You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
World Elephant Day: 'हत्तीला समजून न घेणाऱ्या माणसाची पृथ्वीवर राहण्याची पात्रताच नाहीये'
- Author, संकेत सबनीस
- Role, प्रतिनिधी बीबीसी मराठी
गेल्या वर्षी केरळमधल्या पल्लकड इथे गरोदर हत्तीणीचा फटाके असलेलं अननस खाऊन मृत्यू झाल्यानंतर देशभरात हळहळ व्यक्त झाली होती. त्यानंतर हत्ती आणि मनुष्यांच्या परस्परसंबंधांवर चर्चाही सुरू झाली. बीबीसी मराठीनं हत्ती मित्र म्हणून सुपरिचित असलेल्या आनंद शिंदे यांच्याशी त्यावेळी संवाद साधला होता. आज जागतिक हत्ती दिनानिमित्त ही मुलाखत पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
"हत्तीने माणसाला खूप समजून घेतलंय. माणसाची पृथ्वीवर राहण्याची पात्रता नाहीच असंच मला केरळच्या घटनेनंतर वाटतंय," असं मत व्यक्त केलंय हत्ती मित्र म्हणून सुपरिचित असलेले आनंद शिंदे यांनी.
आनंद शिंदे यांनी स्वतः केरळमध्ये जाऊन अनेक हत्तींचं संगोपन आणि त्यांना प्रशिक्षण दिलंय. हत्तींशी बोलणारा माणूस अशीच त्यांची ख्याती आहे. मात्र, केरळमधल्या पल्लकड इथे गरोदर हत्तीणीचा फटाके असलेलं अननस खाऊन मृत्यू झाल्यानंतर त्यांनी खेद व्यक्त केला.
या हत्तीणीचा मृत्यू झाल्यानंतर देशभरातूनच नव्हे तर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांच्यासह संपूर्ण मायाजालावर गेले दोन दिवस या हत्तीणीच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त झाली.
अनेकांनी या घटनेचा बाऊ केला गेल्याचं मत व्यक्त केलं आहे. तर, अनेकांना हा खूप दुःखद प्रसंग वाटतोय. या पार्श्वभूमीवर केरळमध्ये पाच वर्षांहून अधिक काळ हत्तींसोबत वास्तव्य केलेले अभ्यासक आनंद शिंदे यांच्याशी आम्ही या अनुषंगाने आलेल्या विविध प्रश्नांसंदर्भात बातचीत केली.
अशी घटना घडल्याचं कळल्यानंतर आनंद यांना काय वाटलं ते त्यांनी आम्हाला सांगितलं. आनंद सांगतात, "माणसाची या पृथ्वीवर राहण्याची पात्रताच नाही. रानडुकरांना मारण्यासाठी असे प्रयोग तिथे केले जात असल्याचं नुकतंच एका बातमीद्वारे कळलं. पण, रानडुक्कर किंवा हत्ती यांसारख्या प्राण्यांना असं मारण्याचा हक्कच मुळात कोणालाही नाही. हत्तीण गेल्याचं मला वाईट वाटलं."
फटाके खायला घालून हत्ती मारले जात असल्याचं ऐकीवात नसल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी यावेळी केला.
ते सांगतात, "फटाके फळातून खायला घालून किंवा पायनॅपल बाँबचा वापर हत्ती मारण्यासाठी केरळमध्ये केल्याचं मी कधी ऐकलं नव्हतं. मी स्वतः 2012 ते 2017 हा काळ तिथे हत्तींसोबत काम करत होतो. त्या काळात हत्तींना मारण्याचे प्रयत्न झाले. पण, हा पायनॅपल बाँबचा प्रकार कधीच झाला नव्हता."
'हत्ती माणसावर विश्वास ठेवतात'
हत्ती आणि मानवाच्या संबंधाबद्दल आनंद सांगतात, "हत्तीला जेव्हा केव्हा मानवाकडून खाद्यपदार्थ दिले जातात तेव्हा ते खाणं हेच त्याच्या मनात असतं. त्यामुळे त्यावेळी ते खाणं देणाऱ्या माणसावर विश्वास टाकतात. कारण, हत्तीची अन्नाची गरज ही खूप मोठी असते. फार क्वचित वेळा असं होतं की, हत्तीने खाणं देणारा माणूस अनोळखी आहे म्हणून ते नाकारलं आहे."
