युक्रेन-रशिया युद्ध : युक्रेनवर हल्ला करण्याच्या नादात रशियाने कोणत्या चुका केल्या आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जोनाथन बिल
- Role, संरक्षण प्रतिनिधी
रशियाकडे जगातील सर्वात शक्तिशाली आणि मोठं सैन्य आहे. मात्र युक्रेनवर झालेल्या आतापर्यंतच्या हल्ल्यात असं काहीच वाटलं नाही. पश्चिमेकडील काही विश्लेषक या युद्धातल्या रशियाच्या कामगिरीबद्दल आश्चर्यचकित झाले आहेत.
रशियन सैन्याची आगेकूच ठप्प झाल्याचं चित्र निर्माण झालंय, तर सैन्याच्या झालेल्या नुकसानाची भरपाई रशिया कशी भरून काढणार, असाही प्रश्न काहींना पडतो.
तर मग प्रश्न उरतो तो म्हणजे रशियाची चूक नेमकी झाली कुठे ?
हे जाणून घेण्यासाठी मी पश्चिमेकडील काही वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि गुप्तचर अधिकाऱ्यांशी बोललो आणि रशियाने कुठे चुका केल्या याबद्दल माहिती घेतली.
युक्रेनला कमी लेखून रशियाने पहिली चूक केली. त्यांना असं वाटलं की, युक्रेनचं सैन्य कमी आहे, आणि त्यांची क्षमता पण मर्यादित आहे.
चुकीचा अंदाज
रशियाचं संरक्षण बजेट वार्षिक 60 अब्ज यूएस डॉलर इतकं आहे. त्या तुलनेत युक्रेनचे बजेट फक्त 4 अब्ज यूएस डॉलर आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्यांच्या लष्करासाठी एक महत्त्वाकांक्षी असा आधुनिकीकरणाचा कार्यक्रम राबविला होता. आणि कदाचित यावरही त्यांनी जास्त विश्वास ठेवला होता.
यावर एक वरिष्ठ ब्रिटीश लष्करी अधिकारी सांगतात की, रशिया हा त्यांच्या अण्वस्त्र निर्मितीवर आणि चाचणीवर अधिक गुंतवणूक करतो. यात हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांसारखी नवीन शस्त्रे विकसित करण्यावर त्यांचा भर असतो.
असं म्हणतात की, रशियाने जगातील सर्वात अत्याधुनिक असा T-14 अरमाटा टँक तयार केला आहे. विजय दिनाच्या परेडमध्ये मॉस्कोच्या रेड स्क्वेअरवर हा टँक दिसला होता. पण युद्धभूमीवर हा टँक दिसला नाही. रशियाने T-72 हे आपले जुने रणगाडे, चिलखती वाहने, तोफखाना आणि रॉकेट लाँचर युद्धभूमीवर आणले.

फोटो स्रोत, Getty Images
रशियाने जेव्हा युक्रेनवर हल्ले करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना हवाई हल्ल्यांमुळे युद्धात जास्त फायदा झाला. रशियाच्या तीन विमानांच्या तुलनेत युक्रेनकडे एकचं विमान असल्याने रशियाने युक्रेनच्या सीमावर्ती भागात हवाई हल्ले सुरू केले.
बहुतेक लष्करी विश्लेषकांचा असा अंदाज होता की, हवाई हल्ल्यांच्या माध्यमातून रशिया लवकरच विजयाकडे कूच करेल. पण तसं झालंच नाही. युक्रेनचे हवाई संरक्षण अजूनही प्रभावी आहे. मात्र तेच रशियाची क्षमता मर्यादित झाली.
रशियाने सुद्धा असं गृहीत धरलं होतं की, त्यांच्या स्पेशल फोर्सेस या युद्धात महत्वाची भूमिका बजावतील. जलदगतीने सहाय्य प्रदान करेल, पण यात सुद्धा त्यांना धक्काचं बसला.
पश्चिमेकडील एक वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, रशियाला वाटलं होतं की ते स्पेचनियत्स आणि व्हीडीव्ही पॅराट्रूपर्सच्या एका छोट्या पण आघाडीवर असलेल्या तुकडीच्या मदतीने 'काही रक्षकांना ठार' करता येईल. पण काही दिवसांनंतर कीव्हजवळील हॉस्टोमिल विमानतळावर रशियाने केलेला हेलिकॉप्टर हल्ला अयशस्वी झाला. आणि त्यामुळे रशियाला सैनिक, उपकरणे आणि अन्नपदार्थ आणण्यासाठी कोणताही मार्गचं उरला नाही.
याउलट रशियाला आपलं युद्धसाहित्य रस्त्याने आणावं लागलं. यामुळे ट्रॅफिक जाम झालं आणि युक्रेनियन सैन्याला रशियन सैन्यावर हल्ला करणं सोपं बनलं. रशियाचची हत्यारबंद अवजड वाहने चिखलात अडकली.
दरम्यान, सॅटेलाईटच्या मदतीने रशियन सैन्य उत्तरेकडून पुढे सरकत असल्याचं दिसलं. पण तरीही त्यांना कीव्हला वेढा घालणं अशक्य झालं. मात्र हेच रशियाला दक्षिणेकडून युक्रेन सर करता आला कारण रशियाला तिथून रेल्वेमार्गाद्वारे आपल्या सुरक्षा दलांना सामान पोहोचवणं शक्य झालं होतं.
ब्रिटनचे संरक्षण सचिव बेन वॉलेस यांनी बीबीसीला सांगितले की, पुतिन यांच्या सैन्याने 'गती हरवली' आहे.
"ते अडकले आहेत आणि त्यांचे धीम्या गतीने का होईना पण निश्चितच जीवित आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान होत आहे."
नुकसान आणि ढासळते मनोबल
रशियाने युक्रेनवरील हल्ल्यासाठी 1.90 लाखांचं सैन्य गोळा केला होतं. त्यापैकी बहुतेक आधीच युद्धासाठी मैदानात उतरले आहेत. यातल्या 10% सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. रशियन आणि युक्रेनियन सैन्यात किती सैनिक मारले गेले याची कोणतीही विश्वसनीय आकडेवारी उपलब्ध नाही.
युक्रेनने दावा केलाय की त्यांनी आतापर्यंत 14 हजार रशियन सैनिक मारले आहेत, तर अमेरिकेचा अंदाज आहे की ही संख्या निम्मी असू शकते.

