You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युक्रेन-रशिया संघर्ष : पुतिन यांच्याबद्दल गुगलवर शोधण्यात आलेल्या 11 भन्नाट गोष्टी
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 24 फेब्रुवारीला युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू केली. त्यानंतर त्यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.
पुतिन हे प्रसिद्ध नेते असले तरी त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची अनेकांना इच्छा आहे.
लोकांनी त्यांचं नाव आणि त्यांच्याबद्दलची माहिती गुगलवर शोधण्याचा प्रयत्न अनेकदा केला आहे. लोकांची पुतिन यांच्याबद्दल असलेली ही उत्सुकता पाहून आम्ही देखील एक प्रयोग केला.
गुगलवर आम्ही पुतिन यांच्यापुढे गुगल सर्च स्वतःहून काय सजेस्ट करतं हे तपासलं. लोकांच्या मनात पुतिन यांच्याबद्दलचे कुठले प्रश्न आहेत याची यातून आम्हाला कल्पना आली. काही दिवसांपूर्वी बीबीसीनं केलेली ही स्टोरी पुन्हा शेयर करत आहोत.
लोक पुतिन यांच्याबद्दल गुगलवर शोधत असलेल्या काही प्रश्नांची (यात काही अतरंगी प्रश्नही आहेत) खरी उत्तरं आम्ही तुमच्यासाठी देत आहोत.
1. व्लादिमीर पुतिन विवाहित आहेत का?
सध्या तरी नाही. आमच्या माहितीप्रमाणे, त्यांचा जून 2013मध्ये 30 वर्षीय लूडमिला यांच्यासोबत घटस्फोट झाला. घटस्फोटापूर्वी ते लूडमिला यांच्याबरोबर फार क्वचित एकत्र कार्यक्रमांमध्ये दिसले होते.
पूर्वीच्या जिमनॅस्ट आणि सध्या राजकारणात असलेल्या अॅलिना काबाएवा यांचे आणि पुतीन यांचे प्रेमसंबंध असल्याची अफवा आहे. पण, पुरावे नसल्याने या अफवेबाबत शंकाच अधिक आहे.
2. पुतिन डावखुरे आहेत का?
नाही. जानेवारीमध्ये हा फोटो घेतल्यानंतर काही बदल झाला असेल तर माहीत नाही.
3. पुतिन श्रीमंत आहेत का?
निवडणुकीपूर्वी रशियातल्या केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केलेल्या माहितीनुसार, पुतिन यांना पगारापोटी वर्षाला 1,12,000 डॉलर म्हणजेच 72 लाख 83 हजार 920 रुपये मिळतात. पण, दोन वर्षांपूर्वी अमेरिकेच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या एका अधिकाऱ्याने बीबीसीला पुतिन भ्रष्टाचारी असल्याचं सांगितलं. तसंच, पुतिन यांनी अनेक वर्षांपासून आपली मालमत्ता लपवली असल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितलं.
"त्यांनी अनेकदा आपल्या जवळच्यांना फायदा मिळवून दिला आहे. तर, त्यांच्या दृष्टीने जे त्यांचे मित्र नाहीत त्यांना अशा फायद्यांपासून त्यांनी दूर ठेवलं आहे," असं अॅडम झुबिन यांनी सांगितलं.
क्रेमलिनकडून मात्र या आरोपांचा साफ इन्कार करण्यात आला आहे. 2007मध्ये CIAकडे आलेल्या माहितीनुसार पुतिन यांची व्यक्तिगत मालमत्ता ही 40 बिलियन अमेरिकी डॉलरच्यावर गेली आहे. तर, डोनाल्ड ट्रंप यांच्या एका टीकाकारानं 2012मध्ये म्हटल्याप्रमाणे त्यांची व्यक्तिगत मालमत्ता 70 बिलियन अमेरिकी डॉलरच्यावर गेली आहे. असं असल्यास सध्या ते जगातले सगळ्यांत श्रीमंत व्यक्ती आहेत.
4. पुतिन यांचा मृत्यू झाला आहे का?
नाही. निवडणुकीत त्यांनी नुकताच मिळवलेला विजय ते जिवंत असल्याचा पुरावा आहे. त्यांच्या तब्येतीबद्दल 2015मध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. कारण, तेव्हा ते सलग 10 दिवस कुठेच दिसले नव्हते.
लष्करी उठाव करून त्यांना हटवण्यात आलं का? त्यांचा मृत्यू झाला आहे का?, त्यांना पुन्हा अपत्यप्राप्ती झाली आहे का? अशा बातम्या तेव्हा प्रसिद्ध झाल्या होत्या. पण, काही दिवसांत पुतिन पुन्हा जनतेला दिसल्याने हे प्रश्न मावळले.
