या कारणामुळे पाकिस्ताननं घडवली कुलभूषण यांची कुटुंबीयांशी भेट

    • Author, मरियाना बाबर
    • Role, वरिष्ठ पत्रकार, इस्लामाबाद

पकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कुलभूषण जाधव यांची सोमवारी इस्लामाबादमध्ये आई आणि पत्नीशी भेट घडवून आणण्यात आली.

पाकिस्ताननं त्याला मानवतवादाचा हवाला दिला. पण हे काही एका दिवसाच्या प्रक्रियेचं फलित नव्हतं.

याबाबत पाकिस्तान फार विचारपूर्वक पावलं उचलत आहे. जाधव यांना फाशीची शिक्षा देऊन पाकिस्तानच्या हातात काहीच पडणार नाही.

जाधव हे काही कसाबसारखे दहशतवादी नाहीत.

अर्थात, पाकिस्तानमधल्या दहशतवादी प्रकरणांमध्ये त्यांचा सहभाग होता आणि ते भारतीय गुप्तचर यंत्रणा 'रॉ'साठी काम करतात, हे त्यांनी मान्य केल्याचा पाकिस्तानचा दावा आहे.

जाधव हे जिवंत राहणं पाकिस्तानच्याच हिताचं आहे.

भारतानं बलूचिस्तानमध्ये अशी एक व्यक्ती पाठवली होती, याची जगाला आणि भारताला सतत आठवण करून देण्याची संधी जाधव यांच्यामुळे पाकिस्तानला मिळते.

जाधव यांनी आपल्या पत्नीला भेटण्याची केलेली विनंती, हे या भेटीमागचं दुसरं एक मोठं कारण होतं.

या प्रकरणात पाकिस्तान वेगळ्यापद्धतीनं वागलं आहे.

जगात असं कुठं घडलं आहे का की, एक गुप्तचर पकडला जातो. त्यानंतर तो आपला गुन्हा कबूल करतो शिवाय त्याला चांगली वागणूक ही दिली जाते.

कुलभूषण जाधव यांचं प्रकरण इंटरनॅशलन कोर्ट ऑफ जस्टीसपर्यंत (ICJ) पोहचलं आहे.

पाकिस्तानातल्या भारतीय उच्चायुक्तांना जाधव यांना भेटण्याची परवानगी पाकिस्ताननं दिली नाही. त्यावर जाधव त्या श्रेणीत मोडत नाहीत. तसंच ते काही राजकिय व्यक्ती नाहीत, असं स्पष्टीकरण पाकिस्ताननं दिलं होतं.

असं असलं तरी या भेटीच्या आधी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं होतं की, पाकिस्तान त्यांना ती सुविधाही उपलब्ध करून देऊ शकेल.

वास्तवात, पाकिस्तान जाधव यांचं उदाहरण संपूर्ण जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.

जेव्हा जाधव यांच्या पत्नीनं सांगितलं की, त्या एकट्या पाकिस्तानला जाऊ इच्छित नाही. तेव्हा अधिकाऱ्यांनी विचारपूर्वक त्यांच्यासोबत आणखी एका महिलेला म्हणजेच कुलभूषण यांच्या आईलाही पाकिस्तानात येण्याची परवानगी दिली. सन्मानपूर्वक या दोघींना पाकिस्तानात आणण्यात आलं आणि भेट घडवून आणली गेली.

विशेष म्हणजे, पाकिस्तान या प्रकरणात मोठ्या आत्मविश्वासात वावरतं आहे.

लहान मोठे एजंट दोन्ही देशांमध्ये पकडले जातात. पण पाकिस्तानच्या हातात पहिल्यांदाच एवढी मोठी व्यक्ती लागली आहे.

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा दोन वर्षं जाधव यांच्यावर लक्ष ठेऊन होती. संधी मिळताच त्यांना अटक करण्यात आली.

भारताचा दावा आहे की, जाधव हे एक सेवानिवृत्त लष्करी अधिकारी आहेत. पण पाकिस्ताननं जेव्हा त्यांची सेवानिवृत्ती पुस्तिका मागितली तेव्हा मोदी सरकारनं त्यावर मौन बाळगलं.

सेवानिवृत्ती पुस्तिका दाखवण्यात आली असती तर जाधव यांची केस मजबूत होते. जाधव यांच्याकडून बनावट पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत.

याचंही समाधानपूर्वक उत्तर देण्यात आलेलं नाही.

द्विपक्षीय संबंध

ही भेट केस जिंकण्यासाठी नसून मानवतेच्या दृष्टीतून घडवण्यात आली आहे, असं पाकिस्ताननं सांगितलं आहे.

जगात असे काही देश आहेत जे विश्वास संपादनासाठी अशी पावलं उचलत असतात. जेणेकरून जगात त्यांची प्रतिमा मानवतेच्यारुपानं समोर यावी, तसाच हा प्रकार आहे.

दरम्यान या मुत्सद्देगिरीमुळे जाधव यांच्या पत्नी आणि आईला त्यांना भेटण्याची संधी मिळाली.

असं असलं तरी या भेटीतून दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबधांमध्ये फारसा बदल होण्याची शक्यता कमीच आहे.

हे एक द्विपक्षीय देवाण-घेवाणीचं प्रकरण आहे. या भेटी आधी भारतानं काही पाकिस्तानी कैद्यांची सुटकाही केली होती.

(बीबीसी प्रतिनिधी वात्सल्य राय यांच्याशी झालेल्या मुलाखतीवर आधारित.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)