You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इस्रायलच्या तुरुंगातून 6 पॅलेस्टिनी कैद्यांचं 'फिल्मी स्टाईल' पलायन
इस्रायलच्या सर्वात सुरक्षित अशी ओळख असलेल्या तुरुंगातून सहा पॅलेस्टिनी कैदी पळून गेले आहेत. आता एका रात्रीतून बेपत्ता झालेल्या या कैद्यांना पकडण्यासाठी इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
हे सर्व पॅलेस्टिनी इस्रायलच्या गिल्बाआ तुरुंगात गेल्या अनेक महिन्यांपासून बाहेरच्या रस्त्याकडं निघणारं भूसुरुंग खोदत होते, अशी माहिती मिळाली आहे.
या घटनेची तुलना एखाद्या थ्रिलर कथानक असलेल्या हॉलिवूडपटाशी केली जात आहे.
कैदी पळून गेल्याचं समजताचं पॅलेस्टिनींनी रस्त्यावर उतरत आनंद व्यक्त केला आहे.
काही शेतकऱ्यांनी कैद्यांना शेतातून पळताना पाहिल्यानंतर इस्रायलच्या अधिकाऱ्यांना कैदी फरार झाल्याची माहिती मिळाली.
पळून जाणाऱ्या कैद्यांमध्ये पाच इस्लामिक जिहादचे सदस्य होते आणि एक पॅलेस्टिनी कट्टरतावादी संघटना अल अक्सा मार्टर्स ब्रिगेडचा माजी नेता होता.
पॅलेस्टिनी गटांनी ठरवलं 'हिरो'
इस्रायली तुरुंग सेवेतील एका अधिकाऱ्यानं ही घटना म्हणजे सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेतील मोठी चूक असल्याचं म्हटलं आहे. तर पॅलेस्टिनी कट्टरतावादी गटांनी याला 'धाडसी' म्हटलं आहे.
जवळच्या शेतांमधून काही संशयास्पद लोकांना पळताना पाहिल्याचं शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. हे समजताच उत्तर इस्रायलमध्ये असलेल्या आणि सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या प्रसिद्ध गिल्बोआ तुरुंगात एकच धावपळ उडाली.
तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी कैद्यांची संख्या मोजली तर त्यात सहा जण बेपत्ता असल्याचं समोर आलं.
पॅलिस्टिनी कैद्यांनी बाथरूमच्या फरशीखालून बाहेर निघणारं एक भूयार खोदलं असल्याची माहिती समोर येत आहे.
सोशल मीडियाद्वारे समोर येणाऱ्या काही फोटो आणि व्हीडिओमध्ये याचा खुलासा होताना दिसत आहे. इस्रायचे अधिकारी एका सिंकच्या खाली लहान बोगदा आणि तुरुंगाच्या भिंतीला लागून असलेल्या धुळीनं माखलेल्या रस्त्यावर दुसऱ्या बोगद्याचा शोध घेत आहेत.
सुरक्षा संस्थांच्या मते, पॅलेस्टिनी कैद्यांनी कुठल्या तरी माध्यमातून बाहेरच्या लोकांशी संपर्क केला होता. तसंच त्यांनी तुरुंगात मोबाईलचा वापर केला आणि कार बोलावून घेतली.
टाइम्स ऑफ इस्रायल या वृत्तपत्रानुसार या सहा जणांपैकी पाच जण हे, जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. त्यापैकी एका कैद्यावर हत्येच्या प्रयत्नासह दोन डझनापेक्षा अधिक गुन्ह्यांसाठी खटला सुरू होता.
गाझामध्ये चॉकलेटचं वाटप, उत्साहाचं वातावरण
पॅलिस्टिनी कैद्यांना पकडण्यासाठी रवाना करण्यात आलेल्या इस्रायलमधील पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी त्यांचा ताबा असलेल्या वेस्ट बँक किंवा जॉर्डनला पोहोचण्यापासून रोखण्यासाठी मार्गावर पहारा वाढवला आहे.
इस्रायलचे पंतप्रधान नफ्टाली बेनेट यांनी सार्वजनिक सुरक्षा मंत्री उमर-बर-लेव्ह यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे.
इस्लामिक जिहाद समुहानं कैदी पळून जाण्याच्या घटना या 'धाडसी' असल्याचं म्हटलं आहे. यामुळं इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणेला धक्का पोहोचेल असं ते म्हणाले आहेत.
हमास या पॅलिस्टिनी संघटनेच्या प्रवक्त्यांनी हा 'मोठा विजय' असल्याचं म्हटलं आहे. तसंच ''आपल्या शूर सैनिकांची इच्छाशक्ती आणि दृढनिश्चयाला शत्रू तुरुंगातही पराभूत करू शकत नाही,'' असंही ते म्हणाले.
रॉयटर्स या वृत्त संस्थेच्या वृत्तानुसार गाझामध्ये इस्लामिक जिहादच्या समर्थकांनी आनंद व्यक्त करत रस्त्यावरून जाणाऱ्यांना चॉकलेट वाटप केले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)