कोरोना व्हायरस: चीनमधल्या या शहरात आता कुत्रा आणि मांजर खाण्यावर बंदी

चीनच्या शेंजेंन शहरामध्ये कुत्रे आणि मांजरींचं मांस खाण्यावर आता बंदी लावण्यात आली आहे. असं करणारं चीनमधलं हे पहिलं शहर आहे.

जंगली प्राण्यांचं मांस खाल्ल्यानेचे कोरोना व्हायरसचा प्रसार सुरू झाल्याचं सांगण्यात येतंय, यादृष्टीनेच हे पाऊल उचलण्यात आलंय.

जंगली प्राण्यांचं मांस खाण्यावर चीन सरकारने बंदी घातली होती. पण याच्याही एक पाऊल पुढे जात शेंजेंन शहरामध्ये कुत्रे आणि मांजरीचं मांस खाण्यावरही बंदी घालण्यात आलीय.

चीनमध्ये दरवर्षी तीन कोटी कुत्र्यांची मांसासाठी कत्तल होत असल्याचं ह्युमेन सोसायटी इंटरनॅशनल नावाच्या संस्थेने म्हटलंय.

कोरोना व्हायरसच्या संसर्गानंतर शरीरात काय बदल होतात?

मांजरीचं मांस खाणं ही गोष्ट चीनमध्येही सामान्य नाही. तिथल्या बहुतांश लोकांनी या प्राण्यांचं मांस पूर्वी कधी खाल्लं नव्हतं, किंवा आता खायची त्यांची इच्छाही नाही.

रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार शेंजेंन सरकारने सांगितलंय, "कुत्रे आणि मांजरी पाळीव प्राणी म्हणून माणसाच्या जवळचे आहेत. आणि पाळीव प्राण्यांचं मांस खाण्यावर विकसित देशांमध्ये आणि हाँगकाँग आणि तैवानमध्ये बंदी आहे. ही बंदी मानवतेला धरून आहे."

प्राण्यांसाठी काम करणाऱ्या ह्युमन सोसायटी इंटरनॅशनलने शेंजेनच्या या निर्णयाचं स्वागत केलंय.

या संस्थेचे तज्ज्ञ डॉ. पीटर ली यांनी सांगितलं, "या निर्णयामुळे हा क्रूर व्यापार थांबण्याच्या दृष्टीने आपण पहिलं पाऊल टाकू. हे ऐतिहासिक ठरेल. कारण चीनमध्ये दरवर्षी एक कोटी कुत्रे आणि 40 लाख मांजरींची मांसासाठी कत्तल होते."

पण या उपाययोजनांसोबतच चीनने कोरोनाच्या रुग्णांवरच्या उपचारांसाठी अस्वलाचं पित्त वापरायलाही परवानगी दिलेली आहे. अस्वलाच्या पित्तात असणाऱ्या अॅसिडचा वापर चीनमध्ये मूतखडा आणि यकृताच्या विकारांवरच्या देशी उपचारांसाठी केला जातो. मग हे पित्त कोरोना व्हायरससाठीही परिणामकारण ठरत असल्याचे पुरावे अद्याप मिळालेले नाहीत.

अॅनिमल एशिया फाऊंडेशन नावाच्या संस्थेचे प्रवक्ते ब्रायन डेली यांनी AFP वृत्तसंस्थेला सांगितलं, "या धोकादायक व्हायरसच्या उपचारांसाठी आपण जंगली प्राण्यांवर अवलंबून रहायला नको, कारण या आजाराचा स्रोत जंगली प्राणीच आहेत."

जंगली प्राण्यांचा बाजार

जंगली प्राण्यांची विक्री आणि त्यांचं मांस खाण्यावर चीन सरकारनने फेब्रुवारीमध्ये बंदी घातली होती.

जंगली प्राणी आणि मांसाची विक्री होणाऱ्या वुहानमधल्या बाजारपेठेतून कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं होतं.

जंगली प्राण्यांद्वारेच हा व्हायरस माणसांत संक्रमित झाला. पण नेमका याचा स्रोत कोणता प्राणी होता आणि माणसामध्ये हा विषाणू कसा आला हे मात्र अजून संशोधकांना शोधता आलेलं नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)