You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोसादने लाखो ज्यूंची हत्या घडवून आणणाऱ्या आइकमनला कसं पकडलं?
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
हिटलर व्यतिरिक्त युरोपातील ज्यूंना ठार करण्याचं वेड कदाचित लेफ्टनंट कर्नल अॅडोल्फ आइकमन यांनाच असावं.
दुसऱ्या महायुद्ध संपल्यानंतर कितीतरी वर्षांनी अर्जेंटिनामध्ये अज्ञातवासात असताना आइकमेन यांनी विलियम सॅसेन नावाच्या एका डच व्यक्तीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, "खरं सांगायचं तर युरोपात राहणाऱ्या सर्वच्या सर्व 1 कोटी 30 लाख ज्यूंना ठार केलं असतं तर माझं काम पूर्ण झालं असतं.
मात्र, हे झालं नाही आणि म्हणून आपल्या येणाऱ्या पिढ्यांना जो त्रास सहन करावा लागणार आहे, त्यासाठी मी स्वतःला जबाबदार मानतो. आमची संख्या कमी असल्याने हे काम आम्ही पूर्ण करू शकलो नाही. मात्र, जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही नक्कीच केलं."
दुसरं महायुद्ध संपल्यानंतर आइकमन अर्जेटिंनाला पळून जाण्यात यशस्वी झाले होते.
1957 साली मोसाद या इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेला आपल्या जर्मन सूत्रांकडून आइकमेन गेल्या अनेक वर्षांपासून अर्जेंटिनामध्ये नाव बदलून राहत असल्याचं कळलं.
सर्व पुराव्यांची खात्री पटल्यानंतर मोसादचे संचालक इसेर हॅरल यांनी पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियो यांच्या निवासस्थानी जाऊन आम्ही आइकमनला अर्जेंटिनात शोधून काढल्याचं सांगितलं.
यावर गुरियो म्हणाले, "आपल्याला त्याला जिवंत किंवा मृत पकडायचं आहे."
मात्र, एक क्षण विचार करून ते पुढे म्हणाले, "पण, तुम्ही त्याला जिवंत पकडू शकलात तर बरं होईल. आपल्या तरुणांसाठी हे गरजेचं आहे."
रफी ऐतान यांना या मोहिमेची जबाबदारी देण्यात आली.
मोसादच्या गुप्तहेरांची टीम अर्जेंटिनात पोहोचली
1960 च्या एप्रिल महिन्याच्या अखेरिस मोसादच्या 4 गुप्तहेरांची एक टीम वेगवेगळ्या मार्गांनी अर्जेंटिनामध्ये दाखल झाली.
त्यांनी ब्युनोस आयर्समध्ये एक घर भाड्याने घेतलं. या घराला 'कासिल' हे कोडनाव देण्यात आलं. दरम्यानच्या काळात अर्जेंटिना 20 मे रोजी 150 वा स्थापना दिन साजरा करणार असल्याची माहिती इसेर यांना मिळाली.
त्यामुळे या कार्यक्रमासाठी इस्रायलसुद्धा त्यांचे शिक्षण मंत्री अब्ब इबान यांच्या नेतृत्त्वाखाली एक प्रतिनिधी मंडळ पाठवणार, अशी योजना आखण्यात आली. या प्रतिनिधी मंडळाला घेऊन जाण्यासाठी इस्रायलच्या इलाई एअरलाइन्सने 'व्हिस्परिंग जायंट' नावाचं एक विशेष विमान धाडलं.
इबान यांना जराही कल्पना नव्हती की, त्यांना जी विशेष सेवा मिळतेय त्याचा मुख्य उद्देश 'मिशन आइकमन' आहे. 11 मे रोजी इलाई फ्लाईट क्रमांक 601 अर्जेंटिनाला रवाना होईल, असं ठरलं.
