मेघालय: जगातल्या सगळ्यांत मोठ्या गुहेत डायनासोरचे अवशेष?

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

नैसर्गिक साधन संपत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या मेघालयाचं नाव जागतिक स्तरावर चर्चेत आलं आहे. जगातली सर्वांत लांब खडकाळ (वालुकाश्म) गुहा ईशान्य भारतातल्या मेघालयात सापडल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

ही गुहा म्हणजे अनेक वैज्ञानिक रहस्यांचं प्रवेशद्वार आहे असं संशोधकांना वाटतं. या गुहेतली रहस्य जाणून घेण्यासाठी बीबीसीचे प्रतिनिधी सौतिक बिस्वास यांनी स्पेलियोलॉजिस्टच्या टीमसोबत (गुहांचा अभ्यास करणारे संशोधक) गुहेला भेट दिली.

"जर तुम्ही आतमध्ये हरवला तर तुमची बाहेर पडण्याची शक्यता धूसर आहे," त्या भयंकर गुहेच्या आत शिरण्यापूर्वी मला ब्रायन डी खारप्रान यांनी मित्रत्वाचा सल्ला दिला. पूर्ण मेघालयात भटकंती करून त्यांनी अनेक गुहा शोधून काढल्या आहेत.

घनदाट जंगलातून सुमारे तासभर चालल्यानंतर आम्ही 'क्रेम पुरी' या गुहेजवळ पोहोचलो. क्रेम पुरीचा खासी भाषेत अर्थ आहे 'अद्भुत किंवा स्वप्नवत गुहा'.

समुद्र सपाटीपासून अंदाजे 4,025 फूट उंचीवर एका उंच खडकाळ कड्यावर या महाकाय गुहेचं तोंड आहे. या गुहेची लांबी 24.5 किमी आणि क्षेत्रफळ 13 चौ. किमी इतकं आहे.

'इमावारी येऊता' या गुहेचं नाव तुम्ही ऐकलं आहे का? फेब्रुवारी 2018 पर्यंत व्हेनेझुएलातल्या या गुहेला जगातली सर्वांत लांब खडकाळ गुहा समजली जात असे. या गुहेची लांबी 18.7 किमी आहे. पण आता क्रेम पुरी ही सर्वाधिक लांब गुहा आहे, याची खात्री झाल्यावर जगभरातल्या भूगर्भशास्त्रज्ञांचं लक्ष या गुहेनं वेधलं आहे.

जगात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या मावसिनरामपासून क्रेम पुरी ही गुहा अगदी जवळ आहे.

गुहेचा शोध कसा लागला?

अशी महाकाय गुहा शोधायची म्हणजे काही एक दोन दिवसाचं किंवा एक दोन वर्षांचं काम नाही. ब्रायन डी खारप्रान यांच्या 26 वर्षांच्या अखंड तपश्चर्येचं हे फळ आहे असंच म्हणावं लागेल. खारप्रान आता 71 वर्षांचे आहेत. ते बॅंकिंग क्षेत्रात काम करत होते. पण राज्यात असलेल्या गुहा शोधण्याचा त्यांनी ध्यास घेतला आणि आता ते हेच काम करत आहेत.

1992 मध्ये जेव्हा त्यांनी गुहा शोधण्याचं काम हाती घेतलं तेव्हा 12-13 गुहांचीच माहिती सर्वांना होती. पण खारप्रान यांना अशा गुहा शोधायच्या होत्या जिथं अजून कुणी पोहचलं नाही.

आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्ञात असलेले भूगर्भशास्त्रज्ञ, जलतज्ज्ञ, जीवशास्त्रज्ञ, पुरातत्त्वशास्त्रज्ञ अशा किमान 30 जणांच्या टीमसोबत काम करून खारप्रान यांनी राज्यातल्या 1650हून अधिक गुहांचा शोध लावला. इतक्या गुहा शोधण्यासाठी त्यांना 26 वर्षं आणि 28 शोधमोहिमा लागल्या.

मेघालयामध्ये भारतातले सर्वांत विस्तीर्ण असं गुहांचं जाळं अस्तित्वात आहे, असं संशोधक सांगतात. भारतामध्ये इतक्या गुहा दुसऱ्या कुठल्याच राज्यात नसाव्यात.

