंडून निघालेल्या या वाक्याचा उल्लेख होतो, तेव्हा-तेव्हा 'शेक्सपिअर' यांच्या नावाचा उल्लेखही आपसूकच होतो.
सगळी माणसं विशिष्ट नावामुळेच एकमेकांना ओळखू शकतात. त्या व्यक्तीच्या नावानेच ई-मेल, पत्रव्यवहार होतो. फेसबुक-इन्स्टाग्रामचे प्रोफाईलही नाव टाकूनच तयार होतात.
इतकंच काय, आधार कार्डवर नावात झालेल्या एखाद्या चुकीसाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवणं किंवा गॅझेट बनवून घेणं, अशा वाट्टेल तितक्या खटाटोपी करण्यास आपण तयार असतो.
एखाद्या व्यक्तीने यश मिळवलं तर त्याने 'नाव कमावलं' असं लोक म्हणतात. अयशस्वी व्यक्तीकरिता त्याने 'नाव धुळीस मिळवलं' असं म्हणण्याची पद्धत आहे.
गेल्या काही दिवसांत विविध शहरांच्या, ठिकाणांच्या नामकरणाची जी मालिका देशभरात सर्वत्र सुरू आहे, त्यावरूनसुद्धा नावाचं किती महात्म्य आहे, हे एव्हाना आपल्या लक्षात आलं असेलच.
नावाबाबत इतकं मोठं 'नामपुराण' सांगायचा उद्देश हा की आपल्या सर्वांच्या नावाला महत्त्व तर आहेच. पण त्यातल्या त्यात अनेक प्रसंगांमध्ये नावांना ऐतिहासिक महत्त्व असू शकतं.
दोन 'व्लादिमीर' भिडले
नावाचं हे वैशिष्ट्य सर्वांना सांगण्यासाठी रशिया-युक्रेनपेक्षा चांगलं उदाहरण आपल्याला शोधूनही सापडणार नाही.
सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण माघार घेणार नाही, असं दोन्ही देशांचं म्हणणं आहे. अशा स्थितीत दोन्ही देशांमधील युद्धजन्य स्थिती आगामी काही दिवस कायम राहणार अशी चिन्हे आहेत.
दरम्यान योगायोग म्हणजे, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचं नाव व्लादिमीर पुतीन आहे. तर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं नाव आहे वोलोदिमीर झेलेंस्की.
दोन्ही नेत्यांचं हे एकच नाव असून त्याचा रशियन उच्चार व्लादिमीर (Vladimir) असा आहे. युक्रेनियन भाषेत याच नावाचा उच्चार वोलोदिमीर (Volodymyr) असा केला जातो.
म्हणजेच, या संघर्षाच्या निमित्ताने दोन व्लादिमीर एकमेकांना भिडले आहेत. सद्यस्थितीत दोन्ही व्लादिमीर एकमेकांचं नाव अक्षरशः पाण्यात पाहत आहेत.
लोकप्रिय व्लादिमीर नाव
रशियन-स्लाव्हिक संस्कृतीत व्लादिमीर हे नाव ऐतिहासिक मानलं जातं. सुरुवातीच्या काळात रशिया आणि पुढे ते जगभरात लोकप्रिय झालं आहे.
बेबी नेम अॅनालायझर वेबसाईटवरील माहितीनुसार, 2020 मध्ये जगभरात 116 मुलांचं नाव व्लादिमीर ठेवण्यात आलं. उपलब्ध माहितीनुसार, प्रत्येकी 15,788 मधील एका मुलाचं नाव व्लादिमीर ठेवलं गेलं आहे.
रशियामध्ये हे नाव विशेष लोकप्रिय आहे. द मॉस्को टाईम्समधील एका बातमीनुसार, रशियात 1902 ते 2007 या 105 वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या पहिल्या तीन नावांमध्ये अलेक्झांडर, सर्गेई यांच्यानंतर तिसऱ्या स्थानी व्लादिमीर नावाचा समावेश होतो.
