रशियाच्या 'या' लेफ्टनंट कर्नलने ऑर्डर पाळायला नकार दिला आणि तिसरं महायुद्ध थांबलं

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

38 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तारीख होती...26 सप्टेंबर. अर्ध जग साखरझोपेत होतं, कुठे नुकताच दिवस सुरू झाला होता तर कुठे रात्रीचा चंद्र उगवला होता.

आपआपल्या आयुष्यात रममाण असणाऱ्या लोकांना कल्पनाही नव्हती की त्यांचं जग विनाशाच्या उंबरठ्यावर जाऊन ठेपणार आहे.

काळ-अवकाश, ज्याला 'स्पेस अँड टाईम' असं म्हणतात त्याचा काटा जरा इकडे तिकडे झाला असता तर जग नष्ट होणार होतं.

पोस्ट अॅपोकलिप्टिक जग, विनाशानंतरच्या जगात आपण जगत असतो, कदाचित मानवी समाज आहे तसा राहिला नसता, जमिनीखालच्या बंकरमध्ये जगणं, किरणोत्सर्ग, त्यामुळे होणारे आजार, खुरडत जगणं, अन्न धान्याची कमतरता, भूकबळी, स्वच्छ पाण्यासाठी रोज होणाऱ्या हाणामाऱ्या हेच आपलं वर्तमान असतं.

आजच्या जगात जे देश आहेत, त्यांचं भौगोलिक स्थान आहे , त्यांच्या सध्याच्या सीमा आहेत त्या अस्तित्वात नसत्या, आपण जो इतिहास शिकतो तो वेगळाच असता, कदाचित जगण्याच्या रोजच्या मारामारीत इतिहास शिकण्याइतका वेळ नसता.

पण हे भयानक भविष्य फक्त एका माणसांमुळे आपल्या वाट्याला यायचं टळलं. एक माणूस ज्याने जगाला सर्वनाशापासून वाचवलं. त्या माणसाचं नाव होतं, स्तानिस्लाव्ह पेट्रोव्ह. त्यादिवशी काय झालं ही त्याची गोष्ट.

शीतयुध्दाचे दिवस होते ते. रशिया आणि अमेरिकेची अण्वस्त्रांनी सज्ज विमानं एकमेकांच्या दिशेने तोंड करून बसली होती. फक्त एक ठिगणी पडण्याचा अवकाश होता, आण्विक युद्ध छेडलं गेलं असतं आणि जगाचा इतिहास बदलला असता.

दोन्ही देश एकमेकांना पाण्यात पाहात होते आणि एकमेकांना खिजवण्याची एकही संधी सोडत नव्हते. जसंकाय युद्ध होण्याची वाट पाहात होते.

त्यातच फक्त 25 दिवस आधी 1 सप्टेंबर 1983 ला रशियाने कोरियन एअरलाईन्सचं एक प्रवासी विमान अमेरिकेचं गुप्तहेर आहे असं समजून पाडलं होतं. या विमानातले सगळे 269 प्रवासी आणि केबिन क्रू ठार झाले.

सुरुवातीला तर सोव्हिएत युनियनने या प्रकरणी कानावर हात ठेवले. पण नंतर मान्य केलं की त्यांनीच विमान पाडलं. सोव्हियत युनियनने म्हणे की अमेरिकेचं हे हेरगिरी करणारं विमान होतं.

सोव्हिएत युनियनच्या पोलितब्युरो कम्युनिस्ट पार्टीने म्हटलं की, अमेरिकेने रशियाला चिथावणी देण्यासाठी मुद्दाम ही कृती केली होती. त्यांना सोव्हिएत युनियनच्या सैन्य ताकदीचा अंदाज घ्यायचा होता आणि खरंतर युद्धच घोषित करायचं होतं.

अमेरिकेने म्हटलं की, सोव्हिएत युनियन मुद्दाम बचावकार्यात अडथळा आणत आहे. सोव्हिएत युनियनने याप्रकरणी पुरावे लपवले असाही आरोप झाला. हे पुरावे आणि फ्लाईट रेकॉर्डिंग या घटनेनंतर दहा वर्षांनी, सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यानंतर प्रसिद्ध झाले.

