कोरोना व्हायरसः जर्मनीच्या हेस्से राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केली आत्महत्या?

जर्मनीतल्या हेस्से राज्याचे अर्थमंत्री थॉमस शेफर यांचा मृतदेह फ्रँकफर्ट शहरातील रेल्वे रुळावर सापडला. जर्मनीची सार्वजनिक प्रसारण यंत्रणा DW नं ही बातमी दिली.

थॉमस शेफर हे 54 वर्षांचे होते. शेफर यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुलं आहेत.

थॉमस शेफर यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. कोरोना व्हायरसमुळं निर्माण झालेल्या आर्थिक समस्या हे कारण थॉमस शेफर यांच्या मृत्यूमागे असल्याचं तपास अधिकाऱ्यांना वाटत आहे.

जर्मन माध्यमांच्या वृत्तांनुसार, थॉमस शेफर यांनी याच काही दिवसांपूर्वीच कोरोना व्हायरसची लागण झालेल्यासाठी आर्थिक मदतीची घोषणा केली होती.

'कोरोना व्हायरसमुळं शेफर तणावात होते'

या घटनेनंतर हेस्से राज्याचे प्रमुख फोल्कर बूफिये यांनी व्हीडिओद्वारे संवाद साधला. ते म्हणाले, "कोरोना व्हायरसमुळं निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा सामना शेफर करत होते. या विषाणूच्या प्रसारानंतर थॉमस शेफर सातत्यानं लोकांना भेट होते, त्यांच्याशी बोलत होते."

कोरोना व्हायरसमुळं शेफर हे गेल्या अनेक दिवसांपासून तणावात होते, असंही बुफिये यांनी सांगितलं.

"लोकांच्या आशा आपण पूर्ण करू शकू का, अशी शेफर यांना चिंता होती. विशेषत: आर्थिक संदर्भातल्या आशा. कोरोनाच्या संकटातून बाहेर निघण्याचा त्यांच्यासमोर कुठला मार्ग नव्हता आणि त्यामुळं ते हतबल होते. त्यामुळेच ते आपल्याला सोडून गेले. या घटनेनं आम्हालाही धक्का बसलाय," असंही बूफिये म्हणाले.

गेल्या दोन दशकांपासून थॉमस शेफर हे हेस्से प्रांतातल्या राजकारणात सक्रीय होते आणि जवळपास गेल्या दशकभरापासून ते हस्सेच्या अर्थमंत्रिपदावर होते.

फ्रँकफर्ट ही जर्मनीची आर्थिक राजधानी आहे आणि हे शहर हेस्से राज्यातच आहे.

सुसाईड नोट सापडली?

थॉमस शेफर यांनी आत्महत्या केली की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नसली, तरी तपास पथक त्याच दृष्टीनं तपास करत आहे.

शेफर यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवल्याचं फ्रँकफर्टमधील फ्रांकफुर्टर अलगेमाईन त्साइंटुग या स्थानिक वृत्तपत्रानं म्हटलंय.

जर्मनीतल्या इतर राजकीय नेत्यांनीही थॉमस शेफर यांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केलंय. सीडीयूचे प्रमुख म्हणाले, "केवळ मलाच नव्हे, सगळ्यांनाच या घटनेनं दु:ख झालंय."

डाव्या पक्षाचे नेते फाबियो डे मासी यांनीही थॉमस शेफर यांना आदरांजली वाहिलीय.

जर्मनीतल्या राजकीय नेत्या कोर्दुला यांनीही थॉमस शेफर यांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केलंय.

सध्या जगातील बहुतेक सर्व देश कोरोना व्हायरसच्या साथीला तोंड देत आहेत, त्यात जर्मनीचाही समावेश आहे.

जगभरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 6 लाखांच्यावर पोहोचली आहे. तसेच 30 हजार हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये इटलीच्या नागरिकांची संख्या जास्त असून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या अमेरिकेत जास्त आहे. अमेरिकेत 1 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जर्मनीत सध्या लादण्यात आलेले सार्वजनिक निर्बंध 20 एप्रिलपासून हटविण्यात येतील असे जर्मनीच्या चॅन्सलर कार्यालयाचे मंत्री हेल्गे ब्राऊन यांनी सांगितले आहे.

जर्मनीत सध्य़ा रेस्टोरंट, चित्रपटगृहे, कॅफे बंद आहेत. तसेच शाळा-कॉलेजही बंद आहेत. जॉन हॉपकिन्स विद्यापिठाने दिलेल्या आकडेवारीनुसार जर्मनीत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या 62 हजारच्या वर असून 541 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 9 हजार लोक बरे झाले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)