जागतिक वाघ दिन : 'सोनेरी वाघ' आणि काझीरंगाची आश्चर्यकारक कहाणी

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

नदीकाठ, मागे हिरवंगार गवत आणि समोर बसलेली सोनेरी वाघीण...ठाण्यातल्या मयुरेश हेंद्रेनं काढलेला हा फोटो सध्या वन्यप्रेमींमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या या फोटोमागची कहाणी फोटोमधल्या सोनेरी वाघाइतकीच विलक्षण आणि विचार करायला लावणारी आहे.

आसाममधल्या काझीरंगाच्या जंगलात मयुरेशनं गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हा फोटो टिपला होता. आपण एका दुर्मिळ क्षणाचे साक्षीदार आहोत, याची त्याला नंतर जाणीवही झाली. या वाघाला गोल्डन टायगर किंवा टॅबी टायगर म्हटलं जातं हेही त्याला आधी माहीत नव्हतं.

गोल्डन टायगर किंवा सोनेरी वाघ म्हणजे काहीशी पिवळसर सोनेरी रंगाची त्वचा असणारा वाघ. इतर वाघांसारखे या वाघांच्या अंगावर काळे पट्टे स्पष्टपणे दिसत नाहीत.

"पण हा फोटो म्हणजे खूश होण्याची गोष्ट नाही," असं मयुरेश सांगतो. "ही एक जनुकीय विसंगती आहे आणि ती निर्माण होण्यासाठी माणसं कुठेतरी कारणीभूत आहेत."

'गोल्डन टायगर' का आहे चर्चेत?

मयुरेशनं टिपलेला तो फोटो काही दिवसांपूर्वी वन्यविभागाचे अधिकारी प्रवीण कासवान यांनी ट्विटरवर शेअर केला आणि या वाघाविषयी चर्चा सुरू झाली.

भारतात 21 व्या शतकात अशा पद्धतीच्या मार्जारवर्गातील प्राण्याचा हा पहिला पुरावा आहे, असं कासवान यांनी म्हटलं होतं. हे वाघ अतिशय दुर्मिळ आहेत. इनब्रीडिंगमुळे(जवळच्या नात्यातील प्राण्यांपासून होणारं प्रजोत्पादन) असं होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

याच वाघिणीचा एक फोटो काही वर्षांपूर्वी वनविभागानं लावलेल्या कॅमेरा ट्रॅपनंही टिपला होता, असंही कासवान यांनी ट्विट केलं होतं. कासवान यांनी केलेल्या ट्विटला भरभरून प्रतिसाद मिळाला.

सोनेरी रंगामागचं रहस्य

हा फोटो व्हायरल झाल्यावर काझिरंगा राष्ट्रीय उद्यानाचे संशोधक रबिंद्र शर्मा यांनीही ट्विटरवरून एक अहवाल प्रसिद्ध केला. या वाघिणीचं नाव 'Kazi 106 F' असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि तिचा रंग सोनेरी कशानं झाला असावा, याविषयीची माहिती दिली.

"इनब्रीडिंग म्हणजे जवळच्या नात्यातील वाघ-वाघिणींमधील संबंधातून असा वाघ जन्माला येऊ शकतो. प्राण्यांचा अधिवास नष्ट झाला, त्यांच्यातला संपर्क तुटला तर इनब्रीडिंग होतं असंही ते सांगतात. पण कधीकधी प्राण्यानं केलेली निवडही त्यासाठी कारणीभूत असू शकते," असं शर्मा यांनी म्हटलं आहे.

"Kazi 106 F ही वाघीण आता तीन-चार वर्षांची आहे, ती बछड्यांना जन्म देण्याच्या वयाची आहे. तिच्या पुढच्या पिढीत ही गुणसूत्र दिसतात का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. या फोटोत काझीच्या शरीरावर जखमांचे व्रण दिसत आहेत. तिच्या नाकावरही मोठी जखम झाली असावी. कदाचित एखाद्या वाघानंच ती केली असेल. पण नशिबानं ती आता सावरली आहे."

