वाघ गणना: भारतातील वाघांची संख्या वाढली, सर्वेक्षणाची गिनीज बुकमध्ये नोंद

भारतात 2018 मध्ये करण्यात आलेल्या व्याघ्रगणना सर्वेक्षणात भारतातील वाघांची संख्या वाढल्याची नोंद करण्यात आली होती. यादरम्यान वाघांची संख्या मोजण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्रगणना विभागाने केलेल्या सर्वेक्षणाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली असून हे जगातलं सर्वांत मोठं ऑन-कॅमेरा सर्वेक्षण असल्याची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली आहे.

राष्ट्रीय व्याघ्रगणना विभागाने 2018 मध्ये वाघांचं सर्वेक्षणाच्या चौथ्या टप्प्याबाबत माहिती दिली होती. यामध्ये देशात सुमारे 2967 वाघ असल्याची नोंद करण्यात आली. ही संख्या जगभरातील एकूण व्याघ्रसंख्येच्या 75 टक्के आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी व्याघ्र दिनानिमित्त ट्वीट करून सांगितलं होतं.

या सर्वेक्षणात सुमारे 141 क्षेत्रांमध्ये 26 हजार 838 ठिकाणी विविध प्रकारचे कॅमेरे बसवण्यात आले होते. यादरम्यान 3 कोटी 48 लाख 58 हजार 623 छायाचित्रं काढण्यात आली. हा एक जागतिक विक्रम ठरल्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या वेबसाईटवर घोषित केलं आहे.

भारतीय व्याघ्रगणना विभागाने वाघांची संख्या मोजण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणाच्या चौथा टप्पा हे आतापर्यंतचं सर्वांत व्यापक सर्वेक्षण ठरलं आहे. वापरलेली संसाधनं आणि गोळा केलेली माहिती यांचा विचार केल्यास हे सर्वांत मोठं सर्वेक्षण आहे.

यामध्ये 26 हजार 838 ठिकाणी कॅमेरे(आऊटडोर फोटोग्राफीक डिव्हाईस) बसवून 141 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सुमारे 1 लाख 21 हजार 337 चौरस किलोमीटर भागाचं सर्वेक्षण करण्यात आलं. यादरम्यान एकूण 3 कोटी 48 लाख 58 हजार 623 छायाचित्रं काढण्यात आली.

यात 76 हजार 651 वाघांचे तर 51 हजार 777 बिबट्यांचे फोटो काढले गेले. यामधून भारतात 2461 वाघ असल्याची नोंद झाली आहे. यासाठी विशिष्ट अशा वाघांचे पट्टे ओळखणाऱ्या सॉफ्टवेअरची मदत घेण्यात आली होती, असं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या व्यवस्थापनाने म्हटलं आहे.

देशाचे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत ट्वीट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रीय व्याघ्रगणना विभागाच्या सर्वेक्षणाने आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. प्राण्यांचं सर्वेक्षण करत असताना सर्वाधिक कॅमेरे या सर्वेक्षणात वापरण्यात आल्याबद्दल हा विक्रम नोंदवण्यात आला. भारतासाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आत्मनिर्भर भारताचं हे एक उत्तम उदाहरण आहे, असं जावडेकर म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)