You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भविष्यात ड्रोनचं युद्ध झालं तर भारताची अशी सुरू आहे तयारी...
- Author, सचिन गोगोई
- Role, बीबीसी मॉनिटरिंग
चीन आणि पाकिस्तान या शेजारी देशांशी तणावग्रस्त संबंध असल्यामुळे भारत देशांतर्गत बनावटीचं आणि परदेशांमधून आयात केलेलं प्रगत ड्रोन तंत्रज्ञान वापरून स्वतःची सैनिकी ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
'डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेन्ट ऑर्गनायझेशन'ने (डीआरडीओ) या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचं प्रदर्शन 17 नोव्हेंबर रोजी ड्रोनचा एक थवा उडवून केलं. या थव्यामध्ये 25 ड्रोन एका वेळी उडत होते.
एखाद्या लक्ष्याला घेराव घालणं, नियोजित हल्ला चढवणं, इत्यादी स्वरूपाच्या कारवायांचं प्रदर्शन या 'ड्रोन थव्या'द्वारे करण्यात आलं.
'हिंदुस्तान टाइम्स'मध्ये आलेल्या वार्तांकनानुसार, भारतामध्ये अशा प्रकारचं ड्रोनचं प्रदर्शन पहिल्यांदा जानेवारीमध्ये झालं होतं. त्या वेळी भारतीय सैन्याने देशी बनावटीची 75 ड्रोन उपकरणं एका वेळी उडवून दाखवली होती. यामध्ये आक्रमक मोहिमांसह विविध प्रकारांमधील मोहिमांच्या कवायती ड्रोनद्वारे करून दाखवण्यात आल्या.
17 नोव्हेंबरच्या प्रदर्शनानंतर ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात डीआरडीओने म्हटलं आहे की, "डीआरडीओमधील यंग सायन्टिस्ट लॅब फॉर असिमेट्रिक टेक्नॉलॉजी (डीवायएसएलसीटी) सध्या स्वार्म (थवा) टेक्नॉलॉजीवर काम करते आहे, त्यातून असिमेट्रिक युद्धक्षमता वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे."
भारत स्वतःची आक्रमणाची क्षमता वाढवण्यासाठी प्रगत ड्रोन तंत्रज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. भारतीय सैन्य गुप्तहेरगिरीसाठी ड्रोनचा वापर अनेक वर्षांपासून करतं आहे. भारतीय सैन्याकडील बहुतांश ड्रोन इस्राएलकडून आयात केलेले आहेत.
अलीकडच्या वर्षांमध्ये भारताने इस्राएल आणि अमेरिका यांसारख्या देशांशी भागीदारी केल्याचं दिसतं. त्यामुळे मानवरहित विमानांद्वारे शत्रूच्या तळांवर हल्ले करून ती ठिकाणं भुईसपाट करण्याची क्षमता वाढवण्याचा भारताचा प्रयत्न सुरू असल्याचे संकेत मिळतात.
सध्याच्या काळातील संरक्षण क्षेत्राची परिस्थिती पाहता भारताच्या दृष्टीने हे गरजेचंही झालं आहे.
ड्रोन विमानांची गरज अधोरेखित करताना डीआरडीओने एका लेखात नमूद केलं होतं की,2019 साली भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन केलेल्या 'एअर स्ट्राइक'मध्ये ड्रोनचा वापर झाला असता तर हा हल्ला आणखी परिणामकारक झाला असता.
अझरबैजान-अर्मेनिया युद्धातून घेतलेला धडा
ड्रोनचा वापर गुप्तहेरगिरीपुरता मर्यादित न ठेवता आक्रमक मोहिमांसाठी करता यावा, अशी भारताची दीर्घ काळापासूनची मनिषा राहिली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्यात झालेल्या युद्धामधूनसुद्धा भारताने हाच धडा घेतला. ड्रोनची गरज या युद्धाने अधोरेखित केली.
या युद्धात अझरबैजानला निर्णायक विजय मिळण्यामागे ड्रोनची भूमिका कळीची होती, असं जगभरातील सैन्य आणि संरक्षणविषयक तज्ज्ञ म्हणाले.
भारतीय माध्यमांनी या युद्धाचं वार्तांकन केलं आणि देशातील सैनिक नेतृत्व ड्रोनच्या वापरावर लक्ष ठेवून होतं. विशेषतः अझरबैजानने मोठ्या प्रमाणात ड्रोन विमानांचा वापर केला.
अझरबैजानकडील ड्रोनच्या ताफ्यामध्ये बहुतांश विमानं इस्राएल आणि तुर्कस्तानी बनावटीची होती. भारत पहिल्यापासूनच गुप्तहेरगिरीच्या मोहिमांसाठी इस्राएली ड्रोन वापरत आला आहे. भारताचा कायमचा प्रतिस्पर्धी असलेला शेजारी पाकिस्तान तुर्कस्तानी ड्रोन मिळवू शकतो, कारण त्या दोन देशांचे राजनैतिक संबंध जवळकीचे आहेत, याकडे पत्रकार आणि संरक्षणविषयक भाष्यकार शेखर गुप्ता यांनी एका लेखातून लक्ष वेधलं होतं.