शीत युद्धाच्या काळातला हा सगळ्यात तणावपूर्ण काळ होता. जग आण्विक युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं होतं.

अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी म्हटलं की, "विमान पाडून निरपराध नागरिकांना मारण्याचा ज्यांनी केलाय, त्यांना जग माफ करणार नाही."

अशात 26 सप्टेंबरचा दिवस उजाडला.

एक रशियन सैन्य अधिकारी स्तानिस्लाव्हसाठी तो एक सामान्य दिवस होता. सकाळी त्याने आपल्या आजारी बायकोसाठी नाश्ता बनवला, तिला औषधं दिली.

त्यादिवशी खरं तो आपल्या ऑफिसात जाणारही नव्हता, पण अचानक कोणीतरी आजारी पडलं आणि त्याला रात्रपाळीसाठी बोलावलं.

लेफ्टनंट कर्नल स्तानिस्लाव्ह पेट्रोव्ह रशियाच्या मुख्य अण्वस्त्र केंद्राचे प्रमुख होते.

रशियन सरकारला वाटायचं की अमेरिकेनी याआधी दोन अणुबॉम्ब टाकले आहेतच. तिसरा ते कधीही आपल्यावर टाकू शकतात. म्हणूनच रशियानेही आपली शस्त्रसज्जता वाढवली होती.

दोन्ही देश एकमेकांशी अफगाणिस्तान, मध्यपूर्व, लॅटिन अमेरिकन देश आणि जगातल्या इतर देशात लढतच होते. दोन्ही देशांकडे इतके बॉम्ब होते की संपूर्ण जग कित्येकदा उद्धवस्त करता आलं असतं.

फक्त एकमेकांच्या डोक्यावर बॉम्ब फोडणं शिल्लक होतं.

अशात रशियाने नवी 'अर्ली वॉर्निंग मिसाईल डिटेक्टशन' यंत्रणा बसवली. जर अमेरिका किंवा जगाच्या इतर कुठल्याही भागातून सोव्हिएत युनियनवर क्षेपणास्त्रं डागली गेली तर ती आधीच त्यांच्या रडार यंत्रणेला कळतील अशी संपूर्ण कॉम्प्युटराईज्ड व्यवस्था ती होती.

ही यंत्रणा जिथे बसवली होती त्या केंद्राचे प्रमुख स्तानिस्लाव्ह होते.

मध्यरात्र उलटली होती. स्तालिस्नाव्ह आणि त्यांचे सहकारी निवांत झाले होते. सोव्हिएत युनियनचे सॅटेलाईट घिरट्या घालत अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांवर लक्ष ठेवून होते.

शिफ्टवरची माणसं आळसावली होती. काही तासात सकाळच्या शिफ्टची माणसं येऊन ताबा घेणार आणि आपण घरी जाऊन कडक कॉफीसह नाश्ता करून सुस्तावणार अशा विचारात होती.

एवढ्यात... सायरन वाजायला लागले.

'लॉन्च' अशी मोठी अक्षरं समोरच्या स्क्रीनवर झळकली.

अर्ली वॉर्निंग मिसाईल डिटेक्टशन सिस्टिम दाखवत होती की 12.15 मिनिटांनी अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरून सोव्हिएत युनियनच्या दिशेने एक क्षेपणास्त्र झेपावलं आहे.

युद्धाला सुरुवात झाली होती.

स्तानिस्लाव्ह एका अशा टीमचा भाग होते जिला भरपूर प्रशिक्षण दिलं होतं. रडार सिस्टिमचे सगळे खाचेखळगे समजावून सांगितले होते. मॉस्कोच्या छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या सैन्य विभागाचे ते प्रमुख होते.

सुस्तावले सगळे सैनिक खडबडून जागे झाले, गोंधळ माजला. कॉम्प्युटर सिस्टिम सांगत होती की, हल्ला झालाय, पण इतर ठिकाणाहून त्याला दुजोरा मिळत नव्हता.

स्तानिस्लाव्ह यांनी आदेश दिले, आपल्या सिस्टिम तपासा. एक न एक यंत्रणा तपासा. कुठे काही चुकलंय का, बंद पडलंय का पाहा.

