You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नदी आटली आणि 'या' देशाची अर्थव्यवस्थाच कोलमडली...
- Author, एन्तिया कास्टेडो
- Role, बीबीसी मुंडो प्रतिनिधी
कॅप्टन रोबर्टो गॉन्जालेज गेल्या 25 वर्षांपासून जहाजावरून प्रवास करत आहेत, पण त्यांनी आपल्या आयुष्यात असं दृश्य कधीही पाहिलेलं नव्हतं.
पॅराग्वे नदीवर रात्री त्यांना 'चमकणारे लाल दिवे' दिसले.
जहाज नांगर टाकण्याच्या तयारीत होतं, त्यामुळे त्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना सावध केले. नदीजवळ दिसत असलेले 'चमकणारे लाल दिवे' म्हणजे मगरीचे डोळे होते, ज्यांच्यावर रात्री प्रकाश पडल्यावर ते लाल दिसतात.
त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, "यापूर्वी मी असं कधीही पाहिलं नव्हतं. ज्या नदीत मगरींचं वास्तव्य आहे ती नदी कोरडी पडली आहे. त्यातलं पाणी पूर्णपणे कमी झाले आहे. यामुळेच मगरी बाहेर आल्या आहेत."
या भागात सध्या दुष्काळ पडला आहे. पॅराग्वे नदी या दुष्काळाचेच एक जिवंत उदाहरण आहे.
गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत राजधानी असुनशियोनच्या जवळून वाहणारी पॅराग्वे नदी आणि आजूबाजूच्या परिसरात कोरडा दुष्काळ पडला आहे. अमेरिकन स्पेस एजंसी नासाने सॅटेलाईटच्या माध्यमातून दुष्काळाच्या झळा पोहचलेल्या काही ठिकाणांची दृश्यं प्रसिद्ध केली आहेत.
पॅराग्वे नदीची बातमी अस्वस्थ करणारी होती. देशाचे नाव नदीच्या नावावरून आहे यावरूनच अंदाज येतो की ही नदी देशासाठी किती महत्त्वाची आहे. या नदीला देशाची लाईफलाईन म्हणजेच जीवनवाहिनी मानले जाते.
पॅराग्वेच्या नॅशनल अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ नेव्हिगेशन अँड पोर्ट्स (एएनपीपी) नुसार, 25 ऑक्टोबर रोजी असुनशियोन येथील नदीची पाणी पातळी नेहमीपेक्षा 54 सेंटीमीटरने कमी होती. थोड्या पावसानंतर 9 नोव्हेंबरला नदीच्या पाणी पातळीत किंचित सुधारणा झाली आणि ती नेहमीपेक्षा फक्त 14 सेंटीमीटरने कमी झाली.
एएनपीपीचे संचालक लुईस हारा यांनी परिस्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणतात की, नदीच्या पाणी पातळीत नुकतीच झालेली वाढ कायमस्वरूपी नाही.
एबीसी या स्थानिक टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं, "पाऊस पडल्यानंतर वर्षाच्या उत्तरार्धात नदीत किती पाणी राहील याची आकडेवारी दिलासाजनक नाही."
नदीतील पाण्याची पातळी लवकर वाढणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. तसेच नदीची पातळी सामान्य होण्यासाठी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाट पहावी लागेल. तेव्हाच जहाजांसाठी योग्य परिस्थिती निर्माण होईल असंही त्यांनी मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले.
हारा सांगतात, "याचा अर्थ नदीच्या पाण्याची पातळी आता कमी होणार नाही असे नाही. आम्हाला आजही पावसाची अत्यंत गरज आहे."
पॅराग्वेच्या हवामान विभागाचे संचालक राऊल रोडोस यांनी बीबीसीला सांगितले की, या वेळी नदीच्या पाण्याची पातळी किमान 2.5 मीटरपर्यंत असली पाहिजे.
पॅराग्वेची जीवनवाहिनी - पॅराग्वे नदी
पॅराग्वे देशाला चारही बाजूने जमीनीने वेढले आहे. एका बाजूला बोलिव्हिया आणि अर्जेंटिना तर दुस-या बाजूला ब्राझील आणि उरुग्वे.
पाण्यासाठी हा दक्षिण अमेरिकन देश पूर्णत: पॅराग्वे नदीवर अवलंबून आहे. यामुळेच या नदीला देशाची लाईफलाईन किंवा जीवनवाहिनी संबोधलं जातं.