5. पुतिन सतत हसत का असतात?
पुतिन हे इतरांपेक्षा वेगळे नाहीत. तुम्ही जेव्हा आनंदी असता तेव्हा तुमच्या शरीरातून एंडॉर्फीन स्रवते, त्यामुळे मेंदूद्वारे चेहऱ्याच्या स्नायूंना संदेश पोहोचवला जातो.
हे स्नायू विस्तारल्यामुळे चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटते. त्यांच्या कुत्र्यांसोबत बर्फात खेळताना ते कायम आनंदी आणि हसताना दिसतात.
6. पुतिन यांना युक्रेन ताब्यात घ्यायचं आहे?
खरं तर याला सुरुवात झाली आहेच. त्यांनी यापूर्वीच क्रिमिआ ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. अधिकृतरित्या 2014मध्ये पूर्व युक्रेनमध्ये रशियन फौजांनी थेट प्रवेश केला नव्हता. आता मात्र व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केला आहे.
7. पुतिन सीरियाला पाठिंबा का देतात?
सीरिया हा धोरणात्मकदृष्ट्या रशियासाठी महत्त्वाचा देश आहे. रशियाचे दोन लष्करी तळ हे सीरियामध्ये आहेत. बशर अल-असाद यांचं सरकार रशियासाठी काही काळ महत्त्वाचं ठरलं होतं.
2011मध्ये सीरियामध्ये जेव्हा युद्धाला तोंड फुटलं, तेव्हा रशियानं असाद सरकारला मदत करण्याचं ठरवलं होतं. मात्र, सप्टेंबर 2015पर्यंत त्यांनी वादामध्ये थेट सहभाग घेतलेला नव्हता.
यामुळे दोन गोष्टी साधल्या. रशियानं असाद यांच्या सरकारला साहाय्य केलं आणि या क्षेत्रातलं आपलं वर्चस्व कायम राखलं. अमेरिकेला या भागात त्यांची उद्दीष्टं पूर्ण करण्यात अडथळे आले.
8. पुतिन यांना मुलगा आहे का?
नाही. पण, त्यांना दोन मुली आहेत. पूर्वाश्रमीची नृत्यांगना आणि मॉस्को स्टेट युनिर्व्हसिटीमध्ये कार्यरत असलेली कॅटरिना आणि एंडोक्रोनोलॉजी विषयात काम करत असलेली मारिया या त्यांच्या दोन मुली.
याव्यतिरिक्त या दोन मुलींबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही आणि त्यांच्याबद्दल पुतीन यांच्याकडूनही कोणती माहिती मिळत नाही. मात्र, 2015मध्ये रॉयटर्सने केलेल्या एका संशोधनानुसार, कॅटरिना आणि त्यांचा पती हे खूप श्रीमंत आहेत.
9. पुतिन यांना इंग्रजी येतं का?
हो. त्यांना फर्ड इंग्रजी बोलता येतं, असं चित्रीकरण यापूर्वीच प्रसिद्ध झालं आहे. त्यांचे प्रवक्ते दिमीत्री पेस्कॉव यांनी सांगितलंही आहे की, त्यांच्यासाठी इंग्रजीत भाषांतर करणाऱ्या मध्यस्थांनी जर चूक केली तर पुतीन त्यांची ही चूक तत्काळ सुधारतात.
10. पुतिन यांना ट्रंप आवडतात का?
हा खूप चांगला प्रश्न आहे. 2016च्या अमेरिकेतील निवडणुकांमध्ये ट्रंप यांना सहकार्य करण्यासाठी गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 13 रशियन नागरिकांवर आरोप ठेवण्यात आला आहे.
यात पुतिन यांच्या एका जवळच्या साथीदारचाही समावेश आहे. पण, म्हणून पुतिन यांना खरंच ट्रंप आवडतात का? याचं खरं उत्तर फक्त रशियाचे अध्यक्षच देऊ शकतात.
11. पुतिन यांनी मीम्सवर बंदी घातली आहे का?
अशा आशयाचं वृत्त 2015मध्ये प्रसिद्ध झालं होतं. मात्र, हा बंदीचा प्रस्ताव होता थेट बंदी नव्हती.
पण, गेल्या वर्षी रशियाच्या कायदा मंत्रालयानं घोषणा केली की, पुतिन यांच्याबद्दल विटंबनात्मक चित्र प्रसारित झाल्यास त्याला कट्टरतावादी साहित्य मानलं जाईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)