युक्रेन-रशिया युद्ध : व्लादिमीर पुतिन यांच्या डोक्यात चाललंय तरी काय?

व्लादिमिर पुतिन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, गॉर्डन कोरेरा
    • Role, सुरक्षाविषयक प्रतिनिधी

रशियन नेते व्लादिमीर पुतीन यांनी स्वतःला एका कोंडाळ्यात बंदिस्त करून घेतलं असून ही बाब चिंताजनक आहे, असं पाश्चात्त्य राष्ट्रांच्या गुप्तहेरांना वाटतं.

पुतीन यांच्या मनात काय चाललंय, त्यांचा हेतू नक्की काय आहे, याचा अदमास बांधण्यासाठी हे गुप्तहेर गेली कित्येक वर्षं खटपट करत आहेत.

आता रशियन सैन्यदलं युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या स्थितीत असताना पुतीन या दबावाला कसा प्रतिसाद देतील, याचा अंदाज बांधणं अधिकच आवश्यक झालं आहे.

हे संकट अधिक धोकादायक प्रदेशात पसरू नये, याकरता पुतीन यांच्या मनाचा थांग लावणं गरजेचं ठरतं.

पुतीन आजारी आहेत, असं अनुमान वर्तवलं जात होतं. पण वास्तविक त्यांनी स्वतःला विलग करून घेतलं आहे आणि कोणतेही पर्यायी दृष्टिकोन ऐकून घेण्याची त्यांची मनस्थिती नाही, असं विश्लेषकांना वाटतं.

त्यांच्या अलीकडील बैठकींच्या छायाचित्रांमधूनसुद्धा त्यांचं हे एकटं पडलेलं रूप दिसून येतं. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची पुतीन यांनी भेट घेतली तेव्हा, ते दोघे एका लांबलचक टेबलाच्या दोन टोकांना बसले होते. युद्धाच्या थोडंस आधी स्वतःच्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक सहकाऱ्यांना भेटतानाही पुतीन यांचा हा दुरावा दिसत होता.

पुतीन यांची सुरुवातीची सैनिकी योजना एखाद्या केजीबी अधिकाऱ्याने तयार केल्यासारखी वाटत होती, असं एक पाश्चात्त्य गुप्तचर अधिकारी सांगतात.

या योजनेमध्ये एक काटेकोर 'कटकारस्थान' रचलेलं होतं आणि गोपनीयतेवर भर देण्यात आला होता. पण त्यातून अनागोंदीची स्थिती निर्माण झाली. रशियन सेनाधिकारी अशा योजनेसाठी तयार नव्हते आणि काही रशियन सैनिक आपण काय करतो आहोत हे माहीत नसतानाच सीमेवर गेले होते.

एकमेव निर्णयकर्ता

या योजनांविषयी पाश्चात्त्य गुप्तहेरांना खुद्द रशियाच्या नेतृत्वफळीतील घटकांपेक्षाही जास्त माहिती होती. ही माहिती अर्थातच त्यांना त्यांच्या स्त्रोतांकडून मिळाली होती. पण रशियाचे सर्वोच्च नेते पुतीन पुढे काय करतील, याचा अदमास बांधणं मात्र पाश्चात्त्य गुप्तहेरांसाठी आव्हानात्मक ठरणार होतं.

पुतिन

फोटो स्रोत, SPUTNIK / AFP

"मॉस्कोमध्ये पुतीन हे एकमेवर निर्णयकर्ते आहेत, त्यामुळे रशियाची पुढची चाल ओळखणं आव्हानात्मक असतं," असं जॉन सायफर सांगतात. त्यांनी या आधी सीआयएच्या रशियातील कामकाजाची धुरा सांभाळलेली आहे. पुतीन यांची मतं सार्वजनिक विधानांमधून स्पष्ट होत असली, तरी त्याबाबत ते कोणती कृती करतील, याची माहिती काढणं हे मात्र गुप्तहेरांसाठी मोठं आव्हान असतं.