पॅराग्वेचे उपवाणिज्यमंत्री पेद्रो मान्सुलो यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, "पॅराग्वे हा आमच्यासाठी एकमेव मार्ग आहे जो आम्हाला समुद्राकडे घेऊन जातो आणि आता दुष्काळामुळे हा मार्ग अडचणीत आला आहे.
ते सांगतात की, दुष्काळामुळे नदी एवढी कोरडी पडली आहे की मोठी व्यावसायिक जहाजे सध्या चालवता येऊ शकत नाहीत.
देशाच्या सार्वजनिक बांधकाम आणि दळणवळण मंत्रालयात संचालक म्हणून काम करणारे जॉर्ज व्हर्गारा म्हणतात, "या कठीण परिस्थितीवर तोडगा निघाला नाही तर जहाजांच्या फेऱ्या अशक्य आहेत. साधारण महिन्याभरात आपल्याला अधिक गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते असा आमचा अंदाज आहे."
त्यांनी म्हटलं, "नदीचे पाणी सुकल्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये देशात आयात केलेला 52 टक्के माल आणि 73 टक्के निर्यात केलेल्या मालाची वाहतूक याच नदीमार्गे झाली आहे."
जगातील सर्वात मोठ्या कृषी उत्पादन निर्यातदारांमध्ये पॅराग्वेचा समावेश आहे. हा देश मोठ्या संख्येने सोयाबीनची निर्यात करतो आणि पॅराग्वेत नदीत चालवल्या जाणारा जहाजांचा जगातील सर्वात मोठा ताफा आहे.
ओल्या प्रदेशात दुष्काळ
पॅराग्वेतील पाणीटंचाईच्या समस्येचा संबंध पेंटानलमध्ये नुकत्याच झालेल्या कमी पावसाशी आहे. पेंटानल जगातील सर्वाधिक उष्णकटिबंधीय ओला प्रदेश आहे जो ब्राझील, बोलिव्हिया आणि पॅराग्वेच्या विशाल भागात पसरलेला आहे.
पावसाळ्यात पेंटानलमध्ये साचलेले पाणी पॅराग्वे नदीत येऊन पोहचते. गेल्या काही महिन्यांत पेंटानलमध्ये पाऊस कमी झाला आणि परिसरातील जंगलाला आग लागली. ओल्या प्रदेशातील दुष्काळ काही नवीन नाही, पण भविष्यात जलयुक्त हवामानात बदल आणि निसर्गात मानवी हस्तक्षेप या कारणांमुळे ओल्या दुष्काळाची तीव्रता वाढणार अशी भीती व्यक्त केली जात आहे.
चिंतेचा आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे अॅमेझॉनच्या जंगलतोडीचा, ज्याचा अॅमेझॉनच्या पात्रातील पाण्याच्या बाष्पावर परिणाम होतो. इथला जलबाष्प दक्षिण अमेरिकेतील देशांपर्यंत पोहोचतो.
या क्षेत्रात विशेष काम केलेले ब्राझीलचे भूगोलतज्ज्ञ मार्कोस रोझा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, "हे आता 'न्यू नॉर्मल' आहे याची भीती वाटते. याचा अर्थ ही परिस्थिती लवकर बदलणारी नाही. कित्येक वर्षांपासून मानवी हस्तक्षेप सुरू आहे. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. पावसाचे आणि निसर्गाचे चक्र बदलले आहे. यामुळे दुष्काळ पडतो आहे आणि पेंटानल येथे नैसर्गिक पूर येत आहे."
त्याचबरोबर दक्षिण अमेरिकेच्या हवामानात एका प्रकारचा हंगामी बदल दिसून येत आहे. याला 'ला नीना' असे म्हटले जाते. यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
'ला नीना' ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये भूमध्यरेषेच्या जवळपास प्रशांत महासागराचे पाणी वेळोवेळी थंड होऊ लागते. यामुळे हवामान थंड आणि कोरडे होते.
नांगर न टाकताच जेव्हा जहाज थांबते
पॅराग्वे नदीत कमी पाणी असल्यामुळे अनेक जहाजांनी काम सुरू ठेवण्याचा विचार बदलला आणि नांगर टाकले. असुनशियोनमध्ये पॅराग्वेच्या मुख्य बंदरातील अनेक जहाजे आता पूर्वीपेक्षा कमी सामान वाहून नेत आहेत.
