You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एखाद्या कारच्या आकाराच्या या कासवाला दोन शिंग होती?
दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागात महाकाय कासवाचे जिवाश्म सापडले आहेत. या कासवाचा आकार आजच्या एखाद्या कारएवढा आहे.
Stupendemys geographicus जातीचं हे कासव 1 कोटी 30 लख ते 70 लाख वर्षांपूर्वी या भागात असावं, असा अंदाज आहे. कोलंबियाच्या टॅटॅकोआ आणि व्हेनेझुएलाच्या अरुमॅको भागात हे जिवाश्म सापडलं आहे.
Stupendemys जातीच्या कासवाचं पहिलं जिवाश्म 1970मध्ये सापडलं होतं. मात्र या चार मीटर लांब प्राण्याविषयीची बरीच रहस्यं अजून उलगडलेली नाही.
या कासवाचा आकार आणि वजन एका कारएवढं आहे. दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागात अॅमझॉन आणि ओरिनोको या नद्या उगम पावण्याच्या आधी असलेल्या दलदलीच्या भागात या कासवाचा अधिवास होता.
या नर कासवाला समोरच्या भागाला दोन शिंगही आहेत. जिवाश्मावर आढळलेल्या गडद डागांवरून हे कासव शिंगांचा वापर शत्रूशी लढण्यासाठी एखाद्या सुरीप्रमाणे करायचे, असं दिसतं.
संशोधकांना 3 मीटर लांब कवच आणि खालच्या जबड्याचं हाड सापडलं आहे. यावरून हे कासव काय खात असावं, याचा अंदाज येत असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.
त्यांच्या मते हे कासव मोठमोठ्या मगरींसोबत तलाव किंवा नदीच्या तळाशी राहत असावे. तळ्यातले लहान प्राणी, वनस्पती, फळं आणि बिया हे या कासवाचं मिश्र अन्न असावं.
या कासवाच्या भल्या मोठ्या आकारामुळे इतर प्राण्यांपासून त्यांचं रक्षण व्हायचं. याच जातीच्या कासवाच्या एका जिवाश्मामध्ये मगरीचा दातही आढळला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)