पुढच्या 30 सेकंदात त्यांचे कनिष्ठ सहकारी सांगायला लागले, 'सिस्टिम वन क्लियर, सिस्टिम टू क्लियर, सिस्टिम थ्री...'

कोणत्याच यंत्रणेत एरर नव्हता, काहीही बंद पडलं नव्हतं. स्तानिस्लाव्ह यांनी व्हिज्युअल रडार पाहाणाऱ्या अॅनालिस्टला फोन लावला.

त्याच्याकडून उत्तर आलं, "इथे काहीच स्पष्ट दिसत नाहीये. मला क्षेपणास्त्र दिसलं नाही हे खरंय, पण इथे हवामान खूप ढगाळ आहे, आणि दिवसाची वेळ आहे. त्यामुळे नक्की या भागातून क्षेपणास्त्र डागलं गेलं की नाही हे मला सांगता येणार नाही."

बाकी सगळ्या यंत्रणा सांगत होत्या की हल्ला झालाय. सैन्य मुख्यालयाला कळलं होतं की आपल्या दिशेने क्षेपणास्त्र येतंय. स्तालिस्नाव्ह यांचा फोन खणाणला, तिकडून विचारणा झाली, 'काय परिस्थिती आहे?' स्तानिस्लाव्ह यांनी उत्तर दिलं, "फॉल्स अलार्म. हल्ला झाला नाहीये, कॉप्युटरने चुकून तसं दाखवलं." फोन ठेवला आणि पुढच्या क्षणाला सायरन वाजला.

पडद्यावर अक्षर झळकली... "लॉन्च"

रशियाच्या दिशेने दुसरं क्षेपणास्त्र झेपावलं होतं. घड्याळात वेळ होती रात्रीचे 12 वाजून 17 मिनिटं.

तंत्रज्ञांनी ओरडून सांगितलं, "वैधतेची पातळी - सर्वोच्च." हल्ला झाला होता यात तिळमात्र संशयाला जागा नव्हती.

अमेरिकने आपल्या पश्चिम किनाऱ्यावर एक हजार क्षेपणास्त्र सोव्हियत युनियनच्या दिशेने तोंड करून ठेवली होती. या क्षेपणास्त्रांचा वेग होता ताशी 15 हजार किलोमीटर आणि पल्ला होता 8 हजार 500 किलोमीटर.

पहिल्या महायुद्धात जितक्या बॉम्बच्या स्फोट झाला त्यांची सगळ्यांची क्षमता एकत्र केली असती, तरी ती यातल्या एका क्षेपणास्त्राच्या 60 टक्के भरली असती, इतकी विध्वंसक क्षेपणास्त्र होती ही आणि स्तानिस्लाव्हच्या यंत्रणांनी नुकतंच कन्फर्म केलं होतं की ती रशियाच्या दिशेने येत आहेत.

12 वाजून 18 मिनिटं... सिस्टिमवर तिसरं क्षेपणास्त्र दिसलं.

12 वाजून 19 मिनिटं ... चौथं क्षेपणास्त्र.

12 वाजून 20 मिनिटं... पाचवं.

या घटनेनंतर तीस वर्षांनी बीबीसी रशियनशी बोलताना पेट्रोव्ह म्हणाले होते की, "माझ्याकडे सगळा डेटा होता. काय घडतंय ते डोळ्यापुढे दिसत होतं. मी ते वर सांगायला बांधील होतो."

स्तानिस्लाव्हच्या युनिटचं कामच होतं की दिवसरात्र आपल्यावर कुठून हल्ला होतोय का याकडे लक्ष ठेवायचं आणि तसं काही दिसलं की लगोलग वर कळवायचं.

स्वतः स्तानिस्लाव्ह यांनी कन्फर्म केलं की सोव्हिएत युनियनवर अमेरिकेकडून हल्ला झालाय मग पुढे काय होणार हे सुर्यप्रकाशाइतकं स्वच्छ होतं.

जगभरातले सोव्हियत युनियनचे तळ कार्यरत होणार आणि अमेरिकेवर संपूर्ण क्षमतेनिशी आण्विक हल्ला करणार.

दोन्हीकडच्या हल्ल्यात अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन्ही देशांची जवळपास 50 ते 70 टक्के लोकसंख्या नष्ट होणार होती.