महाकाय गुहेसमोर

ती महाकाय गुहा माझ्यासमोर आ वासून उभी होती. क्रेम पुरीच्या गुहेसमोर मी उभा होतो आणि आत जाण्यासाठी तयार होतो. दिवा असलेली टोपी डोक्यावर घालून, त्या खोल अंधाराच्या गर्तेत मी उडी मारण्यास सज्ज झालो होतो.

त्या तोंडाच्याच डाव्या बाजूला गुहेत जाण्यासाठी एका चिंचोळा रस्ता होता. त्या रस्त्याकडं पाहिल्यावर वाटलं की इथून गेलं तर श्वास गुदमरून जाईल.

या रस्त्यानं जायचं असेल तर तुमच्या जवळ केव्हिंग सूट असणं आवश्यक असतं, कारण गुडघे आणि कोपराच्या जोरावर तुम्हाला पोटावरुन सरपटत जायचं असेल तर केव्हिंग सूट लागणारचं ना. मी तो सूट घातला नव्हता. त्यामुळं असं सरपटत जाण्याचा प्रश्नच नव्हता. मी बाजूला असलेल्या मुख्य रस्त्यानेच जायचं ठरवलं.

मुख्य प्रवेशाजवळ दोन मोठे दगड होते. आतमध्ये जाण्यासाठी माझ्यासमोर दोन पर्याय होते, एक तर दगडांच्या बाजूला असलेल्या फटीतून सरकून आतमध्ये जाणं किंवा दगडांवर चढून आतमध्ये जाणं. मी दोन्ही गोष्टी आजमावून पाहिल्या.

आधी मी फटीतून आत जाण्याचा निर्णय घेतला पण त्या दगडानं माझा घात केला. माझा पाय त्या दगडात अडकला. कसाबसा तो बाहेर काढल्यानंतर त्या दगडावरुन चढून मी आत गेलो. आतमध्ये गेल्यावर करंगळीएवढी पाण्याची बारीक धार डोंगरातून येताना मला दिसली, पावसाळ्यात तर ही धार झऱ्यासारखी वाहत असणार, असा विचार माझ्या डोक्यात आला.

रहस्यमय जग

खारप्रान यांना गुहेत एक भला मोठा कोळी भिंतीवर सरपटताना दिसला. त्याच ठिकाणी भिंतीवर काही ओरखडे दिसत होते. शार्कच्या दातानं भिंतीवर हे ओरखडे काढण्यात आले असावेत असं भूगर्भशास्त्रज्ञ सांगतात. "ही गुहा म्हणजे रहस्यांचा खजिना आहे," असं खारप्रान म्हणतात.

क्रेम पुरी म्हणजे निसर्गानं निर्माण केलेला एक 'भुलभुलैय्या' आहे. ही गुहा सलग लांब नाही. तर या गुहेच्या आत कमी-अधिक लांबी रुंदीचे शेकडो रस्ते आहेत. या रस्त्यांचं एक मोठं जाळं या ठिकाणी आहे. हे जाळं केवळ जाळं न राहता या गुहेच्या क्लिष्ट रचनेमुळं भुलभुलैय्या सारखं वाटतं.

या गुहेत स्टॅलेक्टाइट्स (गुहेच्या छतावरून ओघळ येऊन तयार झालेला चुनखडीचा थर) आणि स्टॅलेगमाइट्स (गुहेच्या जमिनीतून स्रवून तयार झालेला चुनखडीचा थर) आहेत. त्याचबरोबर या गुहेत बेडूक, मासे, वटवाघूळ, कोळी मुबलक प्रमाणात आहे.

नावाच्या गमती-जमती

या गुहेत सर्वेक्षण करणं हे एक आव्हान आहे, असं स्वित्झर्लंडचे स्पेलियोलॉजिस्ट थॉमस अरबेंझ सांगतात.

जेव्हा आपण या गुहेच्या नकाशावर एक नजर टाकतो तेव्हा आपल्याला अरबेंझ यांच्या म्हणण्याची खात्री पटते. हा नकाशाही गुहेप्रमाणेच मोठा आणि अनाकलनीय आहे. सर्वेक्षण करणाऱ्या संशोधकांनी इथल्या भिंतींना, खड्ड्यांना, खडकांना गमतीशीर नावे दिली आहेत. आता हे उदाहरण बघा ना..

