युक्रेन-रशिया युद्ध : या छोट्या शहराने रशियन सैन्याला असं पळवून लावलं

- Author, अँड्र्यू हार्डिंग
- Role, बीबीसी न्यूज
युक्रेनमध्ये रशियाचे हल्ले सुरूच आहेत. पण एक शहर असं आहे जिथल्या नागरिकांनीच रशियन सैन्याला धक्का दिला आहे.
ही एक निर्णायक लढत होती. शेती आणि सुपीक जमीन लाभलेल्या वोज्नेसेस्क शहरात युक्रेनी आणि रशियन सैन्यात दोन दिवसं संघर्ष सुरू होता.
शहर आणि नदीच्या पुलावर ताबा मिळवण्यासाठी दोन दिवस दोन्ही सैन्यात युद्ध सुरू होतं. यात रशियन सैन्याला विजय मिळाला असता तर सागरी तट, ओडेसाचं मोठं बंदर आणि एका प्रमुख अणुऊर्जा प्रकल्पावर ताबा मिळवण्यासाठी ते अधिक सक्षम झाले असते.
याऐवजी स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने युक्रेनी सैन्याने रशियन सैन्याचा सामना केला आणि त्यांना पराभूतही केलं.
सगळ्यांत आधी युक्रेनी सैन्याने पूल उडवला आणि नंतर रशियन सैन्याला पूर्वेच्या दिशेने 100 किमी मागे खेचलं.
स्थानिकांची इच्छाशक्ती
वोज्नेसेस्कच्या 32 वर्षीय महापौर येवेनी वेलिचको टाऊन हॉलबाहेर बॉडी आर्मर घालून जनतेशी संवाद साधत असताना सांगतात, "आम्ही हे कसं करून दाखवलं हे सांगणं थोडं कठीण आहे. आमच्या स्थानिकांचे आणि युक्रेनी सैनिकांचे आभार."

रशियन सैन्य पुन्हा हल्ला करू शकतं अशी शक्यता या युद्धानंतर साधारण तीन आठवड्यांनी महापौरांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, "हे एक मोक्याचे ठिकाण आहे. आम्ही केवळ या शहराची सुरक्षा करत नाही तर इथल्या सर्व क्षेत्रांची सुरक्षा आमच्या हातात आहे. आमच्याकडे आमच्या शत्रूप्रमाणे शस्त्रास्त्र नाहीत."
ब्रिटिश अँटी टँक क्षेपणास्त्रांची मदत
ब्रिटिश अँटी टँक क्षेपणास्त्रांनी वोज्नेसेस्कमध्ये रशियाच्या सैन्याला पराभूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
वेलिचको यांनी सांगितलं, "या शस्त्रांमुळेच आम्ही आमच्या शत्रूला पराभूत करू शकलो. आम्ही आमच्या सहकाऱ्यांचे समर्थनासाठी आभार मानतो. आम्हाला आणखी समर्थनाची गरज आहे कारण असे हल्ले आता होतच राहणार."
युक्रेनची दुसरी सर्वांत मोठी नदी दक्षिणी बुहवर बनललेल्या मोठ्या पुलावरही रशियन सैन्य आपला ताबा मिळवू शकलेलं नाही. यामुळे वोज्नेसेस्कचं महत्त्व आता आणखी स्पष्ट झालं आहे.
वोज्नेसेस्क हे शहर युक्रेनमधील इतर शहरांप्रमाणे उद्ध्वस्त तर झालेलं नाही, पण इथेही सायरनचा आवाज आता सामान्य झाला आहे.
दरम्यान, अलीकडच्या काळात हजारो लोक रेल्वे किंवा रस्ते मार्गाने शहर सोडत आहेत. जे लोक अजूनही या शहरात थांबले आहेत त्यांना ते वारंवार विजयाचे किस्से ऐकण्यासाठी उत्सुक दिसतात.
रशियाच्या सैन्याला रात्रीत शहर सोडावं लागलं
स्थानिक दुकानदार अलेक्झेंडर स्वत: एके-47 घेऊन युद्धात आघाडीवर होते. ते म्हणाले, "हा आमच्या संपूर्ण शहराकडून एक मोठा प्रयत्न होता. शिकार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रायफल्सचा आम्ही वापर केला. लोकांनी वीटा आणि बाटल्यांचा वापर करून रशियन सैन्याच्या हल्ल्यांचा सामना केला. वृद्ध महिलांनी वाळूची अवजड पोती वाहिली आणि या युद्धात आपलं योगदान दिलं."

ते म्हणाले, "रशियन सैनिकांना कळत नव्हतं की हल्ला कुठून होतोय किंवा हल्ला कुठून होणार आहे. मी कधीही लोकांना अशा प्रकारे एकत्र येताना पाहिलेलं नाही."
ही चर्चा त्याच पुलाखाली सुरू होती जो पूल रशियन सैन्याच्या हल्ल्यानंतर युक्रेनी सैन्याना उडवला होता.
वोज्नेसेस्क शहराच्या दक्षिणी किनाऱ्यावर राकोव गावात निकोलायेवना उद्यान आहे. इथे रशियन रणगाडे आणि काही सामानाचा ढिगारा दूरवरूनच लक्ष वेधून घेतो. इथे आक्रमक लढायांपैकी एक लढाई लढली गेली होती.
रक्ताने माखलेल्या पट्ट्या आणि रशियन फूड पाकिटं या उद्यानात दिसून येतात.
59 वर्षांच्या स्वेतलाना आपल्या पतीचे टूल शेड दाखवत सांगतात, रशियन सैन्याने दोन युक्रेनी सैनिकांना बंधक बनवून इथे ठेवलं होतं.
"माझ्या दारावरील रक्ताचे डाग पाहा," असं त्या आपल्या झोपडीकडे बोट दाखवत पाहुण्यांना सांगतात.
या शहरावर जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा स्वेतलाना यांचं घर रशियन सैन्याच्या ताब्यात होतं आणि त्यांच्या कुटुंबाने त्यावेळी एका तळघरात आसरा घेतला होता. रशियन सैन्याने त्या घराचं रुपांतर एका तात्पुरत्या रुग्णालयात केलं होतं.
त्या सांगतात, "मी दुसऱ्या दिवशी जेव्हा कपडे घेण्यासाठी गेले तेव्हा पाहिलं की जिकडे तिकडे जखमी लोक पडले होते. आतापर्यंत मी बऱ्यापैकी रक्त स्वच्छ केलं आहे."
"एका रात्री ते घाईघाईत ही जागा सोडून गेले. त्यांनी सर्वकाही मागे सोडलं - चप्पल, मोजे, बॉडी आर्मर, हेल्मेट... केवळ जखमी आणि काहींचे मृतदेह घेऊन ते पळाले."
याठिकाणी लोकांवर अंत्यसंस्कार करणारे स्थानिक मिखाईलो सोकुरेंको यांना शेतात जाऊन रशियन सैनिकांचे मृतदेह वाहनातून नेण्यास सांगण्यात आलं.
ते म्हणाले, "त्यांनी इथे जे केलं त्यानंतर त्यांना मी आता मनुष्य मानत नाही. पण हे चुकीचं ठरेल जर आम्ही ते मृतदेह मैदानात तसंच सोडून दिले असते. ते त्यांच्या मृत्यूनंतरही लोकांना घाबरवत आहेत."
"रशियन मानसिकदृष्ट्या आजारी आहेत. त्यासाठी आपल्याला तयार रहावं लागेल. विजय आमचाच होईल. रशियन सैन्याला आम्ही आमच्या भूमीवरून परत पाठवू."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








