जुगाड फोटो : जगभरातील या 15 भन्नाट जुगाड आयडिया तुम्ही नक्की पाहायला हव्यात..

ऑक्सफर्ड शब्दकोषानुसार, जुगाड म्हणजे कमी खर्चात राबवलेली अभिनव कल्पना किंवा अगदी शोधही. भारतात खरंतर जुगाडचा अर्थ समजावण्याचीही गरज नाही, इतका तो रूळलेला आहे.

पण जुगाड हा फक्त भारतीय शब्द राहिलेला नाही हे ही फोटोगॅलरी बघून तुम्हाला लक्षात येईल. बीबीसीनं जगभरातल्या वाचकांना जुगाडाचे फोटो पाठवण्याचं आवाहन केलं होतं.

त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यातलेच काही फोटो आज बघूया...

डॉरिस एन्डर्स यांनी गोव्याला काढलेला हा फोटो आहे. 'मी एका बेकरीत चालले होते. वाटेत, एका घराच्या आवारात हा कुत्रा राखण करत होता. तो पायानं अधू आहे.

पण, कुणाचातरी त्याच्यावर भारी जीव आहे. म्हणून त्यांनी कुत्र्याला हिंडता यावं यासाठी ही सोय केली आहे.'

लिया लोपेझ यांच्यामते कामाच्या ठिकाणी घोड्यावरून जाणं हा एक जुगाड आहे. पण त्यामागचा निसर्गसंवर्धानाचा हेतू स्तुत्य आहे. वाहतुकीसाठी गाडी नव्हे तर घोड्याचा वापर करणं हा पर्यावरणपूरक निर्णय आहे.

'शिवाय यात ताण कमी आणि आनंददायी अनुभव आहे. तुमच्याकडे असलेल्या साधनसंपत्तीचा अभिनव वापर करून समस्येवर शोधलेला उपाय म्हणजे जुगाड असा जुगाडचा अर्थ असेल तर घोड्याची सफर हा एक प्रकारचा जुगाडच आहे.' असंही त्या सांगतात.

गायत्री सेलवम यांनी अमृतसरमधून हा फोटो पाठवला आहे. पंजाबमधल्या अमृतसरमध्ये सुवर्णमंदिराजवळ त्यांनी तो टिपला आहे.

'ही खु्र्ची वापरात आहे आणि हे पाहिल्यावर तिला वापरण्यायोग्य बनवलेल्या तिच्या मालकाला दाद नक्कीच द्यावी लागेल. अमृतसरच्या वर्दळीच्या रस्त्यावर ही खुर्ची ठेवली होती.

त्यामुळे लोकांना ती सहज दिसेल याची काळजी घेण्यात आली होती.'

देवळातल्या नगाऱ्याची जागा या यंत्रानं घेतली आहे. पूजेदरम्यान नगारा वाजतो तो यंत्राच्या मदतीनं. मानवी श्रम यातून वाचतात.

टी. विश्वनाथन यांनी हा फोटो पाठवला आहे. 'मी अलीकडे भारतात माझ्या मूळगावी गेलो असताना हा फोटो काढला आहे. चेन्नईजवळ तक्कोलम हे आमचं मूळ गाव.

तिथल्या स्थानिक देवळात हा यांत्रिक नगारा ठेवला होता. एरवी अवाढव्य शरीराचे तरुण हा नगारा वाजवतात किंबहुना बडवतात.

पण, ताकदीचं हे काम यंत्रानं सोपं केलं आहे. यंत्र वीजेवर चालतं. कमी खर्चात केलेला हा प्रयोग मला भलताच आवडला.'

सुनील परिक यांनी फोटो पाठवताना म्हटलं आहे, 'एका जुगाडू माणसानं आपल्या मोटरसायकलला ट्रॉली जोडून तिचं रुपांतर जणू फॅमिली वाहनात केलं आहे.'

रॉबर्ट सँडर्स यांनी कॅरेबियन बेटांवरच्या ग्युनालूप शहरातून हा फोटो पाठवला आहे. 'व्हॅनिला ऑर्किडचं परागीकरण ही एरवी वेळखाऊ प्रक्रिया आहे.

पण, एका टूथपिकनं हा प्रश्न सोडवला आहे. स्वपरागीभवन शक्य झालं आहे.

योन बोथा यांनी पाठवलेला हा फोटो आहे. विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर असं आपण म्हणतो. तसंच काहीसं हे चित्र आहे. योन बोथा यांच्याच शब्दात सांगायचं तर, ' एक चित्र काढताना हा माणूस अचानक मला दिसला.

