व्लादिमीर पुतीन यांच्यावर टॅक्सी चालवण्याची वेळ का आली होती?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 1991 मध्ये सोव्हिएत संघाचे तुकडे झाल्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. तसंच त्यांनी पैसे कमावण्यासाठी एकेकाळी टॅक्सी ड्रायव्हरचं कामही केलं होतं, असं सार्वजनिकरित्या सांगितलं आहे.

सोव्हिएत संघामध्ये फूट पडल्यानंतर रशियासमोर आर्थिक संकटांचा डोंगर उभा ठाकला होता. त्यामुळं रशियातील नागरिकांना पैसे कमावण्यासाठी नवनवीन पद्धतींचा अवलंब करावा लागला होता.

ऐतिहासिक रशियाचे तुकडे झाल्यानंतरच्या त्यांच्या जीवनातील काही घटनांबाबत पुतीन यांनी माहिती दिली आहे.

पुतीन यांच्या या नव्या टिपण्णीनंतर यामुळं युक्रेनबाबतच्या रशियाच्या इच्छांना बळ मिळेल, असा अंदाज वर्तवला जात होता. युक्रेनही पूर्वी सोव्हिएत संघाचा भाग होता.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 24 फेब्रुवारीला युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू केली.

युक्रेनच्या पूर्वेकडील लुहान्स्क आणि दोनेत्स्क या दोन प्रांतांमधलं युक्रेनच्या लष्कराचं अस्तित्त्वं आपल्याला संपुष्टात आणायचं असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी म्हटलं होतं. मात्र, रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव्हपर्यंत पोहोचल्याची माहिती युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं दिलीय.

टॅक्सी चालवल्याचा उल्लेख कुठे केला?

पुतीन यांच्यावरचा 'रशिया, लेटेस्ट हिस्ट्री' नावाचा एक माहितीपट समोर आला आहे. रविवारी त्याचं प्रसारण करण्यात आलं होतं. त्यात पुतीन यांची हि टिपण्णी पाहायला मिळाली.

"सोव्हिएत संघाचं विखुरणं हे ऐतिहासिक असं विघटन होतं," असं त्यांनी यात म्हटलं आहे.

पाश्चिमात्य देशांना असं वाटतं की, रशियाचं पुढंही विघटन होणार आहे आणि ते नजीकच्या काळात होणार आहे, असं पुतीन यात म्हणताना दिसत आहेत.

सोवियत संघाच्या विघटनाबाबतची पुतीन यांची वक्तव्यं आणि भूमिका आधीच सार्वजनिक आहेत. याला त्यांनी कायम एक संकट म्हटलं आहे. मात्र वैयक्तिक अडचणींबाबत त्यांची मतं प्रथमच समोर आली आहेत. ती मतं अगदी नवी आहेत.

"अनेकदा मला अतिरिक्त पैसा कमावायचा असायचा. म्हणजे ड्रायव्हर म्हणून कार चालवून मला पैसे कमवावे लागायचे. प्रामाणिकपणावर बोलणं हे फारसं कुणाला आवडत नाही मात्र, दुर्दैवानं असंच घडलं होतं," असं त्यांनी माहितीपटात म्हटलं.

त्याकाळी रशियामध्ये टॅक्सी ही अत्यंत दुर्मिळ होती. अनेक लोक कमाईसाठी अनोळखी लोकांना प्रवासासाठी टॅक्सी भाड्यानं द्यायचे. काही लोक अॅम्ब्युलन्सही टॅक्सीसारखी चालवायचे.

पुतीन हे सोव्हिएत संघाची गुप्तचर संस्था केजीबीचे एजंट होते असंही म्हटलं जातं.

मात्र, 1990 च्या सुरुवातीला ते सेंट पीट्सबर्गमध्ये मेयर अॅनाटोली सोबचक यांच्या कार्यालयात काम करायचे.

ऑगस्ट 1991 मध्ये सोव्हिएत संघाचे राष्ट्राध्यक्ष मिखाइल गोर्बाचेव यांच्या तख्तपालटानंतर त्यांनी राजीनामा दिला होता, असं ते सांगतात. या तख्तपालटानंतर सोव्हिएत संघाचं विघटन झालं होतं.

"एका रात्री मी बसमधून जात होतो. ती बस डेपोमध्ये जात होती. त्यावेळी मी एक रुग्णवाहिका पाहिली. अशा गाड्यांना रशियात 90 च्या दशकात टॅक्सी म्हणून वापरलं जात होतं. मॉस्कोमधील प्रत्येक तरुण ज्याला मी ओळखत होतो, तो याचा नियमितपणे वापर करत होता. रशियातील घरी कार असलेल्या प्रत्येकाने बॉम्बिला (बॉम्बर) म्हणून त्यांच्या कार दिल्या होत्या. हे नाव अनाधिकृत टॅक्सी चालकांसाठी ठेवण्यात आलं होतं," असं बीबीसी प्रतिनिधी पॅट्रिक जॅक्सन सांगतात.

"1989 मध्ये मी सर्वप्रथम विद्यार्थी म्हणून इथं आलो त्यावेळी याठिकाणी दोन अलिखित नियम होते. पहिला म्हणजे एकापेक्षा अधिक व्यक्ती असताना कारमध्ये जायचं नाही आणि दुसरा म्हणजे कारमध्ये बसण्याआधी भाडं ठरवून घ्या."

"त्यावेळी अधिकृत टॅक्सींची संख्या पुरेशी किंवा जास्त नव्हती. साधारणपणे तेव्हा असलेला सर्वात मोठा धोका म्हणजे, तुम्ही एका अशा ड्रायव्हरबरोबर जात असायचे जो तुमचं काहीही ऐकत नसायचा."

"1991 मध्ये सोव्हिएत संघाचे तुकडे झाले तेव्हा रूबलचं मुल्य घटलं होतं. त्यामुळं अनाधिकृत बाजार समोर आले. तुम्ही रस्त्यावरून जाताना असे लोक शोधू शकत होते, जे तुम्हाला कुठेही सोडू शकतील."

"कधी-कधी चालकांशी माझ्या चांगल्या गप्पा होत होत्या. पण बहुतांशवेळा शांतताच असायची. कदाचित मला असं वाटायचं की, पाश्चिमात्य देशातील असल्यानं ते माझ्याकडून जास्त पैसे घेऊ शकतात किंवा ते लाजेनं काही बोलत नसतील, असंही होऊ शकतं.

कारण एवढी वर्ष ऐशोरामात जीवन जगल्यानंतर ते कार चालवण्याचं काम करत होते. जीवनात त्यांनी आखलेल्या योजना पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)