रशिया-युक्रेन संघर्षामुळे तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकतं का?

    • Author, फ्रँक गार्डनर
    • Role, बीबीसी संरक्षण प्रतिनिधी

एका मुद्दयावर आपण थेटच विचार करुयात. आपण खरंच तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत का?

रशियानं युक्रेनच्या विरोधात उचललेली पावलं आणि त्या पार्श्वभूमीवर अनेकजण याचाच विचार करत आहेत आणि याबाबत विचारणाही करत आहेत. रशियाची विधानं आणि कृत्यं यामुळं पाश्चात्य देशांना निर्बंध आणि इतर गोष्टींचा मार्ग अवलंबावा लागला आहे.

नाही. सध्या रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर जी स्थिती आहे ती कितीही वाईट असली तरी नाटो आणि रशियाच्या लष्करामध्ये थेट संघर्ष पाहायला मिळालेला नाही.

प्रत्यक्षात, जेव्हा रशियानं युक्रेनवर आक्रमण करण्यासाठी सैन्य उभारणी करण्यास सुरुवात केली त्यावेळी अमेरिका आणि ब्रिटन यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनीही लगेचच काही प्रमाणात सुरक्षा सल्लागार आणि लष्करी प्रशिक्षक समोर आणले.

"ज्यावेळी अमेरिका आणि रशियाचे सैनिक एकमेकांवर गोळीबार सुरू करतील, त्यावेळी ते जागतिक किंवा महायुद्ध असेल," असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन या महिन्याच्या सुरुवातील म्हणाले होते. कोणत्याही परिस्थितीत युक्रेनमध्ये अमेरिकेचं लष्कर तैनात करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

मात्र, पाश्चिमात्य देशांत्या नेत्यांना अजूनही ही भीती आहे की, रशिया संपूर्ण युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे.

पण तुम्ही याबाबत किती काळजी करायला हवी हे काही घटकांवर अवलंबून आहेत. त्यात तुम्ही नेमके कोण आहात? तुम्ही कुठे आहात? आणि रशिया पुढे काय करेल? याचा समावेश होतो.

जर तुम्ही पूर्व युक्रेनमधील आघाडीच्या सैनिकांपैकी एक असाल तर परिस्थिती ही नक्कीच अत्यंत धोकादायक आहे. तर युक्रेनमधील लाखो नागरिकांसाठी या सर्वाचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम पडेल याची भीती सर्वाधिक आहे.

रशियाचं लष्कर नेमकं किती आतपर्यंत शिरकाव करणार आहे, हे केवळ रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि त्यांच्या नीकटवर्तीय वर्तुळातील लोकांनाच माहिती आहे.

जोपर्यंत रशियाचं आक्रमणासाठी सज्ज असलेलं लष्कर हे सीमेवर तैनात आहे, तोपर्यंत युक्रेनची राजधानी असलेलं कीव्ह आणि इतर शहरंही हल्ल्यापासून सुरक्षित असू शकणार नाहीत.

मात्र, रशियानं नाटोच्या सदस्य देशासाठी धोका निर्माण केला तर नाटो आणि पाश्चिमात्य राष्ट्रांसाठी ही धोक्याची घंटा असेल.

नाटोच्या कलम 5 नुसार कोणत्याही सदस्य राष्ट्रावर हल्ला झाल्यास, संपूर्ण पाश्चिमात्य लष्करी आघाडीला त्याच्या संरक्षणासाठी येणं अनिवार्य आहे.

युक्रेननं नाटोमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली असली, तरी अद्याप तो नाटोचा सदस्य नाही. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना तेच होण्यापासून रोखायचं आहे.

एस्टोनिया, लातविया, लिथुआनिया किंवा पोलंड असे देश हे एकेकाळी सोव्हिएतच्या काळात मॉस्कोच्या कक्षेत होते. ते सर्व आता नाटोचे सदस्य आहेत.

रशियाचं सैन्य हे युक्रेनपर्यंत येऊन थांबणार नाही तर ते पारंपरिक रशियन अल्पसंख्याकांना मदत करण्याच्या नावाने काही तरी कारण पुढं करून बाल्टीकमध्येही आक्रमण करतील, अशी भीती या सर्वांना आहे.

