You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वॅन्युआतू : एका भाषेनं जोडलेली 83 बेटं आणि या बेटांच्या देशाची गोष्ट
- Author, ज्युलिया हॅमंड
- Role, बीबीसी ट्रॅव्हल
वॅन्युआतू हा 83 बेटं मिळून बनलेला दक्षिण पॅसिफिक महासागरातला एक देश. या देशात शंभरपेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. बिस्लामा ही भाषा ही इथल्या संवादासाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे - परंतु ही भाषा शिकणं सोपं नाही. कारण या भाषेने इंग्रजीलाच बदलायला लावलंय.
दुपारचा प्रहर जवळ येत होता; मी जसजशी 'तन्ना'च्या पूर्वेकडील किनाऱ्याजवळच्या रस्त्यावर चालू लागले तसे माझ्या पाठीवर घर्मबिंदू उमटू लागले. तन्ना हे वॅन्युआतूच्या 83 दिव्पांपैकी एक द्वीप आहे. नेहमीसारखंच, रस्त्याच्या किनाऱ्याला पालापाचोळ्याच्या पातळ थरामधून निळाशार समुद्र दिसत होता आणि समुद्राकाठच्या मासेमारीच्या लाकडी बोटीसुद्धा दिसत होत्या. उंच माडाच्या झाडांमधून जिथून सूर्यप्रकाश पोहोचत होता तिथं गवताचे पुंजके उगवले होते; इतरत्र जमीन मोकळी होती.
धारदार पातीची हत्यारं घेऊन पुरुष मंडळी झपाट्यानं चालत होती. त्यांच्या मळलेल्या टी-शर्टवरून असं वाटत होतं की मी झोपले असतानाच त्यांची सकाळची शेतीची कामं उरकली होती. 'मदर हबाडर्स' नावाचे व्हिक्टोरियन-शैलीतील कपडे परिधान केलेल्या स्त्रिया, कडकडीत उन्हात वाळलेले कपडे गोळा करता करता क्षितिजावर एकत्रित होणाऱ्या ढगांकडे उत्सुकतेने पाहात होत्या.
लेनाकेल या गावाच्या बाजारात पोहोचल्यावर, तन्नीझी लोकांच्या एका घोळक्यानं स्मितहास्य करत माझं स्वागत केलं आणि पिजीन म्हणजे वॅन्युवातूमध्ये बोलल्या जाणाऱ्या मिश्र भाषेत प्रश्नांचा भडिमार करू लागले. त्यांची ही बोलीभाषा 'बिस्लामा' नावानं ओळखली जाते.
"वानेम नेम ब्लाँग यू?" त्यांनी विचारलं.
ब्लाँग म्हणजे इंग्रजीतलं बिलाँग.
आत्मविश्वासाने मी म्हणाले, "माझं नाव ज्युलिया."
"यू ब्लाँग वी?"
"मी इंग्लंडहून आले आहे."
मी इंग्लंडची रहिवासी आहे हे समजताच, त्यांच्या प्रिन्स फिलीप यांच्याबद्दलच्या चौकशा सुरू झाल्या. कारण 1974मध्ये प्रिन्स फिलीप यांनी 'ब्रिटानिया' या त्यांच्या रॉयल यॉट मधून वॅन्युआतूला भेट दिली होती.
तत्कालीन स्थानिक नेते आणि वॉरिअर किंवा योद्धा म्हणून ओळखले जाणारे जॅक नाइवा यांनी तन्नाच्या दुर्गम खेड्यांवर एके काळी राज्य केलं होतं. त्यांनी प्रिन्स फिलिप यांना 'तन्नीझी पर्वत आत्म्याचा अंश' म्हणून घोषित केले होते. हा मोठा सन्मान समजला जातो इथे. तन्नीझी पर्वतआत्म्याच्या आशीर्वादानेच इथे भरभराट होते, असा विश्वास आहे. प्रिन्स फिलीप यांच्या बाबतीत म्हणूनच त्यांचा असा विश्वास आहे की, ते एक दिवस पुन्हा परतील आणि या बेटावर विपुल शेती, संपत्ती निर्माण होईल आणि बेट समृद्ध होईल.
जसं संभाषण अधिक वाढत गेलं तसतसं मला ते चालू ठेवणं जड जाऊ लागलं. कारण त्यांची भाषा गुंतागुंतीची व्हायला लागली. "मी नो सेव - आड डोण्ट अंडरस्टँड - मला समजत नाही," मी पुटपुटले आणि मग हे नव्यानं परिचय झालेले लोक आपापल्या दिशेनं निघून गेले.
बिस्लामा, भाषा ही 'ध्वन्यात्मक' इंग्रजीवर आधारित आहे. म्हणजे इंग्रजीच्या ध्वनीवर आधारित भाषा. त्यांची लिपी रोमन आहे, पण शब्द इंग्रजी नाही. त्यामुळे पहिल्यांदा ऐकताना ती बोलण्यास सोपी असावी असं वाटतं. इंग्रजी येणाऱ्याला ही भाषा शिकणं कठीण नाही असं वाटू शकतं.