विमानाच्या चालक दलाचे सदस्यही अत्यंत सावधगिरीने निवडण्यात आले. पायलट ज्वी तोहार यांना अर्जेंटिनामध्ये लँड क्रूच्या मदतीशिवाय विमान उड्डाण करावं लागलं तर कुठलीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी सोबत एक तंत्रज्ञ घेण्याचेही आदेश देण्यात आले.
आइकमनला पकडण्याची मोहीम एक दिवस पुढे ढकलली
10 मे रोजी आइकमेन यांना त्यांच्या घराजवळून उचलून घेण्याची योजना आखली गेली.
11 मे रोजी इस्रायलचं विमान तिथे पोहोचेल आणि 12 मे रोजी ते पुन्हा इस्रायला परत येतील. मात्र, शेवटच्या क्षणी योजनेत थोडा बदल करण्यात आला.
झालं असं की, अर्जेंटिनाच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी पाहुण्यांची वाढती संख्या बघता अर्जेंटिनाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रोटोकॉल विभागाने इस्रायलच्या प्रतिनिधी मंडळाला तुम्ही तुमचं येणं 19 मेपर्यंत पुढे ढकलावं, असं सांगितलं.
मोसादच्या मोहिमेविषयी 'The Greatest Mission Of The Israeli Secret Service Mossad' या आपल्या पुस्तकात मायकल बार जोहार आणि निसिम मिशाल लिहितात, "इसेर हॅरलसाठी याचा अर्थ होता की, आइकमनच्या अपहरणाची योजना एकतर 19 तारखेपर्यंत स्थगित करावी किंवा ठरल्याप्रमाणे त्याला 10 मे रोजी अटक करून पुढचे 9-10 दिवस कुठेतरी लपवून ठेवावं."
"ही मोठी जोखीम होती. कारण दरम्यानच्या काळात आइकमेनच्या कुटुंबाच्या मागणीवरून आइकमनचा शोध सुरू झाला असता. मात्र, तरीही इशेर यांनी ठरल्याप्रमाणेच कारवाई करण्याचं निश्चित केलं. मोहीम केवळ एक दिवस पुढे ढकलण्यात आली. 11 मे रोजी संध्याकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी आइकमनचं त्याच्या घराशेजारून अपहरण करण्याची योजना आखण्यात आली."
बस क्रमांक 203 मधून आइकमन उतरलेच नाहीत
आइकमेन दररोज संध्याकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी बस क्रमांक 203 ने घरी यायचे. बसमधून उतरल्यावर ते बस स्टॉपवरून थोड्याच अंतरावर असलेल्या आपल्या घरी पायी चालत जायचे. या ऑपरेशनमध्ये दोन कारची मदत घेण्याचं ठरलं. एका कारमध्ये आइकमनचं अपहरण करणारे एजंट्स असतील.
दुसरी कार पहिल्या कारच्या सुरक्षेसाठी असेल. 11 मेच्या संध्याकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी दोन्ही कार बस स्टॉपच्या जवळपास पार्क करण्यात आल्या. पहिली कार होती काळ्या रंगाची शेव्हरले. दोन हेर कारबाहेर आले आणि कार खराब झाल्याचं नाटकं करू लागले.
ज्वी अहारोनी ड्रायव्हर सीटवर बसले होते आणि चौथा हेर कारमध्येच अंग चोरून बसून आइकमेन येणार त्या रस्त्यावर लक्ष ठेवून होता. दुसऱ्या काळ्या रंगाच्या ब्युक कारला रस्त्याच्या पलिकडच्या बाजूला पार्क करण्यात आलं.
दोन हेर कारच्या बाहेर उभे होते. तिसरा ड्रायव्हर सीटवर होता. आइकमन येताना दिसताच कारच्या हेडलाईट्स पेटवून त्यांचे डोळे दीपवायचे, हे ड्रायव्हरचं काम होतं.
