पुतिन यांना जेव्हा पत्रकारानं विचारलं, 'तुम्ही खुनी आहात का?'

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकन टीव्ही चॅनेल एनबीसी न्यूजला मुलाखत दिली. या मुलाखतीत पुतिन यांनी म्हटलं की, अमेरिका आणि रशियाच्या संबंधांसाठी हा सर्वांत वाईट कालखंड आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे जीनिव्हामध्ये भेटणार आहेत. या भेटीच्या आधी एनबीसी न्यूजने पुतिन यांची घेतलेली मुलाखत प्रसिद्ध झाली आहे.

तुम्ही खुनी आहात का? असा थेट प्रश्नच या मुलाखतीत अमेरिकन पत्रकारानं विचारला.

पुतिन यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं की, त्यांच्यावर अशापद्धतीचे आरोप होतच असतात.

पुतिन यांच्याबद्दल बायडन यांचं मत काय?

पुतिन यांनी अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची तुलना केली.

काही महिन्यांपूर्वी जो बायडन यांनाही विचारण्यात आलं होतं की, त्यांच्यादृष्टिनं पुतिन हे खुनी आहेत का? या प्रश्नाचं थोडक्यात पण थेट उत्तर बायडन यांनी दिलं होतं.

एबीसी चॅनेलचे होस्ट जॉर्ज स्टेफनापॉलस यांच्या प्रश्नाला उत्तर देताना बायडन यांनी म्हटलं होतं की, हो मला तसं वाटतं.

जॉर्ज हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचे माध्यम सचिव आणि राजकीय सल्लागार होते. त्यांच्या मुलाखतीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केलेल्या विधानावर रशियाने तीव्र प्रतिक्रिया नोंदवली होती. रशियाने अमेरिकेतून आपल्या राजदूतांना परत बोलावलं होतं.

पुतिन यांनी काय म्हटलं?

यानंतर रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं अमेरिकन राजदूत जॉन साल्विन यांना वॉशिंग्टनला परत जाण्याची सूचना केली.

मात्र ते अजूनही रशियामध्येच आहेत.

एनबीसी न्यूजनं विचारलेल्या प्रश्नावर पुतिन यांनी म्हटलं की, "माझ्या कार्यकाळात सगळीकडून होणारी टीका, आरोप झेलण्याची सवय मला लागून गेलीये. वेगवेगळ्या उद्देशाने आणि निमित्ताने असे आरोप केले जातात. आता मला त्याचं आश्चर्यही वाटत नाही."

आपल्याबद्दलचा हा कठोर दृष्टिकोन अमेरिकन संस्कृतीचा भाग बनल्याचंही पुतिन यांनी म्हटलं.

ट्रंप आणि बायडन यांची तुलना

ट्रंप आणि बायडन यांची तुलना करणाऱ्यासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना पुतिन यांनी दोघांमध्ये खूप फरक असल्याचं म्हटलं.

ट्रंप यांचं व्यक्तिमत्त्व बहुरंगी आहे, तर बायडन हे मात्र शंभर टक्के राजकारणी आहेत.

पुतिन यांनी म्हटलं, "त्यांचं व्यक्तिमत्त्व एकदम वेगळं आहे. त्याचे काही फायदे आणि तोटेही आहेत. मात्र, नवीन राष्ट्राध्यक्ष दोन्ही राष्ट्रांमधील संबंध बिघडतील अशी पावलं उचलणार नाहीत, अशी मला आशा आहे."

याआधी पुतिन यांनी 2018 मध्ये तत्कालिन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचीही भेट घेतली होती. बायडन आणि पुतिन यांची भेट 16 जूनला जिनिव्हामध्ये होणार आहे.

याचवर्षी एप्रिल महिन्यात बायडन यांनी रशियावर काही निर्बंध लादले होते. अमेरिकेवर झालेला सायबर हल्ला आणि 2020 च्या निवडणुकीत रशियानं केलेल्या हस्तक्षेपाची ही प्रतिक्रिया असल्याचं अमेरिकेनं म्हटलं होतं. त्यानंतर अमेरिका आणि रशियानं एकमेकांच्या राजनयिक अधिकाऱ्यांना निलंबित केलं होतं.

तुम्ही खुनी आहात का?

एनबीसीच्या पत्रकाराने गेल्या काही वर्षांत मारल्या गेलेल्या रशियन नागरिकांची नावं सादर केली. आना पोलित्कोव्सकाया, अलेक्झांडर लित्विनेन्को, सर्जेई मेग्नित्सकी, बोरिस नेमत्सोव आणि मिखाइल लेसिन यांची नावं घेतली.

पुतिन यांनी उत्तर देताना म्हटलं की, "मला असभ्य दिसायचं नाहीये, पण हा एकप्रकारे अपमान आहे."

पुतिन यांनी पुढं म्हटलं की, "आम्ही हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना शोधलं आहे आणि त्यापैकी काहीजण जेलमध्ये आहेत. यादृष्टिनं आमचे प्रयत्न सुरू आहेत."

या मुलाखतीच्या दरम्यान पुतिन यांनी वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्ताचंही खंडन केलं होतं. या वृत्तात रशियाकडून इराणला अति उच्च प्रतीची सॅटेलाइट प्रणाली दिली जात आहे.

ही फेक न्यूज असल्याचं सांगत पुतिन यांनी म्हटलं की, किमान मला तरी याबाबत कोणतीही माहिती नाही.

पुतिन आणि बायडन यांची भेट

व्हाइट हाऊसनं शनिवारी (12 जून) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, रशियन राष्ट्राध्यक्षांच्या भेटीनंतर जो बायडन हे स्वतंत्रपणे माध्यमांशी संवाद साधतील. दुसरीकडे, रशियन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोफ यांच्यानुसार पुतिन हेसुद्धा स्वतंत्रपणे माध्यमांशी बोलतील.

वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात बायडन यांनी म्हटलं की, ते रशियन राष्ट्राध्यक्षांसोबत मानवाधिकारांवर चर्चा करतील.

त्यांनी म्हटलं की, "भेटीदरम्यान मी मानवाधिकारांबद्दल अमेरिका, युरोप आणि अन्य लोकशाही देशांची जी बांधिलकी आहे, त्याचा पुनरुच्चार करू."

ही भेट सकारात्मक असेल आणि दोन्ही देश परस्परांच्या हिताचा विचार करतील, असं पुतिन यांनी म्हटलं आहे, तर व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, ही भेट खुल्या मनानं आणि प्रामाणिकपणे होईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)