You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अफगाणिस्तानः तालिबान अमेरिकेच्या हातचं बाहुलं, इस्लामिक स्टेटची टीका
अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर इस्लामिक स्टेटचे (ISIS) समर्थक माध्यम समूह सक्रिय झाले आहेत.
या वृत्तवाहिन्यांनी तालिबानच्या विरोधात प्रचार करण्यासाठी एक अधिकृत ऑनलाईन मोहीम सुरू केल्याचं दिसून येत आहे.
तालिबानविरोधात ISIS ची मोहीम 16 ऑगस्टपासूनच सुरू झाली होती. तालिबानने अफगाणिस्तानच्या इतर भागांसह राजधानी काबूलवर नियंत्रण मिळवल्यानंतरISIS ने हालचाली सुरू केल्या होत्या.
तालिबानच्या विरोधातील ISIS च्या मोहिमेने 19 ऑगस्टपासून आणखी वेग घेतला. याच दिवशी इस्लामिक स्टेटने तालिबानसंदर्भात एक अधिकृत प्रतिक्रिया दिली. तालिबान संघटना ही अमेरिकेच्या हातचं बाहुलं असल्याचं ISIS ने म्हटलं.
कट्टरवादी संघटनांसोबत बातचीत करून पुढील रस्ता मोकळा होऊ शकतो, असा विचार तालिबानने पुढे आणला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात जे काही घडलं, ते पाहता हा तालिबान नव्हे तर अमेरिकेचा विजय आहे, असं ISIS ने म्हटलं आहे.
ISIS प्रणित माध्यम समूहांनी 16 ऑगस्टपासून ते आतापर्यंत 22 प्रोपगंडा लेख प्रसिद्ध केले आहेत. यातील बहुतांश लेख पोस्टरच्या स्वरुपात आहेत.
तसंच फ्रेंच भाषेत अनुवादित केलेले 3 पोस्टरही आहेत. टेलिग्राम या सोशल मीडिया मॅसेजिंग अॅपवर रॉकेटचॅट सर्व्हरच्या माध्यमातून हे पोस्टर पाठवण्यात आले आहेत.
प्रचारासाठीचं शस्त्र
ISIS च्या या मोहिमेसाठी अद्याप कोणतंही हॅशटॅग तयार करण्यात आल्याचं निदर्शनास आलेलं नाही.
पण कदाचित या प्रयत्नांना आणखी बळ देण्यासाठी एखादा हॅशटॅगही आगामी काळात पुढे आणला जाऊ शकतो.
दरम्यान, ISIS प्रणित अल-अंसर माध्यमसमूहाने आपल्या पोस्टरवर Apostate Taliban नामक हॅशटॅग वापरल्याचं दिसून आलं आहे. या पोस्टर्सशिवाय आणखी एक व्हीडिओही दिसून येतो.
एक हाय-प्रोफाईल IS समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रोड्यूसर तुर्जूमन अल-असविर्ती यांनी हा व्हीडिओ पोस्ट केला आहे.
या व्हीडिओत एक इंग्रजीत बोलणारा व्यक्ती दिसतो. तालिबानने अमेरिकेसोबत कशा प्रकारे साटं-लोटं केलं आहे, हे सिद्ध करण्याचा हा व्यक्ती प्रयत्न करतो.
त्यासाठी हा व्यक्ती CIA चे इस्लामाबाद स्टेशनचे माजी प्रमुख रॉबर्ट एल. ग्रॅनियर यांच्या '88 डेज टू कंधार' या पुस्तकाचा आधार घेतो. तालिबानच्या वतीने याप्रकरणी आणखी जास्त अपप्रचार केला जाईल, असं म्हटलं जात आहे.
दरम्यान, अल-कायदा संघटनेच्या संमर्थकांनी तसंच संघटनेच्या येमेन शाखेने तालिबानच्या विजयाबाबत त्यांचं अभिनंदन केलं आहे. त्याशिवाय काही उदारमतवादी जिहादी आणि इस्लामिक संघटनांनीही तालिबानला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
ISIS पाठिराख्यांकडून तालिबानवर टीकास्त्र
ISIS कडून चालवण्यात येत असलेल्या या मोहिमेत त्यांच्या कुप्रसिद्ध संशयित पाठिराख्यांनी सहभाग नोंदवल्याचं दिसून येतं. हे युझर्स खूप जुने आहेत.
अल-बत्तर, तलाए-अल-अंसार, अल-मुरहफत, अल-तकवा, हदम-अल असवार, अल-अदियत आणि अल-असविर्ती यांच्यासारख्या सोशल मीडिया खात्यांवरून सर्वाधिक पोस्टर शेअर करण्यात आले आहेत.
