You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दृष्टिकोन : उत्तर कोरियाने अण्वस्त्र चाचण्या थांबवणे हा ट्रंप यांचा विजय की ट्रंपना शह?
- Author, अंकित पांडा
- Role, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक
यापुढे क्षेपणास्त्रांच्या चाचण्या तसंच अण्वस्त्र चाचणी केली जाणार नाही, अशी घोषणा केली उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांनी केली. पुढच्या आठवड्यात दक्षिण कोरिया आणि जूनमध्ये अमेरिका भेटीच्या पार्श्वभूमीवर ही घटना महत्त्वपूर्ण समजली जात आहे. या घटनेवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि द डिप्लोमॅटचे वरिष्ठ संपादक अंकित पांडा यांनी केलेलं हे विश्लेषण.
किम जाँग उन यांनी अण्वस्त्र चाचण्या थांबवण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर सर्वांनी या घटनेचं स्वागत केलं आहे. या घटनेमुळं माध्यमांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अर्थातच त्यांच्यासाठी ही एक मोठी हेडलाइनची बातमी आहे. पण उत्तर कोरियाचा इतिहास पाहता आपला सर्वांचा हिरमोड होण्याची शक्यता अधिक दिसत आहे.
उत्तर कोरियात पुंगये-री या ठिकाणी होत असलेल्या अण्वस्त्र चाचण्या थांबवण्याचा निर्णय किम जाँग उन यांनी घेतला आहे. पहिली गोष्ट म्हणजे, त्यांना आता चाचण्या घेण्याची गरज उरली नसावी.
2006पासून त्यांनी 6 चाचण्या घेतल्या आहेत आणि आता उत्तर कोरियानं या क्षेत्रात बऱ्यापैकी पाय रोवले आहेत. या घोषणेची सत्यता पडताळून पाहण्याचा आपल्याकडे दुसरा मार्ग देखील नाही. कदाचित ही घोषणा अतिशयोक्तीपूर्ण देखील असू शकते.
जरा विचार करा, भारत आणि पाकिस्ताननं 1998पर्यंत सहा चाचण्या घेतल्या होत्या. त्यानंतर त्यांना चाचण्या घेण्याची आवश्यकता उरली नाही. तरीही त्यांच्याकडे असणाऱ्या अण्वस्त्र साठ्यात वाढ झालीच ना!
गेल्या कित्येक वर्षांपासून उत्तर कोरियानं अण्वस्त्राच्या क्षेत्रात काम केलं आहे. तेव्हा आता त्यांना आपल्या क्षमतेवर विश्वास निर्माण झाला असेल. त्यांच्याजवळ त्या बद्दलचं ज्ञान आलं असेल त्यामुळं आता खुल्या चाचण्या घेण्याची गरज उरली नाही, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा.
पाचवी आणि सहावी चाचणी याबाबतीत महत्त्वपूर्ण समजली जाते. 2016 आणि 2017मध्ये त्यांनी एक कॉम्पॅक्ट अण्वस्त्र तयार केलं होतं, अशी माहिती उत्तर कोरियाच्या न्यूज एजन्सीनं दिली होती. कुठल्याही प्रकारच्या क्षेपणास्त्रामध्ये हे अण्वस्त्र बसवता येतं, असं त्यांनी म्हटलं होतं.
अमेरिकेनं दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी नागासाकीवर जो अणूबाँब टाकला होता त्याहून दुप्पट किंवा तिप्पट विध्वंसक शक्ती या अण्वस्त्रामध्ये आहे, असा अंदाज काढण्यात आला होता.
उत्तर कोरियाची अण्वस्त्र निर्मिती करण्याची क्षमता चांगली आहे, हेच या चाचण्यांमधून दिसून आलं. पण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात मारा करू शकतील इतक्या क्षमतेची क्षेपणास्त्रं उत्तर कोरियाकडे आहे की नाही यावर शास्त्रज्ञांचं एकमत झालेलं नाही.
किम जाँग उन यांनी नुकतीच चीनला भेट दिली. आपण एक नवी सुरुवात करत आहोत, असा संकेत त्यांनी या भेटीतून दिला. त्याच प्रमाणे अण्वस्त्र चाचणी बंदीची घोषणा देखील एक राजकीय संकेत असावा. आपल्या क्षमतांची जाणीव झाल्यानंतर निर्माण झालेला हा आत्मविश्वास देखील असू शकतो.
आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या चाचण्यांवर बंदी
आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या चाचण्या थांबवण्याचा निर्णय किम जाँग उन यांनी घेतला आहे. हे थोडं धक्कादायक आहे कारण, त्यांनी अण्वस्त्राच्या चाचण्या घेतल्या पण ती अण्वस्त्र ज्या क्षेपणास्त्रांमध्ये न्यावी लागतील त्याच्या चाचण्या त्यांनी घेतल्या नाहीत.
अमेरिकेवरही हल्ला करता येण्याइतकी सक्षम क्षेपणास्त्रं आमच्याकडं आहेत, असं किंग जाँग उन म्हणाले होते. पण या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची तितकी क्षमता आहे की नाही याबाबत कुणालाच काही माहिती नाही.
कदाचित उत्तर कोरियाच्या मनात काहीतरी दुसरं असावं. अमेरिकेला घाबरवण्यासाठी जे काही करता येईल ते मात्र त्यांनी केलं. सध्या त्यांच्याकडे ताफ्यात फक्त 6 आंतरखंडीय क्षेपणास्त्रं आहेत.
अण्वस्त्रांची चाचणी घेण्याचा आपला कार्यक्रम पूर्ण झाला, असं त्यांनी आपल्या नववर्षाच्या भाषणात म्हटलं होतं. पण आपली आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची क्षमता वाढवण्यासाठी ते प्रयत्न करत असावेत, याची शक्यता कुणी नाकारू शकत नाही. तसेच ते आण्विक नियंत्रण प्रणालीवर काम करत असावेत, ही शक्यता देखील नाकारता येत नाही.
अर्थात या सर्व गोष्टी पाहता, अण्वस्त्र चाचणी थांबवण्याच्या निर्णयामुळं त्यांचं फार मोठं नुकसान झालं, असं म्हणता येणार नाही.
कधीही बंदी उठवू शकतात
अण्वस्त्र चाचणी बंदीच्या घोषणेला तेव्हाच वजन प्राप्त झालं असतं जेव्हा त्यांनी पुंगये-रीची भूमीगत न्युक्लियर साइट पूर्णपणे नष्ट केली असती. पण त्यांनी ही साइट पूर्णपणे उध्वस्थ केली नाही तर फक्त निकामी केली आहे.
जोपर्यंत त्यांच्याजवळ अण्वस्त्रं आहेत तोपर्यंत ते स्वतःवर घातलेली बंदी केव्हाही उचलू शकतात. 1999मध्ये त्यांनी क्षेपणास्त्र चाचणीवर बंदीचं वचन दिलं होतं आणि 2006मध्ये ते मोडलं होतं.
यातून एक दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट समजण्यासारखी आहे, की उत्तर कोरियावर असलेल्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळं त्यांना व्यवसाय उद्योग करणं कठीण झालं आहे. त्यांच्या या घोषणेमुळं उत्तर कोरियावरील निर्बंध उठून प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
यापुढं आर्थिक प्रगतीवर लक्ष केंद्रित केलं जाणार असं त्यांनी आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे. जूनमध्ये होणाऱ्या अमेरिकेसोबतच्या शिखर परिषदेमध्ये ते आंतरराष्ट्रीय निर्बंध शिथील करण्यात यावेत, अशी मागणी करू शकतात.
सध्या फक्त अण्वस्त्र कार्यक्रमावर बंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्याकडे अस्तित्वात असलेली अण्वस्त्र नष्ट करण्याबाबत त्यांनी काहीच सांगितलं नाही.
उत्तर कोरियाला आपलं लक्ष आर्थिक प्रगतीवर केंद्रित करायचं आहे. त्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे असं म्हटलं जात आहे.
डोनाल्ड ट्रंप आणि किम जाँग उन यांची जूनमध्ये भेट होणार आहे. ही भेट डोळ्यांसमोर ठेऊनच किम जाँग उन यांनी हा निर्णय घेतला आहे.
किम जाँग उन यांच्या आजोबांना आणि वडिलांना जे शक्य झालं नाही ते किम जाँग उन यांना साध्य होईल का, याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या बाजूला बसल्यानेच त्यांना बरंच काही साध्य करता येण्यासारखं आहे.
अण्वस्त्रांच्या कार्यक्रमामुळं उत्तर कोरियाला स्वतःच्या संरक्षणाची हमी मिळाली आहे. अशा परिस्थितीमध्ये ते अण्वस्त्रांचं निशस्त्रीकरण करू शकत नाही. किम जाँग उन यांची घोषणा या पार्श्वभूमीवर पोकळ वाटत आहे.
ट्रंप यांनी किंग जाँग उन यांच्या घोषणेचं स्वागत केलं आहे. पण ते जितक्या लवकर किंग जाँग उन यांची खेळी समजतील, तितकं ते त्यांच्यासाठी चांगलं आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)