या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात डीसीएम श्रीराम इंडस्ट्रीज या भारतीय कंपनीने तुर्कस्तानातील झायरोन डायनॅमिक्स या ड्रोन निर्मात्या कंपनीमध्ये ३० टक्के वाटा खरेदी केल्याच्या बातम्या अलीकडे आल्या होत्या. या दोन कंपन्यांमधील भागीदारीला भारतीय सरकारने प्रोत्साहन दिलं आणि इस्ताम्बूलमध्ये या संदर्भातील करारावर कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सह्या केल्या तेव्हा तुर्कस्तानातील भारतीय राजदूत संजय पांडा उपस्थित होते, असंही सांगितलं जातं.
डीसीएम श्रीराम इंडस्ट्रीज बरोबरच झेन टेक्नॉलॉजी ही आणखी एक कंपनी भारत सरकारच्या नवीन ड्रोन धोरणाचा लाभ घेऊ शकते, अशाही बातम्या आल्या आहेत. भारत हे 2030 सालापर्यंत ड्रोन उत्पादनाचं केंद्र बनवणं, हे नवीन ड्रोन धोरणाचं उद्दिष्ट आहे. याच धोरणानुसार खाजगी कंपन्यांना ड्रोन तंत्रज्ञानाचा विकास आणि संशोधन करण्यासाठी अधिक लाभदायक वातावरण मिळवून दिलं जातं आहे.
हल्ला करण्याची क्षमता असलेल्या ड्रोनवर लक्ष
अमेरिकेतील प्रिडेटर आणि रीपर ड्रोनच्या धर्तीवर आक्रमक हल्ला चढवणारे ड्रोन तयार करण्याचे प्रयत्न भारत सरकारने अलीकडच्या काळात वाढवले आहेत.
यासाठी भारत अमेरिकेकडून एमक्यू-9 रीपर ड्रोनचे 20 स्काय गार्डियन आणि 10 सी गार्डियन हे दोन प्रकार मिळवू शकतो. अमेरिका तीन अब्ज डॉलरांना हे ड्रोन भारताला देईल, असं बोललं जातं आहे.
दैनिक जागरणमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, भारताने नोंदवलेली ही ड्रोनची मागणी या वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
इंडिया टुडेमध्ये आलेल्या वार्तांकनानुसार, इस्राएली बनावटीच्या हेरॉन या गुप्तहेरगिरीसाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रोनवर अस्त्र बसवण्यासाठीसुद्धा भारत प्रयत्नशील आहे. या प्रकल्पासाठी ४० कोटी डॉलर खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी भारताशी भागीदारी केलेला इस्राएल या ड्रोनवर लेझर दिग्दर्शित बॉम्ब आणि हवेतून जमिनीवर मारा करू शकणारी क्षेपणास्त्रं बसवणार आहे. या व्यतिरिक्त रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रंसुद्धा ड्रोनवर बसवण्याचा प्रयत्न होणार आहे.
स्थानिक पातळीवर अभिनवता आणि उत्पादन यांना चालना
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमांचा भाग म्हणून डीआरडीओने 17 नोव्हेंबरला झाशीमध्ये 'ड्रोनच्या थव्या'चं प्रदर्शन केलं. भारत सरकार देशाचं या संदर्भातील यश साजरं करून स्वयंपूर्णतेला चालना देतं आहे.
सध्या देशाची युद्ध क्षमता स्थानिक पातळीवर विकसित करण्यावर भारत सरकारने लक्ष केंद्रित केलं आहे. यासाठी स्थानिक पातळीवर अभिनवता आणि उत्पादन यांना चालना दिली जाते आहे. भारत सरकारच्या नवीन ड्रोन धोरणामुळे मानवरहित विमानांसंदर्भात उत्साहवर्धक आणि मोकळेपणाचं वातावरण निर्माण झालं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात ट्वीट केलं होतं की, "ड्रोनविषयीचे नवीन नियम या क्षेत्रातील नवोद्योगांना आणि तरुणांना सहाय्य करणारे आहेत. तसंच अभिनवता, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी या बाबतीत भारताची क्षमता वाढवून भारत हा ड्रोनिर्मितीचं केंद्र होईल."
भारतात स्थानिक पातळीवर ड्रोननिर्मिती करणारे अनेक मंच आहेत, त्यांच्यात विकासप्रक्रिया आणि प्रत्यक्ष उपयोजन यासाठी वेगवेगळे भाग आहेत. भविष्यातील सर्वोत्कृष्ट ड्रोन म्हणजे बॉम्बवर्षाव करणारं विमान असेल आणि त्याला 'घातक' असंही संबोधलं जातं आहे, असं इंडिया टुडेने म्हटलं आहे.
भविष्यातील ड्रोन सामर्थ्याचा आधार होणाऱ्या या ड्रोनची चाचणी सध्या सुरू आहे, असंही इंडिया टुडेमधील वार्तांकनात म्हटलं होतं. सध्या हा प्रकल्प आरंभिक टप्प्यात आहे, पण त्यात यश मिळालं तर 'घातक' ड्रोन एखाद्या लढाऊ विमानाच्या पातळीवर काम करू शकेल, आणि त्यातून बॉम्बवर्षावासोबतच विशिष्ट दिशादिग्दर्शित क्षेपणास्त्रं सोडण्याचीसुद्धा क्षमता असेल. त्यात प्रगत शस्त्रास्त्रंही ठेवता येतील.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)