ही भाषा शिकण्यासाठी मी उत्सुक होते त्यासाठी मी वॅन्युआतूची राजधानी पोर्ट व्हिलापासून तन्नाकडे ४० मिनिटांची फ्लाईट पकडून आले. येताना वॅन्युआतूच्या विमानात विक्रीसाठी असणाऱ्या मासिकात एक नॅपकिन होता, त्यावर असलेल्या शब्दांचा अभ्यासही मी केला.
त्यात बिस्लामामधले काही मुख्य शब्द आणि वाक्य होती. प्रत्येक वाक्याला जोडून उपयुक्त ग्राफिकही (चित्रे) होतं. 'बास्केट ब्लाँग टीटी' या वाक्याच्या खाली एका बिकिनीचं चित्र होतं, एका स्नॉर्केलिंग फिनच्या खाली 'लेग ब्लाँग डाक डाक' असं लिहिलं होतं, त्यामुळे मी थोडा वेळ गोंधळात पडले, पण जेव्हा त्याचा संदर्भ बदकाच्या पावलांशी जोडला तेव्हा समजलं. 'वोटा' Wota हे सोपं होतं, म्हणजे मी आता पाण्याच्या जवळ म्हणजे समुद्रकिनारी जाण्याचा मनस्थितीत होते.
या मोहक भाषेचा उगम वॅन्युआतूच्या वसाहत-पूर्व भूतकाळात झाला आहे. 'बिस्लामा' हा शब्द 'बेश-डे-मेर' (beche de mer) या शब्दावरून आला आहे. याचा अर्थ वॅन्युआतूच्या पाण्यामध्ये सर्वत्र आढळणारी समुद्री गोगलगाय. अठराव्या शतकात, चिनी लोक 'बेश-डे-मेर'च्या मागावर होते, कारण त्यांच्या मते त्याचा वापर स्वयंपाकात उत्तम रितीनं होऊन एक चवदार पदार्थ तयार होऊ शकतो. पैशाचा लोभ आणि साहस करण्याची ऊर्मी यामुळे वॅन्युआतू लोक आनंदानं चीनच्या खलाशांबरोबर त्यांच्या नौकांमध्ये जाण्यास तयार होत.
परंतु, असं गृहित धरलं जातं की, वेगवेगळ्या बेटांमधील समुदायांचा एकमेकांपासून दूर असा अलिप्तपणे विकास झाला. म्हणूनच वॅन्युआतूच्या द्वीपांवर 100पेक्षा अधिक वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात आणि पूर्वीही बोलल्या गेल्या आहेत. वॅन्युआतूचे रहिवासी महत्प्रयासानं एकमेकांना समजून घेऊ शकत होते, त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या परदेशी माणसांसाठी तर हे अवघडच होतं.
त्यामुळे, खलाशांनी स्वतःचंच दक्षिण समुद्री शब्दजाल निर्माण केलं, संभाषणासाठी एक सामायिक बोलीभाषा इथे रुजवली. ती म्हणजेच पिजीन भाषा. ही भाषा सहजपणे बोलता येते. वॅन्युआतू बंदरांकडे वारंवार परतणाऱ्या खलाशांमुळे पिजीन भाषा किनारपट्टीवर रुळायला फारसा वेळ लागला नाही.
1860च्या दशकापर्यंत, ऑस्ट्रेलियातील अनेक ऊस बागायतदार मजुरांच्या शोधात इथे येत होते. ब्लॅकबर्डिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्धतीमध्ये, नी-वॅन्युवातूंना म्हणजे इथल्या मूळच्या रहिवाशांना क्वीन्सलँडला काम करण्यासाठी आणलं गेलं. अर्थातच ते तिथे स्वेच्छेनं जात नसत. त्यांनी भाषिक डोकेदुखीवर उतारा म्हणून, क्वीन्सलँड प्लांटेशन पिजीन इंग्लिश (दक्षिण समुद्री प्रदेशातली बोलीभाषा) स्वीकारली. पण जसं बागायती शेती वॅन्युआतूमध्ये प्रचलित झाली तशी पिजीन भाषा बोलणारे नी-वॅन्युआतू कामासाठी घरी परतले आणि क्वीन्सलँड पिजीन इंग्लिश ही भाषा इथे अगोदर रुळलेल्या दक्षिण सागरी शब्दजालाच्या पिजीन भाषेत विलीन झाली. त्यातून एक नवीनच बोली तयार झाली. तीच आजच्या बिस्लामा भाषेची मूळ भाषा.
