You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Indo Pak War 1971: पाकिस्तानच्या तुरुंगातून जेव्हा तीन भारतीय पायलट पळाले होते...
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"रेड वन, यू आर ऑन फायर," स्क्वॉड्रन लीडर धीरेंद्र जाफा यांच्या हेड फोनमध्ये त्यांचे सहकारी असलेले वैमानिक फर्डी यांचा आवाज ऐकू आला.
आणखी एक वैमानिक मोहनदेखील ओरडले. "बेल आऊट, रेड वन. बेल आऊट."
तिसरे पायलट जग्गू सकलानी यांचा आवाजही तेवढाच तीव्र होता, "जेफ सर, यू आर... ऑन फायर...! गेट आऊट...! गॉड सेक... बेल आऊट...!"
जाफा यांच्या सुखोई विमानात आगीच्या ज्वाळा त्यांच्या कॉकपिटपर्यंत पोहोचल्या होत्या. विमानावरील नियंत्रण सुटत चाललं होतं. त्यांनी सीट इजेक्शनचे बटण दाबले. यामुळे ते तात्काळ हवेत फेकले गेले आणि पॅराशूटच्या मदतीने हळूहळू खाली उतरू लागले."
जाफा सांगतात की खाली उतरताच "नार-ए-तकदीर" आणि "अल्लाह हो अकबर"चा जयघोष करत गावकऱ्यांचा जमाव त्यांच्या दिशेने धावून आला.
त्यांना बघताच लोकांनी त्यांचे कपडे फाडायला सुरुवात केली. कुणी त्यांचे घड्याळ लूटले तर कुणी त्यांचं सिगारेट लायटर हिसकावलं.
काही सेकंदातच त्यांचे पायमोजे, बुटं, 200 पाकिस्तानी रुपये आणि मफलरही गायब झाले.
एका धिप्पाड लष्करी अधिकाऱ्याने त्यांना विचारलं, "तुझ्याकडे काही शस्त्र आहे का?"
"माझ्याकडे रिवॉल्वर होतं. बहुतेक ते जमावाने उचललं," जाफा म्हणाले.
"तुला काही दुखापत झालीये का?"
वेदनेने विव्हळत असलेले जाफा म्हणाले, "मणक्याचं हाडं मोडलं वाटतं. शरीराचं कुठलंच अवयव मी हलवू शकतं नाही."
त्या अधिकाऱ्याने पश्तो भाषेत काहीतरी आदेश दिले आणि दोन सौनिक त्यांना उचलून तंबूत घेऊन गेले.
"याला चहा द्या," त्या अधिकाऱ्याने सैनिकांना सांगितलं.
जाफा यांच्या शरीरात चहाचा मग धरू शकतील, इतकीही ताकद नव्हती. मग एक पाकिस्तानी सैनिक त्यांना आपल्या हाताने चमच्याने चहा देऊ लागला. जाफा यांचे डोळे कृतज्ञतेने पाणावले.
पाकिस्तानी तुरुंगात राष्ट्रगीत
जाफा यांच्या कमरेला प्लास्टर करून त्यांना एका कोठडीत डांबण्यात आलं. त्यांची रोज चौकशी व्हायची. टॉयलेटला जाताना इकडे तिकडे बघता येऊ नये, म्हणून त्यांच्या तोंडावर उशी बांधलेली असायची.
एक दिवस त्यांना त्याच इमारतीतील दुसऱ्या एका खोलीत नेण्यात आलं. खोलीजवळ येताच त्यांना लोकांचे आवाज ऐकू येऊ लागले. खोलीत शिरताच आवाज बंद झाले.
अचानक एक मोठा आवाज ऐकू आला, "जेफ सर!" आणि फ्लाईट लेफ्टनंट दिलीप पारूळकर त्यांची गळाभेट घेण्यासाठी घाईघाईने पुढे आले. जाफा यांच्या सैल जॅकेटच्या आत असलेले प्लॅस्टर त्यांना दिसलेच नाही.
तिथे युद्धात बंदी बनवलेले आणखी वैमानिक होते. बऱ्याच दिवसांनी भारतीय चेहरे बघून जाफा यांना अश्रू अनावर झाले. तेवढ्यात युद्धात बंदी बनवलेल्यांच्या कॅम्पचा इंचार्ज स्क्वॉड्रन लीडर उस्मान हनीफ हसत आत आला.
