G7 परिषदेतल्या या व्हायरल झालेल्या फोटोत नक्की चाललंय काय?

G7 परिषदेत काही अवघड क्षण येतील अशी अपेक्षा होतीच आणि जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्कल यांच्या इन्स्ट्राग्रामवरच्या फोटोने अनेकांना तो क्षण हाच अशी खात्री पटली.

इन्स्टाग्रामवरचा हा फोटो जगभर प्रचंड व्हायरल झाला आहे. G7 परिषदेत व्यापार हा गाभा होता. या फोटोत कोण आहे, ते व्यापारासंदर्भात काही बोलत आहेत का आणि व्यापाराच्या क्षेत्रात ते कोणत्या स्थानावर आहे हे बघू या.

1.डोनाल्ड ट्रंप, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

ट्रंप यांनी युरोपीयन महासंघ, मेक्सिको, कॅनडा या देशातून स्टीलच्या आयातीवर 25 टक्के आणि अॅल्युमिनिअमच्या आयातीवर 10 टक्के आयात कर घोषित करून धक्का दिला. आता या घोणषेचा सूड उगवण्याच्या तयारीत बाकीचे आहेत. या तणावाची छाया परिषदेवर होती. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थोडे एकटे पडले होते. ट्रंप सगळ्या नेत्यांच्या आधी परतले. अमेरिका एका पिगी बँकेसारखी आहे आणि सगळ्यांना ती लुटायची असते अशी तक्रार त्यांनी केली.

त्यानंतर त्यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंचे ट्वीट्च्या माध्यमातून वाभाडे काढले. त्यांनी ट्रुडो यांना अत्यंत अप्रामाणिक आणि दुर्बळ असं संबोधलं. एका पत्रकार परिषदेत ट्रुडो यांनी वाढलेल्या आयात करावर टीका केली. तेव्हा त्यांनी केलेल्या खोट्या वक्तव्यांचा ट्रंप यांनी समाचार घेतला.

2.जॉन बॉल्टन, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

बॉल्टन यांची नियुक्ती होऊन जेमतेम तीन महिने झालेत पण त्यांनी आपला करिष्मा दाखवण्यास सुरुवात केली आहे. आयात कर वाढवणं हे सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे या बॉल्टन यांच्या दाव्याला ट्रंप यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

3.कझुकी यामाझाकी, जपानचे परराष्ट्र विभागाचे ज्येष्ठ उपमंत्री

जुलै 2017मध्ये त्यांची या पदावर नियुक्ती झाली. त्यांनी पाकिस्तानला गेलेल्या एका शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं तसंच जपान, चीन, दक्षिण कोरिया यांच्यात मुक्त व्यापारासंदर्भात झालेल्या चर्चेत त्यांनी सहभाग घेतला.

4. शिंझो आबे, जपानचे पंतप्रधान

अमेरिकेच्या वाढलेल्या आयातकराला विरोध करावा म्हणून आबे यांच्यावर सातत्याने दबाव येत आहे. त्यामुळे त्यांची अवघड अवस्था झाली आहे. त्यांनी ट्रंप यांच्याबरोबर सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. ट्रंप राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून आबे यांनी ट्रंप यांची दहा वेळा भेट घेतली आहे.

5.यासुतोशी निशिमोरा, जपानचे उपमुख्य सचिव

निशिमोरा हे जपानच्या सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापार आणि उद्योग मंत्रालयात काम केलं आहे.

6. अँगेला मर्कल

या परिषदेत व्यक्त झालेल्या मतभेदांना मिटवण्यासाठी मर्कल आघाडीवर होत्या. अमेरिका आणि इतर देशांमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांना मिटवण्यासाठी मर्कल यांनी विविध योजना मांडल्या. ट्रंप यांच्याबरोबर असलेल्या नात्याविषयी त्यांना मर्कल म्हणाल्या की, आमची सगळ्याच मुद्द्यांवर सहमती नसते, पण आम्ही एकमेकांशी चर्चा करतो. "माझे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर अत्यंत सौहार्दाचे संबंध आहेत असं मी म्हणू शकते," असं त्या म्हणाल्या.

7.एम्युल मॅक्रॉन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष

परिषदेच्या आधी मॅक्रॉन आणि ट्रंप यांचं ट्विटरवर वाक्युद्ध झालं होतं. त्यामुळे त्यांच्यातला ब्रोमान्स संपला की काय अशी शंका उत्पन्न करण्यात आली होती. असं असतांना त्यांच्यात सगळं आलबेल दिसत होतं. मॅक्रॉन यांची ट्रंप यांच्याबरोबर खुली चर्चा झाली असं मॅक्रॉन यांच्या सहकाऱ्यांचं म्हणणं होतं. ट्रुडो यांच्यावर ट्रंप यांनी केलेली चिखलफेक उघड होताच, मॅक्रॉन यांनी एक निवेदन जारी केलं. त्यात ते म्हणतात, "आंतरराष्ट्रीय संबंध अशा रागीट पद्धतीने आणि अविचारी पद्धतीने दृढ केले जाऊ शकत नाही."

8.थेरेसा मे, युकेच्या पंतप्रधान

मागच्या आठवड्यात त्यांनी ट्रंप यांना फोन करून त्यांनी जाहीर केलेले आयातीचे दर अन्याय्य आणि निराशाजनक असल्याचं सांगितलं. पण त्यांचं परिषदेतलं धोरण शांततापूर्ण होतं. तसंच त्या बाकीच्या नेत्यांना व्यापारी युद्ध थांबवण्याचं आवाहन करत होत्या.

9.लॅरी कुडलो, अमेरिकेच्या राष्ट्रीय आर्थिक कौन्सिलचे संचालक

कुडलो यांनी ट्रंप यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आणि या निर्णयासाठी ट्रंप यांना जबाबदार ठरवण्यात येऊ नये असं ते म्हणाले. परिषदेनंतर कुडलो यांनी CNN ला सांगितलं की, राष्ट्राध्यक्ष आणि त्यांची टीम अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून परिषदेला गेली होती. मात्र ट्रुडो यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)