1906मध्ये वॅन्युआतू देश जेव्हा एक संयुक्त ब्रिटिश व फ्रेंच वसाहत बनला तेव्हा बिस्लामा मोठ्या प्रमाणावर बोलली जात होती. तरीही 20व्या शतकात काही प्रमाणात या भाषेवर फ्रेंच भाषेचा प्रभाव पाडला.
1970च्या दशकात बिस्लामा ही वॅन्युआतूच्या स्वातंत्र्यलढ्याची भाषा बनली. 1980मध्ये स्वायत्तता मिळविल्यानंतर बिस्लामा ही बेटांवरची 'ऐक्याची भाषा' बनली. आज फ्रेंच आणि इंग्रजी भाषाच अजूनही वॅन्युआतूच्या अधिकृत भाषा मानल्या जातात. तरीही बिस्लामा ही लोकांच्या बोलण्याची भाषा आहे. इकडच्या सर्व बेटांमधील शाळांमध्ये ती रीतसर शिकवली जाते, तसंच ती राष्ट्राच्या चलनातही वापरली आहे. रेडिओ वॅन्युआतूचं ब्रॉडकास्ट बिस्लामा भाषेत होतं. तसंच टेलिव्हिजन ब्लाँग वॅन्युवातू (टीबीव्ही) हे राष्ट्रीय दूरचित्रवाणी नेटवर्क बिस्लामा भाषेमध्ये प्रसारित होतं.
आज बिस्लामा भाषा अशा प्रकारे या बेटांना एकत्र बांधून ठेवणारी सामायिक बोली ठरली आहे. या बेटांची आणि देशाची सांस्कृतिक ओळख बनली आहे.
रस्त्यांवर भेटणाऱ्या स्थानिक लोकांबरोबरचं संभाषण असफल झाल्यानंतर, मी बिस्लामा बोलण्याचा दुसरा मार्ग शोधला. कोणीतरी विसरलेलं 'पीस कॉर्पस' हे बिस्लामा हँडबुक मला माझ्या हॉटेलच्या रूममध्ये सापडलं.
मी तन्नाच्या पूर्व बाजूला असलेल्या यासुर पर्वत, या एका सक्रिय ज्वालामुखीपाशी फेरफटका मारायचं ठरवलं आणि भूगर्भशास्त्राच्या बिस्लामी अध्यायाचा अभ्यास करायला सुरुवात केली. Volkeno म्हणजे Volcano (ज्वालामुखी) हे कळलं. faerap (Fire up) चा अर्थ होता उद्रेक, आणि गोंधळात टाकणारा शब्द होता wota म्हणजे लाव्हा (कदाचित गरम पाणी) जो पाणी म्हणूनही वापरला जातो.
मला हे शब्द माहिती होते तरी अजूनही त्यांची वाक्यं कशी करावीत याची कल्पनाच नव्हती. तो 'वॉटा ब्लाँग वॉलेंको फेअरप' Wota blong volkeno faerap' असं वाक्य होऊ शकेल का? मी प्रयत्न करायचं ठरवलं.
दुसऱ्या दिवशी मी यासूर पर्वताच्या पायथ्याशी उभी राहून समोर अनेक मीटर हवेत उंच उसळणारा धगधगता लाव्हा पाहात होते. या उदात्त, सहजरीत्या पाहता येईल अशा पॉइंटपासून, राखेच्या लहरी जमिनीवर पसरलेल्या दिसत होत्या. सततच्या ज्वालामुखी स्फोटात राख बाहेर पडत होती. नंतरच्या वारा आणि वादळी पाऊसामुळे तो लावा, राख थंड होत होते. ज्वालामुखीच्या पर्वतामधून ठराविक कालावधीनंतर उमटणाऱ्या स्फोटांच्या आवाजांमुळे माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते.
अखेरीस, मी माझं नवीन तयार केलेलं आणि घोकलेलं वाक्य वापरण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.
"वॉटा ब्लाँग व्होल्केनो फेअरप," आत्मविश्वासची उधळण करत म्हणण्याचा प्रयत्न केला. मळलेल्या लाल कार्गो शॉर्ट्स आणि अनवाणी फिरत असलेल्या माझ्या बरोबरच्या गाईडनं, माझ्याकडे एखाद्या लहान मुलाकडे पाहावं तसं कौतुकानं पाहून स्मित केलं.
"होय, आपण ज्वालामुखीचं वर्णन असं करू शकतो," त्यानं मला इंग्रजीत उत्तर दिलं. संभाषण पुढे चालू ठेवण्यासाठी कुठलेच शब्द पुढे आले नाहीत आणि पुन्हा एकदा या भाषेवर प्रभुत्व मिळवण्यास मी असमर्थ ठरले. तो मला काय म्हणायचंय ते समजू शकला हे कमी नव्हतं. त्यानंतर मी ठरवलं की, यापुढे इंग्रजीतच बोलणार. कारण बिस्लामा ही त्यापेक्षा कठीण आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)