माइकल बार जोहार आणि निसिम मिशााल लिहितात, "संध्याकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी बस क्रमांक 203 येऊन थांबली खरी मात्र त्यातून आइकमेन आला नाही. 7 वाजून 50 मिनिटांपर्यंत एकापाठोपाठ एक दोन बस आल्या. मात्र, आइकमन त्यातही नव्हता."
"एजंट्सची चिंता वाढत होती. आइकमनने अचानक आपलं रुटीन बदललं होतं का? त्याला या मोहिमेचा सुगावा लागला होता? 8 वाजेपर्यंत आइकमन आला नाही तर मिशन तिथेच स्थगित करून सर्वांनी तिथून बाहेर पडायचं, असं इसेर यांनी टीमला आधीच ब्रीफ केलं होतं. मात्र, रफी ऐतान यांनी साडे आठ वाजेपर्यंत वाट बघण्याचा निर्णय घेतला."
आइकमन यांना बळजबरी कारमध्ये कोंबलं
8 वाजून 5 मिनिटांनी आणखी एक बस आली. आधी तर त्यांना बसमधून कुणीच उतरताना दिसलं नाही. मात्र, दुसऱ्या कारमध्ये बसलेल्या अवरुम शालोम यांना एक सावली येताना दिसली.
त्यांनी लगेच कारचे हेडलाईट्स पेटवून त्या व्यक्तीला जवळपास आंधळंच केलं. त्याचवेळी शेव्हरले कारमध्ये असलेले एक हेर ज्वी मालकीन स्पॅनिश भाषेत ओरडून म्हणाले, "मोमेंतो सेन्योर" (एक मिनिट महाशय). आइकमन यांनी खिशात हात टाकून फ्लॅशलाईट शोधण्याचा प्रयत्न केला.
मोसादवरच लिहिण्यात आलेल्या 'Rise and Kill First' या पुस्तकात लेखक रोनेन बर्गमेन लिहितात, "ज्वी मालकिन यांना आइकमन पिस्तुल काढत असावा, असं वाटलं. त्यामुळे त्यांना मागून पकडून कारमध्ये बसवण्याऐवजी मालकिन यांनी त्यांना धक्का देत खड्ड्यात पाडलं आणि त्यांच्यावर बसले. आइकमन ओरडत होता. पण, तिथे त्याची आरडा-ओरड ऐकणारं कुणीच नव्हतं."
ज्वी अहारोनी यांनी आइकमन यांना जर्मन भाषेत विचारलं, "तू हलण्याचा प्रयत्नही केलास तर तुला गोळी घालू."
त्यांनी आइकमन यांना उचलून कारच्या मागच्या सीटवर खाली टाकलं. कार पुढे निघाली आणि पाठोपाठ दुसरी कारही निघाली.
चालत्या कारमध्येच एजंट्सने आइकमनचे हात-पाय बांधून त्यांच्या तोंडात बोळा कोंबला.
अपेंडिक्स ऑपरेशनच्या खुणेवरून आइकमनची ओळख पटवण्यात आली
रोनेन बर्गमन लिहितात, "ऐतान अपहरण करून आणलेल्या व्यक्तीच्या शरीरावरचे ते डाग शोधत होते ज्यावरून ही व्यक्ती आइकमनच आहे, यात कुठलाही संशय उरणार नाही. त्याच्या दंडाच्या खाली कोरलेल्या SS टॅटूवरून त्याची ओळख पटली."
"आता त्यांच्यासमोर अडचण होती त्याच्या पोटात झालेल्या अपेंडिक्सच्या सर्जरीची खूण शोधण्याची. एसएसच्या फाईल्समध्ये त्याचा उल्लेख होता. हा डाग शोधण्यासाठी ऐतानने आइकमनचा बेल्ट काढला आणि त्याच्या पँटमध्ये हात घातला."
"सर्जरीचा डाग दिसताच ते हिब्रूमध्ये ओरडले 'जेह-हू, जेह-हू' म्हणजे 'हा तोच आहे'."
