कोरोना व्हायरस : जग कधी असं दिसेल, याची कल्पनाही केली नव्हती...

कोरोना व्हायरसचा उद्रेक जगभरात झाल्यानंतर लोकांचं आयुष्य बदललं आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत, आणि व्हाईट हाऊसपासून डाऊनिंग स्ट्रीटपर्यंत, सर्वांनाच हादरवून सोडणाऱ्या या आरोग्य संकटामुळे गेल्या आठवड्यात काही भन्नाट तर काही कल्पनासुद्धा केली नव्हती, असे क्षण पाहायला मिळाले. अशाच काही क्षणांवर एक नजर या फोटोंच्या माध्यमातून...

मुंबई

महाराष्ट्रात सध्या रुग्णांचा आकडा जवळपास 1,900 आहे, मात्र त्यापैकी एकट्या मुंबई महानगर क्षेत्रातून आतापर्यंत हजारहून अधिक रुग्ण सापडले असून रुग्णांची ही संख्या तर दिवसागणिक लक्षणीयरीत्या वाढतेय.

त्यामुळे आरोग्य सेवकांसह पोलीस कर्मचाऱ्यांनाही खबरदारीचा उपाय म्हणून असं सॅनिटाईझ करण्याचं काम सुरू आहे. दहिसर पोलीस स्टेशनमध्ये रविवारी मुंबई पोलीस एका निर्जंतुकीकरण टनलमधून जातानाचं हे दृश्यं.

थायलंड

कोरोना व्हायरसची लागण टाळण्यासाठी दोन नवजात बालकांना एका नर्सने असे चेहऱ्यावर शिल्ड लावले आहेत.

थायलंडच्या सुवर्णभूमी भागातील प्रिन्स हॉस्पिटलमध्ये हा फोटो काढण्यात आला.

युक्रेन

युक्रेनमधल्या राहिवका गाव परिसरातील चर्नोबिल आण्विक केंद्राजवळचं हे दृश्य. परिसरातील जंगलात वणवा लागून अशा प्रकारे धूर पसरला होता.

ब्राझील

ब्रझिलियाच्या कॅथेड्रलमध्ये होणाऱ्या पाम संडे मासमध्ये लोकांना भाग घेता आला नाही. त्यामुळे हा कार्यक्रम लोकांशिवायच घेऊन सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला.

मॅसेडोनिया

नॉर्थ मेसेडोनियातल्या स्कोप्जेजवळच्या झानिसिनो गावातलं हे मनमोहक दृश्य. एप्रिल महिन्यातल्या पौर्णिमेच्या दिवशी हा फोटो घेण्यात आला.

चीन

चीनमधल्या वुहानमध्ये, जिथून या साथीचा उद्रेक झाला, तिथे 8 एप्रिल रोजी लॉकडाऊन जवळजवळ 11 आठवड्यांनंतर उठवण्यात आला. मात्र आता चीनमध्ये नवे रुग्ण सापडत असल्यामुळे लोकांची चिंता वाढली आहे.

लॉकडाऊन संपवण्यात आल्यानंतर लोक आता कामावर परतू लागली आहेत. मास्क घातलेले हे लोक वुहान परिसरातील डाँगफेंग होंडाच्या कारखान्यात काम करत आहेत.

वेस्ट बँक

इजरायल-प्रशासित वेस्ट बँक परिसरातील हेब्रॉनमधला हा फोटो. पॅलेस्टिनमध्ये कोरोना व्हायरसमुळे घरात अडकलेल्या लहान मुलांचं मनोरंजन करण्यासाठी जोकर रस्त्यावर उतरले आहेत.

ब्रिटन

युकेचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना कोरोना व्हायरसची लक्षणं दिसून आल्यानंतर आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर वेस्टमिन्स्टर भागात सर विंस्टन चर्चिल यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला 'गेट वेल सून'चं पोस्टर चिकटवण्यात आलं आहे.

जॉन्सन यांना रविवारी हॉस्पिटलमधून सुटी देण्यात आली.

इक्वेडॉर

स्मशानभूमीसमोर मृतदेह ठेवून हे लोक अंत्यविधीसाठी वाट पाहात आहेत.

इक्वाडोर देशातील गायाक्विल शहरात कोरोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. इथं कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांवर अंत्यविधी करण्यासाठी रांगा लागल्या आहेत.

इंग्लंड

इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ यांनी कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर केलेलं भाषण सुमारे 2.4 कोटी लोकांनी पाहिलं. त्यांनी या लढाईत उभे असलेले पहिल्या फळीतील योद्धे, अर्थात आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तसंच लोकांनी एकजूट राहण्याचं आवाहन केलं.

इंडोनेशिया

इंडोनेशियातील बोगोरमधल्या द 101 हॉटेलचा हा फोटो. वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह प्रमुख कर्मचाऱ्यांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हॉटेलमध्ये हृदयाचा आकार बनवण्यात आला.

सर्व फोटोंचे हक्क त्या त्या फोटोग्राफर्सकडे संरक्षित.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)