मराठी विद्यार्थी अन् युक्रेनचं 'युद्ध': 'आमच्या विद्यापीठात बंकर बॉक्स ठेवलेत'

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमधील फुटीरतावाद्यांनी ताब्यात घेतलेल्या प्रदेशांना मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानंतर रशियन सैन्य पूर्व युक्रेनच्या फुटीरतावादी भागात पाठवलं जाईल. या भागात ते 'शांतता राखण्यासाठी' प्रयत्न करेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

युक्रेनमधील दोनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन रशियन समर्थक प्रांतांना पुतिन यांनी स्वतंत्र मान्यता दिली आहे. या घोषणेनंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं एक आपात्कालीन बैठक बोलावली आहे.

ही ताजी घडामोड असली तरी गेलया काही दिवसांपासून रशिया-युक्रेन सीमेवर तणाव होता. त्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेणाऱ्या नागपूरच्या 22वर्षीय पवन मेश्रामशी बीबीसी मराठीनं बातचीत केली होती.

प्रश्न -युक्रेनमध्ये कधीपासून आहेस, आता तिकडे कशी परिस्थिती आहे?

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये युक्रेनला आलो. सध्या मी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला आहे. इथे येऊन मला दोन वर्ष झाली आहेत. काही मुलं भारतात जायला निघाली आहेत. काही इथेच आहेत. रशिया-युक्रेनचा वाद सुरू आहे. अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना परत बोलावून घेतलं आहे. भारत सरकारने अशी काही घोषणा केलेली नाही.

भारतात परत जाण्यासंदर्भात सरकारकडून काही माहिती मिळालेली नाही. 2014 मध्येही संघर्षाची परिस्थिती उद्भवली होती. आताही तशाच स्वरुपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. भारताच्या सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा असं इथल्या मुलांना वाटतं. आमच्या सुरक्षिततेसंदर्भात निर्णय व्हावा.

प्रश्न -तुझं रूटीन कसं असतं? सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे त्यात काही बदल झाला आहे का?

इथेही कोव्हिड केसेस वाढल्या आहेत. लोकल मार्केटमध्ये नेहमी पोलीस असतात. कुठेही काही घडलं तर पोलीस येतात. आधी आम्ही सहजपणे मार्केटमध्ये जायचो. आता गेलं की प्रश्न विचारले जातात- तुम्ही कुठून आला आहात, कशासाठी आला आहात. पासपोर्टची पाहणी केली जाते.

प्रश्न -घरच्यांशी नियमित बोलणं होत असेल. त्यांचं काय म्हणणं आहे?

घरचे दररोज कॉल करतात. प्रत्येक मुलाला सतत घरून कॉल येतात. युक्रेनमध्ये काय परिस्थिती आहे, आम्ही कसे आहोत हे विचारतात. मी त्यांना माझ्यापरीने समजावून सांगतो. मला असं वाटतं की शिक्षण सुरू आहे. ते थांबू नये.

कोव्हिडवेळी ऑनलाईन क्लासेस सुरू करण्यात आले. सुखरुप घरी परतायचं आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू राहिलं तर परतता येईल.

प्रश्न-भारत सरकार, दूतावासाकडून मायदेशी परतण्याबाबत काही योजना तयार करण्यात आली आहे का?

आम्हाला परत जाण्यासंदर्भात सरकारकडून कोणतीही सूचना मिळालेली नाही. 25 डिसेंबरला आम्हाला काही फॉर्म्स भरायला सांगण्यात आले होते. युक्रेनमध्ये किती विद्यार्थी आहेत याची माहिती घेण्यात आली. आम्ही ते फॉर्म भरून दिले आहेत. पण अजून तरी सरकारकडून काही सूचना, घोषणा झालेली नाही.

प्रश्न-मायदेशी परत जाण्यासंदर्भात तू काय ठरवलं आहेस? तुझ्याबरोबर अन्य देशातली मुलंमुली आहेत, त्यांचं काय सुरू आहे?

काही देशांमधली मुलं मायदेशी जाण्यासाठी निघाले आहेत. भारताचे काही विद्यार्थीही निघाले आहेत. आम्ही जे विद्यार्थी इथे आहोत त्यांनाही वाटतं की काहीतरी व्हावं आणि आम्ही सुखरुप घरी पोहोचावं. कारण आम्हाला तेवढी काळजी नाहीये, पण घरच्यांना खूप काळजी वाटते. त्यांचे सतत फोन येत असतात.

युक्रेनमधल्या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल, घरच्यांची काळजी दूर व्हावी यासाठी आम्ही सुखरूप घरी पोहोचणं आवश्यक आहे.

प्रश्न-आपात्कालीन परिस्थिती उदभवली तर स्थानिक प्रशासन, कॉलेजकडून काही ट्रेनिंग वगैरे देण्यात आलं आहे का?

अशी प्रक्रिया दिसलेली नाही. इथल्या स्थानिक प्रशासनाने आमच्याशी संवाद साधलेला नाही. एकदा लेक्चरदरम्यान शिक्षकांनी सांगितलं की युद्ध झालं तर काय करायचं याबद्दल सांगितलं. विद्यापीठात वेगवेगळे विभाग आहेत. काहींमध्ये बंकर बॉक्स आहेत.

