बीबीसी इतिहास - 'आज आमच्याकडे कुठलीही बातमी नाही!' : 90 वर्षांपूर्वीचा तो दिवस

"आज आमच्याकडे कुठलीही बातमी नाही."

ही स्क्रिप्ट होती 18 एप्रिल 1930ला रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी प्रसारित झालेल्या बीबीसी न्यूजच्या बातमीपत्राची.

विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. ही एक ओळ बुलेटिनच्या निवेदकाने वाचली आणि त्यानंतर 15 मिनिटांच्या या सेगमेंटमध्ये फक्त पिआनो संगीत वाजत होतं.

आज 90 वर्षांनंतर, जेव्हा जगभरात क्षणाक्षणाला घडामोडी घडत असतात आणि इंटरनेटमुळे जगभरात एकाच वेळी बातम्या प्रसारित होत असतात, अशा एखाद्या रटाळ दिवसाची कल्पना करणंही कठीण आहे.

पण हो. असा दिवस खरंच होता, जेव्हा निवेदकांवर श्रोत्यांना असं सांगण्याची वेळ आली की आज आमच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही. त्या 15 मिनिटांच्या सेगमेंटनंतर प्रसारण पुन्हा लंडनमधल्या लँग्हम प्लेसच्या क्वीन्स हॉलमध्ये परतलं, जिथे एक ऑपरा सादर केला जात होता.

त्या दिवशी काय काय प्रसारित झालं? ऐका संपूर्ण कार्यक्रम इथे

आज खरंच काळ किती बदलला आहे ना! त्या 18 एप्रिलच्या तुलनेत आजची, 18 एप्रिल 2020 गोष्ट किती वेगळं आहे ना? लागोपाठ जगभरातून बातम्यांचा प्रवाह सुरू आहेच.

तुम्हीच पाहा ना, कोरोना लॉकडाऊनमुळे जग जरासं थांबल्यासारखं असलं तरी, अमेरिकेपासून ते पालघर पर्यंत, सगळीकडेच बातम्यांचा ओघ सुरूच आहे. तुम्ही आमचा हा लाईव्ह ब्लॉग पाहिला की तुम्हालाचा अंदाज येईल आजचा दिवस शनिवार, त्यातच लॉकडाऊन असला, तरीसुद्धा किती व्यग्र ठेवणारा आहे.

हा बातम्यांचा झरा दिवसभर असाच वाहत राहणार आहे.

1930चा विचार केल्यास सद्यस्थितीला बीबीसीचा स्टाफ फार मोठा आहे, कार्यक्रम वाढलेली म्हणून क्षमताही वाढलेली आहे. त्याच वेळी बातमी म्हणजे काय, याविषयीच्या व्याख्याही बदलल्या आहेत.

त्या काळात प्रसार माध्यमं केवळ विश्वासार्ह वृत्तसंस्था आणि सरकारी घोषणांवरच अवंलबून असायच्या. आता त्यात किती बदल झाला आहे. आता तर कुणाच्या मोठ्या व्यक्तीच्या एका ट्वीटवरूनही पुढचे दोन दिवस चालतील, एवढ्या बातम्या लिहिल्या-वाचल्या जातात.

आणि हो, आणखी एक ठळक बदल झाला आहे. त्या काळात निवेदकांची नावं गोपनीय राहायची, आणि ते कामावर येताना कधीकधी चक्क डिनर जॅकेट घालून यायचे.

हे सगळं ते त्या संगीत आणि नाटक कलाकारांसाठी करायचे जे आपल्या रंजक वेषभूषेत संध्याकाळी लोकांचं मनोरंजन करायचे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)