फोटो स्रोत, Getty Images
पाश्चात्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रशियन सैनिकांचे मनोधैर्य आता खचत आहे. त्याचे पुरावे ही आहेत. यातील एक अधिकारी सांगतात की, 'हे मनोबल खूप, खूप, खूप कमी झालं आहे.'
दुसऱ्या अधिकार्याचं म्हणणं आहे की, "रशियन सैनिक थंडावलेले, थकलेले आणि भुकेले आहेत"
रशियाने हल्ल्याचे आदेश देण्यापूर्वीपासूनच ते बेलारूस मधल्या बर्फवृष्टीत कित्येक आठवडे वाट पाहत होते.
मारल्या गेलेल्या सैनिकांची भरपाई करण्यासाठी रशिया आपल्या रिझर्व्ह युनिटच्या सैनिकांना बोलावण्याच्या विचारात आहे. यामध्ये पूर्वेकडे पोस्टिंग असलेले सैनिक ते आर्मेनियामध्ये तैनात असलेल्या सैनिकांचा समावेश आहे.
पाश्चात्य अधिकार्यांचा असा अंदाज आहे की रशिया 'भाडोत्री सैनिक' म्हणून ओळख असणाऱ्या सीरियन सैनिकांना ही युद्धात उतरवण्याची शक्यता आहे. नेटोच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकार्याने म्हटलं आहे की, रशिया 'आता अडचणीत यायला लागलं आहे."
सामानाचा पुरवठा
रशियाला आता मूलभूत गोष्टींसाठी ही संघर्ष करावा लागत असल्याचं दिसतं आहे. सैन्यात एक जुनी म्हण आहे विचारहीन डावपेचाच्या गोष्टी करतात तर मुत्सद्दी सामानाची जुळवाजुळव करण्याच्या गोष्टी करतात. रशियाने या गोष्टींचा विचार करायला फारसा वेळ दिला नाही याचे पुरावे आहेत.
रशियाच्या बख्तरबंद तुकड्यांना तेल, अन्न आणि शस्त्रास्त्रांसाठी लागणाऱ्या दारूगोळ्याची कमतरता भासते आहे. वाहने तुटलेली आहेत आणि ती रस्त्यांवर तशीच सोडून दिली आहेत. युक्रेनियन लोक या वाहनांना ट्रॅक्टरने खेचून दूर नेत आहेत.

फोटो स्रोत, Alamy
रशियाला दारूगोळ्याचा तुटवडा भासत असण्याची शक्यता असल्याचे पाश्चात्य अधिकाऱ्यांचे मत आहे. रशियाने या आधीच 850-900 लांब पल्ल्याची युद्ध क्षेपणास्त्रे डागली आहेत. यात क्रूझ क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. त्यांना अनगाईडेड शस्त्रांनी बदलणे फार कठीण आहे.
आपल्या उणिवा भरून काढण्यासाठी रशियाने चीनकडे मदत मागितली आहे. त्यावर अमेरिकन अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे.
याउलट युक्रेनमध्ये पाश्चात्य देशांचा शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरूच आहे. त्यामुळे युक्रेनचे मनोबल उंचावले आहे. अमेरिकेने युक्रेनला संरक्षण सहाय्यासाठी 800 करोड डॉलर्स मदत देण्याची घोषणाही केली आहे. यासोबतच रणगाडाविरोधी आणि विमानविरोधी क्षेपणास्त्रेही देण्यात येणार आहेत. अमेरिकेन बनावटीची आत्मघाती स्वीचब्लेडसारखी शस्त्रे दिली जाण्याची शक्यता आहे.
पाश्चात्य अधिकारी असा ही इशारा देतात की, पुतिन 'अधिक क्रूरपणा दाखवू शकतात.'
ते म्हणतात की, पुतिनकडे अजूनही युक्रेनियन शहरे नष्ट करण्याची ताकद आहे.
एक गुप्तचर अधिकारी सांगतात की, या सर्व अडथळ्यांना न जुमानता, पुतिन यांची 'थांबण्याची शक्यता तशी कमी आहे आणि ते कदाचित ते युद्ध चालूच ठेवतील' त्यांचा असा अंदाज आहे की रशिया युक्रेनचा लष्करी पराभव करू शकतो.
युक्रेनियन सुरक्षा दल धीरोदात्तपणे युद्धाला सामोरं गेलं आहे. पण त्याच अधिकार्यांनी इशारा दिलाय की, ते ही "शस्त्रे आणि संख्येच्या बाबतीत कमी पडू शकतात".
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