त्यामुळं नाटोनं नुकतीच पूर्व युरोपातील सदस्यांना खबरदारी म्हणून काही मदत पाठवली आहे.

मग आपण किती काळजी करायला हवी? जोपर्यंत रशिया आणि नाटोमध्ये थेट संघर्ष होत नाही, तोपर्यंत हा संघर्ष कितीही वाढला तरी पूर्णपणे जागतिक युद्धाची भीती वाटण्याचं कारण नाही.

रशिया आणि अमेरिका या दोघांकडे असलेली एकूण हल्ला करण्यायोग्य अशा अण्विक शस्त्रांची संख्या ही जवळपास 8 हजारापेक्षा अधिक आहे, हे विसरता कामा नये.

त्यामुळं बऱ्याच गोष्टी पणाला लागलेल्या आहेत. त्यामुळं अजूनही जुनं शीत युद्धाचं (MAD)धोरण लागू होतं.

"पुतिन हे नाटोवर हल्ला करणार नाहीत. तर त्यांना युक्रेनला बेलारुससारखं त्यांची मालकी असणारं राष्ट्र बनावायचं आहे," असं एका वरिष्ठ ब्रिटीश लष्करी अधिकाऱ्यानं सांगितलं.

पण याठिकाणी पुतिन यांच्या मानसिक स्थितीवर बरंच काही अवलंबून असणार आहे. त्यांचं वर्णन हे कायम एखाद्या शांत बुद्धीबळपटूप्रमाणं विचारपूर्वक आणि ज्युदोपटू्प्रमाणं आक्रमक असं केलं जातं. त्यांचं सोमवारचं भाषण हे चतुर रणनितीकारापेक्षा एखाद्या रागीट हुकूमशहासारखं होतं.

नाटो दुष्ट असल्याचा उल्लेख करत त्यांनी युक्रेनला रशियापासून स्वतंत्र किंवा सार्वभौम राष्ट्र म्हणून घेण्याचा काहीही अधिकार नसल्याचं अगदी स्पष्टपणे सांगितलं. हे अत्यंत काळजीचं आहे.

रशियावर निर्बंध लादणारा ब्रिटन हा एकमेव देश नाही. अमेरिका आणि जर्मनीनं आणखी पुढं जात पावलं उचलली आहेत. उदाहरण द्यायचं झाल्यास त्यांनी रशियाच्या मोठ्या प्रमाणातील नॉर्ड स्ट्रिम 2 या गॅस पाईपलाईन प्रकल्पाची मंजुरी रखडवली आहे. मात्र युकेनं त्याच्याही पुढं जात दंड लावण्याचा विचार केला आहे.

रशियाही याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे उत्तर नक्की देईल. रशियातील पाश्चिमात्य देशांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होईल, पण पुतिन यांनी ठरवल्यास त्याहीपेक्षा पुढं जाऊन काही केलं जाऊ शकतं.

सायबर हल्ल्यांच्या आधारेही 'बदला' घेतला जाऊ शकतो. राष्ट्रीय सायबर सुरक्षा केंद्रानं तसा इशारा आधीच दिला आहे. याबाबत अगदी ठाम अंदाज लावणं कठीण आहे, पण यामुळं बँका, व्यवसाय, वैयक्तिक लोक आणि राष्ट्रीय पायाभूत सुविधांनाही लक्ष्य केलं जाऊ शकतं.

आता अशी समस्या निर्माण झाली आहे की, अनेक वर्षांपासून घसरत चाललेल्या रशियाबरोबरच्या संबंधांमुळं आता पाश्चिमात्य देश आणि रशिया यांच्यात परस्परांवर विश्वासाचं प्रमाण हे जवळपास शून्यावर आलं आहे.

सध्याच्या संकटासाठी नेमकं कोण जबाबदार आहे, यावरून जनतेमध्ये वाद सुरू असताना निर्माण झालेली ही परिस्थिती म्हणजे एक गंभीर पार्श्वभूमी आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)