You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तालिबानचा अफगाणिस्तानातील 20 वर्षांपूर्वीचा सत्तेचा काळ कसा होता?
- Author, महमूद जान बाबर
- Role, पत्रकार, बीबीसी ऊर्दूसाठी
परदेशी सैन्य माघारी फिरल्यानंतर अफगाणिस्तानात तणाव पुन्हा एकदा वाढतोय. अफगाण सुरक्ष दल आणि तालिबान यांच्यात देशभरात चकमकी सुरू आहेत. गेल्या काही दिवसात 8 प्रांतांची राजधान्यांची शहरं ताब्यात घेतल्याचा त्यांचा दावा आहे.
शिवाय, येत्या काही दिवसात महत्त्वाची शहरंही तालिबान्यांच्या ताब्यात जातील, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
सद्यपरिस्थिती बघता बीबीसीने अफगाणिस्तानावर तालिबान्यांची सत्ता असलेला काळ आणि त्या काळची परिस्थिती सागंण्यासाठी एक मालिका सुरू केली आहे. त्या मालिकेचा हा पहिला भाग :
वर्ष 1997 - अफगाणिस्तानात तालिबानी सत्तेचा हा सुरुवातीचा काळ होता. आम्ही अफगाणिस्तानात जाणार होते. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळ जाताना आमच्या हृदयाचे ठोके वाढत होते. लहानपणापासून शिकलेल्या, पाठ केलेल्या, येत असतील नसतील तेवढ्या सगळ्या प्रार्थना आम्ही म्हणत होतो.
याच अवस्थेत आम्ही सीमेवरचा निर्मनुष्य एन्ट्री पॉईंट कुठलीही कागदपत्रांची चेकिंग न करता पार केला आणि अफगाणिस्तानात दाखल झालो. इथे आमची गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला एक मजली घरासमोर थांबली.
हीच ती जागा होती जिथे अफगाणिस्तानात प्रवेश करण्यासाठी तालिबान्यांनी आखलेल्या कठोर निकषांनुसार आमची झडती होणार होती.
आमच्या गाडीत अफगाण युद्धाविषयी माहिती असणारे पेशावरचे अनेक पत्रकार होते. आम्ही सगळेच पेशावरहून इथपर्यंत तालिबान्यांचे निर्देश आणि सरकारी कायद्यांची भीड बाळगणार नसल्याच्या गप्पा मारत आलो होतो. त्या सर्वांमध्ये मी वयाने सर्वात लहान होतो आणि पत्रकारितेत नवखा असल्याने मला बसायला शेवटची सीट मिळाली होती. तिथे कसाबसा बसलो होतो.
नमाज आणि दाढीविषयी विचारपूस
काही वेळाने लांब दाढी असलेला, काळी टोपी घातलेला तालिबानी कमांडर आमच्या गाडीजवळ आला आणि त्याने गाडीत डोकावून बघितलं. आम्ही सगळे स्तब्ध होऊन त्याच्याकडे बघत होतो. मनात कालवाकालव सुरू होती. पण, आश्चर्य म्हणजे त्याने आम्हाला ते प्रश्न विचारले नाही किंवा त्याचं वागणंही तेवढं कठोर नव्हतं, जसं आम्ही ऐकून होतो. मात्र, त्याने आमच्या दाढीविषयी आणि नमाजविषयी विचारपूस केली. नमाज पठण करत जा आणि दाढी ठेवणंही गरजेचं असल्याचं तो म्हणाला.
यावर पेशावरचे पत्रकार इस्लामच्या शिकवणीवर चालण्याचा प्रयत्न करतात आणि नमाज पठणही करतात, असं आमच्या वरिष्ठांनी त्याला सांगितलं.