तो बेघर आहे. त्यामुळे आपलं सामान या ट्रॉलीत घालून तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरतो. ट्रॉली कुठली तर शॉपिंग मॉलमध्ये दिसते ती.

शिवाय दूधाचे मोठे कॅनही त्यानं वापरले आहेत. या जुगाडामुळे बेघर माणसाला आपलं सामान वाहून नेणं शक्य झालं आहे.'

एलिन मिलर यांचा हा फोटो आहे. 'ग्रीसच्या पेरोस बेटांवर मी एक अगदी कामचलाऊ अंडरवॉटर कॅमेरा घेतला. वापरा आणि फेकून द्या प्रकारात मोडणारा तो कॅमेरा होता.

पण, माझा प्रयोग किती यशस्वी झाला बघा? जुगाडू कॅमेऱ्यानं काढलेला हा फोटो चांगल्या कॅमेराला लाजवणारा होता.'

सिद्धिका जतिया यांनी वाराणसीहून हा फोटो पाठवला आहे. 'फोटो बघून मला मजा वाटली. कसा हा माणूस एका छोट्या फळकुटावर आपलं अख्खं दुकान घेऊन फिरत होता!

मला फोटो काढावाच लागला. याहून मोठा जुगाड काय असू शकतो?'

फोटोतली गाय नाही तर पेट्रोलच्या बाटल्या बघा. डॉरिस एन्डर्स यांनी पाठवलेला हा फोटो. ते लिहितात,'गोव्यात जागोजागी अशी अनधिकृत पेट्रोल विक्री केंद्र आहेत.

पेट्रोल पंप कदाचित दूर असतील किंवा गावातल्या बाईक आणि स्कूटरमध्ये पेट्रोल भरण्यासाठी हे सोपं पडत असेल.

पैसे देताना तुम्ही कोण आहे का इकडे असं विचारायचं. कुणीतरी पैसे घ्यायला पुढे येतो.'

डॉरसेटच्या चेसिल किनाऱ्यावर कोळ्यांनी बांधलेली ही घरं तु्म्हाला दिसतील. टाकाऊ वस्तू आणि भंगारातून कोळी अशी घरं उभी करतात.

हार्वे जोन्स यांनी पाठवलेल्या फोटोबरोबरच घराविषयी माहीतीही दिली आहे. 'अशी घरं दिसायलाही छान दिसतात आणि त्यांचा उपयोगही मोठा आहे.

घरांवर CCTV कॅमेरे आहेत. त्यातून टर्न पक्ष्यांवर लक्ष ठेवणं शक्य होतं. कमी खर्चातलं घर पण, काम मात्र चोख.'

कुंपणाला जे कुलुप लावलं आहे तो म्हणजे चक्क नांगराचा फाळ आहे. शिवाय ट्रॅक्टरचेही पार्ट वापरले आहेत.

निकी रोझ टेरी यांनी म्हटलं आहे,'दक्षिणेकडच्या माळरानावर जायला मला आवडतं. असे जुगाड तिथं पहायला मिळतात.

जुनी साखळी, बंद पडलेला ट्रॅक्टर आणि नांगर यांचा वापर करून कुंपण बंद केलं आहे.'

हनान खमिस यांनी पेरूमधून हा फोटो पाठवला आहे. 'पेरू देशात गिर्यारोहण करत असताना एका घरापाशी आम्ही थांबलो.

एक पाळीव माकड आणि चार पोपट यांच्याबरोबर खेळत असताना हा मोबाईल होल्डर दिसला.

जुन्या प्लास्टिकच्या बाटलीपासून हा मोबाईल होल्डर तयार झाला आहे.'

प्रेरणा जैन यांनी पाठवलेला हा फोटो भारतातला आहे हे लगेच लक्षात येईल. पाण्याचा टँकरला गळती लागली आहे.

आणि काही लीटर पाणी फुकट जातं आहे हे चित्र इथं नेहमीचंच. त्यावर टँकर चालकाने हा उपाय शोधला.

टँकरची तोटी चक्क जुनी प्लॅस्टिकची बाटली खोचून बंद केली.

विल आयर यांनी हा फोटो पाठवला आहे. वापरात नसलेली खुर्ची इथं घऱमालकानं चक्क फूलझाडं लावण्यासाठी वापरली आहे. दिसायलाही ती मस्त आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)