19 ऑगस्ट रोजी इस्लामिक स्टेटने तालिबानच्या विरोधात पहिलं संपादकीय छापलं होतं. याचा रोख तालिबानकडून कथितरित्या होत असलेल्या धार्मिक उल्लंघनाकडे होता.
माध्यम समूहांनी अफगाणिस्तानात हजारा शिया यांच्यासारख्या अल्पसंख्यांकांसंदर्भतात तालिबानच्या तोडग्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. हा समाज विधर्मी असल्याचं मत ISIS संघटना आधीपासूनच व्यक्त करते.
अशा प्रकारची विखारी वक्तव्ये आणि आक्रमक संपादकीय आणि पोस्टर छापणं ISIS कडून सुरू आहे.
काही पोस्टर्समध्ये त्यांनी तालिबानच्या दोहा येथील बैठकीची किंवा शिया सण-समारंभांमधील त्यांच्या उपस्थितीचे फोटो दिले. त्या तुलनेत ISIS कशा प्रकारे शरिया कायदा लागू करते, त्याचे फोटोही दिले आहेत.
म्हणजेच याचा अर्थ तालिबान संघटना अफगाणिस्तानात कधीच पूर्णपणे शरिया कायदा लागू करू शकणार नाही, असं मत ISIS ने याबाबत व्यक्त केलं.
एकूणच, 20 वर्षांपूर्वी मुल्ला उमर यांच्या नेतृत्वाखाली असणारा तालिबान आता राहिला नसल्याचं ISIS चं म्हणणं आहे.
तालिबान बदलला असून ते आता या भागातील जिहाद कमकुवत करण्यासाठी अमेरिकेच्या एका योजनेअंतर्गत मिळून गुप्तपणे काम करत आहेत, असा दावा ISIS ने केला.
व्हीडिओ
22 ऑगस्टला टेलिग्राम आणि रॉकेटचॅटवर इस्लामिक स्टेटच्या समर्थकांनी एक व्हीडिओ टाकला. त्या व्हीडिओचं शीर्षक होतं- अफगाणिस्तान दोन योजनांच्या दरम्यान. हा व्हीडिओ तुर्जुमान अल-असवीर्ती कडून आला.
हा व्हीडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर झाला. इस्लामिक स्टेटच्या समर्थकांनी 19 ऑगस्टला तालिबानला उघडं पाडण्यासाठी नव्या व्हीडिओचं टिझरही जारी केलं.
या व्हीडिओत रॉबर्ट एल ग्रेनिएर बोलताना दिसत आहेत. 2001 मध्ये अफगाणिस्तानवर अमेरिकेच्या आक्रमणापूर्वी तालिबानशी झालेल्या एका करारासंदर्भात ते बोलत आहेत.
ग्रेनियर बोलता बोलता त्यांच्या 88 days to Kandahar या पुस्तकातील किस्सेही सांगतात.
ग्रेनियर यांच्या बोलण्याचा मथितार्थ असा की तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर याने संघटनेची स्थापना केली तेव्हा आणि आताची परिस्थिती बदलली आहे. अमेरिकेशी गुप्त करार करून त्याने मुजाहिद्दीनला फसवलं आहे.
या व्हीडिओत ग्रेनियर हेही बोलताना दिसत आहेत की अमेरिका स्थानिक अफगाण सेनेच्या शोधात आहे. अशी सेना जी जिहादींशी लढू शकेल, तालिबान ही भूमिका पार पाडेल असा त्यांना विश्वास आहे.
अमेरिकेच्या जाळ्यात तालिबान
व्हीडिओत अमेरिकेच्या उच्चारांमध्ये एक जिहादी बोलतो, "अमेरिका तालिबानच्या नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्या योजना लागू करण्यात यशस्वी झाला होता.
तालिबानचं हे नेतृत्व संस्थापक मुल्ला उमरच्या सिद्धांतांविरोधात जाणारं होतं. या योजनेनुसार इस्लामिक स्टेटच्या स्थापनेला थांबवू पाहत होते. यामुळे अमेरिकेला आफ्रिका, इराक, सीरिया यांच्यासह पूर्व आशियातील इस्लामिक राष्ट्रांशी लढायला मदत होईल".
या व्हीडिओत जिहादी असं बोलून थांबतो की, "अमेरिका इस्लामिक स्टेटच्या जाळ्यात फसली आहे. अफगाणिस्तानात दमल्यानंतर अमेरिका युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. आता त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही. आम्ही अमेरिकेत जाऊन हल्ला करू".
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)