त्याच्या मागे त्याचे दोन शिपाई केक आणि सगळ्यांसाठी चहा घेऊन उभे होते. उस्मान म्हणाला, "मी विचार केला की तुम्हा सगळ्यांना नाताळाच्या शुभेच्छा द्याव्या."
ती संध्याकाळ अविस्मरणीय ठरली. हलकं फुलकं वातावरण होतं. तिथे असलेले सर्वांत वरिष्ठ भारतीय अधिकारी विंग कमांडर बनी कोएल्हो म्हणाले, "आपण ठार झालेल्या आपल्या सहकाऱ्यांसाठी दोन मिनिटं मौन पाळू आणि त्यानंतर आपण सगळे राष्ट्रगीत म्हणूया."
जाफा सांगतात 25 डिसेंबर 1971च्या संध्याकाळी पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय राष्ट्रगीत घुमले, तेव्हा तिथे उपस्थित भारतीयांचे ऊर अभिमानाने भरून आला.
पलायनाची योजना
या दरम्यान भारताचे धोरण नियोजन समितीचे अध्यक्ष D. P. धर पाकिस्तानात येऊन परत गेले होते. मात्र बंदी बनवलेल्या जवानांचे भाग्य उजळले नाही.
त्यांच्या मनात निराशेचे ढग दाटू लागले. सर्वांत जास्त उदास होते फ्लाईट लेफ्टनंट दिलीप पारुळकर आणि मलविंदर सिंह.
1971च्या युद्धाआधी पारुळकर एकदा आपल्या सहकाऱ्यांना म्हणाले होते की एखाद वेळी जर त्यांचे विमान पाडून त्यांना बंदी बनवण्यात आले तर ते तुरुंगात बसणार नाही. ते पळून जाण्याचा प्रयत्न करतील आणि तेच त्यांनी केले.
पलायन करण्याच्या त्यांच्या या योजनेत त्यांचे सहकारी होते फ्लाईट लेफ्टनंट गरेवाल आणि हरीश सिंह.
हिरवा पठाणी सूट
या योजनेत सेल नंबर पाचच्या भिंतीत पाकिस्तानी हवाई दलाच्या रोजगार ऑफिसच्या अंगणात उघडणारे 21 X 15 इंचाचे छिद्र बनवायचे ठरले. त्यानंतर सहा फुटांची भिंत ओलांडून मॉल रोडवर जायचं ठरलं.
म्हणजे जवळपास 56 विटांचे प्लास्टर काढून त्या सैल करणे आणि त्यातून निघणारे अवशेष लपवणे.
कुरुविलाने एका इलेक्ट्रिशिअनचा स्क्रू ड्रायव्हर चोरला. गरेवाल यांनी कोकाकोलाच्या बाटलीपासून एक धारदार शस्त्र तयार केलं.
रात्री दिलीप पारुळकर आणि गरेवाल दहा वाचल्यानंतर प्लास्टर काढायला सुरुवात करायचे. कुणी पहारेकरी तर येत नाही ना, याकडे हॅरी आणि चाटी लक्ष ठेवायचे. या दरम्यान ट्रान्झिस्टरचा आवाज मोठा ठेवला जायचा.
जिनेवा करारानुसार भारतीय कैद्यांना दर महिन्याला 50 फ्रॅंकएवढे पाकिस्तानी रुपये पगार म्हणून मिळायचा. यातून ते आपल्या उपयोगाच्या वस्तू खरेदी करायचे आणि काही पैसे साठवूनही ठेवायचे.
याच दरम्यान पारुळकर यांना माहिती मिळाली की औरंगजेब नावाचा पाकिस्तानी गार्ड कपडेही शिवून द्यायचा. त्यांनी त्याला म्हटलं, "भारतात आम्हाला पठाणी सूट मिळत नाहीत. तू शिवून देशील का?"
औरंगजेबने पारुळकर यांच्यासाठी हिरव्या रंगाचा पठाणी सूट शिवून दिला. कामत यांनी तार आणि बॅटरीच्या सहाय्याने सुईला मॅग्नेटाईज करून एक तात्पुरता कंपास बनवला. तो फाउंटन पेनासारखा दिसायचा.