फक्त काही बटणं दाबली की झालं. हसती खेळती कुटुंब, घरं, शहरं, दुकानांची क्षणार्धात राख.

जगाचं काय होणारं याचा निर्णय तिथल्या करण्याचं ओझं स्तानिस्लाव्ह यांच्या खांद्यावर होतं. सहकारी ओरडून सांगत होते हल्ला झालाय, पुढच्या काही मिनिटात इथे क्षेपणास्त्र येऊन आदळेल आणि मग आपल्याला त्यांना प्रत्त्युत्तर देता येणार नाही.

सगळ्या सिस्टिम सांगत होत्या की सोव्हिएत युनियनच्या दिशेन 5 क्षेपणास्त्र येताहेत.

'द मॅन हू सेव्ह्ड द वर्ल्ड' या डॉक्युमेंटरीत एक क्षण दाखवला आहे. स्तानिस्लाव्ह यांचा सहकारी चिडून विचारतो, "आपण काय करणार?"

"काहीच नाही," स्तानिस्लाव्ह म्हणतात. "माझा कॉप्युटर्सवर विश्वास नाही."

त्यांनी आदेश दिला जोवर रडारवर काही दिसत नाही तोवर कोणी काहीच करणार नाही. कमांड रूममध्ये शांतता पसरली.

या घटनेविषयी बोलताना स्तानिस्लाव्ह यांनी बीबीसीच्या पॉवेल अस्कानॉव्ह यांना 2013 साली सांगितलं होतं, "माझं चुकलं असतं तर? पाच क्षेपणास्त्र आमच्या दिशेने येत होती. सिस्टिम आता पूर्ण क्षमतेने होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा अलर्ट देत होती. एकेक सेकंद वाया जात होता, पण मी म्हटलं माझा कॉप्युटरवर विश्वास नाही. मी मुख्यालयाला कळवली की हा फॉल्स अलर्ट आहे जेव्हा मी मलाच खात्री नव्हती की नक्की काय होतंय. माझा निर्णय चुकला असता तर?"

स्तानिस्लाव्ह यांच्यासाठी आयुष्यातला सगळ्यात अवघड निर्णय होता. काही क्षणात ठरणार होतं की ते जगाचे हिरो आहेत की सोव्हिएत युनियनचे व्हिलन.

सगळी कमांड रूम श्वास मुठीत घेऊन रडारकडे पाहात होती. चार मिनिटात क्षेपणास्त्र रडारच्या रेंजमध्ये येणार होती.

स्तानिस्लाव्ह 'द मॅन हू सेव्ह्ड द वर्ल्ड' या डॉक्युमेंट्रीत म्हणतात, "तिसर महायुद्ध होणार की नाही हा निर्णय माझ्या हातात होता. मला घ्यायचा नव्हता तो. लाखो लोकांचं आयुष्य टांगणीला लागलं होतं. जर खरंच क्षेपणास्त्र डागली गेली असतील तर काही मिनिटात माझ्या देशवासीयांचं सर्वस्व उद्धवस्त होणार होतं. दोन्हीकडून आण्विक हल्ले झाले तर किती लोक मरतील याची कल्पना एक माणूस करूच शकत नव्हता. करू शकतही नाही."

येणारी क्षेपणास्त्र 30 सेकंदात रडारच्या रेंजमध्ये येणार होती. 20 सेकंद, 10, 5…

अॅनालिस्टने कन्फर्म केलं, "रडारवर कोणतीही क्षेपणास्त्र दिसत नाहीयेत. कोणतीही क्षेपणास्त्र अमेरिकेकडून आपल्या दिशेने येत नाहीयेत."

स्तानिस्लाव्ह यांचा निर्णय योग्य ठरला. घाईघाईत सोव्हिएत युनियनने अमेरिकेवर आण्विक हल्ला केला नाही. हा हल्ला झाला असता तर अमेरिकेने सूड घ्यायचा म्हणून सोव्हिएत युनियन, रशिया बेचिराख केला असता. किती देश, किती माणसं यात होरपळली असती कोणास ठाऊक.

आपण पाहातो त्या जगाचं चित्र दिसलंच नसतं.