"रशियासारख्या अत्यंत संरक्षित व्यवस्थेमध्ये मुख्य नेत्याच्या मनात काय चाललंय हे शोधणं अत्यंत अवघड असतं. विशेषतः खुद्द त्यांच्याच अनेक लोकांना हे माहीत नसताना याबाबतचे गुप्तचरविषयक संकेत गोळा करणं खडतर असतं," असं ब्रिटनच्या 'एमआय-६' या गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख सर जॉन सॉवर्स बीबीसीशी बोलताना म्हणाले.

गुप्तचर अधिकारी सांगतात त्यानुसार, पुतीन यांनी स्वतःला एका कोंडाळ्यात बंदिस्त करून घेतलं आहे, आणि या कोंडाळ्यात बाहेरची थोडीशीच माहिती आतपर्यंत पोहोचते. विशेषतः पुतीन यांच्या विचारांना आव्हान देणारं फारसं काही तिथपर्यंत जात नाही.

"ते स्वतःच्याच प्रचारतंत्राला बळी पडले आहेत. ते केवळ मोजक्याच लोकांचं ऐकतात आणि इतर सर्व गोष्टी टाळतात. त्यामुळे त्यांची विचित्र जीवनदृष्टी निर्माण झाली आहे," असं मानसशास्त्राचे प्राध्यापक एड्रिअन फर्नहॅम म्हणतात.

ऑडिओ कॅप्शन, 'युक्रेन कायमच रशियाचा भाग होता', हा पुतिन यांचा दावा किती खरा?

त्यांनी सहलेखन केलेलं 'द सायकॉलॉजी ऑफ स्पाइज् अँड स्पाइंग' हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. पुतीन यांना "गटविचारा"चा धोका आहे, या गटातील प्रत्येक जण केवळ पुतीन यांच्याच मताला दुजोरा देतं. "पुतीन गटविचाराला बळी पडले असतील, तर हा गट कसा आहे हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे," असं प्राध्यापक फर्नहॅम म्हणतात.

पुतीन यांचं हे वर्तुळ कधीच फारसं मोठं राहिलेलं नाही. पण युक्रेनवर स्वारी करण्याचा निर्णय त्याहूनही मोजक्या लोकांनी घेतला, असं पाश्चात्त्य गुप्तचर अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या आणखी संकुचित झालेल्या वर्तुळामध्ये केवळ पुतीन यांच्यावर 'अढळ श्रद्धा' असणारे लोक आहेत.

युक्रेनवर आक्रमण करण्याच्या थोडं आधी राष्ट्रीय सुरक्षाविषयक बैठक झाली, तेव्हा पुतीन यांनी त्यांच्यात परकीय गुप्तचर सेवेच्या प्रमुखाची जाहीर खरडपट्टी काढली होती, यावरून त्यांचं निकटवर्तीयांचं वर्तुळ किती छोटं झालंय याचा अंदाज येतो. काही तासांनी पुतीन यांनी केलेल्या भाषणातसुद्धा युक्रेन आणि पाश्चात्त्य देश यांच्याविषयीचा आत्यंतिक संताप व्यक्त झाला.

१९९०च्या दशकात रशियाला मानहानी सहन करावी लागली त्यावर मात करण्याची इच्छा पुतीन यांना आहे, शिवाय पाश्चात्त्य देश रशियाला दडपण्याचा आणि आपल्याला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार करून आहेत, असा पुतीन यांचा समज असल्याचं निरीक्षकांचं म्हणणं आहे.

लिबियाचे कर्नल गद्दाफी यांना 2011 साली सत्तेवरून खाली खेचण्यात आल्यावर मारून टाकण्यात आलं, त्यासंबंधीचे व्हीडिओ पुतीन सतत पाहत असतात, अशी आठवण त्यांना भेटलेल्या एका व्यक्तीने सांगितली.

सीआयएचे संचालक विल्यम बर्न्स यांना पुतीन यांच्या मनस्थितीचा अदमास घ्यायला सांगण्यात आलं, तेव्हा ते म्हणाले, "पुतीन गेली अनेक वर्षं तक्रारी आणि महत्वाकांक्षा यांच्या ज्वलनशील संयोगाने धगधगत आहेत." पुतीन यांची मतं सरत्या काळागणिक 'कठोर' झाली आहेत आणि इतर दृष्टिकोनांपासून ते 'अधिकाधिक दुरावलेले' आहेत, असंही बर्न्स म्हणाले.