वादळ-वाऱ्यात तुरुंगातून निघाले
14 ऑगस्टला पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन होता. या दिवशी गार्ड सुटीच्या मूडमध्ये असतील आणि थोडे कमी सतर्क असतील, असा अंदाज पारुळकर यांनी बांधला.
12 ऑगस्टला रात्री त्यांना वीज कडाडण्याचा आवाज आला आणि त्याच वेळी प्लॅस्टरचा शेवटचा थरही निघाला. तिघे त्या छोट्या छिद्रातून निघाले आणि भिंतीजवळ वाट बघू लागले. धूळ मिश्रित वादळ त्यांच्या चेहऱ्यांवर धडकू लागले होतं.
जवळच एक सुरक्षारक्षक खाटेवर बसला होता. मात्र त्याच्याकडे बारकाईने बघितल्यावर कळले का धुळीपासून बचावासाठी त्याने चेहऱ्यावर ब्लॅंकेट घेतले होते.
कैद्यांनी बाहेरच्या भिंतीवरून माल रोडकडे बघितले. त्यांना रस्त्यावर बरीच लगबग दिसली. त्याच वेळी रात्रीचा शो संपला होता. तेवढ्यात पाऊसही सुरू झाला.
पहारेकऱ्याने डोक्यावरचे ब्लॅंकेट काढले आणि खाटेसह हवाई दलाच्या रोजगार ऑफिसच्या अंगणाकडे धाव घेतली. त्याने पुन्हा डोक्यावर ब्लॅंकेट टाकताच तिन्ही कैदी भिंतीवरून उड्या मारून पलीकडे गेले.
भराभरा चालत ते माल रोडवर डावीकडे वळले आणि सिनेमा बघून येणाऱ्या लोकांच्या गर्दीत हरवले.
थोडं अंतर कापल्यावर अचानक फ्लाईट लेफ्टनंट हरीश सिंह यांना ध्यानात आलं, की पाकिस्तानच्या सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या जेलमधून त्यांनी यशस्वी पलायन केलं होतं. ते जोरात ओरडले..."आझादी!"
पण फ्लाईट लेफ्टनंट मलविंदर सिंह गरेवाल यांचे उत्तर आलं, "आत्ताच नाही."
धिप्पाड शरीरयष्टीच्या गरेवाल यांनी दाढी ठेवली होती. त्यांच्या डोक्यावर खूपच कमी केस होते आणि ते पठाणासारखे दिसण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या शेजारी होते फ्लाईट लेफ्टनंट दिलीप पारुळकर. त्यांनाही दाढी वाढवली होती आणि याच प्रसंगी वापरण्यासाठी शिवलेला हिरवा पठानी कोट घातला होता.
यापैकी कुणालाच नमाज पठण करता येत नव्हतं. त्यामुळे आपण ख्रिश्चन असल्याचं सांगावं, असं सगळ्यांनी ठरवलं. सर्वजण ख्रिश्चन शाळेत शिकले होते आणि त्यांनी भारतीय हवाई दलात काम करणाऱ्या ख्रिश्चन लोकांना जवळून पाहिलं होतं.
पाकिस्तानच्या हवाई दलातही बरेच जण ख्रिश्चन असल्याची त्यांना माहिती होती. दिलीप यांचं नवं नाव होते फिलिप पीटर आणि गरेवाल यांनी आपले नाव ठेवलं 'अली अमीर'. त्यांनी जी नवी नावं स्वीकारली होती, त्या व्यक्ती खऱ्या होत्या.
पीटर आणि अमीर हे दोघेही पाकिस्तानच्या PAF स्टेशनवर काम करत होते.
तिसरी व्यक्ती म्हणजे सिंह यांचं नवीन नाव होतं हॅरोल्ड जॅकब. ते हैदराबाद सिंधमध्ये पाकिस्तानच्या हवाई दलात ड्रमर म्हणून काम करायचे.
कुणी विचारलंच तर या दोघांची भेट लाहोरच्या लाबेला हॉटेलमध्ये झाली, असं सांगायचं ठरलं होतं.