अफगाणिस्तानात बरेचदा जाऊन आलेले दाढी न ठेवणारे एक हाफिज-ए-कुराण (संपूर्ण कुराण तोंडपाठ असणारी व्यक्ती) ज्येष्ठ पत्रकार अशरफ डार आणि तो तालिबानी कमांडर यांच्यात झालेलं ते संभाषण मला आजही आठवतं. थोडक्यात सांगायचं तर अशरफ डार यांचं म्हणणं होतं की दाढी नसलेली व्यक्तीही चांगली मुसलमान असू शकते आणि तालिबानी नेत्यांची इच्छा असेल तर डार त्यांना कुराणातील कुठलाही पाठ तोंडपाठ ऐकवू शकतात.
तालिबानी गाइड
या छोटेखानी संभाषणानंतर त्या तालिबानी कमांडरने विषय पुढे न नेता शेजारी उभ्या असलेल्या सहकाऱ्याला पश्तू भाषेत, 'हे पाहुणे आहेत आणि यांना उशीर होत असल्याचं' सांगत त्याला आमच्या गाडीत बसवलं आणि आम्हाला निरोप दिला.
सीमा कशी पार होणार, याची एकप्रकारची भीती आमच्या मनात होती. मात्र, ती सीमा पार करून आमची गाडी तूरखमहून जलालाबादला रवाना झाली होती. या प्रवासावर निघण्याच्या आदल्या रात्री पेशावर प्रेस क्लबच्या नोटीस बोर्डावर गाडी सकाळी अफगाणिस्तानला रवाना होणार आहे, ज्यांना-ज्यांना जायचं आहे त्यांनी सकाळी हजर व्हावं, अशी नोटीस बघितली होती.
तालिबान्यांनी मुजाहिद्दीनच्या गृह युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या अफगाणिस्तानवर लवकर आणि सहज ताबा मिळवला होता. मात्र, तालिबान्यांनी अफगाणिस्तान बळकावल्यापासून विचित्र बातम्या पसरत होत्या.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील मदरशांमधल्या मुलांवर अवलंबून असलेल्या तालिबान नावाच्या संघटनेने इतकी मोठी घटना कशी धसास लावली, याचं लोकांना आश्चर्य वाटत होतं.
अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्यासोबतच तालिबान्यांना अनपेक्षितरित्या अफगाणी जनतेसाठी विचित्र असणारे काही नियमही लादले. उदाहरणार्थ पुरुषांना दाढी ठेवणं बंधनकारक करण्यात आलं. पतंग उडवणे, संगीत ऐकणे, कबूतर उडवणे, यावर बंदी घातली. महिलांवर बुरख्याची सक्ती करण्यात आली.
अफगाणिस्तानात परिस्थितीत कशीही असली तरी पाकिस्तानात तिथल्या विचित्र बातम्यांमुळे लोक एकमेकांना अफगाणिस्तानात न जाण्याचा सल्ला देत होते. अफगाणिस्तानात गेलात तर तालिबानी पकडून ठेवतील आणि पुन्हा कधी सोडणार नाही, अशी भीती घातली जायची.
पुरुषांच्या दाढीसाठी तालिबानने इस्लामी कायद्यांनुसार जे निकष तयार केले होते त्याविषयीहदेखील बरंच काही ऐकलं होतं. माझी स्वतःची दाढी खूप बारिक होती. त्यामुळे तालिबान्यांनी आपल्याला त्या निकषांच्या आधारे तपासलं तर आपलं काही खरं नाही, अशी धास्ती मला वाटत होती.
गाडीच्या आत एकमेकांना आपल्या कहाण्यांनी घाबरवणारे आमचे ज्येष्ठ पत्रकार मित्र मोठमोठ्या गप्पा मारत असले तरी त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची अनिश्चितताही दिसत होती. तालिबान्यांनी आपल्या दाढी नसलेल्या मित्रांना ताब्यात घेतलं तर, अशी भीती त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होती.
मात्र, त्या चेकपोस्टवरून आमची गाडी पुढे जाताच सर्वच मोकळेपणाने हसू लागले आणि सगळेच पेशावरमध्ये असतात तसे निर्धास्त झाले. इकडे माझ्या मनात विचारचक्र सुरू झालं की तालिबान एकतर पत्रकारांना काही म्हणत नाहीत आणि त्यांना कायद्यात थोडीफार सवलत देतात किंवा मग आम्हाला जी नरमाईची वागणूक मिळाली त्यामागे वेगळाच काहीतरी हेतू असावा.
