You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ग्राउंड रिपोर्ट : मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात शेतकरी आत्महत्या : काय खरं काय खोटं?
- Author, नीतेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी, यवतमाळहून
मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावातील शेतकरी माधव रावते यांनी स्वतःच सरण रचून आत्महत्या केली अशी बातमी वर्तमानपत्रांत छापून आली होती. यासंबंधीचा बीबीसी मराठीचा ग्राउंड रिपोर्ट. यवतमाळ आणि नांदेड या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणारं सावळेश्वर गाव. गावाची लोकसंख्या चार हजारच्या जवळपास आहे. फारसं चर्चेत नसणारं हे गाव आता देशपातळीवर चर्चेत आलंय. गावात पोहोचण्यापूर्वी रस्त्याची वाईट अवस्था दुर्गम स्थळी आल्याची जाणीव करून देते.
माधव रावते यांच्या घराचा पत्ता विचारल्यानंतर ग्रामस्थ सिद्धार्थ पोपुलवार त्यांच्या घरापर्यंत घेऊन गेले. गावामध्ये पसरलेली शोककळा गावातल्या भयाण शांततेतून स्पष्टपणे दिसून येत होती. थोडं चालल्यानंतर माधव यांच्या घरापर्यंत येऊन पाहोचलो.
बाहेरच्या दोन खोल्या विटांच्या आणि आतल्या दोन खोल्या मातीच्या असं हे चार खोल्यांचं घर. घराबाहेरचा चपलांचा खच घरातल्या परिस्थितीची जणीव करून देत होत्या.
काय झालं त्या दिवशी ?
घरापासून काही अंतर चालत गेल्यावर माधव यांचं शेत येतं. याच शेतामध्ये त्यांनी स्वतःच सरण रचलं आणि आत्महत्या केली, असं सांगतात.शेतकरी माधव रावते यांच्याकडे चार एकर इतकी शेतजमीन होती. बोंड अळीनं पऱ्हाटीचा (कापसाचा) घात केला. सोयाबीनचं उत्पन्नही फसलं. त्यातच मार्च महिन्यात मुलीचं लग्न झालं. या आर्थिक विवंचनेतून माधव यांनी पऱ्हाटीचा ढीग रचून स्वतःला आगीत झोकून दिलं.
14 एप्रिलला दुपारच्या 12च्या दरम्यान त्यांनी स्वतःच सरण रचलं. दोन दिवसांनंतर माधव यांनी आत्महत्या केल्याची बातमी स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली. त्यानंतर ही आत्महत्या नसून अपघात असल्याची सारवासावर प्रशासनाकडून होऊ लागली. माधव यांचा मुलगा गंगाधर रावते यांना आम्ही भेटलो तेव्हा ते संभ्रमात होते. वडिलांच्या आत्महत्येसंदर्भात ते काहीच बोलायला तयार नव्हते. या चार दिवसांमध्ये नेमकं असं काय झालं असावं की, ते काहीच बोलायला तयार नाहीत असा प्रश्न आम्हाला पडला. पण त्यांच्या चेहऱ्यावर दबाव स्पष्ट जाणवत होता. ते म्हणाले, "त्या दिवशी अचानक सगळीकडे धावपळ झाली. बाबा शेतातील ढिगाऱ्यामध्ये जळाले असं माझ्या मित्रानं सांगितलं आणि मी शेताच्या दिशेने पळतच सुटलो. घटनास्थळी पोहोचल्यावर तिथली परिस्थिती पहिली आणि जीवाचा थरकाप उडाला."
- सौदी अरेबियात सिनेमाला अचानक कशी काय परवानगी मिळाली?
- 'आज आमच्याकडे कुठलीही बातमी नाही!' : 88 वर्षांपूर्वीचा बीबीसीतला तो दिवस!"मी तिथे नसल्यामुळे नेमकं काय झालं हे सांगू शकत नाही", लगेच त्यांनी स्पष्ट केलं. वडील कसल्या चिंतेत होते असं विचारल्यावर गंगाधर म्हणाले, "वडिलांच्या वागण्यावरून ते आत्महत्या करतील असं कधीच वाटलं नाही. पण ते चिंतेत असायचे."
