युक्रेन-रशिया युद्ध : '...तर युक्रेनविरुद्धच्या युद्धाचं रुपांतर तिसऱ्या महायुद्धात होईल'

फोटो स्रोत, Getty Images
जर रशियासोबतची चर्चा असफल ठरली तर या युद्धाचं रुपांतर 'तिसऱ्या महायुद्धा'त होईल, असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.
रविवारी (20 मार्च) अमेरिकन वृत्तवाहिनी सीएनएनशी बोलताना झेलेन्स्की यांनी सांगितलं की, आपण रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी संवाद साधायला तयार आहोत.
चर्चा हाच हे युद्ध थांबविण्याचा एकमेव मार्ग आहे, असंही झेलेन्स्की यांनी म्हटलं.
झेलेन्स्की यांनी म्हटलं, "चर्चेसाठी आपण कोणतंही मॉडेल, कोणत्याही संधीचा वापर करायला हवा."
अर्थात, युक्रेनला रशिया पुरस्कृत फुटीरतावादी प्रदेशांना स्वतंत्र प्रदेश म्हणून मान्यता द्यावी लागेल अशा कोणत्याही संधीचा आम्ही स्वीकार करणार नसल्याचंही झेलेन्स्की यांनी स्पष्ट केलं.
जर आमचा देश नेटोचा सदस्य असता तर हे युद्ध सुरूच झालं नसतं, असंही युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं.
झेलेन्स्कींनी म्हटलं, "जर नेटोचे सदस्य आम्हाला त्यांच्यासोबत घेऊ इच्छित असतील, तर त्यांनी तातडीनं करावं. कारण या युद्धात रोज हजारो लोकांचा जीव जात आहे."
रशियावरील निर्बंध अधिक कठोर करू- अमेरिका
अमेरिकेचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलीप सिंह यांनी सांगितलं आहे की, अमेरिका अजूनही रशियावर लादलेले निर्बंध अधिक कठोर करू शकते, जेणेकरून रशियाच्या अर्थव्यवस्थेला अधिकाधिक फटका बसेल.

फोटो स्रोत, Getty Images
सीबीएसला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये दलीप सिंह यांनी म्हटलं, "रशिया आधीच एका आर्थिक संकटाच्या दिशेनं चालला आहे आणि आता तर तो अधिक वेगानं 1980 च्या दशकातील सोव्हिएत संघाच्या दिशेने चालला आहे.
निर्बंधांमुळे आधीच रशिया संकटाला सामोरा जात आहे. आता, हे निर्बंध अधिक कठोर करण्याचा विचार करत असल्याचं दलीप सिंह यांनी म्हटलं आणि हे निर्बंध विशिष्ट क्षेत्रांना लक्ष्य करूनही लादले जाऊ शकतात. ज्या क्षेत्रांमध्ये आधी निर्बंध लादले गेले नाहीत, त्या क्षेत्रांवर आता निर्बंध लादले जातील.
त्यांनी म्हटलं, "हे निर्बंध तेल आणि गॅसशी संबंधित असतील, पण त्यात इतरही क्षेत्रं असतील. मी आता त्याची सविस्तर माहिती देऊ शकत नाही. पुतिन यांना ही क्षेत्रं कोणती याचा अंदाज असू शकतो.
बायडन करणार पोलंडचा दौरा
व्हाइट हाऊसनं घोषणा केली आहे की, नेटो आणि युरोपियन युनियनमधील सहकारी देशांसोबत बैठक केल्यानंतर अमेरिकन राष्ट्रपती जो बायडन शुक्रवारी (18 मार्च) पोलंडचा दौरा करणार आहेत.
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे सामान्य नागरिकांवर जे परिणाम होत आहेत, त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी ते वॉर्सामध्ये पोलंडचे राष्ट्रपती आंद्रेजज डूडांची भेट घेतील.

फोटो स्रोत, Getty Images
व्हाइट हाऊसनं त्यासंबंधीच निवेदनही प्रसिद्ध केलं आहे.
सोमवारी (21 मार्च) बायडन हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रॉन, जर्मन चॅन्सलर ओलाफ स्कोल्ज, इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रेगी आणि ब्रिटनचं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली.
बुधवारी बायडन नेटो आणि युरोपियन परिषदेच्या शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी ब्रसेल्सला जातील. तिथेच ते जी-7 च्या बैठकीतही सहभागी होतील.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