पावसात भराभरा पावलं टाकत भिजून ते बस स्टॉपवर पोचले. तिथे एक कन्डक्टर ओरडत होता, "पेशावर जाना है भाई? पेशावर! पेशावर!"
तिघेही लगेच बसमध्ये चढले. सकाळी सहा वाजेपर्यंत ते पेशावरला पोहोचले. तिथून त्यांनी जमरूद रोडसाठी घोडागाडी केली. घोडागाडीतून उतरून ते पायी जाऊ लागले.
मग त्यांनी पुढे आणखी एक बस पकडली. बसमध्ये जागा नव्हती म्हणून कंडक्टरने त्यांना छतावर बसवलं. जमरूदला पोहोचल्यावर त्यांना रस्त्यावर एक गेट दिसले. तिथल्या लाईन बोर्डवर लिहिलं होते, "तुम्ही स्थानिक जमातींच्या भागात (जनजातीय) भागात प्रवेश करत आहात. प्रवाशांना सल्ला आहे की तुम्ही रस्ता सोडू नका आणि स्त्रियांचे फोटो काढू नका."
त्यानंतर एका बसच्या छतावर बसून तिघंही साडेनऊ वाजता लंडी कोतलला पोहोचले. तिथून अफगाणिस्तान केवळ पाच किमी लांब होते. ते तिथे एका चहाच्या दुकानात गेले. गरेवाल यांनी चहा घेत शेजारच्या व्यक्तीला विचारलं, "इथून लंडीखाना किती दूर आहे?"
त्याला काहीच माहिती नव्हती. तिथे प्रत्येकाने डोक्यावर काहीतरी घातल्याचं दिलीप यांना जाणवलं. त्यांच्यासारखे दिसण्यासाठी दिलीप यांनी दोन पेशावरी टोप्या खरेदी केल्या.
एक टोपी गरेवाल यांच्या डोक्यावर नीट बसली नाही. त्यामुळे ती बदलण्यासाठी दिलीप पुन्हा त्या दुकानात गेले.
...आणि इथेच माशी शिंकली!
जेव्हा ते परत आले तेव्हा चहा स्टॉलवरचा मुलगा मोठमोठ्याने ओरडू लागला, "टॅक्सीने लंडीखाण्याला जाण्यासाठी 25 रुपये लागतील." हे तिघेही टॅक्सीवाल्याकडे जाणार तेवढ्यात मागून आवाज आला.
एक प्रौढ व्यक्ती त्यांना विचारत होती, "तुम्हाला लंडीखान्याला जायचे आहे का?" तिघांनी हो म्हटल्यावर त्या व्यक्तीने विचारले, "तुम्ही कुठून आला आहात?"
दिलीप आणि गॅरी यांनी ठरल्याप्रमाणे ओळख सांगितली. त्या व्यक्तीचा आवाज एकदम कठोर झाला. तो म्हणाला, "इथे लंडीखाना नावाचं कोणतं ठिकाणच नाही. ते ठिकाण तर इंग्रजांसोबतच संपलं आहे."
हे तिघे बंगाली असावे आणि अफगाणिस्तान मार्गे बांगलादेशात जाण्याची यांची योजना असावी, असा संशय त्या व्यक्तीला आला. गरेवाल हसत हसत म्हणाले, "तुम्हाला आम्ही बंगाली वाटतो का? तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी बंगाली बघितले आहेत का?"
मात्र तहसीलदारच्या कर्मचाऱ्याने तिघांचे काहीही ऐकले नाही. तो त्यांना तहसीलदाराकडे घेऊन गेला. तहसीलदाराचाही तिघांच्या बोलण्यावर विश्वास बसेना. तो म्हणाला, "मला तुम्हाला तुरुंगात पाठवावे लागेल."
ADC उस्मान यांना फोन
तेवढ्यात दिलीप अचानक म्हणाले की, त्यांना पाकिस्तानच्या हवाई दलाच्या प्रमुखांचे ADC स्क्वॉड्रन लीडर उस्मानशी बोलायचं आहे. हे तेच उस्मान होते, जे रावळपिंडी जेलचे इन्चार्ज होते आणि भारतीय कैद्यांसाठी नाताळचा केक आणला होता.