पुतिन

फोटो स्रोत, DENIS SINYAKOV

रशियन राष्ट्राध्यक्ष वेडसर झाले आहेत का? हा प्रश्न पाश्चात्त्य राष्ट्रांमधील अनेकांनी विचारला आहे. पण अशा प्रश्नातून फार काही साध्य होईल, असं बहुतेकांना वाटत नाही. याबाबतीत काही गृहित धरणं चुकीचं होईल, कारण युक्रेनवर आक्रमण करण्यासारखा निर्णय घेणारा माणूस 'वेडा' आहे असं मानून आपल्याला या निर्णयाचा अर्थ लावता येणार नाही, असं एक मानसशास्त्रज्ञ म्हणतात.

सीआयएच्या एका विभागातील सदस्य परदेशी निर्णयकर्त्या मंडळींचं 'नेतृत्वविषयक विश्लेषण' करतात. हिटलरच्या मानसिकतेचा अंदाज बांधण्यापासून ही परंपरा सुरू झालेली आहे. हे लोक संबंधित नेत्याची पार्श्वभूमी, नातेसंबंध आणि आरोग्य इत्यादी पैलूंचा गोपनीय गुप्तचर माहितीच्या आधारे अभ्यास करतात.

अशा व्यक्तींशी थेट संपर्क आलेल्या इतर लोकांकडून- यात इतर नेतेही आले- मिळणारी माहिती, हा आणखी एक स्त्रोत असतो. पुतीन 'दुसऱ्याच जगा'त वावरत असतात, असं जर्मनीच्या माजी चँसेलर अँगेला मर्केल यांनी 2014 साली तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना सांगितल्याचं कळतं. अलीकडेच पुतीन यांच्याशी भेट झाली तेव्हा आधीच्या भेटींपेक्षा या वेळी 'अधिक कठोर झालेले, अधिक एकटे पडलेले' पुतीन भेटल्याचं जाणवलं, असं फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी म्हटलं होतं.

काहीतरी बदललं का? तब्येत बिघडलेली असण्याची शक्यता किंवा औषधोपचारांचा परिणाम, अशा गोष्टींबाबत फारसा पुरावा नसतानाही काही लोक अनुमान बांधत राहतात.

इतर काही जण मानसिक घटकांकडे लक्ष वेधतात- रशियाच्या संरक्षणासाठी किंवा रशियाची थोरवी पुन्हा प्राप्त करण्यासाठी नियतीने आपल्यावर सोपवलेली कामगिरी पूर्ण करायला आता पुरेसा वेळ नसल्याचं जाणवल्यामुळे पुतीन अस्वस्थ असावेत, असा अंदाजही बांधला जातो. कोव्हिडच्या जागतिक साथीदरम्यान पुतीन यांनी स्वतःला इतरांपासून पूर्णतः तोडून घेतलं होतं.

"पुतीन मनोरुग्ण असण्याची शक्यता फारशी नाही किंवा ते बदललेसुद्धा नसावेत. पण या वेळी त्यांना घाई जास्त आहे आणि बहुधा अलीकडच्या वर्षांमध्ये ते अधिक एकटे पडले असावेत," असं अमेरिकी सरकारचे माजी फिजिशियन आणि मुत्सद्दी केन डेक्लेव्हा यांनी म्हटलं आहे. सध्या ते जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश फाउंडेशन फॉर यू.एस.-चायना रिलेशन्स या संस्थेत सिनिअर फेलो म्हणून कार्यरत आहेत.

विश्वसनीय माहिती पुतीन यांच्या बंदिस्त कोंडाळ्यातून आत शिरकाव करू शकत नाही, ही चिंतेची बाब आहे. युक्रेनवरील आक्रमणापूर्वी पुतीन यांना न रुचणारी कोणतीही गोष्ट सांगण्यास त्यांची गुप्तचर यंत्रणा इच्छुक नव्हती, त्यामुळे हे आक्रमण कशा रितीने पुढे नेता येईल आणि रशियन सैनिकांना लोक कसं सामोरं जातील याचं धुंदफुंद चित्र त्यांच्या समोर रंगवण्यात आलं.

