एका जर्मन छायाचित्रकाराची आणि भारतीय सिनेमाची प्रेमकहाणी

    • Author, सुधा टिळक
    • Role, दिल्ली

दुसरं महायुद्ध भडकलं तेव्हा जोसेफ वेर्शिंग मुंबईतल्या चित्रपटांच्या सेटवर काम करण्यात मग्न होते. स्वप्नांचं शहर आणि बॉलिवूडचं घर अशी मुंबईची ओळख तेव्हापासूनच होती.

हिमांशू रॉय आणि देविका राणी यांनी स्थापन केलेल्या 'बाँबे टॉकीज'च्या १७पेक्षा अधिक हिंदी आणि उर्दू चित्रपटांवर जोसेफ वेर्शिंग यांनी काम केलं. त्यांचा जन्म म्युनिकमध्ये झाला होता.

वेर्शिंग यांनी जर्मन निर्माते फ्रान्झ ऑस्टेन यांच्याबरोबरही काम केलं होतं. एमेल्का फिल्म स्टुडिओत बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या 'लाईट ऑफ एशिया' या मूकपटाच्यावेळी त्यांनी एकत्र काम केलं. याच चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते पहिल्यांदा भारतात आले होते.

शूटिंगनंतर वेर्शिंग आणि ऑस्टेन जर्मनीला परत गेले. पण नाझी जर्मनीत चित्रपट निर्मात्यांवर प्रचारात्मक चित्रपट बनवण्याची सक्ती व्हायला लागल्यानंतर वेर्शिंग यांनी हिमांशू रॉय यांचं निमंत्रण स्वीकारून भारतात काम करायला यायचं ठरवलं.

बाँबे टॉकीजबरोबर तांत्रिक तज्ज्ञ म्हणून ते काम करू लागले. या स्टुडिओनं मुख्य प्रवाहातल्या चित्रपटांना दिशा दिली.

"आपली फोटोग्राफीची उपकरणं घेऊन जाण्यासाठी एका खास बनवून घेतलेल्या मर्सिडीज बेंज गाडीतून ते भारत आणि युरोपात प्रवास करत असत," अशी माहिती वेर्शिंग यांच्या दुर्मीळ छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात पुढाकार घेतलेल्या रहाब अल्लाना यांनी दिली.

ऑस्टेन जर्मनीत परत गेले तरी वेर्शिंग भारतीय स्टुडिओंमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून आणि नंतर मुंबईतल्या अनेक स्टुडिओंसाठी डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी म्हणून काम करत होते.

जवानी की हवा (1935), अछूत कन्या (1936), महल (1949), दिल अपना प्रीत परायी (1960) आणि पाकिजा (पाकिजा 1972ला रिलीज झाला) यासारख्या लोकप्रिय हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी छायाचित्रकार म्हणून काम केलं. वेर्शिंग यांचं निधन 1967 साली भारतात झालं.

"भारतीय चित्रपटसृष्टीत वेर्शिंग यांचं योगदान महत्त्वाचं मानलं जातं," असं अल्लाना सांगतात.

वेर्शिंग यांनी घेतलेल्या 130हून अधिक फोटोंचं प्रदर्शन पहिल्यांदाच गोव्यात भरवलं गेलं होतं.

सिनेमॅटोग्राफर म्हणून वेर्शिंग यांनी दिलेल्या योगदानाचा अंदाज हे फोटो पाहताना येतो. तसंच चित्रीकरणाची स्थळं, शूटिंगदरम्यान होणाऱ्या गमती-जमती आणि सेटवर अभिनेत्यांच्या नकळत टिपलेले त्यांचे हावभाव, हे सगळं आपलं लक्ष वेधून घेतं.

1925 ते 1967 या काळातल्या दुर्मीळ मूळप्रती आणि डिजिटल आवृत्त्या यांचा अमूल्य खजिनाच वेर्शिंग आर्काईव्हच्या निमित्ताने खुला झाला आहे.

अल्लाना सांगतात, "या संग्रहातील गोष्टी कुणीही पाहिलेल्या नाहीत."

गोव्यात राहणारे वेर्शिंग यांचे नातू जॉर्ज यांच्या खासगी संग्रहातल्या 4000 वस्तूंमधून हे फोटो निवडण्यात आले होते. फोटो निगेटिव्हस् आणि फोटोप्रिंट यांचाही त्यात समावेश होता.

आशिया आणि युरोपात प्रवास करताना वेर्शिंग यांनी स्वतः काढलेल्या वेगवेगळ्या फोटोजचा आणि वेर्शिंग यांच्या सेटवर असतानाच्या फोटोंचाही त्यात समावेश होता.

वेर्शिंग लायका कॅमेरा वापरत असत. 1925 साली या कॅमेऱ्यांची निर्मिती सुरू झाली. त्यात 35mm फिल्म वापरली जात असे. वेर्शिंग यांनी हा कॅमेरा वापरून मुंबईतल्या जोमाने वाढणाऱ्या चित्रपटसृष्टीचे फोटो काढायला सुरुवात केली.

वेर्शिंग यांच्यामुळे भारतीय चित्रपटनिर्मितीवर आणि निर्मिती शैलीवर प्रचंड प्रभाव पडला.

अल्लाना सांगतात, "वेर्शिंग यांच्यामुळे भारतीय सिनेमात युरोपमध्ये असलेला आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन आला. आधुनिकतेचे पैलूही भारतीय सिनेमात रुजू लागले आणि त्यातूनच 'अछूत कन्या' सारख्या चित्रपटातून अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला गेला."

स्वप्नांसारखा आभास निर्माण करणारी प्रकाशयोजना, वातावरण निर्मिती करण्याची क्षमता, चाकोरीबाहेरचे कॅमेऱ्यांचे अँगल आणि विलक्षण फोटोग्राफी ही जर्मन अभिव्यक्तीवादाची वैशिष्ट्यं भारतीय 'टॉकीज'मध्ये आणण्याचं श्रेयही त्यांना दिलं जातं.

त्यांच्या कॅमेऱ्याच्या कौशल्यातून स्क्रीन दीपून जायचं. त्यांच्या याच कसबानं देविका राणी, लीला चिटणीस, अशोक कुमार आणि दिलीप कुमारसारख्या अनेक दिग्गजांना पडद्यावर अजरामर केलं.

आपला देश सोडून एका परक्या भूमीत फोटोग्राफी आणि चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात नव्या कौशल्यांची मुहूर्तमेढ रोवणारे धुरीण अशीच वेर्शिंग यांची त्यांच्या 50व्या स्मृतिदिनी आठवण होणं स्वाभाविक आहे.

छायाचित्र सौजन्य: A Cinematic Imagination: Josef Wirsching and the Bombay Talkies प्रदर्शन. हे प्रदर्शन सेरेंडिपिटी आर्टस् आणि अल्काझी फाउंडेशन यांच्या समन्वयातून भरवलं गेलं. देबश्री मुखर्जी, रहाब अल्लाना आणि जॉर्ज वेर्शिंग यांनी ह्या प्रदर्शनाचं क्युरेशन केलं.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)