आयात-निर्यात सुरू रहावी यासाठी सरकारने नदीऐवजी रस्ते मार्गाने सुमद्रापर्यंत पोहचण्याचा उपाय शोधून काढला आहे. पण नदीच्या तुलनेत रस्ते मार्गाच्या वाहतूकीचा खर्च खूप जास्त आहे.
एक वेळ अशी आली जेव्हा जहाजांना पुढे जाण्याचा कोणताही मार्ग नव्हता. एका शिपिंग कंपनीचे संचालक गुलेरमो एरेक म्हणतात, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या एक चतुर्थांश जहाजांना नांगर टाकून जहाज थांबवावे लागले. त्यांच्याकडे एकूण 80 जहाजे आहेत.
ते सांगतात, "आमची आठ जहाजे बोलिव्हियात अडकली होती, तीन जहाजे पॅराग्वेच्या सॅन अँटोनियोमध्ये, आणि 12 जहाजांना अर्जेंटिनाच्या सॅन लोरेन्झो शहरात थांबवावे लागले."
ते तांत्रिकदृष्ट्या अडकले नव्हते तर कमी पाण्यामुळे जहाज चालवणं अश्यक्य झाले होते.
गुलेरमे सांगतात की नदीत पाणी कमी झाल्यामुळे त्यांच्या कंपनीला याचा आर्थिक फटका बसला. कंपनीला दरमहा सुमारे 40 लाख डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला.
सेंटर फॉर रिव्हर अँड मेरिटाइम शिप ओनर्स यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पॅराग्वेच्या खासगी क्षेत्राला 25 कोटी डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला आहे.
या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या ठिकाणी नदी आणखी खोल करण्याची गरज आहे, पण अद्याप या दिशेने काम सुरू झालेले नाही.
जॉर्ज वेर्गारा सांगतात, याकामासाठी सरकारने पहिल्या टप्प्यातील आर्थिक तरतूद केली होती पण कोरोना साथीच्या रोगामुळे सरकारने वैद्यकीय क्षेत्रासाठी प्राधान्याने पैसे वळवले.
"या वर्षी डिसेंबरपासून नदीपात्राच्या खोलीकरणाचे काम सुरू होईल, असा त्यांचा अंदाज आहे. पण या काळात परिस्थिती गुंतागुंतीची असेल असंही त्यांनी मान्य केले."
पिण्याच्या पाण्याची कमतरता
प्रश्न केवळ जहाजांचा नाही तर पाणी कमी झाल्याने पॅराग्वे येथील नागरिकांच्या घरी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कमी झाला आहे. या वर्षाच्या सुरूवातीला सरकारने पाणी टंचाई असलेल्या भागांमध्ये पाणी पोहचवण्याची योजना आखली.
या योजनेअंतर्गत पॅराग्वे नदीचे पाणी असुनशियोनपासून 650 किलोमीटर अंतरावर असलेल्या प्यूर्टे कसाडो येथील लोकांच्या घरी पोहचवले जात होते.
परंतु ऑक्टोबरमध्ये नदीत पुरेसे पाणी नसल्याने पुरवठा होऊ शकला नाही. एवढेच काय तर असुनशियोन येथेही पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.
पॅराग्वे नदीच्या काठावर राहणाऱ्या रहिवाशांसाठी नदीचे विशेष महत्त्व आहे. या समाजातील लोक आपल्या दैनंदिन गरजा आणि पुरवठ्यासाठी नदीवर अवलंबून असतात.
बीबीसीशी बोलताना उपवाणिज्य मंत्री मनसुलो यांनी हवामान, निसर्ग आणि अर्थव्यवस्था यांच्यातील संबंधावर वारंवार भर दिला.
त्यांनी सांगितले, "पर्यावरण आणि विकास यांच्यात आवश्यक समतोल राखणे गरजेचे आहे. निसर्ग आपल्याला सतत काही संकेत देत आहे."
पॅराग्वे हवामान विभागाचे संचालक राऊल रोडोस म्हणतात की, नदीवरील दुष्काळाचा प्रभाव समजून घेण्यासाठी हवामान बदलाच्या संभाव्य परिणामांवर अधिक संशोधन करण्याची गरज आहे.
त्यांनी सांगितले, "दुष्काळ वारंवार येत आहे की नाही याचे विश्लेषण करावे लागेल आणि तसे असेल तर त्यात वेगाने वाढ होईल का? पूर आता वारंवार येऊ लागला आहे हे आम्हाला आतापर्यंत कळाले आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)