आइकमनने खरं नाव सांगितलं
8 वाजून 55 मिनिटांनी दोन कार मोसादच्या गुप्तहेरांच्या ठिकाणाच्या ड्राईव्हवर थांबल्या. आइकमनला घरात आणलं गेलं. एजंट्सने त्यांचे कपडे काढायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी कसल्याच प्रकारचा विरोध केला नाही. त्यांनी जर्मन भाषेत आइकमनला तोंड उघडायला सांगितलं.
आइकमनने तसंच केलं. त्यांना आइकमनने तोंडात विषारी कॅप्सूल तर ठेवली नाही, याची खात्री करायची होती. तेवढ्यात जर्मन भाषेतच एक आवाज ऐकू आला, "तुमच्या शू आणि टोपीची साईज? जन्मतिथी? वडिलांचं नाव, आईचं नाव?"
आइकमनने एखाद्या रोबोप्रमाणे सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. मग त्यांनी आइकमनला त्यांच्या नाझी पक्षाच्या कार्डचा नंबर आणि एसएसचा नंबरही विचारला. आइकमनने उत्तर दिलं 45326 आणि 63752. त्यांचा शेवटचा प्रश्न होता - तुमचं नाव?
आइकमेनचं उत्तर होतं रिकार्डो क्लेमेंट. मोसादच्या एजंटने पुन्हा विचारलं - तुमचं नाव? आइकमनने थरथरत उत्तर दिलं ओटो हेनिंगर. एजंटने तिसऱ्यांदा विचारलं - तुमचं नाव? यावेळी त्यांचं उत्तर होतं - अॅडॉल्फ आइकमन.
इस्रायलचं विमान ब्युनोस आयर्समध्ये दाखल
इस्रायलचे हेर आइकमनला रेझर देऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वतःच त्यांची दाढी केली. ते आइकमेनला एका सेकंदासाठीही एकटं सोडत नसत. टॉयलेटला जातानाही एक एजंट त्यांच्या सोबत असायचा.
इस्लायच्या टीममध्ये असणाऱ्या येहूदिथ निसीयाहू यांनी आइकमनसाठी जेवण बनवलं. पण, त्याची उष्टी भांडी घासायला नकार दिला. पुढचे दहा दिवस इस्रायलच्या गुप्तहेरांच्या आयुष्यातले सर्वात प्रदीर्घ 10 दिवस होते. ते परदेशात त्यांनीच पकडून आणलेल्या कैद्यासोबत लपून बसले होते.
त्यांच्या हातून एकही चूक घडली असती तर पोलिसांच्या धाडीची भीती होती. शिवाय, मोठ्या आंतरराष्ट्रीय वादाला सुरुवात झाली असती. 18 मे 1960 रोजी सकाळी 11 वाजता तेल अविवच्या लोद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान उडालं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 मे रोजी दुपारनंतर ब्युनोस आयर्स विमानतळावर उतरलं.
दोन तासांनंतर इसेर यांनी पायलट ज्वी तोहार यांच्याशी बोलून 20 मेच्या मध्यरात्री टेक ऑफ करण्याची वेळ ठरवल्याची माहिती दिली.
आइकमनना इंजेक्शन देऊन विमानात बसवण्यात आलं
20 मेच्या रात्री 9 वाजता आइकमन यांना आंघोळ घालून इस्रायल एअरलाईन्स इलाईचा गणवेश घालण्यात आला. त्यांच्या खिशात जीव जिकरोनी या नावाने एक बनावट ओळखपत्र ठेवण्यात आलं.
मायकल बार जोहार आणि निसिम मिशाल लिहितात, "डॉक्टरांनी आइकमनन यांना असं इंजेक्शन दिलं ज्यामुळे तो झोपला नाही. मात्र, त्याला सगळं अंधुक दिसू लागलं. तो ऐकू शकत होता, बघू शकत होता आणि चालूही शकत होता. पण बोलू शकत नव्हता."