दिलीप म्हणाले, "सर, तुम्ही बातमी ऐकली असेलच. आम्ही तिघे लंडीकोतलमध्ये आहोत. आम्हाला तहसीलदाराने पकडले आहे. तुम्ही तुमची माणसं पाठवू शकता का?"
उस्मान म्हणाला तहसीलदारांना फोन द्या. ते म्हणाले, "ही तिघं आमची माणसं आहेत. यांना बंद करून ठेवा. काळजीपूर्वक ठेवा. मात्र मारू नका."
दिलीप पारुळकर यांनी बीबीसीला सांगितलं की काही सेकंदातच त्यांच्या डोक्यात हा विचार आला. त्यांना वाटलं की ते ज्युरिस्डिक्शन इतक्या वर नेऊन ठेवतील की इच्छा असूनही तहसीलदार काहीच करू शकणार नाही.
तिकडे 11 वाजता रावळपिंडी तुरुंगात गडबड सुरू झाली. जाफा यांच्या कोठडीच्या शेजारी गार्डरूममध्ये फोनची बेल वाजली. फोन ऐकताच गडबड वाढली. गार्डची पळापळ सुरू झाली. उरलेल्या सात कैद्यांना वेगवेगळे करून अंधाऱ्या कोठडीत डांबण्यात आले.
एक गार्ड म्हणाला, "हे सगळं जाफाने केले आहे. याला या छिद्रासमोर उभं करा आणि गोळी घाला. आपण सांगू की हा सुद्धा त्या तिघांसोबत पळून जात होता."
तुरुंगाचे उपसंचालक रिजवी म्हणाले, "शत्रू अखेर शत्रूच राहील. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आणि त्याबदल्यात तुम्ही काय दिलं!"
सुटका आणि घरवापसी
यानंतर सर्व युद्धकैद्यांना लायलपूरच्या तुरुंगात नेण्यात आले. तिथे भारतीय लष्कराचे युद्धकैदीही होते.
एक दिवस अचानक तिथे पाकिस्तानचे राष्ट्रपती जुल्फिकार अली भुट्टो पोहोचले. ते भाषणात म्हणाले, "तुमच्या सरकारला तुमची काहीच काळजी नाही. मात्र मी आपल्याकडून तुम्हाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे."
1 डिसेंबर 1972 रोजी सर्व कैद्यांनी वाघा सीमा ओलांडली. आपल्या सुटकेसाठी आपल्या सरकारने काहीच केलं नाही, याचा राग त्यांच्या मनात होता. भुट्टो यांनी मोठ्या मनाने त्यांना सोडलं होतं.
मात्र भारतीय हद्दीत पाय ठेवताच तिथे हजर असलेल्या हजारो लोकांनी हार घालून आणि गळाभेट घेत त्यांचं स्वागत केलं. पंजाबचे मुख्यमंत्री ग्यानी झैल सिंह स्वत: तिथे उपस्थित होते.
वाघा ते अमृतसर या 22 किमी रस्त्यात शेकडो फलक लागले होते. लोकांचे प्रेम बघून या युद्धकैद्यांचा राग निवळत गेला.
दुसऱ्या दिवशी दिल्लीत रामलीला मैदानात या सर्वांचे सार्वजनिक अभिनंदन करण्यात आले.
स्वीट कॅप्टिविटी
गरेवाल यांना बरेलीमध्ये तैनात करण्यात आले. त्यांना आपल्या वर्षभराच्या पगारातून 2,400 रुपयाला एक फियॅट कार विकत घेतली.
दिलीप यांनी हवाई दल प्रमुख P. C. लाल यांना एक फाउंटन पेन भेट दिला. प्रत्यक्षात तो एक कंपास होता. तुरुंगातून पळून जाण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी तो बनवला होता.
दिलीप पारुळकर यांच्या आई-वडिलांनी तात्काळ त्यांचे लग्न लावून दिले.
भारतात परतल्यावर पाच महिन्यांनी त्यांचे लग्न झालं. यावेळी त्यांचे पाकिस्तानातील तुरुंगातील सहकारी स्क्वॉड्रन लीडर A. V. कामत यांचा टेलिग्राम मिळाला, "No escape from this sweet captivity."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)