गंगाधर शेतीच करतात. त्यांना 5 मुली आणि 1 मुलगा आहे . मृत माधव यांच्या पत्नी अनुसूया अजूनही दुःखातून बाहेर पडलेल्या नाहीत. पती गेले हे कळल्यानंतर त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे.
प्रशासन म्हणतं, आत्महत्या नव्हे अपघात
तहसीलदार भगवानदास कांबळे यांनी 14 एप्रिलला माधव यांनी आत्महत्या केल्याचा अहवाल दिला. पण नेमकी आत्महत्या कशामुळे झाली यावर ते ठाम नाहीत. त्यांनी सांगितलं की, "पोलिसांच्या चौकशीमध्ये आत्महत्या की अपघात हे स्पष्ट होईल. पण रावते यांना कर्जमाफी मिळाली होती आणि त्याबद्दल त्यांना माहिती होतं. याशिवाय स्प्रिंकलरची सबसिडी त्यांना मिळाली होती. त्यांच्या खात्यात साडे बारा हजार रुपये कृषी विभागाकडून जमाही झाले होते. त्यामधून दहा हजाराची उचलही घेतलेली होती". "कर्जमाफी मिळाली. त्यामुळे ही शेतकरी आत्महत्या नाही, असा प्रशासनाचा समज आहे. पण शेतमालाला भाव नाही आणि बोंडअळीने फस्त केलेली पऱ्हाटी, घरखर्चासाठी नसलेला पैसा या विवंचनेतून आत्महत्या होऊ शकते हे प्रशासन मानायला तयार नाही," असं ग्रामस्थ कोंडबाराव रावते म्हणतात.
ग्रामस्थ म्हणतात प्रशासनाचा दबाव
मुख्यमंत्री आदर्श गाव बळीराजा चेतना अभियानांतर्गत हे गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलं आहे. काही दिवसापूर्वीच केंद्रीय ग्रामीण विभागाकडून 'मॉडेल बेस प्रधानमंत्री दत्तक गाव' म्हणून या गावाची निवड करण्यात आली आहे. सावळेश्वर, करंजी, मन्याळी ही तीन गावं मॉडेल म्हणून निवडण्यात आली आहे. तरीही गावामध्ये पर्यायी सोयी-सुविधांचा अभाव असल्याचं गावकरी सांगतात.
ग्रामस्थ सिद्धार्थ पोपुलवार यांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ते सांगतात की, "ते शेतकरी कुटुंब प्रचंड दहशतीमध्ये आहे. मुलावर प्रशासनाने दबाव टाकलाय. कारण हे गाव केंद्र सरकारनं आणि मुख्यमंत्रांनी दत्तक घेतलेलं गाव आहे". आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी तंबाखूची पुडी, चष्मा, काठी, चप्पल बाजूला काढून ठेवली होती. आगीमधून बाहेर पडणं सहज शक्य होतं. पण प्रशासन ही आत्महत्या आहे, मानायलाच तयार नाही," असं ते पुढे सांगतात.
पोलिसांचं म्हणणं काय?
बिट्टरगाव पोलीस स्टेशनचे API राजपूत यांच्याशी आम्ही संपर्क साधला तेव्हा त्यांनी माधव यांनी आत्महत्या केली नसल्याचं सांगितलं. "माधव यांचा मृत्यू म्हणजे आत्महत्या असल्याचं सध्यातरी आमच्या निदर्शनास आलेलं नाही. रावते यांच्या मुलाच्या जबाबातही आत्महत्येचा उल्लेख नाही. आत्महत्येच्या आधी वडिलांनी घरामध्ये कर्जबाजारी आहे, जीव द्यावासा वाटतो, असं कधी सांगितल्याचा उल्लेख नाही. त्यांच्यावर असलेलं साठ हजाराचे कर्जही माफ झालं होतं. त्यामुळे आतापर्यंतच्या तपासामध्ये कुठेही शेतकरी आत्महत्या असल्याचं दिसून येत नाही. बिडी पेटवताना तुऱ्हाटीच्या गंजीला आग लागून झोपेतच भाजून त्यांचा मृत्यू झाला असावा असं सध्याच्या परिस्थितीवरून आम्हाला वाटतंय," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार यांनी शेतकरी माधव रावते यांच्या आत्महत्या प्रकरणाला वाचा फोडली. हा अपघात नसून आत्महत्या असल्याचा दावा त्यांनी केला आहे. देवानंद पवार हे शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी लढतात. "भारत देश कृषिप्रधानावरून फाशीप्रधान असल्याची जाणीव व्हायला लागली आहे. वर्तमान काळात समस्त शेतकरी वर्गाचे जीवन शासकीय धोरणांमुळे एवढे बिकट झाले आहे की त्यांना या खडतर आयुष्यापेक्षा मरणयातना प्रिय वाटू लागली आहे. त्यामुळेच शेतकरी आपलेच सरण रचून आत्महत्या करत आहेत," असं पवार सांगतात.
