You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बोटस्वाना हत्ती मृत्यू : 2 महिन्यात 350 हत्तींचा मृत्यू कशामुळे झाला असावा?
आफ्रिकेतल्या बोटस्वाना या देशात गेल्या 2 महिन्यांत शेकडो हत्तींचा मृत्यू झाला आहे.
डॉ. नियाल मॅकेन यांनी म्हटलं, "आमच्या टीमनं दक्षिण आफ्रिकेच्या बोटस्वाना देशातल्या ओकावांगो डेल्टा या भागात प्रवास केला. मे महिन्याच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत या भागात 350हून अधिक हत्ती मृतावस्थेत आढळले आहेत."
या हत्तींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट नाही. सरकारनं प्रयोगशाळेत काही चाचण्या केल्या आहेत, पण अजूनही त्यांचा निकाल आलेला नाही.
आफ्रिकेतील हत्तींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आफ्रिकेतील हत्तींच्या एकूण संख्येपैकी एक तृतीयांश हत्ती बोटस्वाना आहेत.
ब्रिटनस्थित नॅशनल पार्क रेक्स्यूचे डॉ. मॅकेन यांनी बीबीसीला सांगितलं, "वन्यजीव संरक्षण विभागाशी संबंधित कर्मचाऱ्यांनी मे महिन्याच्या सुरुवातीलाच सरकारला याविषयी माहिती दिली होती. या भागातून पुढे जाताना परिसरातील परिस्थिती चिंताजनक असल्याचं निदर्शनास आलं होतं."
या परिसरातील 3 तासांच्या प्रवासादरम्यान 169 हत्तींचे मृतदेह दिसून आले. एका महिन्यानंतर पुन्हा चौकशी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, ही संख्या 350 वर पोहोचली आहे.
या हत्तींचा मृत्यू भुकेमुळे झाल्याचं समजलं. हे भयानक चित्र आहे, असंही मॅकेन सांगतात.
दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचा नाही, तर फक्त हत्तींचाच मृत्यू झाला आहे, असंही ते पुढे सांगतात. हे बेकायदेशीर शिकारीचं प्रकरण असतं, तर इतर प्राण्यांचेही मृतदेह आढळले असते, असं ते म्हणतात.
या हत्तींच्या मृत्यूमागे दुसरं कारण असू शकतं का, या प्रश्नाला डॉ. मॅकेन अँथ्रेक्स फेटाळून लावतात. गेल्या वर्षी बोटस्वानामध्ये 100 हत्तींचा मृत्यू झाला होता.
हत्तींचा मृत्यू हा एखाद्या विषारी पदार्थामुळे अथवा आजारामुळे झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही ते म्हणतात. "मात्र जोपर्यंत प्रयोगशाळेतील चाचण्यांचे निकाल येत नाही, तोपर्यंत काहीही बोलणं चुकीचं ठरेल."
माणसांपासून प्राण्यांमध्ये शिरकाव केलेल्या एखाद्या साथीमुळे या हत्तींचा मृत्यू झाला असू शकतो, असाही कयास लावला जात आहे.
बोटस्वानाच्या वन्यजीव आणि राष्ट्रीय उद्यान विभागाचे कार्यकारी निर्देशक डॉ. साइरिल टोलो यांच्या मते, आतापर्यंत जवळपास 280 हत्तींचा मृत्यू झाला आहे.
आता दुसऱ्या प्राण्यांविषयीही माहिती एकत्र केली जात आहे आणि चाचण्यांचा निकाल आल्यानंतर सगळं चित्र स्पष्ट होईल.
हेही नक्की वाचा
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)