You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
व्याघ्र दिन : वाघिणीच्या शोधात जेव्हा एका वाघाने केली हजारो किलोमीटरची भटकंती
प्रेयसीच्या प्रेमाखातर प्रियकर काय काय करत नाहीत? त्यांचे लाड पुरवतात. हवं-नको ते आणून देतात. आपलं सर्वस्व प्रेयसीला अर्पण करतात. पण प्रेयसीसाठी तब्बल 3 हजारांची पायपीट करणारा प्रियकर कुणी आहे का?
वॉकर नावाच्या वाघाने ही करामत केल्याची माहिती गेल्या वर्षी समोर आली होती. या वाघाने साथीदाराच्या शोधात 3 हजार किलोमीटरची पायपीट केली.
भारतात नोंदली गेलेली ही सर्वाधिक मोठ्या स्वरुपाची पायपीट आहे. अभयारण्यात वसलेला हा एकमेव वाघ आहे.
वॉकर या नावाने हा वाघ वनअधिकाऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. साडेतीन वर्षांच्या या वाघाने आपलं घर म्हणजे महाराष्ट्रातलं अभयारण्य त्याने गेल्या वर्षी जूनमध्ये सोडलं. साथीदाराच्या शोधात तो बाहेर पडला.
त्याच्या शरीरावर रेडिओ कॉलर बसवण्यात आलं होतं. ज्यामुळे तो कुठे जातो आहे हे वनअधिकाऱ्यांना टिपता येत होतं. या वाघाने राज्यातले सात जिल्हे पालथे घातले, 3000 किलोमीटरची पायपीट केली. शेजारच्या तेलंगणातही गेला. अखेर महाराष्ट्रातल्याच एका अभयारण्यात येऊन विसावला. एप्रिलमध्ये त्याच्या शरीरावर बसवलेली कॉलर काढण्यात आली.
205 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेल्या ध्यानगंगा अभयारण्यात बिबटे मोठ्या प्रमाणावर आहेत. जंगली अस्वलं, हरणं आहेत. पण वाघ एकच आहे.
या वाघाला भौगोलिक सीमांची अडचण नाही. त्याला शिकारीसाठी पुरेसे खाद्य उपलब्ध आहे असं महाराष्ट्रातील वरिष्ठ वनअधिकारी नितीन काकोडकर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
या वाघाला साथीदार मिळावा यासाठी अन्य अभयारण्यातून एखादी वाघीण या अभयारण्यात आणावी का यासंदर्भात वनअधिकाऱ्यांचा विचार करत आहेत. तसं झालं तर ही खूपच अनोखी घटना असेल.
नैसर्गिकदृष्ट्या वाघ साथीदाराच्या शोधात असतात. मात्र अन्य अभयारण्यातून वाघासाठी साथीदार आणणं सोपं असणार नाही.
हे अभयारण्य लहान आहे. आजूबाजूला शेती आहे आणि जंगल आहे. वाघिणीने जन्म दिला तर शिकार म्हणून काय मिळणार याचा विचार करावा लागेल. नवीन बछडे इथून पळून जाण्याचा विचार करू शकतात असं काकोडकर यांनी सांगितलं.
वाघांच्या लोकसंख्येपैकी 25 टक्के भारतात राहतात. जंगली वाघांपैकी सत्तर टक्के म्हणजेच साधारण 3,000 वाघ भारतात आहेत. वाघांची संख्या वाढली आहे मात्र त्यांच्या अधिवासाची ठिकाणी आक्रसत चालली आहेत. वाघ ज्यांची शिकार करतो असे प्राणीही कमी झाले आहेत असं तज्ज्ञांनी सांगितलं.
वाघांना आसपासच्या प्रदेशात पाचशे प्राणी लागतात जेणेकरून त्यांच्या खाण्यापिण्याची सोय होते.
गेल्या वर्षी फेब्रुवारीत वॉकरला रेडिओ कॉलर बसवण्यात आली होती. वॉकरने पावसाळा सुरु होईपर्यंत भरपूर मुशाफिरी केली. त्यानंतर तो या अभयारण्यात येऊन स्थिरावला.
वाघ सरळ आखीव रेखीव पद्धतीने आगेकूच करत नाही. जीपीएस सॅटेलाईट यंत्रणेद्वारे त्याचा माग ठेवण्यात आला. तो कुठे कुठे आणि किती वाजता गेला आहे याची नोंद ठेवण्यात आली. वॉकर 5,000 ठिकाणी हिंडला असल्याचं स्पष्ट झालं आहे.
गेल्यावर्षी हिवाळ्याचा हंगाम आणि उन्हाळ्यात वॉकर नद्या, कालवे, हायवे असा मनसोक्त भटकला. राज्यात हिवाळ्याच्या हंगामात कापसाचे पीक घेतले जाते. उंच पीकांमुळे वॉकरला शेतात लपण्यासाठी जागाही मिळाली. वॉकरने प्रामुख्याने रात्रीच प्रवास केला. वाटेत, जंगली डुकरं आणि मांजरांना तो फस्त करत असे.
माणसांबरोबर त्याचा संघर्ष एकदाच उडाला. एक माणूस वॉकरच्या पावलांचा माग घेत तो विश्रांती घेत असलेल्या ठिकाणी जात होता. त्यावेळी वॉकरने आक्रमण केलं. यामध्ये तो माणूस जखमी झाला आहे.
माणसांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे शहरं विस्तारत चालली आहेत. शेती, जंगलांचं प्रमाण कमी होतं आहे. निसर्गावर अतिक्रमण होतं आहे मात्र वॉकरच्या मुशाफिरीतून हे स्पष्ट झालं की आजही वाघ फिरू शकेल असं वातावरण गावांमध्ये आहे.
गावांमधला विकास प्राण्यांच्या विकासात अडथळा बनून उभा राहिलेला नाही असं डॉ. बिलाल हबीब यांनी सांगितलं. हबीब वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे वरिष्ठ बायॉलॉजिस्ट आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)