पुढे बोलताना ते सांगतात "माधव शंकर रावते यांच्या कुटुंबाकडे अवघी चार एकर कोरडवाहू शेती आहे. संपूर्ण कुटूंब शेतीवरच अवलंबून आहे. नापिकीमुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत घसरण झाली. स्टेट बँकेचे 60 हजारांचे कर्ज थकले. ते कसे फेडावे या विवंचनेतच ते होते. गुलाबी बोंडअळीमुळे चार एकरात अवघा 3 क्विंटल कापूस झाला. सरकारने जाहीर केलेली गुलाबी बोंडअळीच्या नुकसानभरपाईची रक्कम त्यांना मिळाली नाही. त्यामुळे आता कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा असा प्रश्न त्यांना पडला. त्यामुळे नैराश्य आलेल्या वृद्ध शेतकऱ्याने शेतातील पऱ्हाटीचे सरण रचून ते पेटवून त्यात स्वत:ला झोकून दिलं."
मुख्यमंत्री दत्तक ग्राम असल्याने ही शेतकरी आत्महत्या नाही हे सिद्ध करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी यावर पत्रकार परिषद घेतली. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत करण्याऐवजी ती शेतकरी आत्महत्या नाही हे सिद्ध करण्याचा ते आटापीटा करत आहेत.जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनीही ही शेतकरी आत्महत्या नसल्याचं म्हटलं आहे. "देवानंद पवार, नाना पटोले हे नेते शेतकरी आत्महत्येचं भांडवल करत आहेत. धडक सिंचन विहीर योजना शासन राबवत आहे. जलयुक्त शिवार योजनेचे कामे झाली आहेत. मागेल त्याला शेततळे या योजनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात विक्रमी शेततळी आम्ही दिली आहेत. येणाऱ्या काळात हीच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणार आहे. तसंच हमी भावाने खरेदी सुरू आहे," असं येरावार यांनी सांगितलं.
आत्महत्येचं राजकारण
शेतकरी आत्महत्येवर आता राजकारण सुरू झालं आहे. माधव यांची आत्महत्या नसून त्यांचा अपघाती मृत्यू असल्याचा भाजपचे आमदार राजेंद्र राजरधने यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. प्रशासनामार्फत आत्महत्या नसून अपघात आहे हे स्पष्ट करणारी महाराष्ट्रातली ही पहिलीच पत्रकार परिषद असावी. आमदार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
या संपूर्ण प्रकरणावर बोलताना आमदार राजेंद्र नजरधने म्हणाले की, "त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता. त्यांच्याकडे कुठलंच कर्ज थकीत नाही, शिवाय स्प्रिंकलरची सबसिडीही त्यांना मिळाली होती. त्यामुळे आत्महत्येचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेस यावर विनाकारण राजकारण करतंय. कुठेतरी एक जण मरतो आणि काँग्रेस त्यावर राजकारण करतं. त्यांच्या कुटुंबाच्या जबाबातही आत्महत्या केली असं म्हटलेलं नाही."यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरू झालंय. काही दिवसापूर्वीच शंकर चायरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आत्महत्येस जबाबदार असल्याची चिट्ठी लिहून आत्महत्या केली होती.
शेतकरी माधव यांचा अपघात की आत्महत्या हे चौकशीमध्ये स्पष्ट होईलच. मात्र गावकरी ही आत्महत्या असल्याचं सांगत आहेत. प्रशासन मात्र हा अपघात असल्याचं स्पष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)