दौऱ्यावरून परतल्यानंतर काही दिवसांनी कळलं की तालिबान्यांवर मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचे जे आरोप होत असतात, त्यावर तोड म्हणून आमचा हा दौरा आखण्यात आला होता. तालिबान्यांना आम्हाला ते दाखवायचं होतं जे त्यांच्या मते जगाला माहिती नव्हतं.
मोकळेपणाचा अभाव
आमच्या सोबत गाडीत बसलेला आमचा गाईड तालिब जो सुशिक्षित वाटत होता, त्याने आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. त्यापैकी काही आठवतात. पण, त्याचं प्रत्येक उत्तर एकाच गोष्टीवर संपायचं. त्याचं म्हणणं होतं तालिबान्यांचं राज्य आल्यापासून स्थानिक जनता खूश आहे. पूर्वी अफगाणिस्तानात बरीच अशांतता आणि लूटमार होती. आता ती नाही.
तूरखमहून जलालाबादला जाताना रस्त्यात बटीकोट लागलं होतं. तिथून जाताना तालिब आम्हाला तिथल्या परिस्थितीविषयी सांगत होता. या भागात तालिबान्यांची सत्ता येण्याआधी कशी लूटमार व्हायची, अत्याचार व्हायचे. मात्र, तालिबानी शासन आल्यापासून कशी शांतता प्रस्थापित झालीय, असं सगळं तो बोलत होता.
एक गोष्ट मात्र जाणवली. आमची गाडी जिथून जात होती त्या जवळपास सर्वच भागात घराबाहेर फारशी माणसं दिसत नव्हती. काही लोक दिसले ते शेतात काम करत होते आणि अगदी तुरळक संख्येने स्त्रिया बुरख्यात घराबाहेर दिसल्या. रस्त्यात काही दुकानं दिसली. आम्ही तालिबला सांगितलं की आम्हाला तिथे लोकांशी बोलायचं आहे आणि काही वस्तू खरेदी करायच्या आहेत.
त्याने अत्यंत आनंदाने गाडी थांबवली. आम्ही तिथल्या लोकांना भेटलो आणि खरेदी करण्याच्या बहाण्याने बातचीत सुरू केली.
अफगाणिस्तानातील सामान्य जनता तालिबान्यांच्या येण्याने खरंच खुश आहे का, हे जाणून घ्यायला मी उत्सुक होतो. मी एका दुकानात गेलो आणि गेल्या-गेल्या लगेच दुकानदाराला तालिबानी कसे आहेत आणि त्यांची सत्ता आल्यापासून तुम्ही खुश आहात का, हा प्रश्न विचारला. तो हसला. पण काही बोलला नाही. मी पत्रकार आहे आणि पेशावरहून आल्याचं त्याला सांगितलं. तरीही तो फारसं बोलला नाही. मात्र, तालिबान आल्यापासून परिस्थिती थोडी सुधारल्याचं आणि लूटमार बंद होऊन शांतता असल्याचं त्याने सांगितलं.
मी जरा खट्टू झालो. हे लोक मनातलं का बोलत नाही, असा प्रश्न मी माझ्या वरिष्ठ सहकाऱ्याला विचारला. यावर माझ्या त्या सहकाऱ्याने त्यांच्या अनुभवावरून जे उत्तर दिलं ते मी आयुष्यभर विसरणार नाही. ते म्हणाले की 'तू तालिबान्यांच्या गाडीतून त्यांच्या सोबत आला आहेस. हे सगळं बघूनही ही व्यक्ती तुला ते सगळं कसं सांगेल जे तो एखाद्या विश्वासू माणसालाच सांगू शकतो?'
त्या दुकानदाराने माझी निराशा केली होती. रस्त्याच्या कडेला काही वडीलधारी माणसं उभी होती. मी त्यांच्याजवळ गेलो.
आणि लांब दाढीच्या प्रश्नावर हशा पिकला..