या अहवालामध्येच कार्डिफ विद्यापीठ आणि नॅशनल सेंटर फॉर बायॉलॉजिकल सायन्सेसनं केलेल्या अभ्यासाची माहिती दिली आहे. त्यानुसार ब्रिटिश काळातील वाघांची आजच्या काळातील वाघांशी तुलना केली, तर वाघांच्या डीएनएतलं 93 टक्के वैविध्य नष्ट झालं आहे. वाघाच्या त्वचेचा पिवळसर रंग हा 'अगूटी जीन्स' तर काळा रंग 'टॅबी जीन्स' या गुणसूत्रांमुळे येतो.

रबिंद्र शर्मा सांगतात की, 2014 साली ही वाघीण पहिल्यांदा दिसून आली होती. पुढच्या काही वर्षांतही तिचे फोटो वनविभागानं लावलेल्या कॅमेऱ्यात टिपले गेले होते. पण मयुरेशनं टिपलेला फोटो हा खुल्या वातावरणात काढला गेलेला पहिला फोटो असावा.

अशी भेटली Kazi 106 F

25 वर्षांचा मयुरेश हेंद्रे हा वाईल्डलाईफ फोटोग्राफर आणि नॅचरलिस्ट (निसर्गवादी किंवा निसर्ग अभ्यासक) आहे. लहानपणापासूनच त्याला निसर्गाची आवड होती आणि मीडियातलं शिक्षण घेतल्यावर तो 2013 साली वाईल्डलाईफ फोटोग्राफीकडे वळला. निसर्गात राहून निसर्गाची माहिती लोकांना देण्याची त्याला आवड होती आणि हेच काम त्याला आसामला घेऊन गेलं.

मयुरेश 2018 पासून आसाममध्ये ब्रह्मपुत्रेतल्या एमव्ही-महाबाहू या क्रूझबोटवर काम करतो.

"ब्रह्मपुत्रा नदीतून आमची बोट प्रवास करते आणि मी पर्यटकांना आसपासच्या निसर्गाची माहिती देण्याचं काम करतो. त्यामुळं मी दर आठवड्याला काझीरंगाला जायचो. 2018 पासून तिथे काम करतो आहे. पण काझिरंगामध्ये वाघ दिसणं कठीण असतं. मलाही वर्षभर अजिबात वाघ दिसला नाही. पण पहिला वाघ दिसला, तो हाच."

लोकांना तिच्या सोनेरी रंगामागचं रहस्य कळेल, तेव्हा त्यांचा दृष्टीकोन बदलेल अशी आशा आहे.

"आपल्याला देशातल्या जंगलांचा ऱ्हास थांबवायला पाहिजे आणि वाघांना संचार करता येईल अशा टायगर कॉरिडॉर्सचं संवर्धन करायला पाहिजे, याची जाणीव लोकांना होईल असं मला वाटतं."

काझीरंगाच्या सोनेरी वाघिणीचा फोटो मयुरेशला नशिबानं काढता आला. पण कोव्हिडचं संकट संपल्यावर आणखी दोन प्राण्यांचे फोटो काढण्याची, त्यांना पाहण्याची त्याची इच्छा आहे. "कर्नाटकातल्या काबिनी राष्ट्रीय उद्यानातल्या 'साया' या ब्लॅक पँथरचे फोटो सध्या गाजतायत. ब्लॅक पँथर म्हणजे खरंतर पूर्णपणे काळा बिबट्या आणि मलाही त्याला कधीतरी पाहायला आवडेल. दुसरं म्हणजे मला लडाखमध्ये जाऊन स्नो लेपर्ड बघायचा आहे."

लॉकडाऊनच्या दिवसांत लोकांना आसपासच्या निसर्गाची पुन्हा होताना दिसली. वन्यजीवांमध्ये लोकांना रस आहे आणि भारतातही त्याविषयी जागरुकता वाढते आहे, असं मयुरेश नमूद करतो.

"तरुण पिढी त्याविषयी बोलते आहे, आवाज उठवते आहे. उदा. प्रस्तावित environmental Impact assessment (पर्यावरण प्रभाव मूल्यांकन) मसुद्यातील अनेक गोष्टींना विरोध केला जातो आहे, त्यात तरुण आघाडीवर आहेत. ही गोष्ट आश्वासक आहे. अभयारण्यात जाऊन आपण वाघ बघतो, तेव्हा आपल्याला बराच आनंद होतो. पण वाघ कुठल्या परिस्थितीत राहतो, त्याच्यासोबत बाकी अनेक पशूपक्षी आहेत त्यांचीही अवस्था काय आहे याचा विचार आपण करायला हवा."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)