G7 : रशिया प्रेमामुळे डोनाल्ड ट्रंप पडले एकटे

बहुचर्चित G7 बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप व्यापार आणि रशियाच्या मुद्यावरून एकटे पडल्याचं चित्र आहे.

G7 देशांमध्ये रशियाचा समावेश करण्यात यावा, अशी आश्चर्यकारक मागणी ट्रंप यांनी केली. क्रीमियावर कब्जा केल्याप्रकरणी रशियाची G7मधून हकालपट्टी करण्यात आली होती.

बैठकीला उपस्थित युरोपियन युनियन अंतर्गत देशांचा रशियाच्या समावेशाला विरोध असल्याचं जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी सांगितलं.

ट्रंप प्रशासनाने लादलेले व्यापारी निर्बंध शुक्रवारी बैठकीत चर्चेत राहिले. ट्रंप यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुअल मॅक्रॉन यांची भेट घेतली. व्यापारी निर्बंधासंदर्भात आम्ही चाचणी म्हणून प्रयोग केला. याबाबत लवकरच योग्य निर्णय घेऊ असं ट्रंप यांनी सांगितलं.

याप्रकरणी संयुक्त तोडगा काढण्यासाठी बैठकीतील सर्व देश प्रयत्नशील असल्याचं मॅक्रॉन यांनी सांगितलं.

येत्या दोन आठवड्यांत अमेरिका आणि युरोपियन युनियन यांच्यात व्यापारासंदर्भात चर्चा होणार असल्याचं वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

सिंगापूर येथे होणाऱ्या ऐतिहासिक बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ट्रंप G7 बैठकीतून लवकर प्रयाण करणार आहेत. सिंगापूर बैठकीत ट्रंप उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांची भेट घेणार आहेत.

ट्रंप प्रशासनाने लादलेले व्यापारी निर्बंध अवैध असल्याचं कॅनडाने म्हटलं आहे. व्यापार, हवामान बदल तसंच इराण संदर्भातील ट्रंप आणि पर्यायाने अमेरिकेचं धोरण खऱ्या अर्थाने धोकादायक असल्याचं युरोपियन काऊन्सिलचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, "आंतरराष्ट्रीय मानकांची पायमल्ली होत आहे. आणि यावेळी नेहमीचे उल्लंघन करणारे देश नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आचारसंहितेचा पाया रचणाऱ्या अमेरिकेकडूनच नियमांना तिलांजली देण्यात येत आहे."

G7 म्हणजे काय?

अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, फ्रान्स, इटली, जपान आणि जर्मनी अशा सात देशांची मिळून होणारी ही वार्षिक परिषद आहे. या सात देशांकडे जगाच्या अर्थव्यवस्थेच्या 60 टक्के पैसा आहे. अर्थकारण हा बैठकीचा प्रमुख विषय असतो. मात्र जागतिक स्तरावरील प्रमुख विषयांवर चर्चा होते. यंदा ही बैठक क्युबेकमधील ला मलाबिई नावाच्या शहरात होत आहे.

रशियाबद्दल ट्रंप काय म्हणाले?

तुम्हाला आवडेल की नाही ठाऊक नाही. ते डावपेचादृष्ट्या अचूक असेल का माहिती नाही. ही परिषद G8 होती. आता सात सदस्य आहेत. रशियाची हकालपट्टी करण्यात आली होती. आता रशियाला समाविष्ट करण्याची वेळ आली आहे, असं ते म्हणले.

सुरुवातीला इटलीचे पंतप्रधान जियूसेपी कोंटे यांनी ट्रंप यांनी पाठिंबा दिला होता. मात्र युक्रेनप्रकरणी ठोस मार्ग काढल्याशिवाय रशियाचा समावेश करता येणार नाही अशी भूमिका सदस्य राष्ट्रांनी घेतली.

ट्रंप यांची खेळी- जेम्स रॉबिन्स, बीबीसी डिप्लोमॅटिक प्रतिनिधी

अमेरिका आणि मित्रराष्ट्रांतले संबंध दिवसेंदिवस दुरावत चालले आहेत. व्यापारी निर्बंधांमुळे संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे. या सगळ्या परिस्थितीतच ट्रंप यांनी रशियाच्या समावेशाचा मुद्दा मांडत सदस्य राष्ट्रांना धक्का दिला. 2014मध्ये रशियाची परिषदेतून हकालपट्टी करण्याचा निर्णय योग्यच होता असं बहुतांशी सदस्य राष्ट्रांना वाटलं होते. आजही हे देश या भूमिकेवर ठाम आहेत. रशिया स्वत:च समावेशाविषयी फारसा उत्सुक नाही. व्यापारी निर्बंध आणि अन्य वादग्रस्त मुद्यांवरून लक्ष हटवण्यासाठी ट्रंप यांनी रशियाचा मुद्दा मांडत चतुर खेळी केली आहे.

ट्रंप यांना G7 ही संकल्पना फारशी रुचलेली नाही. जागतिक स्तरावरील सात सुबत्तापूर्ण देश धोरणं तसंच सद्य परिस्थितीविषयी चर्चा करतात हेच ट्रंप यांना पटत नाही. परिषदेला सगळ्यात शेवटी ट्रंप यांचं आगमन झालं आणि परिषदेतून सगळ्यात आधी बाहेर पडणारेही ट्रंपच होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)