You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : जर्मनीत पुन्हा लॉकडाऊन, मर्केल यांची घोषणा
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर युरोपीय देश जर्मनीमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. येत्या बुधवारपासून (16 डिसेंबर) जर्मनीमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात येईल, अशी घोषणा जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांनी केली आहे.
कोरोना व्हायरस रुग्णांच्या वाढत्या संख्येचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचं मर्केल यांनी सांगितलं आहे.
16 डिसेंबर 2020 ते 10 जानेवारी 2021 पर्यंत सुमारे 25 दिवस हे लॉकडाऊन असेल. या काळात जर्मनीत अत्यावश्यक वस्तू वगळता इतर दुकानं, शळा बंद असतील.
अँगेला मर्केल यांनी देशातील 16 राज्यांच्या प्रमुखांसोबत एक बैठक घेतली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
कोरोना व्हायरस रोखण्यासंदर्भात तातडीचं पाऊल म्हणून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
नुकतेच जर्मनीत कोरोना रुग्णांचं तसंच मृत्यूचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं होतं.
ताज्या आकडेवारीनुसार, जर्मनीच्या कोरोना रुग्णांची संख्या 20 हजार 200 ने वाढून रुग्णांचा आकडा 13 लाखांवर गेला आहे.
येथील मृत्यूंची संख्या 321 ने वाढून 21 हजार 787 वर गेली आहे, अशी माहिती रॉबर्ट कोच इन्स्टीट्यूटने दिली.
जर्मनीतील रेस्टॉरंट आणि बार दीड महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आले होते. देशातील काही भागांत तिथल्या स्थानिक प्रशासनाने याआधीच लॉकडाऊन लावला होता.
16 डिसेंबरनंतर देशात फक्त अत्यावश्यक वस्तूंची दुकानं, बँका आदी सुरू राहतील. केअर होममध्ये कोरोना चाचणी करून घेणं बंधनकारक आहे. नव्या वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर देशात फटाके उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)