You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशिया अमेरिकेशी छुपं युद्ध लढत आहे का?
- Author, जस्टिन रौलेट
- Role, बीबीसी दक्षिण आशिया प्रतिनिधी
रशिया अफगाणिस्तानातल्या तालिबानला शस्त्रं पुरवत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत या आरोपाचे काय संदर्भ आहेत? अमेरिकन सैन्याधिकाऱ्याची विशेष मुलाखत.
रशिया तालिबानला पाठबळ देत आहेच शिवाय शस्त्रंही पुरवत आहे, अशी माहिती अफगाणिस्तानमधील अमेरिकन फौजांचे प्रमुख जनरल जॉन निकोल्सन यांनी बीबीसीला दिली.
या भागात अस्थिरतेसाठी रशिया कारवाया करत असल्याचं दिसून आल्याचं त्यांनी बीबीसीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सांगितलं.
जनरल जॉन निकोल्सन- अफगाणिस्तानातल्या अमेरिकन फौजांचे प्रमुख आहेत. ते बीबीसी प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, "रशियाच्या ताजिक सीमेवरून शस्त्रास्त्रांची तस्करी होते. पण नेमकी किती शस्त्रास्त्रं येतात त्याचं प्रमाण सांगता येणार नाही."
रशियाने यापूर्वीच हे आरोप नाकारले असून याला कसलाही पुरावा नसल्याचं रशियाचं म्हणणं आहे.
अमेरिकेचा नवा दावा मात्र संवेदनशील समजला जात आहे. रशियाचे नाटो राष्ट्रांशी सध्याचे संबंध लक्षात घेता हा दावा महत्त्वाचा आहे. ब्रिटनमध्ये एका रशियन गुप्तहेर आणि त्याच्या मुलीवर झालेल्या हल्ल्यामागे रशिया असल्याचा आरोप ब्रिटनने केला होता.
तर दुसरीकडे अमेरिका काँग्रेसच्या इंटेलिजन्स कमिटीच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात 2016च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियन चिथावणीखोरांनी हस्तक्षेप केल्याचा निष्कर्ष काढला आहे.
जनरल निकोल्सन म्हणाले, "इथं इस्लामिक स्टेटचे लढवय्ये असल्याचं जे सांगितलं जात आहे, त्यांची संख्या वाढवून सांगितली जात आहे. याचाच आधार घेऊन रशिया तालिबान्यांच्या कारवायांना योग्य ठरवत असून त्यांना काही प्रमाणात सहकार्य देत आहे."
ते म्हणाले, "स्थानिक वृत्तपत्रांमध्ये तालिबानला शत्रूकडून आर्थिक मदत मिळत असल्याच्या बातम्या येत आहेत. एका अफगाण नेत्याकडून मिळालेली शस्त्रं आम्ही इथं आणली आहेत. ही शस्त्रं तालिबानला रशियाकडून मिळाली आहेत. आम्हाला माहीत आहे की, रशिया यात गुंतलेला आहे."
जनरल निकोल्सन यांच्या कारकिर्दीमधील बरीच वर्षं अफगाणिस्तानातील संघर्षात गेली आहे. 9/11ला अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यात पेंटॅगॉनवर झालेल्या हल्ल्यात त्यांचं कार्यालय नष्ट झालं होतं. त्यावेळी ते थोडक्यात बचावले होते. त्यानंतर ते अमेरिकेच्या अफगाणिस्तानमधील मोहिमेत सहभागी आहेत.
ते म्हणतात, "रशियाच्या तलिबानसोबतची या भागातील थेट गुंतवणूक नवीन आहे. रशियाने यापूर्वी अफगाणिस्तानच्या कझाकिस्तानशी असलेल्या सीमेवर रशियाने अभ्यास मोहिमा घेतल्या आहेत. या मोहिमा दहशतवाद विरोधी होत्या." रशिया मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रं घेऊन येतं आणि त्यातील काही शस्त्रात्रं मागे ठेवून जातात. हा पॅटर्न पूर्वी आम्ही पाहिला आहे, असं ते म्हणतात.