इतका स्पष्ट अलर्ट म्हणून संशय

स्तानिस्लाव्ह यांनी बीबीसीच्या पॉवेल अस्कानॉव्ह यांना सांगितलं, "पहिला अलर्ट येऊन 23 मिनिटं होऊन गेले होते. पण कुठेही क्षेपणास्त्र धडकल्याची बातमी नव्हती. जीव भांड्यात पडणं काय असतं ते तेव्हा कळलं."

पण इतका स्पष्ट अलर्ट असताना स्तानिस्लाव्ह यांना कशामुळे संशय आला?

"अलर्ट इतका स्पष्ट होता याचाच संशय आला," ते म्हणतात. "28 किंवा 29 सुरक्षा पातळ्या होत्या. जर एखादं क्षेपणास्त्र येतंय हा स्पष्ट इशारा द्यायचा असेल तर इतक्या पातळ्या, चेकपॉईंट क्लीयर करायला हवे होते. तेव्हाच्या परिस्थितीत, इतक्या कमी वेळात इतके चेकपॉईंट पास होऊ शकतील की नाही याची मला खात्री नव्हती."

'नशीब त्या दिवशी मी होतो'

स्तानिस्लाव्ह यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "त्या दिवशी तिथे असणाऱ्या लोकांपैकी फक्त मी असा होतो ज्याने नागरी भागात शिक्षण घेतलं होतं. बाकी सगळे पूर्णपणे सैनिकी डोक्याचे होते. सैनिकांनी फक्त आदेश द्यायचे किंवा पाळायचे हेच त्यांना शिकवलेलं होतं. त्या दिवशी जर मी नसतो आणि माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर नक्कीच हल्ला झालाय हे कन्फर्म केलं असतं."

आता इतक्या मोठ्या कामगिरीनंतर, जगाला अक्षरशः विनाशाच्या दारातून वाचवल्याबद्दल पेट्रोव्ह यांचं कौतुक झालं, मेडल मिळालं असं तुम्हाला वाटलं तर उफ, ये गलत जवाब!

त्यांना उलट वरिष्ठांनी त्या रात्री जे घडलं त्याबद्दल जाम झापलं. त्यांनी जो धीरोदत्तपणा दाखवला तो राहिला बाजूला आणि एका लॉगबुकातली एक नोंद चुकवली म्हणून धारेवर धरलं.

पुढे त्यांनी आपल्या कॅन्सरग्रस्त पत्नीची काळजी घ्यायला सैन्याची नोकरी सोडली. त्यांच्या पत्नीचं 1997 साली निधन झालं

या प्रकरणाबद्दल त्यांनी पुढची दहा वर्षं कोणालाच काही सांगितलं नाही. "आमची सिस्टिम अशाप्रकारे फेल झाली ही सोव्हिएत सैन्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे असं मला वाटलं आणि म्हणून मी कोणालाच काही बोललो नाही."

पण सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यानंतर ही गोष्ट जगाला कळली. त्यानंतर त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले.

पण त्यांना कधीच वाटलं नाही की ते एक हिरो आहेत. "मी फक्त योग्य वेळी, योग्य ठिकाणी होतो' असं ते शेवटपर्यंत म्हणत राहिले.

पण सिस्टिमवर क्षेपणास्त्र दिसली कशी?

अरे हा ते राहिलंच. जर अमेरिकेनी सोव्हिएत युनियनच्या दिशेने क्षेपणास्त्र डागली नाहीत तर ती सिस्टिमवर दिसली कशी? स्वतः स्तानिस्लाव्ह म्हणायचे की ते शेवटपर्यंत कळलं नाही.

पण काही लोकांचं म्हणणं आहे की ढगांवरून सुर्यकिरणं परावर्तीत झाल्यामुळे सिस्टिमला तसा भास झाला.

नक्की काय झालं हे अधिकृतरित्या कधी बाहेर आलं नाही.

स्तानिस्लाव्ह यांचं 2017 साली निधन झालं. पण त्याआधी त्यांनी जग वाचवलं. जगाच्या इतिहासात कुठल्याच एका माणसाने इतक्या लोकांचा जीव वाचवलेला नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)