You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जर्मनीत पुन्हा 'जय हिटलर' : उजव्यांच्या हिंसक आंदोलनात 2 दिवसांत काय घडलं?
जर्मनीतल्या कॅमिट्ज या शहरात उजव्या विचारांच्या लोकांनी काढलेल्या मोर्चात बंदी घालण्यात आलेला हिटलर सॅल्यूट देण्यात आल्याची घटना घडली आहे. सोमवारी घडलेल्या या घटनेचा तपास पोलीस करत असून 10 गुन्हे नोंद झाले आहेत.
एका व्यक्तीच्या मृत्यू नंतर या शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून त्यानंतर उजव्या विचारांच्या आंदोलकांनी काढलेल्या मोर्चात 6 हजार लोक सहभागी झाले. तर फॅसिस्ट विरोधी विचारांच्या लोकांच्या मोर्चात 1 हजार लोक सहभागी झाले. हे शहर सॅक्सोनी प्रांतात असून इथं उजव्या शक्ती प्रबळ आहेत.
1. नेमका प्रकार काय?
रविवारी सकाळी एका रस्त्यावर जर्मन नागरिक आणि सुतार काम करणाऱ्या एका युवकाचा काही लोकांशी वाद झाला. यात या युवकाला भोसकण्यात आले. या तरुणाला नंतर हॉस्पिलटमध्ये नेण्यात आले तिथं त्याचं निधन झालं. त्यानंतर ही घटना जिथं घडली, तिथं श्रद्धांजली वाहण्यासाठी गर्दी जमू लागली.
एका महिलेवर लैंगिक अत्याचार होत असताना हा युवक तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होता, अशी बातमी ऑनलाईन पसरली. पण ही बातमी चुकीची असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. या युवकाला मारणारे लोक हे सीरियन आणि इराकी असल्याची बातमी पसरल्याने संतप्त आणि हिंसक प्रतिक्रिया उमटू लागल्या.
त्यानंतर गेले 2 दिवस उजव्या विचारांशी सहानभूती असणारे हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. इतक्या संख्येनं लोक जमतील असा कोणताही अंदाज पोलिसांना नव्हता, हे पोलिसांनी मान्य केलं आहे.
इतक्या संख्येनं आणि वेगानं लोक जमवण्यासाठी काही गट सोशल मीडियाचा वापर करत आहेत. विशेषतः सोमवारी रात्री संपूर्ण देशभरातून लोक जमले होते.
उत्स्फूर्त वाटणाऱ्या या हिंसक उद्रेकानं जर्मनतल्या अनेकांना धक्का बसला आहे. जर्मनीमध्ये हिटलरच्या काळात ज्या पद्धतीनं सलामी दिली जात होती त्यावर बंदी आहे. या सलामीला हिटलर सॅल्यूट म्हटलं जातं.
पण या आंदोलनात सहभागी अनेक लोक हिटलर सॅल्यूट देत असल्याचे फोटो सोशल मीडियावर फिरत होते. परदेशी नागरिकांचा पाठलाग करणे, त्यांना मारहाण करणे, बाटल्या फेकणे, फटाके फोडणे अशा काही घटनाही घडल्या. यात 20 लोक जखमी झाले आहेत.
अनेक जर्मन नागरिकांनी या आंदोलनाचा धसका घेतला कारण दुसऱ्या महायुद्धाचा वारसा असलेल्या जर्मनीमध्ये कोणत्याही प्रकारच्या फॅसिजम विरोधात लढणे ही विशेष जबाबदारी समजली जाते.
2. उजव्या शक्ती किती प्रबळ?
जर्मनीच्या पूर्व भागात सामाजिक आणि आर्थिक असमानतेमुळे उजवा विचार आणि कट्टरवाद यासाठी सुपीक जमीन मिळाल्याचं सांगितलं जातं.
जर्मनीतील गुप्तचर संस्थांनी 2016मध्ये देशात 23,000 उजवे कट्टरवादी आहेत, असा अहवाल दिला होता.
जर्मन सरकारनं उजव्या कट्टरवादाशी लढण्याच ठरवलं आहे. पण कॅमिट्जमध्ये झालेल्या आंदोलनात सर्वसामान्य नागरिकांनीही भाग घेतला होता, ही बाब विशेष मानली जाते.
जर्मनीत 2015मध्ये अनेक स्थलांतरितांनी आश्रय घेतल्यानंतर त्यांना सर्वाधिक विरोध पूर्व भागात झाला होता. Alternative for Germany (AfD) हा पक्ष आणि Pegida ही चळवळ इथं बळकट आहे. यांचा चॅन्सेलर अँगेला मर्केल यांच्या स्थलांतरितांच्या धोरणाला विरोध आहे.
3. तरुणाच्या मृत्यू प्रकरणी काय घडलं?
रविवारी नेमकी काय घडलं हे स्पष्ट झालेल नाही. मृत युवकाचं नाव डॅनिएल एच. (वय 35) असं आहे. त्याच्यावर चाकू हल्ला केल्याच्या संशयावरून एक सीरियन आणि एका इराकी युवकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
मृत युवकाची आई जर्मन असून वडील क्युबन आहेत. या मारामारीमध्ये आणखी दोघे जखमी झाले आहेत.
4. मर्केल काय म्हणतात?
मर्केल यांनी या आंदोलनांचा निषेध केला आहे. हा रस्त्यावरील तिरस्कार असून त्याचा राज्याशी काही संबंध नाही, असं त्या म्हणाल्या आहेत.
मर्केल यांच्या प्रवक्त्यानं सरकार अशा प्रकारची बेकायदेशीर कृत्य खपवून घेणार नाही, असं म्हटलं आहे.
5. स्थलांतरितांचा विषय काय आहे?
2015 मध्ये मर्केल यांनी जर्मनीत 8 लाख 90 हजार स्थलांतरितांना आश्रय दिला होता. यामध्ये संघर्षग्रस्त सीरियातून बाहेर पडलेल्या नागरिकांची संख्या सर्वांत जास्त होती. गेल्या वर्षी सीरियातून येणाऱ्यांच्या संख्येत 403% वाढ झाल्याचं स्थालांतरित कार्यालयानं म्हटलं आहे.
या धोरणाचा फटका मर्केल यांना बसला आहे. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत AfDने 12.6% मतं आणि 94 जागांसह संसदेत प्रवेश केला.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)