You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दृष्टिकोन : 'मोदी तासन् तास स्वत:ची स्तुती करतात आणि स्वतःला फकीर म्हणवतात'
- Author, परवेज आलम
- Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी लंडनहून
नरेंद्र मोदी कमालीचे शो मॅन आहेत. लंडनमध्ये वेस्टमिन्स्टरच्या सेंट्रल हॉलमध्ये 'भारत की बात, सबके साथ' या कार्यक्रमात दोन तास वीस मिनिटांमध्ये त्यांनी लेखाजोखा मांडला. सगळा कार्यक्रम ठरवून केल्यासारखा वाटत होता.
कार्यक्रमात प्रत्येक गोष्ट, कधी काय होणार आहे, काय प्रश्न असतील, हे आधीपासूनच ठरलेलं दिसत होतं. कोणतीही समजूतदार व्यक्ती त्याचा अंदाज लावू शकत होती.
कार्यक्रमात त्यांची मुलाखत गीतकार प्रसून जोशी घेत होते. त्यांनी पण चांगला अभिनय केला. त्यांनी असे प्रश्न विचारले की, पंतप्रधान मोदी अगदी गहिवरून गेले.
कार्यक्रमात पंतप्रधानांनी प्रगतीपुस्तक सादर केलं. त्यात अनेक गोष्टींचा उल्लेख केला. पाकिस्तानबद्दल ते असं बोलले जे आपण पहिल्यांदाच ऐकलं.
त्यांच्या बोलण्यातून निवडणुकीच्या तयारीची झलक दिसत होती. त्यांनी कर्नाटकातल्या लिंगायतांचे गुरू बसवेश्वरांचा उल्लेख केला. त्यांच्या पुतळ्याजवळसुद्धा ते गेले.
पंतप्रधान मोदी मॅचो मॅनसारखे बोलतात, जसं सलमान खान दबंगसारखा बोलतो.
कार्यक्रमात बोलताना त्यांनी अशा गोष्टी सांगितल्या ज्यावरून असं वाटेल की, त्यांनी किती काम केलंय. खरं तर भारत पाकिस्तानसमोर जितका वाकला आहे तितका आतापर्यंत कधीच नव्हता, असं एका बाजूला टीकाकार सांगतात.
देशात दहशतवाद वाढलाय, काश्मीरमध्ये हिंसाचार वाढलाय. कथित सर्जिकल स्ट्राईकच्या आधी आणि नंतर अशा अनेक घटना घडल्या. पण नरेंद्र मोदी इथे बोलताना असं बोलले की, जणू पाकिस्तानने भारतासमोर गुडघेच टेकले आहेत.
रंग माझा वेगळा
देशातल्या बलात्काराच्या घटनांवर त्यांनी मौन सोडलं. पण खूप वेळानंतर. पंतप्रधान नरेंद्र मोदी छोट्या छोट्या गोष्टींवर ट्वीट करतात, पण संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बलात्काराच्या घटनांवर ते काहीही बोलले नाही.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कोणत्याही कामाबद्दल बोलताना ते काम आपणच पहिल्यांदा केलं, असा त्यांचा आविर्भाव असतो. अरब आणि इस्राईल या दोन्ही देशांच्या दौऱ्यांचा प्रचारही त्यांनी असाच केला होता.
आपला मुद्दा मांडण्याची त्यांची शैली अत्यंत प्रभावशाली आहे. आवाजातला चढ-उतार ते छान सांभाळतात. त्यांचा कितीही मोठा टीकाकार असला, तरी तो त्यांचं बोलणं ऐकतोच.
एवढ्या खुबीनं आपण केलेल्या कामांची स्तुती आपणच करून लोकांसमोर मांडणारा पंतप्रधान विरळाच! लंडनमधल्या कार्यक्रमात त्यांना विचारलेले प्रश्नही त्यांची प्रशंसा करणारेच होते.
प्रश्न विचारणारे ठरवल्यासारखं प्रश्न विचारत होते आणि सभागृहातली प्रत्येक व्यक्ती त्यांची स्तुती करत होती. त्याच वेळी बाहेर मात्र त्यांच्याविरोधात निदर्शनं सुरू होती.
'मोदीनामा'चा जप मोदीमुखातूनच
हा कार्यक्रम म्हणजे मोदींनी स्वप्रतिमा जास्तीत जास्त ठळक करण्याचा प्रयत्न होता. एखादा माणूस स्वत:विषयी इतका वेळ कसं काय बोलू शकतो, हेदेखील आश्चर्यच आहे.
मोदींची खासियत म्हणजे एकीकडे आत्मस्तुतीचा डोंगर उभा करताना दुसऱ्या बाजूला स्वत:कडे एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून पाहण्याची कसरतही ते करतात. 'मी असा, मी तसा', असं सांगताना ते दुसऱ्या बाजूला असंही म्हणतात की, मी एक सामान्य माणूस आहे, चहावाला आहे आणि माझे विचार फकिरी आहेत इत्यादी इत्यादी...
प्रश्न हा आहे की, एखादा सामान्य माणूस तासन् तास स्वत:चं गुणगान कसं गात बसू शकतो?
त्यांचे जितके समर्थक होते त्यापेक्षा कितीतरी अधिक लोक त्यांच्या विरोधात होते. विरोधकांमध्ये अनेक महिलांचा समावेश होता. त्यांनी बलात्काराच्या घटनांविरुद्ध शांततेत निदर्शनं केली.
त्याचवेळी 'नरेंद्र मोदी शेम शेम' च्या घोषणा दिल्या.
त्यांच्या विरोधात निदर्शनं करणाऱ्या रश्मी वर्मा युनिव्हर्सिटी ऑफ वॉरिकमध्ये शिकवतात. बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "पंतप्रधान म्हणून हा मोदी यांचा दुसरा दौरा आहे. त्यांच्या कार्यकाळात महिला, दलित, अल्पसंख्याकांविरुद्ध जी हिंसा झाली त्याचा विरोध करण्यासाठी मी आले आहे."
मोदीच्या समर्थनार्थ उतरलेल्या एका महिलेने बीबीसीला सांगितलं, "आम्ही मोदींना पाठिंबा द्यायला आलोय. ते देशाला पुढे घेऊन जात आहोत. काँग्रेसनं इतकं काम केलं नाही जितकं मोदींनी केलंय. ते कोणताही गाजावाजा न करता शांततेत काम करतात. परदेशात असूनही इतके लोक मोदींच्या पाठिशी आहेत हे अद्भूत आहे."
देशात झालेल्या बलात्कारासारख्या घटनांवर बोलण्यासाठी ते लंडनसारखी जागा निवडतात. ते सांगतात की देशात जो काही विकास झाला आहे तो त्यांनीच केला आहे. या आधी असं कधीच झालेलं नाही.
ते परदेशात देशाची प्रतिमा तयार कण्याचा दावा करतात खरा, पण वस्तुस्थिती अशी आहे की, त्यांच्या वक्तव्यांमुळे देशाची प्रतिमा बिघडत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)