आपात्कालीन परिस्थिती उद्भवली तर आपण त्यात जाऊन सुरक्षित राहू शकतो. तिथे कसं राहायचं, ऑक्सिजन पुरवठा कसा मिळवायचा ते सांगितलं. बाहेरच्या देशातले विद्यार्थी बरेच आहेत. सगळ्यांनाच ही सुविधा मिळेल असं नाही. युक्रेन आपल्या माणसांची काळजी घेईल तशी आमची काळजी घेतली जाईल असं सांगता येत नाही.

प्रश्न-तिथल्या मीडियातून तुमच्यासमोर काय चित्र स्पष्ट होतं आहे?

काहीतरी वाईट होणार असं त्यांनाही वाटत आहे. त्यादृष्टीने त्यांची तयारी सुरू आहे. युक्रेनचं लष्कर सज्ज झालं आहे. जे होईल त्याचा आपण सामना करू अशी भावना आहे. रशियाच्या प्रश्नाकडे ते अतिशय गंभीरपणे बघतात.

आता युक्रेन कुठे आहे आणि रशिया युक्रेनवर आक्रमण करणार का ते थोडक्यात जाणून घेऊया...

युक्रेन कुठे आहे?

युक्रेनच्या सीमा युरोपियन युनियन आणि रशिया या दोन्हींना लागून आहेत. पण युक्रेन पूर्वी सोव्हिएत साम्राज्याचा भाग होता. त्यामुळेच रशियाशी युक्रेनचे अगदी जवळचे सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत आणि इथे रशियन भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते.

युक्रेनच्या युरोपियन संघटनांच्या दिशेने झुकण्याला रशियाने दीर्घकाळापासून विरोध केलाय आणि युक्रेनने कधीही नाटोमध्ये सहभागी होऊ नये आणि नाटोच्या कोणत्याही गोष्टीला आपल्या भूमीवर परवानगी देऊ नये अशी रशियाची मागणी आहे.

रशिया धार्जिण्या राष्ट्राध्यक्षांची सत्ता युक्रेनियन नागरिकांनी 2014मध्ये संपुष्टात आणली. त्यानंतर रशियाने युक्रेनकडून दक्षिण क्रिमिआच्या भागाचा ताबा मिळवला. त्यानंतर रशियाचं पाठबळ असणाऱ्या फुटीरतावाद्यांनी युक्रेच्या पूर्वेकडील दोनबास भागांमध्ये मोठा ताबा मिळवला.

रशिया आक्रमण करणार?

घुसखोरांनी व्यापलेल्या या भागाजवळ रशियाने रणगाडे, तोफखाने आणि स्नायपर्स - अचूक वेध घेणारे बंदूकधारी सैनिक पाठवल्याचं युक्रेनचं म्हणणं आहे. युक्रेनच्या सीमेजवळच्याच भागात रशियाचं 90 हजारांपेक्षा जास्त सैन्य असल्याच्या बातम्या आल्यायत आणि हीच काळजीची गोष्ट आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी हल्ला करण्याचं ठरवल्याचं वा लगेच हल्ला होण्याची शक्यता असल्याचं अजून कशावरूनही सूचित झालेलं नाही. सगळ्यांनी शांत रहावं असं आवाहन क्रेमलिनच्या प्रवक्त्यांनी केलं होतं. पण 2022च्या सुरुवातीला कधीतरी हल्ला होऊ शकतो असा युक्रेनच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा आणि पश्चिमेतल्या देशांच्या गुप्तचर यंत्रणांचा अंदाज आहे.

सैन्य तळ दाखवणारे सॅटेलाईट फोटोज हे पूर्व युक्रेनमधले नसून क्रिमिआमधले आहेत असं रशियाने सुरुवातीला सांगितलं. पण त्यांनतर 'आम्हाला आमच्या भूभात सैन्य हलवण्याचा हक्क आहे' असं राष्ट्राध्यक्षांच्या सहकाऱ्याने म्हटलं. पण याचा अर्थ आणखी गंभीर काही होईल असा काढू नये, असंही म्हटलं.

युक्रेनने त्यांच्या एकूण सैन्याच्या निम्मे जवळपास 1 लाख 25 हजार सैनिक पूर्व सीमेजवळ तैनात केले असून रशियाचा पाठिंबा असणाऱ्या फुटीरतावाद्यांनी व्यापलेल्या भागांवर हल्ला करण्याचा कीव्हचा इरादा असल्याचा उलट आरोप रशियाने केला.

रशियाला काय हवंय?

युक्रेनबाबत पश्चिमेकडच्या देशांनी रशियाची 'रेड लाईन' - धोक्याची रेषा, ओलांडू नये असा इशारा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिलाय.

काय आहे ही धोक्याची रेषा?- नाटोने पूर्वीकडच्या देशांमध्ये हातपाय पसरू नयेत आणि रशियाला धोका निर्माण करतील अशाप्रकारे त्यांच्या शेजारच्या देशांमध्ये युद्धसामुग्री तैनात करू नये, असं पुतिन यांचं म्हणणं आहे.

पूर्व युक्रेनमधल्या बंडखोरांना रशियाचा पाठिंबा आहे आणि त्यांच्या विरोधात युक्रेनने तुर्कीची ड्रोन्स तैनात केली होती. याला रशियाचा विरोध आहे. सोबतच काळ्या समुद्रात पश्चिमेतल्या देशांच्या सैन्यासोबत युक्रेनने केलेल्या सैनिकी सरावालाही रशियाचा विरोध आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)