आनंद याचविषयी बोलताना पुढे सांगतात की, हत्तीने माणसासारखं कपट कधी पाहिलेलं नसतं. त्यामुळे ते विश्वास टाकतात.
"केरळमध्ये जंगलात आईपासून वेगळं झालेलं हत्तीचं पिल्लू आमच्या सेंटरमध्ये आलं होतं. आईपासून वेगळं झाल्याने त्याची जगण्याची शक्यता 50 टक्केच होती. मी त्याला पहिल्यांदा भेटलो तर ते माझ्यासमोर आलं नाही. दुसऱ्या प्रयत्नात ते माझ्या दिशेनं आलं. पण, तिसऱ्या प्रयत्नात त्याने माझा हात हातात घेतला आणि ते हात चाटू लागलं. त्यावेळी त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं."
हत्तींच्या एकमेकांबद्दल सहवेदना असल्याचंही ते सांगतात, "कळपात एखादा हत्ती गेला तर त्याच्या अंगावर माती किंवा झाडांच्या फांद्या आढळतात. कारण, इतर हत्ती त्याला झाकण्याचा प्रयत्न करतात. तसंच, हत्ती जिथे मरून पडला असेल त्याच जागी ते बरोबर 6 महिना वर्षभराने परत येतात. तिथे, संपूर्ण एक दिवस घालवतात. जर, गेलेल्या हत्तीची हाडं तिथे असतील तर ती हाडं कळपातले हत्ती कुरवाळतात. त्यांचं एकमेकांशी खूप घट्ट नातं असतं."
हत्ती आणि माणसाचं बदलतं नातं
सध्याच्या अत्याधुनिक जगात हत्ती आणि माणसाचं नातं बदललं असल्याचं आनंद मानतात. हत्तीने माणासाला समजून घेतल्याचंही मत आहे.
ते याबद्दल सांगतात, "माणसाकडून जोपर्यंत हत्तीला त्रास होत नाही. तोपर्यंत हत्ती स्वतःहून काही करत नाही. आपण, महामार्गावर वगैरे बघतो की, हत्ती गाडीच्यामागे धावतोय. पण, त्यावेळी त्याला एखाद्या गाडीवाल्याने कट मारला किंवा जोरात हॉर्न मारला अशी घटना नक्कीच घडलेली असते. भीतीपोटी हत्ती असं करतो."
हत्ती आणि माणूस संघर्षामध्ये माणसाबद्दल बोलताना आनंद सांगतात, "हत्ती - मानव संघर्षात माणसाचा विचार केला तर त्यात माणसाचं होणारं नुकसान हे आर्थिक असतं. म्हणजे मेहनतीने पिकवलेलं शेत हत्ती खराब करतो. किंवा आपण कोकणात पाहतो तर अनेक वर्ष वाढीसाठी लागलेल्या माडाला हत्ती एका मिनिटांत तोडतो. यात माणसाचं आर्थिक नुकसान होतं. यावेळी हत्ती - मानव संघर्ष सुरू होतो. हत्तीसाठी हा संघर्ष जगण्याचा असतो तर माणसासाठी ही संघर्ष मुख्यतः आर्थिक असतो."
हत्तीने माणसाला स्वीकारलंय तसंच माणसाने हत्तीला स्वीकारायला हवं असं त्यांचं मत आहे. ते सांगतात, "हत्तीचं घर आपण त्याला सुरक्षित करून द्यायला हवं. तसं जर झालं तर हत्ती माणसाच्या वाट्याला जाणार नाही. पूर्वी हत्ती जंगलातून बाहेर आले तर कर्णे, टाळ वाजवले जायचे. त्याला हत्ती घाबरू लागले. पण, नंतर त्यांना कळलं की यातून धोका नाही मग ते घाबरणं बंद झाले. पण, त्यावेळी माणसाने फटाके हाती घेतले. त्यापासून धोका आहे हे समजल्यावर हत्तींनी आक्रमकपणा दाखवायला सुरुवात केली."
इथून पुढच्या काळात हत्ती - माणूस संघर्ष टाळण्यासाठी हत्ती या प्राण्याला पृथ्वीवर राहण्याचा मूलभूत अधिकार आहे याची माणसाला जाणीव झाली पाहिजे. तरच, या दोघांना एकत्र नांदता येईल असं मत अखेरीस आनंद यांनी मांडलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)