You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तालिबान-अफगाणिस्तान संघर्ष : गोळीबाराचा आवाज, ओरडणारे सैनिक आणि हतबल नागरिक
- Author, सिकंदर किरमानी
- Role, बीबीसी, काबूल
"परत फिरा, परत फिरा", गर्दीतून एक ब्रिटिश सैनिक ओरडत असतो. अफगाणिस्तानातील या संकुलात ब्रिटिश दूतावासाकडून बाहेर घेऊन जाणाऱ्या लोकांना उड्डाणापूर्वी इथे आणलं जातं.
याठिकाणी बरीच गर्दी झाली होती. लोक आपला ब्रिटिश पासपोर्ट हवेत भिरवकावत होते, जेणेकरुन तो पाहून त्यांना आतमध्ये जाण्याची परवानगी मिळेल. पण अफगाण सुरक्षा दलांचा एक गट त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होता.
गर्दीत उपस्थित असलेल्यांपैकी कोणालाही अफगाणिस्तानातून बाहेर काढलं जाईल, असं काहीही सांगण्यात आलं नव्हतं. पण तरीही बाहेर निघण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. अनेकांना दूतावासातून ईमेल आला होता. त्यांना इथे पोहचण्यास आणि प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रतिक्षा करण्यासाठी सांगितलं होतं.
या गर्दीत पश्चिम लंडन येथील उबर ड्रायव्हर हेलमंद खान सुद्धा होते. ते काही महिन्यांपूर्वीच आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आपल्या मुलांसोबत अफगाणिस्तानात आले होते.
माझ्या हातात काही ब्रिटिश पार्सपोर्ट ठेवत निराश होऊन ते सांगतात, "मी गेल्या तीन दिवसांपासून आत जाण्याचा प्रयत्न करत आहे."
ब्रिटिश सैन्यासाठी दुभाषी म्हणून काम करणारे खालिददेखील या गर्दीत आहेत. त्यांच्या पत्नीने दोन आठवड्यांपूर्वीच बाळाला जन्म दिला आणि अशा परिस्थितीत बाळाच्या जीवाला धोका पोहचेल अशी भीती त्यांना आहे.
खालिद म्हणाले, "मी सकाळपासून इथे आहे. इथे येत असताना तालिबानने मलाही मारहाण केली."
याठिकाणाहून थोड्याच अंतरावर संकुलाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. हजारो लोक येथे जमले आहेत पण बहुतेकांना अफगाणिस्तान सोडणं शक्य होणार नाही असं दिसतं.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश सैनिक काही वेळेला हवेत गोळीबार करतात. आत जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही गर्दीतून बाहेर पडा आणि सैनिकांना दिसू शकेल अशापद्धतीने हातातली कागदपत्र दाखवा. कदाचित ती कागदपत्र पाहून ते आतमध्ये सोडतील.
मदतीसाठी विनवणी करणारे लोक
अमेरिकेचे सैन्य सुरक्षा देत असलेल्या विमानतळाबाहेर स्थिती आणखी वाईट आहे. मुख्य प्रवेशद्वारावर लोकांची गर्दी आहे. ते आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत पण तालिबानी हवेत गोळीबार करत असून लोकांना मारहाण करत त्यांना मागे खेचत आहेत.
ब्रिटनच्या नियंत्रणात असलेल्या या परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना लोकांनी माझ्यावर सुद्धा प्रश्नांचा वर्षाव केला. "तुम्ही माझी मदत करू शकता का?" "ते आम्हाला आतमध्ये जाऊ देतील का?"
अनेकांनी मला त्यांची कागदपत्र दाखवण्याचाही प्रयत्न केला. आम्ही परराष्ट्र दूतावासात किंवा आंतरराष्ट्रीय सैन्यासोबत काम केलं आहे हे दाखवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू होता.
एका महिलेने मला सांगितलं की त्या आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू आहेत. ब्रिटिश दूतावासात त्यांचा काहीही संपर्क नाही पण आपल्या जीवाला धोका आहे असं त्यांना वाटतं. आपल्या मनातली भीती सांगत असताना त्यांचा कंठ दाटून आला.
तालिबानसाठी लढणाऱ्या सैनिकांची गस्त
सरकारशी संबंधित लोकांना क्षमा करण्यात आल्याचं तालिबानने सांगितलं आहे. सर्वसमावेशक सरकार बनवायचं आहे असं संघटनेचं म्हणणं आहे. पण अनेकांना आपल्या भविष्याबाबत भीती वाटत आहे.
शहरांमध्ये ठिकठिकाणी शांतता आहे. एक वेगळं जग असल्यासारखं वाटत आहे. रेस्टॉरंट आणि दुकानं सुरू आहेत. फळं आणि भाजी विक्रेत्यांनी सांगितलं की खरेदीसाठी प्रतिसाद कमी आहे.
कॉस्मेटिकचे साहित्य विक्रेत्याने सांगितलं की खरेदी करणाऱ्या महिलांची संख्या कमी झाली आहे. सगळीकडे तालिबानी दिसत आहेत. अफगाण सुरक्षा दलांनी ताब्यात घेतलेल्या गाड्यांवर ते गस्त घालत आहेत. त्यांना लूटमार आणि शांतात भंग करणाऱ्या घटना रोखायच्या आहेत. अनेकांनी मला सांगितलं की त्यांना आता सुरक्षित वाटत आहे असंही ते म्हणाले.
तालिबानच्या राजवटीत आमचं आयुष्य कसं असेल हे सांगण्याचा सुद्धा अनेकजण प्रयत्न करतात. एका टॅक्सी चालकाने मला सांगितले की त्यांनी तालिबानसाठी लढणाऱ्यांना शहरात फिरवले. त्यावेळी गाडीत संगीत सुरू होतं.
ड्रायव्हर हसला आणि मला म्हणाला, "ते मला काहीच बोलले नाहीत. ते पूर्वीइतके कठोर नव्हते."
तालिबान पत्रकार, सरकारी कर्मचारी यांचा शोध घेत घरोघरी जाऊन चौकशी करत असल्याचेही वृत्त आहे.
आता पुन्हा विमानतळ परिसरातील परिस्थिती पाहूया. इथे दुभाषी खालिद त्यांच्या लहान मुलाला घेऊन कॅम्पसमध्ये जाण्यात यशस्वी झाले आहेत. पण अनेक लोक अजूनही आत जाण्यासाठी धडपड करत आहेत.
एक ब्रिटिश अफगाण मला सांगत होते, "मी माझ्या मुलांना या गर्दीतून कसे घेऊन जाऊ? खरं तर अनेक लोक बाहर जाण्यासाठी पात्र नाहीत. पण तरीही त्यांना अफगाणिस्तानातून बाहेर पडायचं आहे. त्यांच्यासमोर अनिश्चित भविष्य उभं आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)