स्वाझीलँड-इस्वानिती : राजाच्या मनात आलं, देशाचं नाव बदललं!

जगात असे फार कमी लोकं असतात, जे आपल्या देशाचं नाव बदलू शकतात. त्यापैकी एक आहेत राजा मस्वाती.

आफ्रिकेतल्या स्वाझीलँडचे राजे मस्वाती तृतीय यांनी नुकतंच आपल्या देशाचं नाव बदलून 'द किंगडम ऑफ इस्वातिनी' असं ठेवलं.

स्वाझीलँड देशाच्या स्वातंत्र्याच्या 50व्या वर्धापनदिनी, राजाने याबाबतची अधिकृत घोषणा केली.

नवीन नावाचा अर्थ

इस्वातिनी या नावाचा अर्थ 'स्वाझी लोकांची भूमी'. गेल्या अनेक वर्षांपासून राजा मस्वाती स्वाझीलँडला इस्वातिनी असंच संबोधित करायचे. पण तरीही हा बदल अनपेक्षित होता.

2017मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सभेत भाषण करताना आणि 2014ला स्वाझीलँडच्या संसदेचं उद्घाटन करताना त्यांनी या नावाचा उल्लेख केला होता.

देशाचं नाव बदलल्यानं तिथले काही लोक मात्र नाराज आहेत.

बीबीसीचे स्वाझीलँडमधले (इस्वातिनी) प्रतिनिधी नोम्स मसेको सांगतात की, "जनतेला वाटतं, की आपल्या राजानं देशाच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर आपलं सगळं लक्ष केंद्रीत केलं पाहिजे."

मस्वाती यांचे वडील सोभुजा द्वितीय यांच्या निधनानंतर मस्वाती यांनी 18व्या वर्षी राज्यकारभाराची सूत्रं हाती घेतली. राजा मस्वाती यांना 15 पत्नी आहेत. त्यांच्या वडिलांनी 82 वर्षं राज्य केलं होतं. त्यांना 125 पत्नी होत्या.

मस्वाती यांना 'सिंह' म्हणून ओळखलं जातं. सरकारी निधीचा वापर ते आपल्या राजवाड्यावर आणि लक्झरी कारवर करतात त्यामुळे त्यांच्यावर टीका देखील होते.

या देशात इंटरनेट वापरण्यास बंदी नाही, पण इथल्या लोकांना इंटरनेट परवडत नाही.

या देशाची लोकसंख्या 13 लाख असून क्षेत्रफळ 17,364 स्क्वेअर किमी आहे. या देशातले बहुतेक लोक दक्षिण अफ्रिकेत काम करतात आणि घरी पैसे पाठवतात. देशात एकाधिकारशाही आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)