You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तालिबान-अफगाणिस्तान संघर्ष: काबूल विमानतळाजवळ रॉकेट हल्ला - अधिकारी
काबूल विमानतळावर धमाक्याचे जोरदार आवाज ऐकू आल्याचं वृत्त आहे.
सोशल मीडियावर समोर आलेल्या काही फोटोंमध्ये काही इमारतींच्या वर काळा धूर आसमंतात पसरलेला दिसतो आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने जोरदार स्फोट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
विमानतळाजवळच्या घराजवळ रॉकेट येऊन आदळल्यामुळे हा स्फोट झाल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
विमानतळाला या स्फोटाचा थेट फटका बसलेला नाही असंही या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.
स्फोटात जीवितहानी झाली आहे का यासंदर्भात माहिती मिळू शकलेली नाही.
काबूल विमानतळावर आणखी हल्ले होऊ शकतात - जो बायडन
काबूल विमानतळावर कट्टरवाद्यांकडून आणखी हल्ले होऊ शकतात, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिला होता.
रविवारी (29 ऑगस्ट) पुन्हा विमानतळावर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनी आपल्याला दिल्याचं बायडन यांनी सांगितलं.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानेही अमेरिकन नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. हल्ल्याची दाट शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे लोकांनी विमानतळाच्या मुख्य रस्त्यापासून दूर राहावं, असं मंत्रालयाने म्हटलं.
अफगाणिस्तानातून लोकांना बाहेर काढण्याचं काम अमेरिकेकडून अजूनही सुरू आहे.
दुसरीकडे ब्रिटनने आपले सैनिक, राजदूत आणि इतर अधिकाऱ्यांना अफगाणिस्तानातून बाहेर काढलं आहे.
गुरुवारी काबूल विमानतळाजवळ एक आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. यामध्ये सुमारे 170 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट संघटनेची प्रादेशिक शाखा असलेल्या इस्लामिक स्टेट खुरासानने घेतली होती.
काबूल विमानतळावरील हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने शुक्रवारी कारवाई केली होती. अमेरिकेने ड्रोन हल्ल्याच्या माध्यमातून ISIS-K 2 कट्टरवाद्यांना ठार केलं. दोघेही काबूल विमानतळ हल्ल्याचे सूत्रधार असल्याचं अमेरिकेने म्हटलं.
ही अखेरची कारवाई नव्हती. ज्यांनी कुणी काबूल विमानतळावर हल्ला केला. त्यांना सोडणार नाही. त्यांना किंमत चुकवावी लागेल, असं जो बायडन म्हणाले आहेत.
सध्या अफगाणिस्तानची सत्ता तालिबानच्या हातात आहे.तालिबानने अमेरिकेच्या एअर-स्ट्राईकचा निषेध नोंदवला आहे. अमेरिकेने हल्ला करण्यापूर्वी आपल्याला सांगायला हवं होतं, असं तालिबानने म्हटलं आहे.
अमेरिकन सैनिकांनीही काबूल विमानतळ सोडणं सुरू केलं आहे. आता काबूल विमानतळावर 4 हजारपेक्षाही कमी सैनिक आहेत. गेल्या आठवड्यात ही संख्या 5800 होती.
पुढील काही दिवस अत्यंत धोकादायक ठरू शकतात, असं अमेरिकेने म्हटलं आहे.
अफगाण नागरिकांना काबूल विमानतळावर जाण्यापासून रोखण्यासाठी तालिबानने विमानतळाच्या चारही बाजूंना नाकाबंदी केलेली आहे.
गेल्या दोन आठवड्यात अफगाणिस्तानातून 1 लाख 10 हजार अफगाण तसंच परदेशी नागरिकांना काबूलमधून बाहेर काढण्यात आलं आहे.
काबूल विमानतळावर ताबा घ्यायला तालिबान तयार
तालिबाननं त्यांच्याकडं तांत्रिक माहिती असलेले तज्ज्ञ आणि इंजिनीअर आहेत, असं म्हटलं आहे. अमेरिकेचं लष्कर काबूल विमानतळावरून बाहेर निघताच ते विमानतळावर ताबा घेतील, असंही त्यांनी सांगितलं.
''आम्ही अमेरिकेकडून अंतिम मंजुरीची वाट पाहत आहोत. मंजुरी मिळताच आम्ही संपूर्ण ताबा घेऊन टाकू,'' असं तालिबानच्या एका अधिकाऱ्यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
ठरलेल्या वेळेमध्ये म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून संपूर्ण सैन्य परत बोलावणार असल्याचं, अमेरिकेनं आधीच स्पष्ट केलं आहे.
तालिबानच्या प्रवक्त्यांच्या मते, आगामी काही दिवसांत तालिबानमध्ये नव्या सरकारची घोषणा केली जाईल, अशी अपेक्षा त्यांना आहे.
काबूलवर तालिबानचा ताबा हा अचानक झाला. त्यांना अशी अपेक्षा नव्हती असं प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहीद यांनी मान्य केलं.
सरकार स्थापन करण्यात काही अडचणी आहेत, पण त्यावर चर्चा सुरू असल्याचंही ते म्हणाले.
तालिबान काबूल विमानतळावर ताबा घेण्यास सज्ज : जबीहुल्लाह मुजाहीद
तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहीद यांनी काबूल विमानतळावर ताबा घेण्यासंदर्भात अमेरिकेच्या संकेतांची वाट पाहत असल्याचं म्हटलं आहे.
विमानतळ चालवू शकतील अशा तज्ज्ञ आणि इंजिनीअर्सची टीम असल्याचं त्यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
तालिबाननं अफगाणिस्तानच्या 34 पैकी 33 प्रांतांच्या गव्हर्नर आणि पोलिस प्रमुखांची नावं ठरवली आहेत. लवकरच देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठीही काम सुरू केलं जाईल, असं जबीहुल्लाह यांनी शनिवारी म्हटलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)