'द ग्रेट व्हाइट शार्क', नाव ऐकल्यावर तुमच्या मनात काय येतं?... हा एक करड्या रंगाचा मोठा दगड आहे. तो दगड समुद्रात तरंगणाऱ्या शार्क सारखा वाटतो त्यामुळं त्याचं नाव 'द ग्रेट व्हाइट शार्क' देण्यात आलं आहे.

गुहेमध्ये डायनासोरचं वास्तव्य?

या गुहेमुळं भूगर्भशास्त्रदृष्ट्या महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याचं संशोधकांना वाटतं. इटलीचे संशोधक फ्रॅनसेस्को साउरो सांगतात, "या ठिकाणी आम्हाला शार्कचे दात सापडले आहेत आणि काही हाडं सापडली आहेत. ही हाडं सागरी डायनासोरची असावीत. 6 कोटी वर्षांपूर्वी डायनासोरचं अस्तित्व होतं. काही डायनासोर या ठिकाणी राहिले असावेत असा एक अंदाज आहे. या ठिकाणी अनेक अशा गोष्टी हाती लागल्या आहेत. त्या गोष्टींचं संशोधन केल्यावर अनेक रहस्यं उलगडू शकतील," असं साउरो यांना वाटतं.

दुसरं नाव ऐकून तर धडकी भरू शकते. गुहेच्या आतमध्ये एक रस्ता आहे. तिथं कपाऱ्या आहेत. त्या कपाऱ्या ठिसूळ खडकांपासून बनल्या आहेत. त्या कपाऱ्यांचं नाव माहितीये काय आहे? 'सुसाइड लेज कॅनयन', आता नावचं इतकं सूचक असेल तर त्यावर चालायची हिंमत कोण करणार?

'द टाइट क्रॉल' आणि 'डेंजरस बाउल्डर' ही नावं तर अजूनच सूचक वाटली.

या गुहेत एक जागा आहे. ती जागा मला खूप महत्त्वपूर्ण वाटली. या जागेचं नाव आहे 'स्लिपी लंच'. दिवसभर काम करून थकलेले संशोधक या ठिकाणी बसून जेवण करतात आणि थोडा आराम करतात. त्यांच्यापैकी एका जण खरंच पेंगत होता. मनात विचार आला चला याने तर या जागेचं नाव सार्थ ठरवलं.

क्रेम पुरीच्या गुहेत माणसांचं वास्तव्य होतं का?

या ठिकाणी मानवाचं वास्तव्य होतं का? असा प्रश्न मी संशोधकांना विचारला. कारण जेव्हा माणूस शिकार करून जगत होता त्या वेळी त्याची पसंती अशाच सुरक्षित गुहांना असे. तसेच थंडी, ऊन आणि वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी गुहेपेक्षा अधिक चांगला निवारा काय असू शकतो?

काही गुहा पूर आल्यावर सुरक्षित नसतात. कारण पुरामुळं पाणी तिथंच साचून राहू शकतं. मेघालयातल्या गुहा तशाच वाटतात त्यामुळं इथं मानवाचं वास्तव्य नसावं असं संशोधकांना वाटतं.

मेघालयातच का झाली असावी या गुहांची निर्मिती?

या गुहेचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ही गुहा वालुकाश्मापासून बनली आहे. साधारणतः गुहांची निर्मिती चुनखडी झिजल्यामुळे होत असते.

पावसाचं पाणी आणि कार्बन डॉयऑक्साइडसोबत रासायनिक क्रिया घडल्यावर त्यातून आम्ल तयार होतं. त्या आम्लामुळेच खडकाचं विघटन होतं. वालुकाश्मापासून गुहा तयार होणं ही गोष्ट दुर्मीळ आहे कारण खडकांची विघटनाची प्रक्रिया संथ असते. खडकांच्या विघटनासाठी आणि भूमिगत पोकळी तयार करण्यासाठी खूप पाण्याची आवश्यकता असते.

"जगातील सर्वांत जास्त पाऊस पडणाऱ्या जागांपैकी मेघालय एक आहे. पाणी मुबलक प्रमाणात असल्यामुळं वालुकाश्मांपासून मेघालयात गुहा तयार होणं ही काही फार विस्मयकारक घटना आहे असं आम्हाला वाटत नाही," असं काही संशोधक म्हणतात.