ही शस्त्रास्त्रं नंतर सीमेवरून तस्करी करून आणली जातात आणि तालिबानला दिली जातात, असं ते म्हणाले.
रशिया तालिबानला मदत करतंय पण ती किती प्रमाणात हे सांगणं कठीण आहे, असं त्यांनी सांगितली. पण अफगाणिस्तानमधील पोलीस अधिकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार या शस्त्रास्त्रांत नाईट व्हिजन गॉगल्स, विविध प्रकारच्या मशीनगन्स आणि लहान शस्त्रास्त्रांचा समावेश आहे.
अफगाणी सूत्रांच्या मते, ही शस्त्रं अफगाण सैन्य आणि त्यांना सहकार्य करणारे 'नाटो'चे सल्लागारांच्या विरोधात वापरली जातील.
पण तालिबान हा रशियाचा स्वाभाविक मित्र कधीच नाही. 1979 रशियाने अफगाणिस्तानवर हल्ला केला होता. त्यानंतर सोव्हिएत युनियनला अमेरिकेचं पाठबळ असलेल्या मुजाहिदीनांशी कडवा संघर्ष करावा लागला होता. 1989ला रशियाला अपमानकारक माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर इथं सुरू झालेल्या नागरी युद्धातच तालिबानची स्थापना झाली. त्यामध्ये हेच मुजाहिदीन सहभागी झाले होते.
तालिबानशी रशियाशी असणारं शत्रुत्व न संपणारं होतं अशी प्रतिक्रिया अफगाणिस्तान अॅनालिस्ट नेटवर्कच्या केट क्लर्क यांनी सांगितले. "रशियाशी सहकार्य केल्याबद्दल नॉदर्न अलायन्सला तालिबानने नेहमीच विरोध केला होता," असं त्या सांगतात.
आता रशिया आणि तालिबान यांचे हितसंबंध परस्पर पूरक ठरत असतील, असं त्या म्हणाल्या.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पाकिस्तानला तालिबानशी संबंध तोडण्याचा इशारा दिला होता. जानेवारीमध्ये 'पाकिस्तानने फसवणूक आणि खोटेपणा याशिवाय दुसरी काही दिलेलं नाही', असं त्यांनी ट्वीट केलं होतं. त्यानंतर ट्रंप यांनी पाकिस्तानची लक्षावधी डॉलरची लष्करी मदत स्थगित केली होती.
तालिबानलाही पाकिस्तानपासून बाजूला होऊन स्वतंत्र शक्ती म्हणून पुढं यायचं आहे, त्यासाठी त्यांना आर्थिक सहकार्य देणारे आणि आंतरराष्ट्रीय पाठीराखे आहेत.
रशियाने मात्र तालिबानला निधी किंवा शस्त्रं पुरवल्याचा इन्कार केला आहे, पण तालिबानशी चर्चा झाल्याची मात्र मान्य केलं आहे. कथित इस्लामिक स्टेट ईशान्य अफगाणिस्तानात तळ निर्माण करू पाहात आहे, त्यामुळे एकत्रित विरोध उभं करण्यासाठी हे आवश्यक असल्याचं समर्थन रशियाने केलं आहे. तालिबानला सहकार्य करण्याचे रशियाला भूराजकीय लाभ झाले होऊ शकतात.
रशिया अफगाणिस्तानात अमेरिकेशी छुपं युद्ध लढत आहे का, असा प्रश्न निकोल्सन यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी थेट उत्तर दिलं नाही.
ते म्हणाले, "गेल्या दीड ते दोन वर्षांत या हालचाली वाढलेल्या आहेत. यापूर्वी आम्ही रशियाकडून अशा प्रकारचे अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न पाहिले नव्हते. आपण जर यातले परस्पर संबंध पाहिले तर सीरियातलं वातावरण तापल्यानंतर हे घडू लागलं आहे. या सगळ्या मागची वेळ लक्षात घेतली पाहिजे."
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)