"आइकमनला कारच्या मागच्या सीटवर बसवण्यात आलं. त्याचवेळी ब्युनोस आयर्सच्या त्या हॉटेलमधून आणखी दोन कार रवाना झाल्या. त्यात इस्रायलच्या एअरलान्सचे खरे चालक दल सदस्य होते. रात्री 11 वाजता सर्व कार एकत्र विमानतळात दाखल झाल्या."
"कार बॅरियवर येताच विमानदलाच्या एका सदस्याने ओरडून 'हाय, इलाई' म्हटलं. गार्ड्स त्यांना ओळखत होते. त्यांनी कारच्या आत बघितलं. सर्वांनीच इस्रायलच्या एअरलाइन्सचा गणवेश घातला होता."
"सगळं नॉर्मल आहे हे दाखवण्यासाठी काही जण गाणं गुणगुणत होतं, तर काही मोठमोठ्याने हसून गप्पा मारत होते. गार्ड्सने बॅरियर उचललं आणि तिन्ही कार इस्रायलच्या विमानाजवळ जाऊन थांबल्या."
कारमधून उतरताच सर्वांनी आइकमनच्या भोवती घेर केला दोघांनी त्यांना धरत त्यांचे दोन्ही हात आपल्या खांद्यावर टाकून त्यांना विमानात घेऊन गेले. आइकमनला फर्स्ट क्लासच्या विंडो सीटवर बसवण्यात आलं. 11 वाजून 15 मिनिटांनी विमान तेल अविवसाठी रवाना झालं.
डेव्हिड बेन गुरियो यांचं नेसेटमध्ये घोषणा
22 मे 1960 च्या सकाळी विमान तेल अविवच्या लोद विमानतळावर उतरलं. 9 वाजून 50 मिनिटांनी मोसादचे संचालक इसेर हॅरल जेरुसलेममधल्या पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियो यांच्या कार्यालयात गेले. पंतप्रधानांचे सचिव इतजाक निवोन त्यांना थेट पंतप्रधानांकडे घेऊन गेले.
आश्चर्यचकित बेन गुरियोंनी त्यांना विचारलं, "तुम्ही कधी पोहोचलात?" इसेर म्हणाले, "2 तासांपूर्वी. आइकमन आमच्या ताब्यात आहे."
गुरियोंनी विचारलं, "कुठे आहे तो?" इसेर म्हणाले, "इथे इस्रायलमध्येच. तुमची परवानगी असेल तर त्याला ताबडतोब पोलिसांच्या स्वाधीन करायचं का?"
संध्याकाळी 4 वाजता इस्रायलची संसद नेसेटमध्ये डेव्हिड बेन गुरियो यांनी उभं राहून एक छोटं निवेदन दिलं. ते म्हणाले, "मी नेसेटला सांगू इच्छितो की, इस्रायलच्या सुरक्षा दलाने सर्वात मोठ्या नाझी गुन्हेगारांपैकी एक 60 लाख युरोपीय ज्यूंच्या मृत्यूसाठी जबाबदार अॅडॉल्फ आइकमनला अटक केली आहे. तो यावेळी इस्रायलच्याच एका तुरुंगात आहे. लवकरच त्याच्यावर इस्रायलच्या कायद्यानुसार खटला सुरू करण्यात येईल."
डेव्हिड बेन गुरियो यांनी हे म्हणताच इस्रायलच्या संसदेत टाळ्यांच्या एकच गजर झाला. 15 डिसेंबर 1961 रोजी आइकमनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि 31 मे 1962 रोजी शिक्षेची अंमलबजावणी झाली.
आइकमनचे शेवटचे शब्द होते, "आपण पुन्हा भेटू. मी ईश्वरावर विश्वास ठेवून जगलो. मी युद्धाच्या कायद्यांचं पालन केलं आणि आपल्या झेंड्याप्रती कायम प्रामाणिक राहिलो."
इस्रायलच्या इतिहासात ही पहिली आणि शेवटची फाशी होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)