विज्ञानाच्या कोणत्या रहस्यांची यामुळं उकल होईल?

"क्रेम पुरीसारख्या गुहा म्हणजे जुन्या काळातलं वातावरण आणि जीवसृष्टी कशी होती हे जाणण्याची गुरूकिल्ली आहे असं संशोधक म्हणतात. एका अर्थानं या गुहा 'टाइम मशीन' सारख्या आहेत. त्या काळातलं वातावरण त्यांनी आपल्या उदरात सुरक्षितपणे जपून ठेवलं आहे आणि त्यांची उकल आता आहे," असं सायमन ब्रुक्स म्हणतात. सायमन ब्रुक्स हे 'केव्हिंग इन द अबोड ऑफ क्लाउड्स एक्सपेडिशन' या समूहाचे समन्वयक आहेत. हा समूह मेघालयातल्या गुहांवर संशोधन करत आहे.

ही गुहा म्हणजे अनंतकाळापासून पृथ्वीच्या पृष्ठभागावर घडलेल्या घटनांचा संग्रह आहे असं संशोधक म्हणतात. कारण पृथ्वीनं अनेक स्थित्यंतर पाहिली आहेत. अनेक नैसर्गिक घटना जसं की- बर्फाच्छादित जमीन, जिवंत ज्वालामुखी आणि पूर पृथ्वीनं पाहिले आहेत. त्यांचा अभ्यास करायचा असेल तर या गुहेची खूप मदत होऊ शकते असं संशोधक म्हणतात.

मेघालयातल्या गुहांचं संशोधन करण्याची इच्छा जगभरातल्या संशोधकांना होत आहेत. जगभरातून संशोधक येऊन इथं मुक्काम ठोकून बसत आहेत. मेघालयामध्ये भारतातली सर्वाधिक लांब गुहा आहे. या गुहेची लांबी 31.1 किमी आहे. ही गुहा सर्वसाधारण आहे, वालुकाश्माची नाही. या गुहेचं नाव 'लियात प्राह' आहे. या ठिकाणी देखील अभ्यासक येत आहेत.

काही गुहा प्रचंड मोठ्या आहेत, इतक्या मोठ्या की त्यांच्या उदरात नद्यांचं वास्तव्य आहे. एक गुहा 317 मीटर खोल आहे. ही सर्वांत खोल गुहा आहे.

या गुहांमध्ये कॅलसाइट सापडतं. कॅलसाइट हा चुनखडीपासून बनलेला आणि स्फटिकांप्रमाणे दिसणारा पदार्थ असतो. "या कॅलसाइटचं सौंदर्य भुरळ घालणारं आहे," असं अरबेंझ यांचं म्हणणं आहे.

अश्मयुगात किंवा त्या आधी या गुहांमध्ये मानवी वास्तव्याचे पुरावे आढळले नसले तरी मध्ययुगाच्या काळात या गुहा आक्रमकांपासून संरक्षणासाठी वापरण्यात आल्या याचे पुरावे आढळले आहेत. तसेच या गुहांचा वापर दफन करण्यासाठी पण झाला असं संशोधक म्हणतात.

राज्यात कोळसा आणि चुनखडी उत्खनन या व्यवसायाने जोर धरला आहे. या उत्खननांचा धोका मेघालयातल्या गुहांना आहे. (हा धोका ओळखून खारप्राण यांनी 2007मध्ये सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली होती. पण कोळसा उत्खनन काही थांबलं नाही.)

क्रेम पुरीच्या गुहेमधलं वातावरण हे आल्हाददायक असतं. बाहेर कितीही तापमान असो पण गुहेतलं तापमान नेहमी 16-17 डिग्री असतं. या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता नाही कारण गुहेला असणाऱ्या छोट्या फटीतून नेहमी हवा खेळती राहते.

पण असं असलं तरी, गुहेमध्ये स्वतःची काळजी घेणं आवश्यक असतं हे खारप्रान सांगतात. ते म्हणतात, "जेव्हा तुम्ही गुहेमध्ये असता तेव्हा काळजी घेणं आवश्यक असतं, कारण या ठिकाणी असल्यावर कुठलाच धोका तुम्ही पत्करू शकत नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)