व्लादिमीर या शब्दाचा स्थानिक भाषेत अर्थ होतो साम्राज्य करणारा किंवा सम्राट.
सोव्हिएत रशियाची स्थापना करणाऱ्या लेनिन यांना जगभरातील कम्युनिस्ट नेत्यांमध्ये विशेष ओळख आहे. त्यांचंही पूर्ण नाव व्लादिमीर लेनिन असं होतं, हे विशेष.
रशियाच्या आजूबाजूच्या परिसरात विविध स्वरुपात हे नाव आढळून येतं. बेलारुसियनमध्ये उलादीमीर, पोलिशमध्ये व्लोदीमिर्झ, जर्मनमध्ये वाल्देमार किंवा वोल्देमार ग्रीकमध्ये व्लादिमिरोज अशा वेगवेगळ्या स्वरुपात हे नाव पाहायला मिळतं.
व्लादिमीर द ग्रेट आणि ऐतिहासिक महत्त्व
व्लादिमीर नावाला रशियन-स्लाव्हिक संस्कृतीत ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे राजकुमार व्लादिमीर द ग्रेट हे होय.
बीबीसी न्यूजच्या बातमीनुसार, 1 हजार वर्षांपूर्वी या भागात असलेल्या कीव्हन रुस या साम्राज्याचे व्लादिमीर द ग्रेट हे राजकुमार होते. या संपूर्ण साम्राज्याच्या अधिपत्याखाली आजच्या युक्रेन, रशियासह आजूबाजूचा प्रदेश त्यावेळी होता.
या भागातील राजे स्वातोस्लाव्ह आणि राणी मालुशा यांना तीन मुले होती. इसवी सन 970-80 च्या दशकात एका मोहिमेवर जाताना त्यांनी आपल्या राज्याची तीन भागांत विभागणी करून त्याची जबाबदारी आपल्या मुलांकडे दिली.
ज्येष्ठ पुत्र यारोपॉक यांना मुख्य प्रदेश कीव्ह, मध्य भागातील द्रेव्हल्यानी परिसर ओलेग यांना तर नोव्हगोरॉड परिसर व्लादिमीर यांच्याकडे देण्यात आला.
व्लादिमीर यांनी पुढे विविध देशांत प्रवास केला. त्यांचा संपर्क मुस्लीम, ज्यू तसंच ख्रिश्चन धर्माशी आला. यामध्ये येशू ख्रिस्ताच्या संदेशाने प्रभावित होऊन त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला.
पुढे व्लादिमीर द ग्रेट यांनी संपूर्ण देशात ख्रिश्चन धर्माचा प्रसार अत्यंत वेगाने केला होता. त्यामुळे पुढे त्यांना या परिसरात संत म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
इसवी सन 958 मध्ये जन्मलेल्या व्लादिमीर यांनी 37 वर्ष राज्यकारभार आणि धर्मप्रसाराचं कार्य केलं. अखेर 1015 मध्ये त्यांचं निधन झालं.
रशियाचे पहिले राज्यकर्ते म्हणून व्लादिमीर द ग्रेट यांचं नाव घेतलं जातं. रशियन ऑर्थोडॉक्स चर्चची स्थापना त्यांनीच केली. त्यामुळे मूळचे युक्रेनियन प्राचीन राजे असलेल्या व्लादिमीर द ग्रेट यांना रशियामध्ये प्रचंड आदर दिला जातो. त्यामुळे भावनिकदृष्ट्या रशियन लोकांच्या मनात व्लादिमीर यांचं विशेष स्थान आहे.
व्लादिमीर द ग्रेट यांची 1 हजारावी पुण्यतिथी 2015 मध्ये साजरी करण्यात आली. या निमित्ताने व्लादिमीर द ग्रेट यांचा भव्य पुतळा रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये उभारण्यात आला आहे. युक्रेनची राजधानी कीव्ह येथेही व्लादिमीर द ग्रेट यांचं एक स्मारक आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)