त्यांच्याशी बोललो तेव्हा एका सद् गृहस्थाने सांगितलं की तालिबानी कसेही असले तरी त्यांच्याआधी जे मुजाहिद्दीन होते त्यांच्यापेक्षा बरे आहेत. पूर्वी अफगाणिस्तानात प्रत्येकाच्या स्वतःच्या भागात स्वतंत्र चेकपोस्ट असायच्या. बाहेरच्या भागातून आलेल्यांना हाकलून दिलं जायचं.
पण, तालिबानी मानवाधिकारांचं उल्लंघन करतात, इथे पुरुषांना दाढीची तर स्त्रियांना बुरख्याची सक्ती केली जाते, अशा आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रं आणि न्यूज चॅनलवर येतात, यात किती तथ्य आहे, मी विचारलं. त्यावर सोबतच उभ्या असलेल्या आणखी एका वडीलधाऱ्या व्यक्तीने म्हटलं, जगण्याची हमी मिळत असेल तर या बंधनांना फारसा अर्थ उरत नाही. इतकंच नाही तर आता ज्या ठिकाणी तुम्ही उभे आहात इथल्या पख्तून समाजात या चालीरिती पूर्वापार चालत आलेल्या आहेत.
तालिबानी दाढीची लांबी मोजतात का, हा प्रश्न विचारल्यावर तिथे एकच हशा पिकला. उत्तर मात्र कुणीच दिलं नाही.
त्यावेळी मला जाणवलं की इथले लोक मोकळेपणाने बोलत नाही, यामागे दोन-तीन कारणं असावी. एक म्हणजे शांततेसारखं धन मिळाल्याने ही जनता खरंच खुश होती किंवा आपण जे काही बोललो ते तालिबान्यांना कळेल आणि त्याची शिक्षा भोगावी लागेल या भीतीने ते शांत होते आणि आनंदी असल्याचं भासवत होते किंवा या भागात पख्तून परंपरा पुन्हा लागू होत असल्याचा त्यांना आनंदच होता.
या प्रवासात शेवटी आम्ही तालिबान्यांच्या त्या केंद्रात पोहोचलो जिथे फारशी वस्ती नव्हती.
तालिबान्यांची ब्रिफिंग
त्या ठिकाणाचं नाव माझ्या लक्षात नाही. पण, हे तेच ठिकाण होतं जिथून तिथल्या संपूर्ण भागात आणि तूरखम सीमेपर्यंतच्या लोकांची मदत केली जायची. तिथे आम्हाला अधिकृतपणे तालिबानच्या सरकारी धोरणांविषयी एका ज्येष्ठ तालिबानी नेत्याने ब्रिफिंग केलं.
या ब्रिफिंगदरम्यान माझ्या सहकाऱ्यांनी विचारलेल्या काही प्रश्नांनी माझी चांगलीच पाचावर धारण बसली. कारण ते असे प्रश्न विचारत होते जे विचारण्याचा विचारही माझ्या मनात येणार नाही.
महिलांना बुरख्याच्या तर पुरुषांना दाढीच्या सक्तीपासून ते तरुणांना पतंग उडवण्यास बंदी घालण्यापर्यंत अनेक प्रश्न त्यांनी विचारले. मात्र, तालिबान्यांच्या त्या नेत्याने अत्यंत संयमाने त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आणि तालिबानी कठोर निर्बंध लादत असल्याच्या आरोपांचंही खंडन केलं.
मात्र, काही गोष्टींवरूनच जाणवलं की तालिबान्यांविषयी जे काही ऐकलं किंवा वाचलं होतं त्यात तथ्य होतं आणि ते तसंच वागत होते.
आम्हाला ब्रिफिंग देणारा तो तालिबानी नेता अधून-मधून हसायचा. त्यावरून त्यांनाही थोडीफार गम्मत आवडायची, याचा अंदाज आला. परत येताना आमचा गार्ड तालिबही जरा मोकळा झाला होता आणि त्याने चक्क विनोदही ऐकवले.