युक्रेनमध्ये गेलेल्या रशियन सैनिकांसमोरची परिस्थिती किती बिकट झालेली आहे, याची माहिती पाश्चात्त्य गुप्तचर संस्थांकडे गोळा झालेली असली, तरी पुतीन यांना मात्र त्याबद्दल अजूनही फारशी माहिती मिळालेली नसावी, असं याच आठवड्यात एका पाश्चात्त्य अधिकाऱ्याने म्हटलं आहे. त्यामुळे, रशियासमोरची परिस्थिती अधिकाधिक विपरित झाल्याचं कळल्यावर पुतीन कशी प्रतिक्रिया देतील, याबद्दलची चिंता आणखी वाढते.

वेडसरपणाविषयीचा सिद्धान्त

लहान असताना आपण एका उंदराचा पाठपुरावा कसा केला होता, याची गोष्ट स्वतः पुतीनच सांगतात. शेवटी उंदीर एका कोपऱ्यात अडकला आणि मग त्याने पुतीन यांच्यावर हल्ला केला, त्यामुळे पुतीन यांना पळून जावं लागलं. आत्ता पुतीन यांना जागतिक पटलावर कोपऱ्यात अडकल्यासारखं वाटत असेल तर काय, असा प्रश्न पाश्चात्त्य धोरणकर्ते विचारत आहेत.

पुतिन

फोटो स्रोत, Getty Images

"अशा वेळी ते अधिक निष्ठूरपणे कृती करतील का आणि त्यांनी सज्ज ठेवलेल्या अस्त्रांचा वापर आणखी वाढवतील का, हा खरा प्रश्न आहे", असं एक पाश्चात्त्य अधिकारी म्हणाले. पुतीन रासायनिक अस्त्रं किंवा व्यूहरचनात्मक अण्वास्त्रं वापरतील, अशीही भीती काहींनी वर्तवली आहे.

"अचानक विखारी पद्धतीने वार केल्याप्रमाणे ते काहीतरी अविश्वसनीय पाऊल उचलतील, अशी चिंता व्यक्त होते आहे," असं एड्रिअन फर्नहॅम म्हणतात.

मॅडमॅन थिअरी

आपण धोकादायक वा अविवेकी आहोत, अशी प्रतिमा स्वतः पुतीन जोपासताना दिसतात (याला इंग्रजीत मॅडमॅन थिअरी असं संबोधलं जातं). अण्वास्त्रांचा वापर झाल्याने सर्वच नष्ट होण्याची शक्यता असली, तरी आपण या अस्त्रांचा वापर करण्याइतके वेडसर आहोत, अशी प्रतिस्पर्ध्याची खात्री पटवून देण्याचा प्रयत्न अण्वास्त्रसज्ज देशाचा नेता करतो, तेव्हा 'मॅडमॅन थिअरी' लागू पडते.

पुतिन

फोटो स्रोत, AFP

पुतीन यांचे हेतू आणि मनस्थिती समजून घेणं हे पाश्चात्त्य गुप्तहेरांसाठी आणि धोरणकर्त्यांसाठी आज सर्वांत महत्त्वाचं झालं आहे. धोकादायक प्रतिक्रिया उद्भवणार नाही याची काळजी घेत पुतीन यांच्यावर कुठवर दबाव वाढवता येईल, हे ठरवण्यासाठी त्यांच्या मनस्थितीचा अंदाज असणं अत्यंत कळीचं ठरतं.

"पुतीन यांच्या स्वतःविषयीच्या प्रतिमेत अपयश किंवा दुबळेपणा यांना जागा नाही. या गोष्टींचा त्यांना तिटकारा वाटतो," असं केन डेक्लेव्हा म्हणतात. "कोंडी झालेले, दुबळे पुतीन अधिक धोकादायक असतील. एखाद्या वन्य प्राण्याला पिंजऱ्यातून पळायची संधी देऊन जंगलात जाऊ देणंच कधीकधी अधिक उपकारक असतं."

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)