तूरखम सीमेवरून अफगाणिस्तानला निरोप देताना मी त्याला अखेर विचारलंच की अफगाणिस्तानात तालिबानी कंदिलाच्या काचेत दाढी टाकून मोजतात, असं आम्ही ऐकलं होतं. ते कुठे होतं?
यावर तो हसला आणि तुम्ही कुठे बघितलं का, असा प्रतिप्रश्न केला. त्यावर मला दाढी नसलेलं कुणीच दिसलं नाही. त्यामुळे यात किती तथ्य आहे, हे कळलंच नसल्याचं मी म्हणालो. यावर तो काही न बोलता फक्त हसला आणि आम्ही त्याचा निरोप घेऊन पेशावरला रवाना झालो.
या संपूर्ण प्रवासात आम्ही जो अफगाणिस्तान बघितला तिथे शांतता तर होती. मात्र, ती एकप्रकारच्या भीतीच्या छायेत होती.
लोक दिसले. पण, संख्येने खूप कमी होते. त्यावरून संपूर्ण अफगाण समाजाच्या वास्तविक परिस्थितीचा अंदाज बांधता येणं शक्य नव्हतं. मात्र, तालिबान्यांशी बातचीत करताना जाणवलं की विरोधक आणि मीडिया ते जसे आहोत तसे जगाला दाखवत नसल्याचा त्यांचा आरोप होता.
दिवसेंदिवस बदलत असलेला तालिबानी दृष्टीकोन
तालिबानी अफगाणिस्तानातील शांततेचं क्रेडिट घेतात. अफगाणिस्तानात सत्ता स्थापन केल्यापासून तिथे शांतता प्रस्थापित झाल्याचा दावा ते करतात. तालिबान येण्यापूर्वी अफगाणिस्तानातील गृहयुद्ध आणि लूटमार अनुभवलेले लोकदेखीलृ तालिबान नसतं तर किती लाख लोकांचा मुजाहिद्दीन युद्धात मृत्यू झाला असता, हे सांगता येत नसल्याचं म्हणतात.
खरंतर, या एका भेटीतून तालिबानी सत्तेचा संपूर्ण अंदाज येणं शक्य नव्हतं. मात्र, हे तालिबानी युगाच्या प्रारंभाचं प्रतिबिंब नक्कीच होतं ज्यात पाकिस्तानी पत्रकारांना अफगाणी जनता खुश आहे आणि त्यांचे प्राण, अब्रू आणि संपत्ती सुरक्षित आहेत, हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
मात्र, पुढे अशा काही घटना घडल्या ज्यामुळे अफगाणी जनतेत तालिबानी शासनाविरोधात तक्रारीचे सूर उमटू लागले आणि तालिबान्यांना असणाऱ्या जनसमर्थनावरही त्याचा परिणाम झाला.
यात स्त्री शिक्षण, समाजात त्यांच्या स्वतंत्र वावरावर निर्बंध, बुरख्याची सक्ती, पुरुषांना दाढी ठेवणे आणि नमाज पठणाचे आदेश, अनेक खेळांवर लादलेले निर्बंध आणि विशेषतः स्त्रियांना खुलेआम 'इस्लामी कायद्यानुसार' शिक्षा करण्यासारख्या घटनांनी तालिबान्यांना असणाऱ्या समर्थनावर विपरित परिणाम झाला.
पुढे स्त्रियांना भर बाजारात दगडांनी ठेचणे, छोट्या पॅन्ट घालून फुटबॉल खेळल्याने संपूर्ण टीमचं मुंडन करणे आणि संगीतासारख्या कार्यक्रमांशी संबंध ठेवणाऱ्यांना शिक्षा करणे, अशा बातम्याही पाकिस्तानात पोहोचल्या. त्यावेळी आम्हालाही हा प्रश्न पडला की हा तोच तालिबान आहे का ज्यांनी अफगाणिस्तानवर आपली सत्ता कायम करण्यासाठी सुरुवातीच्या दिवसात पाकिस्तानातून आलेल्या पत्रकारांसमोर आपली सकारात्मक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता?
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)